• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राजाची ताकद कशात!

- मोशो (बोधकथा)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 10, 2022
in बोधकथा
0

बादशहाने वजीराला विचारलं, राज्यकर्त्याची सगळ्यात मोठी ताकद कशात असते?
वजीर म्हणाला, प्रजेच्या सहनशक्तीत… आणि चतुर राज्यकर्ता ती नेहमीच मधूनमधून तपासून पाहात असतो हुजूर.
बादशहा म्हणाला, नेहमीप्रमाणे मला तुझं उत्तर पटलेलं नाही.
वजीर म्हणाला, हुजूर, जे आपल्याला कळत नाही, ते आपल्याला पटलेलं नाही, असं म्हणणं सोपं असतं आणि त्यातून फुकाचा आबही शिल्लक राहतो. तुम्हाला कार्यानुभवातूनच समजवावं लागेल. मी सांगतो तसा एक हुकूम काढा.
बादशहाने अतिशय शंकाकुल मनाने तो हुकूम काढला. राजधानीच्या मधोमध एक नदी होती. तिच्यावर एकच पूल होता. तो राज्यातला सगळ्यात महत्त्वाचा पूल होता. जवळपास सगळ्या प्रजाजनांना त्याचा वापर करायला लागत होता. त्या पुलाचा वापर करणार्‍या प्रत्येकाला दोन अशर्फींचा कर द्यावा लागेल, असा हुकूम होता. असा हुकूम निघाला, तर प्रजेत प्रचंड असंतोष निर्माण होईल, अशी राजाला भीती वाटत होती. पण, तसं काही झालं नाही. लोक निमूटपणे कर भरू लागले.
बादशहा चकित झाला. वजीराला म्हणाला, तुझा मुद्दा खरा ठरतोय बहुतेक.
वजीर म्हणाला, हुजूर, खेळ आत्ता कुठे सुरू झालाय. आता हा कर दहापट करा. उद्यापासून २० अशर्फी द्यायला सांगा प्रत्येकाला.
बादशहा म्हणाला, तू माझं सिंहासन उलथायला निघालायस की काय?
वजीर गालातल्या गालात हसला.
कर दसपट झाला. लोकांनी खळखळ करत का होईना, तो भरायला सुरुवात केली. अत्यावश्यक काम असेल, तेव्हाच लोक पुलाचा वापर करायला लागले. नदीतल्या नावाड्यांना बरकत आली.
काही दिवसांनी हा कर चाळीस अशर्फींवर गेला. तरीही लोक रांगा लावून कर भरत होते. त्यानंतर वजिराने बादशहाला भयंकर भासणारा हुकूम काढायला लावला… पूल वापरणार्‍याला चाळीस अशर्फींचा कर द्यावा लागेल, शिवाय जोड्याचे दहा फटके खावे लागतील, असा तो हुकूम होता.
तो अंमलात येऊन एक दिवस होतो ना होतो, तोच राजवाड्यासमोर प्रजाजनांची प्रचंड गर्दी गोळा झाली. बादशहा सचिंत मनाने बसला होता. वजीर आला. बादशहा म्हणाला, हे तू काय करून ठेवलंयस? पाहतोस ना बाहेर सगळ्या राज्यातली प्रजा गोळा झालीये. कर भरा आणि वर दहा जोडे खा, हे कोणती प्रजा सहन करील?
वजीर म्हणाला, हुजूर, ते काय म्हणतायत ते न ऐकताच तुम्ही मला बोल का लावताय? मी त्यांची मागणी आत्ताच ऐकून आलोय आणि ती पूर्ण करण्याचं आश्वासनही देऊन आलोय.
बादशहा थरथरत म्हणाला, काय होती ती मागणी?
वजीर हसून म्हणाला, हुजूर, त्यांची फक्त इतकीच तक्रार होती की पुलावर दोन्ही बाजूला एकेकच कर्मचारी आहे. तोच कर घेतो, तोच जोडे मारतो. त्यात खूप वेळ जातो. मोठ्या रांगेत खूप वेळ थांबावं लागतं. जोडे मारण्यासाठी दोन्ही टोकांना वेगळा कर्मचारी नेमला, तर आमचा खोळंबा होणार नाही.

—– —–

वेड्यांच्या राज्यात शहाणा

एकदा एका राज्याच्या राजाचं एका दुष्ट जादूगाराशी जोरदार भांडण झालं.
माझ्याशी घेतलास पंगा, आता तुला दाखवतोच माझा इंगा, असं म्हणून जादूगाराने गावातल्या विहिरीवर मंत्र टाकला.
नगरात दोनच विहिरी होत्या. एक राजवाड्यातली. दुसरी गावातली.
राजवाड्यातल्या विहिरीचं पाणी राजपरिवारासाठी होतं. नगरातल्या विहिरीचं पाणी सगळे नगरवासी प्यायचे.
जादूगाराने मंत्र टाकल्यानंतर त्या विहिरीचं पाणी पिणारा प्रत्येक माणूस वेडा होऊ लागला. हळुहळू राजपरिवार आणि प्रधान सोडल्यास सगळं नगर वेडं होऊन गेलं.
सगळ्या लोकांना शहाणं कसं करायचं, याचा विचार करत राजा सचिंत बसला होता. तेवढ्यात प्रधान धावत आला आणि राजाला म्हणाला, नगरातल्या लोकांना तुमच्याबद्दल शंका यायला लागली आहे. त्यांना वाटतंय की तुमचं मानसिक संतुलन ढळलंय.
अरे, पण, ते सगळे वेडे झाले आहेत. मी शहाणाच आहे.
ते ठीक आहे. पण, सगळे वेडे असतील, तर त्यांना तेच शहाणे आहेत, असं वाटणार आणि शहाणा माणूस वेडा ठरणार. तसंच त्यांनीही तुम्हाला वेडा ठरवला आहे. तुम्हाला ठार मारून किंवा हुसकावून देऊन कोणीतरी ‘शहाणा’ माणूस राजगादीवर बसवण्याचा त्यांचा विचार आहे. आता तुम्ही लगेच निघा. गुप्तमार्गाने मी तुम्हाला गावच्या विहिरीवर पाठवतो. तिथे जाऊन पाणी पिऊन या.
राजाविरुद्ध बंड करण्यासाठी राजवाड्याला घेराव घातलेल्या जमावाने जेव्हा राजा, राणी, राजपुत्र, राजकन्या हे सगळे कपडे फाडत, असंबद्ध हसत बडबडत राजवाड्याकडे येत असल्याचं अनुपम दृष्य पाहिलं, तेव्हा आपला राजाही आपल्याइतकाच शहाणा आहे, याची त्यांना खात्री पटली आणि त्यांनी त्याची मिरवणूक काढली.

Previous Post

विचित्र विश्व

Next Post

१२ मार्च भविष्यवाणी…

Next Post

१२ मार्च भविष्यवाणी...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.