बामणी कावा काय असतो हे रोज दिवसरात्र अनुभवत असलेल्या श्रीधरपंतांना ब्राह्मणेतरांचं दु:ख समजायला उशीर लागला नाही. त्यानंतर मात्र ते सक्रिय झाले. त्यांनी १९२७च्या गणेशोत्सवात अस्पृश्यांचा मेळा थेट गायकवाड वाड्यातल्या गणपतीसमोर उभा केला. प्रबोधनकार या क्रांतीचे साक्षीदार होते.
– – –
तेव्हा पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे खूप प्रसिद्ध होते. सन्मित्र मेळ्यासारखे ब्राह्मणी मेळे होतेच. त्याला उत्तर देण्यासाठी जेधे जवळकरांनी छत्रपती मेळा सुरू केला. त्याला प्रतिसाद म्हणून बहुजनांमधून अनेक मेळे सुरू झाले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पांडुरंगराव राजभोजांचा श्रीकृष्ण मेळा होता. तेव्हा अस्पृश्य गणले जाणारे तरुण या मेळ्यात असायचे. पण या मेळ्याला बहुजनांना गणपतीसमोर प्रवेश नसायचा. ब्राह्मणेतर नेते आणि बाबासाहेबांच्या संपर्कात आलेल्या श्रीधरपंत टिळकांची मेळ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली होती. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गायकवाड वाड्यातल्या गणपतीसमोर अस्पृश्यांच्या मेळ्याचं आयोजन करण्याची घोषणा केली आणि पुण्यातल्या सनातन्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
केसरी कंपूने यावर जिल्ह्याधिकार्याकडून मनाई हुकूम बजावण्याचा प्रयत्न केला. पण टिळक बंधू त्याला भीक घालत नसल्याने गणपतीला अस्पृश्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून मखराभोवती लोखंडी जाळीचा पिंजरा लावून त्याला मोठं कुलूप लावलं. टिळक बंधू ते कुलूपही तोडण्याची भीती म्हणून कोर्टाचा बेलिफ नोटीस घेऊन वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला. पण ऐकतील ते टिळक बंधू कसले? प्रबोधनकारांनी त्यांच्या आत्मचरित्रात हे सविस्तर वर्णन करून ठेवलं आहे. त्यापुढचा वृत्तांतही त्यांच्याच शब्दात वाचायला हवा…
लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात!
सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊ नि बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलंस तर याद राखून ठेव, असं धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेला. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसताच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळक बंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजर्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदर्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला- अहो नाझर साहेब, आमच्या थोरं वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केली ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजर्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार? आला तसा निमूट परत गेला.
याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार, असे बजावून रामभाऊने बापूला माझ्याकडे जाऊन बसायला पिटाळले. घडल्या प्रकाराची साग्रसंगीत हकिकत बापूने सांगितली. सबंध दिवस तो माझ्याकडे होता.
संध्याकाळी दिवेलागणी होताच तो पुणे कँपात भोकर वाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन तो प्रबोधन कचेरीवर आला. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. सदाशिव पेठेसारख्या बामणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता.
इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोर्या सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५, १०-१० मिनिटांनी तिकडे फेर्या घालून रामभाऊच्या सूचना आणीत होता. खुशाल या, असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी उसळली. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती.
मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीस पार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जण्टाने दोन्ही हात पसरून ‘यू कॅनॉट एण्टर द वाडा‘ असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलिस नि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्यगायनाला जोरात सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिसीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटिसीचा कागद हातात घेतला आणि टरटर फाडून टाकला.
मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. मी चालू केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, ‘गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी‘, या मथळ्याखाली सबंध पानभर हकिकत लोकहितवादी साप्ताहिकात छापून वक्तशीर बाहेर पडली.
प्रबोधनकारांनी केलेलं हे वर्णन ही महाराष्ट्रातल्या क्रांतीच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या घटनेची नोंद आहे. ज्या गायकवाड वाड्यातून ब्राह्मणी कंपू आपल्या वर्चस्वाचे साखळदंड करकचून आवळत असत, त्या गायकवाड वाड्याचं सोवळं ओवळं तोडत अस्पृश्यांचा मेळा थेट टिळकांच्या गणपतीसमोरच पोचतो, हे त्या काळात धक्कादायक होतं. खुद्द लोकमान्यांच्या मुलाने पुणेरी ब्राह्मणांच्या किल्ल्याचे मजबूत वाटणारे बुरूज ढासळवले होते. श्रीधरपंतांच्या या उपक्रमामुळे १४ सप्टेंबरला अस्पृश्यांनी जाहीर सभा भरवून त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना श्रीधरपंतांनी सनातनी ब्राह्मणांवर सडकून टीका केली. २ ऑक्टोबरला अस्पृश्य विद्यार्थ्यांचं संमेलन पुण्यात बाबासाहेबांच्या अध्यक्षतेत भरलं होतं. त्यालाही श्रीधरपंत उपस्थित होते. त्याआधी मार्च महिन्यात महाडच्या चवदार तळे सत्याग्रहातही श्रीधरपंतांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला होता. याच प्रसंगी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचंही दहन केलं होतं, हेही लक्षात ठेवायला हवं.
