आजकाल माझा मानलेला परममित्र पोक्या हा प्रेमात आकंठ बुडालेला आहे. त्याचं कशातच लक्ष नसतं. गेल्या आठवड्यात त्याला पाकळीने लिहिलेलं पहिलं वहिलं प्रेमपत्र त्याने मला वाचायला लावलं आणि त्यानंतर तिने लिहिलेल्या प्रेमपत्राला त्याने दिलेलं उत्तरही मला दाखवलं. ते वाचून हा तिच्या प्रेमात इतका वेडा होईल याची मला कल्पना नव्हती. पण त्याला इतका आवडीचा विरंगुळा मिळाला याचं मला समाधान वाटलं. त्याने खूप कष्टाने आणि मेहनत करून मला माझ्या धंद्यात साथ दिली त्यामुळेच मी या काळ्या धंद्यात स्थिरावू शकलो आणि माझ्या बरोबरीने तोही स्थिर झाला. इथे खूप मोठी रिस्क घ्यावी लागते. त्यात जिवालाही धोका असतो, पोलिसांना खूष ठेवावं लागतं. तरी आम्हा दोघांच्या मागे कुटुंबाची जबाबदारी नाही. खाओ-पिओ और मजा करो.
पिओवरून आठवण झाली. किराणा दुकाने, साध्या हॉटेल्समधून वाईन विकायला विरोध करणार्या लोकांचं हसू आलं. वाईनमध्ये अगदी थोड्या प्रमाणात अल्कोहोल असले तरी वाईन म्हणजे दारु नव्हे, हे या विरोधकांना पटतच नाही. अनेक औषधांमध्येही थोड्या प्रमाणात अल्कोहोल असते, म्हणून त्यांना दारू ठरवून त्यांच्यावर कोणी बंदी आणत नाही. खोकल्याच्या अनेक औषधात अल्कोहोल असतो. काही लोक तर अशी औषधे केवळ नशा येण्यासाठी घेतात, हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा त्या औषधांवर सरकारला बंदी आणावी लागली आणि कफ सिरपमध्ये अल्कोहोल किती असावी याचं प्रमाण ठरवून देण्यात आलं. वाईन आणि कोणतीही व्हिस्की, ब्रॅन्डी, रम यासारख्या दारुच्या प्रकारात फरक आहे. वाईन पिऊन कोणी मद्यपी बनत नाही की त्याला ती पिण्याची चटक लागत नाही. भूक लागण्यासाठी जेवणापूर्वी वाईन पिण्याची अनेक घरांमध्ये पद्धत आहे. ती द्राक्षासवाप्रमाणे आरोग्याला उपकारक आहे. तिला कोणी इतर दारूप्रमाणे समजत असतील तर त्यांच्यासारखे वेडे तेच आहेत.
आम्ही तर अनेक वर्षांपूर्वी हातभट्टी लावायचो, मग ती दारु पत्र्याच्या मोठ्या डब्यात भरून, ते डबे मातीत पुरुन ठेवायचो. काही दिवसांनी ते बाहेर काढून घरातच दारूचा अड्डा करून विकायचो, अनेक आंट्या मोठ्या फुग्यातून ती विकत घेऊन त्यांच्या घरातील अड्ड्यावर विकायच्या. इकडे कधी आमच्या शत्रूंनी पोलिसांना फोन केला की त्यांचा छापा पडायचा आणि जमिनीत पुरलेले दारूचे पत्र्याचे मोठे डबे शिगांनी खणून बाहेर काढून पोलीस ते मातीत ओतायचे. असा प्रकार कधीतरी सहा महिन्यांनी व्हायचा. पण आमचे काही पोलीस मित्र धाड पडण्याच्या आदल्या दिवशी खबर द्यायचे आणि त्यांना धाड घालण्यापुरते एक-दोन डबे ठेऊन बाकीचे आम्ही बाहेर काढून तो माल घरात सुरक्षित ठेवायचो आणि अंटीच्या अनेक अड्ड्यावर विक्रीसाठी पाठवायचो.
त्या हातभट्टीच्या दारूत नाशिवंत गुळ आणि नवसागर याचा वापर असायचा. आम्ही ती कधीतरी ढोसायचो. तेव्हा या धंद्यातून दुसर्या अनेक धंद्यांच्या आयडिया सुचायच्या. तेव्हापासून आम्ही ब्रँडी, व्हिस्कीपासून सर्व प्रकारच्या दारूची चव घेतली होती. अगदी विदेशी उंची दारुचीही. त्यामुळे आम्हाला कोणी वाईनविषयी शिकवू नये. आज या जुन्या धंद्याच्या आठवणी वाईन प्रकारामुळे जाग्या झाल्या. हातभट्टीच्या धंद्यामुळेच आज आमच्या पाच डिस्टीलरीज पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात आहेत. त्यांचा कारभार पाहणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यात एक वाईन उत्पादनाचा कारखानाही आहे. आज आमच्या धंद्याला चांगली बरकत आली आहे. त्यावेळी पँटच्या खिशाला सायकलची चेन लावून त्या चेनने एखाद्याला चोप देण्याच्या सुपार्या आम्ही घ्यायचो. कधीतरी गेमही करावा लागायचा. काही बदमाश व्यापार्यांकडून खंडणीही वसूल करायचो. एरियात त्यावेळी आमचं नाव गाजत होतं. पोलीस कधीतरी आतही टाकायचे. आज ते दिवस आठवले की हसू येतं.
मग राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या ओळखीही वाढल्या. समाजात दानशूर म्हणून नावाजू लागलो. विभागातील अनेक संस्थांना देणग्या दिल्या. रक्तदान शिबिरांसारखे समाजाच्या उपयोगी पडणारे उपक्रम केले. यामुळे एका पक्षाने आमदारकीसाठी मला आणि पोक्याकडेही विचारणा केली होती. आमच्या दोघांपैकी एकजण जरी उभा राहिला असता तर शंभर टक्के निवडून आला असता.
अजूनही आमचे बेकायदा धंदे सुरळीत सुरू आहेत. झटपट लॉटर्यांचे आमचे अनेक स्टॉल मुंबईत आहेत. अनेक धंद्यातून मिळणारे कोट्यवधी रुपये आम्ही समाजकार्यासाठी खर्च करतो. कुठल्याही गडबड घोटाळ्यात सापडू नये म्हणून आम्ही दिल्लीतल्या देशातल्या सत्ताधारी काही वजनदार नेत्यांशी चांगले संबंध ठेवून आहोत. त्यामुळे काही मुंबईतील नेत्यांकडेही आमचं वजन आहे म्हणूनच ईडीशी धाड आमच्यावर कधीच पडू शकत नाही. तरीही सावधगिरी बाळगावी लागते.
आता पोक्याचे लग्न झाले की त्याचं किती सहकार्य मिळेल याबद्दल शंका वाटते, पण त्याच्या पत्नीने फूल ना फुलाच्या पाकळीएवढी साथ जरी त्याला दिली तरी मला बरं वाटेल. तिचे विचार बोल्ड असले तरी पोक्याच्या कविमनामुळे तिच्या पत्रावरून तिच्यातील बदल जाणवतो. तिलाही आमच्या समाजकार्यात सहभागी करून घेऊ. मग आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे!