निष्णात डॉक्टरला पेशंट पाहताच रोगाचे निदान करता येते, त्यासाठी त्याला पेशंटची तपासणी करावी लागत नाही. तपासणी त्याच्या निदानावर शिक्कामोर्तब करते, इतकेच. शिवसेनाप्रमुखांचा मूळ पिंड समाजकारणाचा. त्यांनी नंतर राजकारणात उतरून महाराष्ट्राला ओजस्वी दिशा दिली असली तरी त्यांना राजकारणातून उद्भवणार्या ‘रोगां’चे निदान अचूक करता येत होते, कारण ते ‘राजकारणी’ नव्हते, सामान्य माणसांना लढाईचे बळ देणारे स्फूर्तीनायक होते, राजकारणातली बीभत्स व्यंगं टिपणारी व्यंगचित्रकाराची नजर त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या कुंचल्याच्या फटकार्यांनी अचूक मर्मभेद व्हायचा. त्यांनी हे व्यंगचित्र रेखाटलं तेव्हाही महागाई शिगेला पोहोचली होती. महागाईच्या अजगराने सामान्य माणसाला गिळंकृत केल्यानंतर अर्थमंत्री ‘त्याचा श्वास चालू आहे,’ असा दिलासा देत आहेत, हे पाहिल्यावर आजच्या आर्थिक दु:स्थितीची आठवण येते. निवडणुकांचे निकाल लागले की आपणही याहून मोठ्या अजगराच्या पोटात त्याच ठिकाणी असणार आहोत, पण आपला श्वास चालू आहे, याची तरी फिकीर केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यांच्या सदैव प्रचारमग्न आकांना असेल का, असा प्रश्न पडतो… त्याचं उत्तर तुम्हाला ठाऊक आहेच!