१९२७ याच वर्षी महात्मा फुलेंचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात मुंबईत गिरगावात प्रार्थना समाज आणि लोअर परळच्या तालचेरकर वाडी इथे दोन मोठ्या सभा झाल्या. त्यात श्रीधरपंत मुख्य वक्ते होते. त्यात त्यांनी महात्मा फुलेंचा पुढील शब्दांत गौरव केला, महात्मा फुले हे आपल्या हिंदूधर्मीयांचे मार्टिन ल्युथर होत. ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध म्हणजे ब्राम्हण्याविरुद्ध त्यांची तक्रार ही आपल्याकडील प्रोटस्टॅन्टिझम होय आणि गेल्या ५० वर्षातील सत्यशोधक समाजाची चळवळ ही आमच्या इकडील रेफर्मेशनची चळवळ होय, हे तरुण पिढीने लक्षात ठेवावे. महात्मा फुले हे १८२७ साली जन्मले आणि ईश्वरी योगायोग असा की त्याच साली पुण्यातील पेशव्यांचा शनिवारवाडा- मोठा भव्य सात मजली टोलेजंग राजवाडा एकाएकी जळून खाक झाला. पेशवाईचे हे मूर्त स्मारक नेमके त्याच वेळी नामशेष व्हावे याला मी ईश्वरी योगायोग का म्हणतो हे आपल्या ध्यानी आलेच असेल.
हा तो काळ होता, जेव्हा महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पुणे नगरपालिकेने बहुमताने फेटाळला होता. पालिकेतल्या भाषणांत महात्मा फुलेंना हिंदू धर्मविरोधी तर म्हटलं गेलंच, पण त्यांच्या चारित्र्यावरही चिखल उडवला गेला. जोतिबांच्याच नातेवाईकांकडून त्यांची निंदानालस्ती घडवण्यात आली. हे सगळं स्वतःला टिळकवादी म्हणवणारे करत होते. त्यांना वाटत होतं की त्यांनी लढाई जिंकली आहे. पण साक्षात लोकमान्यांच्या मुलाच्या एका भाषणाने ही बाजी उलटली. या भाषणावर महान संपादक जागृतिकार पाळेकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचं शीर्षक होतं, काळाने सूड उगवला. त्यात ते लिहितात, श्रीधरपंत चिपळूणकर टिळक संप्रदायाच्या वातावरणात जन्मले व वाढले, परंतु त्यांनी जोतिबांच्या कार्याचे रहस्य ओळखले.
टिळकवाद्यांच्या डोळ्यात खुपणार्या छत्रपती शाहू महाराजांचाही श्रीधरपंतांनी सामाजिक विषमता कायम राखणं हा भिक्षुकशाहीचा स्वार्थ! या शीर्षकाच्या लेखात थोर विभूती म्हणून गौरव केला आहे. ज्ञानप्रकाश, विविधवृत्त, रत्नाकर या आघाडीच्या नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. एका लेखात श्रीधरपंत लिहितात, भिक्षुकवर्ग हा आपखुषीने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या डोलार्याखाली सुरूंग लावण्यास कधीही तयार होणार नाही. ते काम ब्राह्मणेतर चळवळीचे आहे व त्यांनी ते मोठ्या शिताफीने व धिटाईने पार पाडले पाहिजे. यावरून त्यांच्या लिखाणाने त्या काळात किती खळबळ उडवली असेल, याची कल्पना करता येते.
जन्माने ब्राह्मण असूनही आणि कट्टर ब्राह्मणवाड्यांच्या गराड्यात राहूनही श्रीधरपंत बहुजनवादी बनले होते. त्यांच्या या प्रवासाला दिशा देण्यात प्रबोधनकारांचा सहवास हे एक मुख्य कारण होतं. अर्थातच त्याचे पुरावे देता येणार नाहीत. दिवस दिवस प्रबोधनच्या कचेरीत राहणार्या श्रीधरपंतांवरचा प्रबोधनकारांचा प्रभाव हा तर्कानेच समजून घ्यावा लागतो.