मदनला भेटून परत निघालेला यश चांगलाच हादरला होता. अर्चनाचे गेल्या काही दिवसात बदललेले वागणे, रात्री बेरात्री उठून तिचे खिडकीतून पिंपळाकडे पाहत बसणे, तिचे वागणे-बोलणे, खाणे-पिणे सगळेच त्याला आता कुठेतरी खटकायला लागले होते. तळहाताचा घाम रुमालाला पुसत तो बंगल्याच्या आवारात शिरला आणि घाईघाईने पळत आलेला वॉचमन त्याला धडकला.
– – –
तिन्हीसांजेची वेळ होती आणि हळूहळू बाहेर अंधार दाटायला सुरुवात झाली होती. खिडकीत बसलेल्या अर्चनाच्या मनावर मात्र कधीचाच काळोख दाटून राहिलेला होता. तिला बाहेरच्या अंधुक होत चाललेल्या प्रकाशाची जणू काही कल्पनाच नव्हती. तिचे डोळे उघडे होते; मात्र बाहेरच्या कुठल्याच दृश्याची नोंद तिच्या मेंदूला, मनाला होत नव्हती. जणू खिडकीत ठेवलेली एक बाहुलीच..
‘अरू.. ए अरू…’ तिच्या खांद्याला हलवत यशने हाक मारली आणि ती एकदम दचकून भानावर आली. तिने पटकन मागे वळून पाहिले. बेडरूम लख्ख प्रकाशाने उजळलेली होती आणि तिच्या प्रकाशात यशचा धास्तावलेला चेहरा तिला अजूनच लाजवून गेला.
‘बाप रे! संध्याकाळ देखील उलटायला आली की…’ ती घड्याळाकडे पाहत म्हणाली.
‘अरू, किती वेळ बसली होतीस इथे? लक्ष कुठे होते तुझे? अगं घराचे दार देखील सताड उघडे होते.’ त्याच्या प्रश्नावर अर्चना कसनुसे हसली फक्त. खरंच, तिला तरी कुठे माहिती होते की, ती किती वेळ इथे बसली होती ते.
‘तुझी तब्येत बरी आहे ना? आणि राधा कुठे गेली? इतक्या बेफिकिरीने कशी वागू शकते ती?’
‘अरे असेल इथेच कुठेतरी. मीच सांगितले होते तिला की, मला जरा एकटी सोड म्हणून.’
‘अगं पण म्हणून सगळा बंगलाच उघडा टाकून जायचे का? थोडी काळजी नको का तिला? इतका पगार कसला मोजतोय आपण तिला?’ यश आता चांगलाच चिडला होता.
‘असू दे रे… ती देखील दमते बिचारी. दिवसभर माझ्याच सेवेत असते. केअर टेकर कमी आणि बहीण जास्ती झाली आहे ती माझी.’ फिकटसे हसत अर्चना म्हणाली आणि तिने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेत हळुवार दाबले.
‘चल जरा बागेत चक्कर टाकायची?’ यशने प्रेमाने विचारले आणि तिचे डोळे लकाकले. पण पुन्हा एकदा बघता बघता तिची नजर मंदावली.
‘नको, मी बसते जरा वेळ इथेच..’ ती थकल्या स्वरात म्हणाली आणि पुन्हा एकदा तिची नजर खिडकी बाहेरच्या पिंपळावर विसावली आणि तिथेच गुंतून राहिली. यशने हताशपणे तिच्याकडे पाहिले आणि तो पडलेल्या खांद्याने बेडरूममधून बाहेर पडला.
यश बाहेर पडला आणि त्याचवेळी बंगल्यात शिरत असलेल्या राधावर त्याची नजर पडली. त्याने एकदा मागे वळून बेडरूमचा अंदाज घेतला. अर्चना अजूनही एकाग्रपणे पिंपळामध्येच गुंतून बसलेली होती. त्याने जवळजवळ धावतच राधाला गाठले आणि तिला एकदम मिठीतच घेतले; ती देखील आवेगाने त्याच्या मिठीत शिरली.
‘कुठे होतीस तू?’
‘यश.. संध्याकाळ झाली की खूप अस्वस्थ वाटते रे.. भीती वाटते इथे थांबायची.’
‘झाले तुझे पुन्हा सुरू?’
