मध्यंतरी जुने अर्थात डिजिटल कॅमेराचे आणि आताच्या मोबाईल कॅमेराच्या काळातले, फोटो बघता-बघता सहजच एक गोष्ट लक्षात आली की कोणत्याही सण-सोहळ्याचे फोटो त्यावेळच्या पक्वान्नाच्या फोटोशिवाय अपुरे वाटतात. गणपतीच्या फोटोत मोदक, दिवाळीचा फराळ, दसर्याचं श्रीखंड पुरी वगैरे कसं साग्रसंगीततेचे समाधान देतात नं? माझ्या वाढदिवसाच्या फोटोत आलटून पालटून गुलाबजाम आणि चिरोट्यांची वर्णी लागलेली दिसली, त्यातून काही गोष्टी कशा नकळत रुजतात मनात याची जाणीव झाली.
लहानपणापासूनच माझ्या वाढदिवसाची सहसा ठरलेली ही दोन पक्वान्नं. मनापासून आवडणारी. गुलाबजाम बनवणं तर तुलनेत सोप्पं आणि आजकाल बाजारात बारा महिने तेरा त्रिकाळ उपलब्ध असतात ते, अगदी किराणा मालाच्या दुकानातही पॅक डबे मिळतातच की. अर्थात घरच्या कोणत्याही ताज्या पदार्थांची मजा काही औरच! त्या बाबतीत चिरोटे थोडे खानदानीपणा जपून आहेत त्यांचा! बाजारात ठरावीक ठिकाणी मुख्यतः पिठीसाखर लावलेले चिरोटे मिळत असले तरी पाकातले चिरोटे मात्र घरोघरीच जास्त बनतात!!
घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात बनणारे हे चिरोटे ही माझ्या आजीची आणि आईची खासीयत! तोंडात शब्दशः विरघळणारे आणि पहिल्याच घासात खाणार्याला मनोमन सुखावणारे चिरोटे मी त्यांच्याकडूनच शिकलो. सारख्या प्रमाणात म्हणजे प्रत्येकी एक वाटी बारीक रवा व मैदा, चार लहान चमचे कडकडीत गरम तुपाचे मोहन आणि थोड्या किंचित आंबटसर दह्यात, शक्यतो निरश्या दुधात किंवा पाण्यात चवीला थोड मीठ टाकून घट्ट भिजवायचे. रवा मुरण्यासाठी हा भिजवलेला गोळा किमान अर्धा तास तरी तसाच राहू द्यावा. साटा बनवण्यासाठी साजूक तुपात तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर मिसळून त्याची सहज पसरेल, पण ओघळणार नाही अशी पेस्ट बनवावी. हा साटा लावला नं की छान पापुद्रे सुटतात चिरोट्यांना. रवामैद्याचा गोळा छान मळून त्याचे पोळीच्या गोळ्यापेक्षा मोठे आणि एकसारखे गोळे करून घ्यावेत. गरज वाटली तर पोळपाटाला आणि लाटण्याला किंचित तुपाचा हात लावून त्या गोळ्यांच्या जाडसर आणि एका आकाराच्या एकेरी पोळ्या लाटाव्या, कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सहा पोळ्या; आधी बनवलेला साटा मध्ये लावून एकावर एक ठेवाव्यात आणि त्यांची वळकटी करावी. त्या जाडसर वळकटीला हाताने एकसारखं करून आवडीनुसार लहानमोठ्या लाट्या कापून घ्याव्या. कापलेला भाग वर दिसेल अशी लाटी ठेऊन मध्यम जाडीचे चिरोटे लाटावेत आणि तुपात मध्यम आचेवर तळून घ्यावेत. जेवढा रवामैदा घेतला असेल तेवढीच साखर, ती बुडेल एवढ्या पाण्यात घालून जाड बुडाच्या भांड्यात दोन तारी पाक करावा, या पाकात थोडा लिंबाचा रस, वेलदोड्याची पूड आणि केशर घालावे. तळलेले चिरोटे पाकात बुडवावे आणि दुसरा घाणा तळून होईपर्यंत तसेच राहू द्यावे. पुढचा घाणा तळून झाला की पाकातले चिरोटे ओळीमध्ये उभे रचावेत म्हणजे अतिरिक्त पाक निघून जातो आणि एकदम योग्य गोडीचे, छान अलवार चिरोटे तयार होतात! अर्थात आवडीनुसार पाकात बुडलेले ओलसर चिरोटे पण खातात!
स्वतःला फारशी मूळ चव नसलेले हे चिरोटे एकदा का पाकात मुरले की अंतरबाह्य मधुर बनतात. त्यांचा एक एक पदर उलगडून खायची मजा वेगळीच! पाकाशी तादात्म्य पावलेले, खाल्ल्या जाणार्या प्रत्येक पापुद्र्याबरोबर स्वतःचं अस्तित्व मागे सोडणारे आणि खाणार्याच्या तोंडावर अवीट गोडी पसरवणारे हे चिरोटे जगण्याचे एक मर्म सांगतात बरे!!
माणसाच्या जीवनाचा उद्देश जर ईश्वरप्राप्ती आहे, तर तो साधण्यासाठी त्याचे गोड नाम आपल्या वाणीवर, मनोबुद्धीत असे मुरले पाहिजे, जसा चिरोट्यांमध्ये पाक. मूळच्या फारशा नसलेल्या चवीला खुलवणार्या साखरेच्या गोडीप्रमाणेच नामामृताची गोडी आयुष्याला दिशा देते. देहाच्या वृथा अभिमानाबरोबर बाकी षड्रिपु, अहंकार आपोआपच त्या पापुद्र्यांप्रमाणे विरघळत जातात नी भरून राहतो, अवीट गोडी देतो तो नामामृताचा गोडवा! स्वतःबरोबरच संपर्कात येणार्या सर्वांनाच सुखावणारा, हवाहवासा वाटणारा. नामाची गोडी हा पहिला टप्पा असला, तर त्यावरील दृढ विश्वास ही पुढची पायरी असते. सीतामाईच्या शोधात लंकेला जाण्यासाठी पूल बांधताना वानरसेना जेव्हा प्रत्येक दगडावर श्रीरामाचे नाव लिहून तो दगड समुद्रात टाकायची. तो दगड तरंगू लागे. मात्र स्वतः श्रीरामांनी टाकलेला दगड बुडाला, कारण त्या नामाप्रतीची भक्ती व श्रद्धा वानरसेनेत प्रबळ होती. मात्र स्वयं श्रीरामांच्या मनात त्याबद्दल शंका होती. एकदा का मन निःशंक झालं की नामाच्या गोडीबरोबर त्या परमअस्तित्वाची साक्ष पटायला लागते मनाला. अंतरबाही तोच भरून उरतो आणि त्याच्याच इच्छेने, त्याच्याच दिशेने, त्याचीच योजना अंमलात आणताना तो आणी मी असा भेदच नाहीसा होतो. परमेशाचे ते मधुर नाम घेऊन आणि त्यावर विश्वास ठेऊन केलेली प्रत्येक कृती नकळत आपल्याला सहाय्य करते ध्येयप्राप्तीसाठी. नश्वर देहाच्या बंधनाचा वापर ती गोडी जाणून जोपासण्यासाठी केला की हा देह पण त्याचेच मंदिर बनतो, त्याच्याच अस्तित्वाची खूण बनतो, अंतरबाह्य गोडव्याच्या ह्या साथीनेच, देहाचा शेवटचा दिवसही गोडच होतो!!