• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

किरीटाऽऽऽ येशील कधी परतूनऽऽऽ

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 10, 2022
in टोचन
0

दुसर्‍याही दिवशी माझा ईडीतला मित्र कावळ्या सकाळी पुन्हा आला. आला तो लज्जतदार नाश्ता घेऊनच. म्हटलं, माझा मानलेला परममित्र पोक्या फॉरेन टूरला गेल्यापासून हा कावळ्या तर दररोज माझी सोबत करायला देवाप्रमाणे येत नसेल ना! मी म्हटलं, कावळ्या, तुला तुझ्या ऑफिसमध्ये काही काम नाही का? सरळ दांड्या मारून इथे येतोस ते!
तो म्हणाला, आपण कुणाच्या बापाला घाबरत नाय. आपला स्वभाव तुला शाळेपासून माहीत हाय. आलं मनात की चाललो रानात. फक्त किरीटजी येतात तेव्हा मी तिथे हजर असतो. समोर फाइलींचा ढीग ठेवून. त्या फायलीत कसलेच, कागदपत्र नसतात. त्या फायलीत इंटरनॅशनल गाजलेल्या लेखकांच्या आणि लेखिकांच्या सस्पेन्स स्टोर्‍या ठेवून डोकं खुपसून वाचत बसलेला असतो मी. कंटाळा आला की कधी पिक्चर टाकतो तर कधी चौपाटीवर जाऊन बसतो.
परवा तर स्वत: किरीटजी आले होते माझ्याबरोबर चौपाटीवर हवा खायला. घामाने नुसते डबडबले होते. ऑफिसात आले तेव्हा त्यात ती कागदपत्रांची बोचकी, पोती, पिशव्या, हातात सुटकेस, गळ्यात शबनम झोळी, त्यातही कोंबलेली कागदपत्रं. मी म्हटलं सुद्धा, एवढं सगळं स्वत:बरोबर घेऊन फिरायला कंटाळा नाही येत? तर म्हणतात कसे, मी नेहमीच राष्ट्राच्या शिस्तबद्ध सैनिकासारखा काम करतो. एकदा का हाती पुरावा सापडला की आम्ही त्याची साथ शेवटपर्यंत सोडत नाही. ही कागदपत्रं म्हणजे माझी दोस्त आहेत. यांच्याच जिवावर मी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धापेक्षा मोठे युद्ध जिंकणार आहे आणि `किंग ऑफ ईडी’ हा मानाचा किताब मिळवणार आहे. त्यामुळे या कागदपत्रांशी असलेली दोस्ती तुटायची नाय. एवढं बोलून त्यांनी भर दुपारी चौपाटीवर सुटलेल्या गरम हवेत सूर लावला. ‘येऽऽ दोऽसऽतीऽऽ… हम नहीं छोडेंगे, छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगेऽऽ’ त्यांचा भसाडा आवाज ऐकून बाजूला भरलेली आमच्या भाऊबंदांची शाळाही सोडण्यात आली.
मी त्यांना म्हणालो, बहुतेकांनी त्यांच्या घरावर `ईडी’ची म्हणजे तुमची धाड पडणार याचा अंदाज येताच आपल्याकडील खंडीभर कागदपत्रं महापालिकेच्या कचरागृहातील गाड्यांमध्ये नेऊन टाकलीत. आपण तिथे जाऊन उत्खननास सुरुवात केलीत तर मोठमोठी घबाडं हाती लागतील. नाहीतर डायरेक्ट डंपिंग ग्राऊंडवर जाऊन शोधावी लागतील. हे ऐकताच किरीटजींच्या पायात हजारो हत्तींचं बळ आलं आणि म्हणाले, उद्याच्या उद्या मुंबईतील महापालिकेची सगळी कचरागृह पिंजून काढतो आणि हाती लागतील तेवढी लाखमोलाची कागदपत्रं शेकडो पोत्यात भरून ईडीच्या कार्यालयात आणून टाकतो. त्यातील काही निरुपयोगी ठरली तर त्याचे कागदी बिछाने किंवा उशा शिवून घेऊ म्हणजे फावल्या वेळात आपल्या मंडळींना कार्यालयात लोळायला बरं…