‘मी खरंच सांगते आहे यश. अरे मी देखील शिकली सवरलेली, आधुनिक काळातली स्त्री आहे. पण तरी मी तुला सांगते आहे की अर्चनाचे हे आजारपण काहीतरी वेगळे आहे… हे आजारपण नाहीच आहे खरेतर. तिला…’
‘तिला काय राधा? भूतबाधा झाली आहे? झपाटले आहे?’ यश तिरसटपणे म्हणाला आणि राधा ओठ घट्ट दाबून त्याच्याकडे पाहत राहिली.
‘यश आज अर्चनाने एकावेळी ११ भाकरी खाल्ल्या…’
‘काय?’ यश जवळ जवळ किंचाळला.
‘हो! आज डॉक्टर साहेब देखील जेवायला येणार म्हणून मी थोडा जास्ती स्वयंपाक बनवून घेतला होता. सगळा स्वयंपाक मी टेबलावर मांडला आणि त्यांना फोन करून यायची वेळ विचारून परत येईपर्यंत, भाकरीचा पूर्ण डबा मोकळा पडला होता आणि शेवटच्या भाकरीचे चार तुकडे करून अर्चना ते तोंडात कोंबत होती..’ सांगत असताना जणू ते दृश्य पुन्हा डोळ्यासमोर आल्यासारखी राधा घाबरली होती.
‘हे बघ तू शांतपणे बस. मी डॉक्टरांशी बोलतो यासंदर्भात.’
‘यश…’ अर्चनाची हाक आली आणि दोघे पटकन भानावर आले आणि बाजूला झाले.
‘काय गं अरु?’ यशने बाहेरुनच विचारले.
‘खूप भूक लागली आहे रे.. काहीतरी मस्त खायला करू का?’ दारापाशी येत अर्चनाने विचारले आणि यश आणि राधा दोघेही डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिले.
त्या रात्री अर्चनाने मस्त खमंग पावभाजी बनवली आणि मनमुराद खाल्ली देखील. त्यानंतर हट्टाने तिने यशबरोबर बाहेर जाऊन आइसक्रीम देखील खाल्ले.
आता मात्र यशची काळजी वाढायला लागली होती. मनातल्या मनात त्याने उद्या सकाळीच डॉक्टर मदनला गाठायचे ठरवले आणि त्याचा ताण थोडा हलका झाला.
—
‘यश, हा माझ्या औषधांचा परिणाम नाही. हे काही वेगळेच आहे. जी औषधं आपण ठरवली होती, त्यांचे परिणाम हे असे नसतात.’
‘काय बोलतो आहेस तू? अरे मग हे तिचे वागणे.. बोलणे..’
‘हे बघ, जी औषधं आपण चालू केली आहेत, त्या औषधांनी ती सतत अस्वस्थ व्हायला हवी, लहान सहान गोष्टींनी दचकायला हवी, तिला सतत वेगवेगळे भास चालू व्हायला हवेत. पण अशी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत असे तू म्हणतो आहेस. काल मी आलो होतो, तेव्हा देखील ती मला पूर्णपणे नॉर्मल वाटली.’
‘मदन, मग हे नक्की आहे तरी काय?’
‘तू का काळजी करतो आहेस? तुला जे हवे आहे त्या दिशेनेच सगळे चालले आहे ना? तुझ्या मार्गातला काटा हळूहळू दूर होतोय ना?’
‘तुला कळत नाहीये मदन.. मला तिने नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्या करायला हवी आहे. ती वेडी किंवा शहाणी, मला कुठल्याच प्रकारे ह्या जगात नको आहे.’
‘आय नो यश! पण तुला थोडा धीर धरावा लागेल. मी काही थेट तिला विष पाजू शकत नाही. माझे देखील करिअर आहे, भविष्य आहे. भले तू मला एक कोटी देणार आहेस, पण उद्या मी तुरुंगात गेलो, तर त्या पैशाला चाटायचे आहे का?’ मदनचा स्वर आता थोडा त्रासला होता.
‘कूल, कूल… मी थोडा अपसेट झालो आहे हे खरे आहे, पण हे काय चालू आहे ते मलाच कळत नाहीये.’
‘मी स्वत: डॉक्टर आहे यश, पण मला देखील चक्रावल्यासारखे झाले आहे. गेल्या महिन्यापर्यंत शरीराने सुकलेली, गाल आत गेलेली आणि फिकट पडलेली अर्चना आता एकदम निरोगी आणि तंदुरुस्त झालेली आहे. इव्हन, तिच्या शरीरातले रक्त देखील आश्चर्यकारकरीत्या वाढलेले आहे. यश आपण एकदा तिच्या सगळ्या तपासण्या पुन्हा करून घ्यायच्या का?’
