टोक्याला हेरगिरी करायची सवय पूर्वीपासूनच आहे. ज्यावेळी टूलकीट टूलकिट हे नवे प्रकरण गाजू लागले त्यावेळी टोक्याला स्वस्थ राहवेना. मी माझा मित्र दगड्या याच्या मदतीने या सर्व प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा मोदींची सध्या होत चाललेली बदनामी टाळण्यासाठी मोदी-भक्तांनी ‘हे काँग्रेसने मोदींविरुद्ध रचलेले कुभांड आहे’ असा पद्धतशीर प्रचार सुरू केला. त्यासाठी मोदींविरुद्ध कोणते मुद्दे छापील प्रचारात घ्यायचे आणि काँग्रेसच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावातील काँग्रेसच्या लेटरहेडवरील ठरावात त्याची बेमालूम सरमिसळ करत काँग्रेसचा हा मोदींची प्रतिमा खराब करण्याचा तथाकथित डाव लोकांसमोर उघड करायचा ही त्यातील कूटनीती होती. पण ती फसली. आणि ही जोडाजोडीची बनवाबनवी सार्या जगाला कळली. हे टूलकिट प्रकरण भाजपवाल्यांच्या अंगाशी आले आणि मग मात्र त्यांची तारांबळ उडाली. परंतु खोट्याचे खरे आणि खर्याचे खोटे करण्यात माहीर असलेल्या महाराष्ट्रातील चंपागटाने पुढाकार घेऊन गुप्तपणे मोदींची प्रतिमा उजळ करण्यासाठी ‘बुल किट’ तयार केले. त्या गुप्त बैठकीला मी मोदीभक्त म्हणून खास बनवून घेतलेल्या वेगळ्या चेहर्याचा रबरी मास्क लावून उपस्थित होतो. नमो नम: म्हटले की आपलाच माणूस समजून ते प्रवेश देतात. त्याप्रमाणे त्या टोळक्याच्या बैठकीत शिरलो.
आत चंपादादा, सॅडणवीस, बोंबीई बँकेचे खारेकर, खळखळकर, घनघंटीवार, पेल्हार, घाटकोपरचे तांबडेबाबा आदी मंडळी उपस्थित होती. चंपादादांनी ठराव वाचून दाखवला. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर त्यांच्या उलट्या पध्दतीनुसार त्यावर नेहमीप्रमाणे निरर्थक चर्चा सुरू झाली. त्या ‘बुल किट’ची एक प्रत मी केव्हाच खिशात घातली होती. एका कोपर्यात बसून त्यांनी वाटलेल्या फरसाण-जिलेबीच्या प्लेटवर ताव मारत मी ती वाचत होतो आणि पोट धरून हसत होतो. त्याचे शीर्षक होते ‘टूलकिट विरुद्ध बुलकिट’ पुढे एकेक मुद्दे पुढीलप्रमाणे होते.
१) कोरोना आणि मोदींचा काहीही संबंध नाही. कोरोना या कलियुगात येणारच होता हे प्राचीन ग्रंथात ऋषीमुनींनी संस्कृतमध्ये लिहूनच ठेवले आहे.
२) उलट मोदींनी थाळ्या वाजवण्यास सांगितल्यामुळे त्या आवाजाला वैतागून कोरोनाचे करोडो विषाणू चीनमध्ये परत गेले.
३) परमपूज्य रामदेवबाबा यांनी कोरोनावर अॅमलोपॅथिक औषधांचा काहीही उपयोग होणार नाही हे मोदींना आधीच सांगितले होते. ऑक्सिजन वाढवण्याची योगासने कागदावर आकृत्यांसह दिली होती. पण ट्रम्पेट भेटीच्या वेळी तो कागद ट्रम्पेट यांनी चोरला.
४) गंगा नदीत सापडलेले मुडदे हे कोरोनाचे बळी नसून पाकिस्तान आणि चीनने मोदींना बदनाम करण्यासाठी त्यांच्या देशातील कोरोनाने मृत पावलेल्या लोकांचे मुडदे हवाई मार्गाने गंगेत टाकले आहेत.
५) जे थोडे लोक कोरोनाने मृत झाल्याचे सांगतात त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर भारतातील या दुसर्या पोलादी पुरुषाच्या अंत:करणाला खरोखरच पाझर फुटला आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आजही थांबलेले नाही. खोटे अश्रू म्हणून त्याची टिंगल करू नका. हेच अश्रू मोदीजल म्हणून लोक प्राशन करतील.
६) दया, क्षमा, शांती हा मोदींचा स्वभाव आहे. त्यानुसारच त्यांनी काही इतर देशांना मोठ्या प्रमाणात लसपुरवठा केला. जेव्हा मानवता त्यांना साद घालते तेव्हा ते कसलाच स्वार्थी विचार करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मानवता धर्म हाच खरा धर्म.
७) गुजरात आणि उत्तर प्रदेशातील मृतदेहांच्या पेटलेल्या चितांची दृश्ये पुन्हा पुन्हा प्रसारमाध्यमातून दाखवली जातात ती केवळ मोदींची बदनामी करण्यासाठी.
८) मदत देण्याच्या बाबतीत मोदी कोणत्याच राज्यावर अन्याय करत नाहीत. आताही ते प्रत्येकाच्या खात्यात मागचे १५ लाख आणि आताचे पाच लाख मिळून २० लाख रुपये टाकणार आहेत.
खाली सर्वांच्या सह्या होत्या. मी ‘आ बैल मुझे मार’ असे मनात म्हणत तो ‘बुल किट’चा कागद घेऊन सटकलो.