मला त्यांच्या बोलण्याचं एकीकडे हसायला आलं तर दुसरीकडे कौतुकही वाटलं. असा माणूस खरं तर आज युनोच्या महासंघात भारताचा प्रतिनिधी म्हणून हवा होता, असंही वाटून गेलं. त्यांनी तिथे रशिया आणि युक्रेनला अशी काही पाचर मारली असती की युद्ध थांबविण्याशिवाय त्यांना पर्यायच उरला नसता. इतका बुद्धिमान माणूस भाजपला मिळाला याचं खरं तर त्यांना कौतुक वाटायला हवं. चौपाटीवर आम्ही सर्व विषयांवर खुल्लमखुल्ला बोललो. त्यांनीही मनात काही आडपडदा काडपडदा न ठेवता माझ्याकडे मन मोकळं केलं. खूप आतल्या गोष्टी सांगितल्या. पक्षात आणि विशेषत: महाराष्ट्रात पक्षांतर्गत कशा लाथाळ्या सुरू आहेत, याचं साग्रसंगीत वर्णन केलं.
मी म्हटलं, राजकारण जाऊ दे चुलीत. आपण आता चौपाटीच्या कठड्यावर शुद्ध हवा खात बसलोच आहोत, तर राजकारण सोडून वैयक्तिक आवडीनिवडीवर बोलूया. मला सांगा, तुम्हाला राजकारण सोडून कशाकशाची आवड आहे?
– मला खाण्याची, गाण्याची, चित्र काढण्याची आणि फाडण्याची, चणेवाल्याकडे मिळतात ते भाजलेले चवदार दगड खाण्याची, कांद्याचा ज्यूस पिण्याची, जत्रेत पिपाणी वाजवण्याची, गुजराती नाटकात काम करण्याची, गुजराती नट-नट्यांना पुश करण्याची, गुजरातीला अभिजात का काय म्हणतात तो दर्जा मिळवून देण्यासाठी ईडीमार्फत प्रयत्न करण्याची, कधीतरी राज्यपाल नाहीतर राष्ट्रपती होण्याची, सिनेमात व्हिलनची भूमिका करण्याची, अशा अनेक आवडी आहेत. या आवडी म्हणजे स्वप्नंच असली तरी त्यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे. उद्या मी ज्युडो-कराटेच्या क्लासेसमध्ये नाव घालणार आहे. पुणे महानगरपालिकेत पायर्‍यांवर तुडवला गेल्यामुळे न सांगता येण्यासारख्या ठिकाणी अजून अंग ठणकते आहे. तुमच्या ओळखीचे कुठले मसाज सेंटर आहे का? आपण वेष पालटून जाऊ या. तुम्हीही मसाज करून घ्या. फ्रेश वाटेल… जाऊ आपण कुलाब्याला टॅक्सीने. तुमच्या माहितीतले एखादे गुजराती मसाज सेंटर बघा. रगडतातही चांगलं. आपण त्यांना भारीतलं रगडा-पॅटीस भेट म्हणून खायला नेऊया. पण मसाज करताना मास्क काढला तर चालतो ना?
– आता मी तुम्हाला काय सांगू! मी तिथे बाहेरच बसतो, पहारा करत. तुम्ही आरामात बाहेर या. पुण्यातली सगळी अंगदुखी नाहीशी झाली पाहिजे म्हणजे मी तुम्हाला कुलाब्यातील नवनवीन रंजक ठिकाणे दाखवीन. तिथेही तुम्हाला `ईडी’च्या धाडी घालता येतील.
– ही मात्र फस्क्लास आयडिया आहे. नंतर आपण ग्रँटरोडला गोल टॉकीजजवळ ज्ााऊ. अगदी आलिशान ठिकाणी. साहेब, मुजरा बघायचा तर तिथेच.
– मी गर्बा बघितलाय. मी खेळतोसुद्धा गर्बा. पण आता नवरात्र नाही ना!
– इथे आपण नाचायचं नाही. आपण लोडाला टेकून बसायचं आणि फक्त बघायचं. दिल खूष होणार साहेब. एवढं प्रचंड काम करता तुम्ही ईडीचं, पण थोडं तरी रिलॅक्स व्हा ना. एक दिवस जरी फ्रेश झालात तर दुप्पट जोमानं कामाला लागाल. गॅरंटी देतो मी.
एव्हाना किरीटजी फ्रेश झाले होते. म्हणाले, आता माझं डोकं संतुलित झाल्यासारखं वाटतं. मी म्हटलं, मला कळलं नाही. म्हणजे अजूनपर्यंत ते फिरलेलंच होतं? पण लक्षात ठेवा, अशी फिरलेली आणि भरकटलेली डोकीच अचाट ऐतिहासिक कामगिरी करून जातात.
तेवढ्यात त्यांचा मोबाइल वाजला. त्याला वायरलेसच्या आवाजाची रिंगटोन होती. त्या गडबडीत त्यांनी पाडायच्या आत तो मी घेतला. ईडीच्या ऑफिसात त्यांना तातडीने कॉल होता. मी ओरडून निरोप दिला, किरीटजी, ते बोंबलतायत- किरिटाऽऽ येशील कधी परतूनऽऽऽ

Previous Post

१२ मार्च भविष्यवाणी…

Next Post

नया है वह…

Next Post

नया है वह...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.