पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जीनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवले आहे. तर कोरोनाच्या दुसर्या लाटेनेही मोदींजीचा देशभर पराभव केला आहे. थोडक्यात मोदी लाट ओसरली आहे. खरे तर नियती सर्वश्रेष्ठ आहे. कोणीही अजिंक्य नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला आलेले नाही. आम्ही कोरोनाला हरवलेय असे पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे जगाला सांगितले होते. आज भारतातील कोरोनाच्या हाहाकारापासून सारे जग हादरले आहे. भयभीत झाले आहे. हरिद्वारचा कुंभमेळा, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांतील प्रचारसभा, निवडणूक मेळाव्यांमुळे आज बंगालसह देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. याला केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगही जबाबदार आहे.
आता कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. दुसर्या लाटेने चांगलाच धडा शिकविला आहे. खरे तर कोरोनाच्या पहिल्या लाटेतच केंद्र सरकारसह राज्य सरकारांनी नियोजन तयार केले असते, तर लाखो जीव वाचले असते. गंगानदीतून कोरोनामुळे मरण पावलेल्यांची प्रेते वाहत आहेत. गंगा नदीही अपवित्र झाली आहे. कुंभमेळे, निवडणूक मेळावे झाले नसते तर कोरोना इतका वाढला नसता. सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. लोकांना औषधे मिळत नाहीत. सरकार काळाबाजार थांबवीत नाही. सुप्रीम कोर्टाने अनेक हायकोर्टानी ताशेरे, तेही कठोर शब्दात मारल्यानंतर जगातील नामवंत वृत्तपत्रांनी कठोर शब्दात जहरी टीका केल्यानंतर पंतप्रधान मोदी सरकारला जाग आली. सरकारी व्यवस्थाही कामाला लागली.
पंतप्रधान मोदींजीनी मनावर घेतले आणि देशाचा विचार केला तर फार बरे होईल. कोरोना हे राष्ट्रीय संकट आहे. उत्तर प्रदेशात भाजप राजवट आहे. संन्यासी असलेले योगीजी मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानपदावर दोन वेळा संधी मिळूनही नरेंद्र मोदीजी गंगा नदी शुद्ध करू शकले नाहीत. उलट थोडीफार पवित्र शुद्ध असलेली गंगा नदीही कोरोनामुळे आणखी अस्वच्छ व कमालीची अपवित्र झाली आहे. हे चांगले दिवस नाहीत. अत्यंत वाईट दिवस आहेत.
– आर. के. मुधोळकर, नांदेड
फक्त ‘गुजरातचे पंतप्रधान’!
तोक्ते वादळाने गुजरातप्रमाणे महाराष्ट्रासह काही राज्यांना जोरदार तडाखा दिला. कोणताही भेदभाव केला नाही. पंतप्रधान मोदींनी मात्र फक्त गुजरात राज्याचाच दौरा केला, हवाई पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला आणि गुजरातला एक हजार कोटींची मदत जाहीर केली. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. गुजरातविषयी अधिक प्रेम साहजिकच आहे. आज मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रही देशातच आहे. गुजरातसोबत महाराष्ट्राचाही दौरा मोदीजींनी केला असता तर पंतप्रधानपदावर मोदी आणखी मोठे झाले असते. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत असा संदेश गेला असता. मोदीजी गुजरातचे पंतप्रधान आहेत अशी टीकाही झाली नसती.