‘तुला योग्य वाटते ते कर. पण मी आणि राधा दोघेही आता फार वाट बघू शकत नाही!’
‘मला कल्पना आहे यश. तू राधाला भेटायच्या आधीपासून ती माझ्याकडे नर्स म्हणून काम करते आहे. तिला प्रत्येक गोष्टीची किती घाई असते, हे मी चांगले ओळखतो,’ हसत हसत मदन म्हणाला आणि वातावरणाचा ताण जरा हलका झाला.
—
‘आर यू सीरियस मदन?’
‘येस १०० टक्के! त्याने हातातले रिपोर्ट यशसमोर फेकले.
लॅब माझीच असल्याने, मी ’कॉम्प्युटर गंडलाय’ असे म्हणत हे सगळे कसेतरी निस्तरले आहे. पण पुन्हा एकदा रात्री मी स्वत: सगळ्या तपासण्या पुन्हा एकदा करून बघितल्या आहेत. अर्चनाच्या शरीरात दोन प्रकारचे रक्त आढळले आहे आणि हे पूर्णपणे अनैसर्गिक आहे!’ थरथरत्या हाताने कपाळावरचा घाम पुसत मदन बोलला आणि यश हादरला.
मदनला भेटून परत निघालेला यश चांगलाच हादरला होता. अर्चनाचे गेल्या काही दिवसात बदललेले वागणे, रात्री बेरात्री उठून तिचे खिडकीतून पिंपळाकडे पाहत बसणे, तिचे वागणे-बोलणे, खाणे-पिणे सगळेच त्याला आता कुठेतरी खटकायला लागले होते. तळहाताचा घाम रुमालाला पुसत तो बंगल्याच्या आवारात शिरला आणि घाईघाईने पळत आलेला वॉचमन त्याला धडकला.
‘रामसिंग क्या हुआ?’
‘मैं यहां काम नहीं करेगा साहेब.. वो भूतनी है!’ रामसिंग किंचाळत म्हणाला आणि यशला ढकलून पळत सुटला. ‘आता ह्याचे डोके का फिरलंय?’ असा विचार करत यश बंगल्यात शिरला आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे पायच थिजले. समोर राधा बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती आणि अर्चना पिंपळाच्या फांदीने तिला वारा घालत होती.
‘यश, आय एम प्रेग्नंट.. मी आई होणारे..’ राधा त्याला बिलगत म्हणाली आणि यश हादरला.
‘काय बोलते आहेस तू हे? अगं आपण सगळी काळजी घेत असताना..’
‘ते नाही मला माहिती. पण आता ह्या अवस्थेत मी जास्ती मानसिक ताण सहन नाही करू शकणार यश. तुझी बायको अमानवी आहे यश. आपण तिचे काही वाकडे करू शकणार नाही यश..’
‘राधा वेडी झालीयेस का तू?’
‘माझ्यावर विश्वास ठेव यश. त्या दिवशी तिला शोधत मी बंगल्याच्या मागच्या बाजूला गेले होते. ती एकटक पिंपळाच्या झाडाकडे पाहत उभी होती. मी तिला हाका मारत तिच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा ती गर्रकन मागे वळली. यश.. तिच्या हातात एक मेलेला उंदीर होता यश, तिने त्याला अर्धे खाल्ले होते..’ त्या आठवणीने आता देखील राधा शहारली आणि यशला घट्ट बिलगली. तिचे बोलणे ऐकून यश देखील बावचळला होता. त्याचे डोकेच सुन्न झाले होते. एकतर आधी ही अर्चना भुताळली होती आणि त्यात आता हे राधाने नवे प्रकरण.
—
अर्चना सुन्नपणे समोर बसलेल्या इन्स्पेक्टरकडे पाहत होती. आपण बोलतोय ते ह्या बाईला समजते तरी आहे का? हेच त्या इन्स्पेक्टरला कळत नव्हते. बहुदा ह्या दुविधेतून त्याची सुटका करायला म्हणून डॉक्टर मदन तेवढ्यात तिथे आला.
‘हॉरिबल..’ मदन धप्पकन कोचात बसत म्हणाला.
‘डॉक्टर..’ हताशपणे त्याच्याकडे बघत अर्चना पुटपुटली आणि पुढे होत मदनने तिला सावरले.
‘विषप्रयोग झालाय त्याच्यावर…’ थरथरत्या आवाजात मदन बोलला.
‘तुम्हाला कसे कळले?’ त्याच्याकडे पाहत इन्स्पेक्टर संशयाने विचारता झाला.
