‘झुंड’ या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाने एक व्यापक, वैश्विक असे सामाजिक विधान केले आहे, असे म्हटले पाहिजे. अगदी आरंभीच या चित्रपटाबद्दल, या देशातील समाजव्यवस्थेबद्दल, विषमतेच्या विरोधातील भूमिकेबद्दल नागराज यांचे उदंड उदंड अभिनंदन! या चित्रपटातील फुटबॉल प्रशिक्षकाच्या प्रमुख भूमिकेतील अमिताभ बच्चन यांना सलाम करतानाच त्यांच्या टीममध्ये असलेले जे विविध छोटे-मोठे जमिनीवरचे कलावंत आहेत, त्यांनाही माझा मनःपूर्वक सलाम!
हा चित्रपट आपल्या सर्वांना अंतर्मुख करतोच; पण पुन्हा एकदा नागराजने आपल्या सर्वांना एक भूमिका घ्यायला भाग पाडले आहे. हा चित्रपट पाहणारा प्रत्येक जण ही भूमिका घेईलच असे नाही; पण निदान तसा विचार करेल यात शंका नाही.
अलीकडेच झी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात ‘झुंड’मधील हे नवे कलावंत सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना नागराजने डॉन ऊर्फ अंकुश मसराम याचे विशेष कौतुक केले होते आणि हा डॉन हिंदी सिनेमात एक वेगळा असा खलनायक म्हणून समोर येईल, असे म्हटले होते. याबरोबरच एक बुटकी मूर्ती असलेल्या आणि केसात एक वेगळी रंगाची छटा असलेला भांग पाडणार्या बाबू या छोट्या कलावंताने आपली मोठी छाप उमटवली आहे.
नागराजने ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ यातून आलेल्या अनेक कलावंतांना त्याने ‘झुंड’मध्ये एकत्र आणले आहे. या सर्वांना पाहताना आपल्याला आनंद होतोच; पण या कलावंतांचे आणि आपले नाते किती छान निर्माण झाले आहे, हाही अनुभव आपल्याला येत राहतो!
मी अगदी आरंभी म्हटल्याप्रमाणे नागराज मंजुळे यांनी वैयक्तिक स्तरावरील एक व्यापक सामाजिक विधान केले आहे.
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी त्याचा श्वास कोंडून मारले, तशीच काहीशी कोंडी यातल्या झोपडपट्टीतल्या डॉनची होते आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायला आणि त्याच्यामध्ये काही गुण आहेत हे मान्य करायला आपल्या समाजातील सामान्य मध्यमवर्गीय, पोलीस अजिबात तयार नाहीत. यातून त्याच्या या कोंडीचा प्रवास या चित्रपटाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतो, तेव्हा आपले डोळे ओले झालेले असतात आणि त्याला संधी मिळाली पाहिजे, इथपर्यंत आपली न्यायबुद्धी जागी झालेली असते. नागराजच्या चित्रपटातील हा एक वेगळा क्लायमॅक्स पाहताना, या देशातील, समाजव्यवस्थेतील बारकावे किती काळजीपूर्वक आणि समंजसपणे त्यांनी चित्रित केले आहेत हे सतत जाणवत राहते.
नागपूरच्या झोपडपट्टीतील उन्मार्गी मुलांना घेऊन तेथील फुटबॉलपटू विजय बारसे (या चित्रपटात विजय बोराडे), हे फुटबॉलची टीम उभी करतात, ही कथारुप असलेली फिल्म. नागराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे समाजातून आणि तेथील झोपडपट्टीतून ही मुले शोधून काढली आणि त्यांना रुपेरी पडद्यावर स्थान दिले. ‘फॅन्ड्री’ असो किंवा ‘सैराट’ असो या दोन्ही चित्रपटांच्या वेळी या मातीत बागडणारी, खेळणारी मुले त्यांनी निवडली आणि त्यामुळे या चित्रपटांना या देशाच्या मातीचा खराखुरा गंध लाभला आहे.
यातला दुसरा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेबांची प्रतिमा आणि त्यांची जयंती यांचा एक सामाजिक धागा त्याने या चित्रपटात जोडलेला आहे. मला अलीकडेच पाहिलेल्या ‘जय भीम’ या चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात लाल झेंडे फडकत होते आणि तरीही बाबासाहेबांशी नाते जोडणारा सामाजिक न्यायाचा परखड उच्चार या चित्रपटातून सर्वांना ऐकू येत होता. या ‘जय भीम’शी नाते जोडणारा हा झुंड आहे.
मला इथे सत्यजित राय यांची आठवण येते. त्यांचे चरित्र आणि त्यांच्या आठवणी मी पत्रकारितेचा विद्यार्थी असताना खूप वाचल्या होत्या.पथेर पांचाली, अपूर संसार, शतरंज के खिलाडी, जलसाघर, चारुलता असे अनेक चित्रपट त्यांचे त्या काळात पाहिले होते. सत्यजित राय यांनी एक आठवण दिली आहे पांचालीच्या नायकाचा शोध घेताना त्यांनी याप्रमाणे आसपासचे जग गुंडाळले होते आणि मग त्यांना हा ‘पथेर पांचाली’चा छोटा नायक सापडला होता.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात जात वास्तव आणि समाजवास्तवाचे अतिशय परखड भान असलेला नागराज मंजुळे यांच्यासारखा दिग्दर्शक फार विरळा, असे म्हटले पाहिजे. हे विषय यापूर्वीच्या भारतीय दिग्दर्शकांनी हाताळले नाहीत, असे नाही; पण ज्या थेटपणे आणि धाडसाने नागराज हे विषय मांडतो आहे, चित्रपटाच्या कथेतून पुढे नेतो आहे, त्याचे मनापासून कौतुक केले पाहिजे.
अमेरिकेत ट्रम्प यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराच्या घटनांनी तेथील समाजजीवन ढवळून निघाले होते. श्वेतवर्णीय प्रभुत्वाची भावना तिथे उसळून आली होती. मार्टिन ल्युथर यांच्या काळापासून म्हणजे गेल्या सुमारे पन्नास साठ वर्षांच्या कालखंडात तेथील श्वेतवर्णीय प्रभुत्वाला धक्का दिला जात होता आणि त्यातून अग्निदिव्य केल्याप्रमाणे कृष्णवर्णीयांचे स्वतःचे जीवन एकेक दार उघडल्याप्रमाणे मोकळे होत अधिक स्वतंत्र होत होते. भारतासारख्या बहुजातीय, बहुधार्मिक, पंथीय आणि विविध सामाजिक स्तरांमध्ये असलेल्या, फसलेल्या, अडकलेल्या अशा या अनेकमिती समाजातील तळात अडकलेले सर्वहारा वर्ग हे खूप कुचंबणा सोसत जगत आहेत. या वर्गाच्या व्यथा-वेदना आणि त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांची स्वप्ने या सगळ्यांना मुखर करणारा एक विचार, एक व्यक्तिमत्व, एक प्रत्यय देण्याच्या दिशेने नागराजची दिग्दर्शकीय शक्ती, सुधाकर रेड्डीच्या कॅमेर्यातून टिपले जाणारे विविध आकांक्षी चेहरे, त्यांच्या जीवनाकडून असलेल्या शतखंडित अपेक्षा या सगळ्यांचे एक विलक्षण असे रसायन ‘झुंड’मध्ये पाहायला मिळते!
कितीतरी प्रश्न या ‘झुंड’ने निर्माण केले आहेत. भारत का मतलब क्या है? झोपडपट्टीतल्या गरीब मुलांना कॉलेजच्या, विद्यापीठांच्या मैदानावर खेळण्याचा अधिकार आहे की नाही? त्यांना प्रतिष्ठेने, सन्मानाने जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे की नाही? वाममार्गी आणि झोपडपट्टीचे म्हणून त्यांच्यावर कायम दोषारोपण करत राहायचे ही आपली समाजाची वृत्ती बदलणार आहे की नाही? असे अनेक प्रश्न हा चित्रपट निर्माण करतो.
मी या चित्रपटाचा विचार करत असताना माझ्या पोरके दिवस, या पुस्तकाकडे वळतो. आणि मला जाणवते की यातले अनेक जण हे माझे सहोदर आहेत! मीही कॉलेजची तीन वर्षे पुण्यातील झोपडपट्टीत काढली आहेत. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिकायला गेल्यावर आणि माझे भाषण ऐकल्यावर वर्गातल्या काहींनी विचारले होते की, तू नुमवीत होतास की भावे स्कूलमध्ये? या प्रश्नाचे काय उत्तर देणार! कारण माझे शुद्ध आणि स्वच्छ उच्चार हीच माझी यत्ता राहिली होती. पोरके दिवस प्रकाशित झाल्यावर मुंबईतील एका निर्मात्यांनी त्यावर एखादा चित्रपट करता येईल का, यावरील यावरील चर्चेसाठी मला बोलावले होते. मी फोर्टमधील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या स्टोरी डिपार्टमेंटच्या लोकांशी बोलायला गेलो होतो. ते मला प्रश्न विचारत होते, तुम्हाला खून करावासा वाटला नाही का? तुम्हाला सूड घ्यावासा वाटत नाही का? हा एक मुलगा शिकतो, सरळ पुढे जातो आणि आपले आयुष्य उभे करतो, ही एक चांगली कथा त्यांना पटत नव्हती. मी तेव्हा १९९४- ९५ या काळात ‘लोकसत्ता’मध्ये चीफ रिपोर्टर म्हणून काम करत होतो.या स्तरापर्यंत येईपर्यंत मी माझे जीवन एखाद्या खुल्या पुस्तकातील पानांप्रमाणे स्वच्छपणे सांगत होतो. त्या फिल्म कंपनीच्या स्टोरी डिपार्टमेंटच्या लोकांना या साध्या-सरळ कथेमध्ये दम वाटत नव्हता.
