निवडणुकांचे निकाल लागल्यावर पेट्रोल १३५ रुपये लिटर होणार आहे म्हणे; तुम्ही टाकी फुल केलीत की नाही?
– सुुदाम बनसोड, शेलार वाडी
नाही… मी चालतच जाणार आता सगळीकडे!
युक्रेनची दोन तिकीटं मिळाली आहेत फक्त दोन हजारांत. १० दिवसांची टूर आहे. युद्ध प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि पकडले गेल्यास रशिया पण फुकटात पाहून होईल… येताय का?
– तात्या शिंदे, बाणेर
आधी घरी विचारा… ९च्या पुढे बाहेर जायचं असेल तर संध्याकाळपासून मनधरणी करणारे तुम्ही… युद्ध कसलं पाहताय?
हिंदी वेबसिरीजमध्ये अनेक मराठी कलावंत झळकताना दिसतात, उत्तम अभिनय करताना दिसतात. तुम्ही का नाही जात वेबसिरीजमध्ये? जबरदस्त काम कराल.
– सायली रिसबूड, नवेगाव
पीआर कमी पडतोय…
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे, असं विंदा करंदीकर म्हणाले, पण हे वाचून आपल्याकडचे लोक हात काढून घेणार नाहीत का देणार्याचे!
– अमित सोळकर, पठाणवाडी
हो… त्यात पहिले तुम्ही!
माणूस एकीकडे परग्रहावरची जीवसृष्टी शोधायला यानं पाठवतो, दुसरीकडे आपल्याच ग्रहावरची जीवसृष्टी नष्ट करणारी युद्ध करतो… माणूस खरंच जगातला सगळ्यात हुशार प्राणी आहे का?
– रेवती दुर्गुळे, सावनेर
नाही… मूर्ख म्हणा फार तर!
बहिणाबाईंनी प्रश्न विचारला होता, अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस? तुमच्याकडे आहे या प्रश्नाचं उत्तर?
– पंढरी गुर्जर, वाशी
तो कधीच होणार नाही… झाला तर कथा, कादंबर्या, फिल्म, सिरीयल कशा झाल्या असत्या आणि तुम्ही करमणूक कशी करून घेतली असतीत?
‘ण’च्या जागी ‘न’ उच्चारणार्यांना अशुद्ध बोलणारे म्हणून हसतात, आपल्याकडे काही लोक. अशाने मराठी भाषा टिकणार कशी?
– अशोक सोनार, बेळगाव
जे टिकण्याच्या योग्यतेच असतं आणि त्या समाजात टिकवून ठेवलं पाहिजे असं वाटणारी माणसं असतात तरच ते टिकतं.
अष्टपैलू कलावंत किशोर कुमारचं कोणतं रूप तुम्हाला अधिक भावतं? गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, लेखक की दिग्दर्शक?
– नीहार कोळंबकर, भायखळा
गायक
मालवणी नाटक मच्छिंद्र कांबळी यांनी लोकप्रिय केलं. तुम्ही बाणकोटी नाटक लोकप्रिय करू शकाल… कशी वाटते आयडिया?
– राजेश कदम, विक्रोळी
नाही… ते कळणारी, त्या भाषेविषयी आस्था असणारी माणसं नाहीत.
यंदा होळीत तुम्हाला गार्हाणे घालायला सांगितलं तर ते काय असेल?
– शकूर बागवान, सावंतवाडी
कल्यान होवं ते सग्ल्यांचं!
तुम्हाला गाव आवडतं की मुंबई आवडते?
– किरण साने, डोंबिवली
मुंबई
सुबह का भूला शाम को घर आया तो उसे भूला नहीं कहते, असे म्हणतात… मग म्हणायचं तरी काय अशा माणसाला?
– शरद खाडिलकर, दादर
भोलाशाम