‘मी डॉक्टर आहे सर. आणि यशचा निळा पडलेला चेहरा सगळे काही सांगून जातोय.’
‘ओह सॉरी! तुम्ही मयताचे?’
‘मी डॉक्टर मदन. मी सध्या तुमच्या ताब्यात असलेल्या मिस राधा आणि यश या दोघांचा इलाज करत होतो.’
‘काय आजार आहे नक्की त्यांना?’
‘आजार शारीरिक नाही. मानसिक म्हणता येईल.’
‘म्हणजे?’
‘मिस राधा माझ्याकडे गेले वर्षभर नर्स म्हणून काम करत आहेत. त्यांना मागे पुढे कोणी नाही. त्यांना अधेमधे नैराश्याचे झटके येतात, वेगवेगळे भास होतात. मग त्या वाटेल त्या कथा, कल्पना मनात बनवतात आणि त्यात रमून जातात. अर्चना मॅडम त्यांच्या मिस्टरांना म्हणजे यशला माझ्याकडे काही वेळा घेऊन यायच्या. यशला देखील अधेमधे नैराश्याचा झटका यायचा. पण आता त्याच्यात खूपच सुधारणा झाली होती. याच दरम्यान अर्चनाजींची आणि राधाची चांगलीच गट्टी जमली होती,’ मदन अर्चनाकडे पाहत बोलला.
‘त्या तुमच्याकडे राहायच्या?’ इन्स्पेक्टरने अर्चनाकडे पाहत विचारला.
‘हो. ती आणि यश दोघांचा आजार सारखाच. त्यामुळे मला तिच्याविषयी खूप सहानुभूती होती. त्यातच यशचा आजार पूर्ण बरा होण्याच्या टप्प्यावर आला होता आणि ह्या सगळ्या दगदगीने मी आजारी पडले. त्यामुळे मग यशसाठी केअरटेकर म्हणून मी राधाला बोलावले.’
‘पण राधा तर सांगते आहे की ती तुमची केअर टेकर म्हणून इथे आली होती.’
‘माझी??’ आश्चर्याने अर्चना किंचाळली आणि मदनकडे पाहायला लागली.
‘पण अर्चनाजींना काय झाले आहे? त्या तर पूर्ण निरोगी आहेत. परवाच यशच्या जोडीने मी त्यांना देखील पूर्ण चेकअप करून घ्यायला सांगितले होते. त्यांचे रिपोर्ट देखील तुम्हाला बघता येतील,’ आता मदन देखील चक्रावल्यासारखा बोलला.
मदनचे वाक्य पूर्ण होत असतानाच एक पोलीस येऊन इन्स्पेक्टरच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि इन्स्पेक्टरचा चेहरा भलताच बिघडला.
‘राधा प्रेग्नंट होती ह्याची तुमच्यापैकी कोणाला कल्पना होती?’ त्याने खाडकन प्रश्न विचारला आणि समोर बसलेले दोघेही ताडकन उभे राहिले.
—
‘आज सहा दिवस झाले डॉक्टर.. पोलिसांची चौकशी कधी संपणार?’ अर्चना निराशेने बोलली.
‘माझे सकाळीच इन्स्पेक्टर साहेबांशी बोलणे झाले. राधा आणि यश यांच्यात अनैतिक संबंध होते आणि राधा यशच्या मागे लग्नासाठी जोर लावायला लागली होती आणि त्या वादातूनच तिने यशला विष दिले असावे अशा निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. तिच्या पर्समध्ये पोलिसांना विषाची बाटली देखील मिळाली आहे. ’अर्चना भूत आहे, ती प्राण्यांना खाते, तिनेच यशवर करणी केली आहे..’ असे काय काय ती पोलीस चौकशीत बोलत असते म्हणे. पोलिसांना देखील डोक्याला हात लावायची वेळ आली आहे,’ हसू दाबत दाबत मदन म्हणाला आणि अर्चना खळखळून हसायला लागली.
‘तुझे मात्र कौतुक आहे मनू… किती सहजपणे तू हे ’विचित्र विश्व’ उभे केलेस.’ अर्चना प्रेमाने म्हणाली.
‘खरे कौतुक तुझे आहे अरू. मी स्वत: डॉक्टर आहे, पण असा अर्धा लचका तोडलेला उंदीर घेऊन रात्री पिंपळाखाली उभे राहण्याचे धाडस माझे देखील होणार नाही…’ हात जोडत तिला कोपरापासून नमस्कार करत मदन म्हणाला आणि लाजत लाजत अर्चना त्याच्या मिठीत शिरली.