‘झुंड’ची कथा पाहताना शेवटी तो डॉन किंवा अंकुश बदलत्या आयुष्यात पुढील पाऊल उचलताना त्याला तेथील गुंड तुझे हैराण करून सोडतात आणि तरीही तो जाच आणि छळ सहन करून पाऊल उचलत पुढे जातो. ‘पोरके दिवस’मधील माझी भूमिका ही याच वाटेवर अशी होती.
माझे अनेक गरीब मित्र मला या चित्रपटाच्या व्यक्तीरेखांमधून दिसत होते. पुण्याच्या रिमांडमधले मित्र, मुंबईतल्या द. ना. सिरुर बालकाश्रमातील मित्र, देहू रोडजवळच्या किवळे येथील संस्थेतील मित्र अनेक होते. काहीजण पोरके होते आणि जीवनसंघर्षात ते पूर्ण पराभूत होऊन कसेबसे दिवस पुढे ढकलत निघाले होते. अनेकांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. या मुलांना रिमांडमधून किंवा अनाथ आश्रमातून बाहेर पडल्यावर त्यांनी जायचे कुठे हा प्रश्न तसाच पडला होता! हा प्रश्न अनुत्तरित होता!
आज नागराजने झोपडपट्टीतील या मुलांचा प्रश्न त्यांना एका फुटबॉल टीममध्ये आणून सोडवला आहे. या देशातील उमेदीचे स्वप्न पाहणार्या लक्षावधी कोट्यावधी बालकांच्या, किशोरांच्या आयुष्याचे एक विलक्षण दाहक आणि तितकेच सुंदर असे एक चित्र-शिल्प नागराजने साकारले आहे.या दिग्दर्शकाचे एक वेगळेपण आहे आणि ते म्हणजे त्याच्या चित्रपटातील सगळी पात्रे, सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याशी जोडल्या जातात, आपल्याशी संवाद करू पाहतात, संवाद करतात. कारण त्यांना जन्माला घालणारा हा लेखक दिग्दर्शक आणि कवी हा तितकाच संवादी आहे… आणि म्हणून मी अगदी आरंभी म्हटल्याप्रमाणे नागराजने वैश्विक स्तरावरचे एक सामाजिक विधान त्याने या चित्रपटातून अधोरेखित केले आहे. आपल्या भटक्या विमुक्त समाजातील, मागासवर्गीय समाजातील या होतकरू तरुण मुलांच्या स्वप्नाच्या नौकेची शिडे झुंड या चित्रपटाने हाकारली आहेत!
अधिक काय लिहू?
सुमारे तीन तासाच्या या चित्रपटाने आपल्याला विचार करायला भाग पडले आहे. काही भूमिका तुम्ही घेणार का, असा प्रश्नही ही कलाकृती आपल्याला विचारते! आपले उत्तर काय असेल, हे प्रत्येकजण सांगेल. एक लेखक आणि पत्रकार म्हणून माझे उत्तर आहे- होय, आपण विचार केला पाहिजे आणि तो करत प्रत्यक्ष जमेल तशी कृती करायला सुरुवात केली पाहिजे!
भारतीय आणि जागतिक स्तरावरील दिग्दर्शकांच्या मांदियाळीत नागराज मंजुळे यांचे नाव लिहिले गेले आहे. बिमल
रॉय, व्ही. शांताराम, सत्यजित रे, स्टीव्हन स्पीलबर्ग, राज कपूर, अनुभव सिन्हा, पा रंजीत या सगळ्यांच्या नामावळीत नागराज मंजुळे हे नाव नक्कीच घेतले जाईल आणि त्याची प्रभा अधिक पसरेल आणि जागतिक चित्रपटांचा अवकाश ती गाठेलच,यात शंका नाही!!!
– अरुण खोरे, पुणे