रमेशजींच्या काळात भालजी, राजाभाऊ परांजपे, सुलोचना दीदी यांच्यासारखे ज्येष्ठ कलावंत, दिग्दर्शक नवोदित कलावंतांना मार्गदर्शक म्हणून लाभले; त्यातून त्या काळातली एक अख्खी पिढी उभी राहिली, ज्यांनी पुढे अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. याच शिस्तबद्धतेमुळे आणि ज्येष्ठांचा आदर करण्याच्या वृत्तीमुळे पुढे रमेश देव यांनी एकाच वेळी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करण्याची विक्रमी कामगिरीही केली. अत्यंत वैविध्यपूर्ण भूमिकाही केल्या.
– – –
दोन फेब्रुवारी २०२२ रोजी एका दीर्घ कारकीर्दीचा अंत झाला, मराठी चित्रपटांच्या साठ-सत्तरच्या दशकातले सुपरस्टार रमेश देव हे अंतिम प्रवासाला निघून गेले आणि मनाच्या कोपर्यात उगाचच एक पोकळी निर्माण झाली. उगाचच एवढ्यासाठी की जितकी पोकळी सीमाताई, अजिंक्य आणि अभिनय यांच्या आयुष्यात निर्माण झाली आहे, तितकी इतर कोणाच्याच आयुष्यात होणे शक्य नाही. आपण चित्रकर्मी असलो तरीही आधी चित्ररसिक आहोत. आपल्या मनातली पोकळी रूपेरी पडद्यापुरती मर्यादित.
बालपणी गिरगावातल्या मॅजेस्टिक आणि सेंट्रल सिनेमात त्यांचे मराठी चित्रपट आईवडिलांचं बोट धरून पाहिले, तो काळच झर्रकन समोरून निघून गेला. घोडागाडीत बसून सहकुटुंब मराठी सिनेमे आणि नाटके बघणे हा एक कौटुंबिक सोहळा होता आणि त्या सोहोळ्यात रमेश देव, सीमा, सुलोचना दीदी, राजा गोसावी, शरद तळवलकर, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर आणि भालजी व राजा परांजपे यांचे सिनेमे बघणे ही कौटुंबिक आणि सांस्कृतिक घटना असे. त्यात रमेश देव यांचे ते देखणं रूप फक्त सीमाताईंनाच मोहून टाकत नव्हतं, तर कित्येक तत्कालीन तरुणीही त्यांच्या रूपावर भाळून पागल झाल्या होत्या. त्या काळात मुलगी बघण्याचा कार्यक्रम अगदी सिनेमातल्यासारखा व्हायचा किंवा सिनेमातला मुलगी बघण्याचा कार्यक्रम घरच्यासारखा व्हायचा… लग्नाचे मध्यस्थ मुलीचं वर्णन करताना ‘सीमापेक्षा उजवी आहे मुलगी’ म्हणायचे आणि मुलाबद्दल बोलताना ‘अगदी रमेश देवच जसा’ असं म्हणायचे. लग्न झाले की ‘जोडा अगदी सीमा-रमेश देवसारखा शोभतो हो’ म्हणून मल्लिनाथी करायचे… रमेश देव हे अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्वाचे, कोल्हापुरातून येऊनसुद्धा भाषेच्या बंधनात न अडकलेले, असे ते नायक होते. अगदी पुण्यामुंबईतल्या रसिकांनाही त्यांचं बोलणं आपलंसं वाटलं. त्याच रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या आधारावर अगदी योगायोगाने ते मराठी चित्रपटसृष्टीत आले. नुसते आलेच नाहीत तर शिस्तबद्ध आणि व्यावसायिक कार्यपद्धतीमुळे निर्माता-दिग्दर्शकांमध्ये लोकप्रिय झाले आणि त्याचा परिणाम त्यांना रसिकांमध्ये अफाट लोकप्रियता मिळण्यामध्ये झाला.
अभिनेता नुसता उत्तम अभिनेता असून चालत नाही, तर त्याच्यात हे गुणही आवश्यक आहेत. आशा गुणी अभिनेता अभिनेत्रींना व्यग्र करण्यात निर्माता-दिग्दर्शकांचा जसा हात असतो, तसा माजोरड्या, बेशिस्त कलावंतांना घराचा रस्ता दाखवण्यातसुद्धा निर्माते दिग्दर्शक कमी करीत नाहीत. रमेशजींच्या काळात भालजी, राजाभाऊ परांजपे, सुलोचना दीदी यांच्यासारखे ज्येष्ठ कलावंत, दिग्दर्शक नवोदित कलावंतांना मार्गदर्शक म्हणून लाभले; त्यातून त्या काळातली एक अख्खी पिढी उभी राहिली, ज्यांनी पुढे अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. याच शिस्तबद्धतेमुळे आणि ज्येष्ठांचा आदर करण्याच्या वृत्तीमुळे पुढे रमेश देव यांनी एकाच वेळी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करण्याची विक्रमी कामगिरीही केली. अत्यंत वैविध्यपूर्ण भूमिकाही केल्या.
माझ्या दीर्घकाळ स्मरणात राहिलेले त्यांचे चित्रपट आणि भूमिका म्हणजे ‘मानिनी’, ‘मोलकरीण’, ‘तू सुखी राहा’, ‘पडछाया’, ‘अपराध’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आणि हिंदीतील ‘लाखों में एक’, ‘तीन बहुरानियां’ आणि सर्वात ग्रेट ‘आनंद’. ‘मोलकरीण’ या चित्रपटातली लग्नानंतर आई-वडील आणि पत्नी यांच्या कचाट्यात सापडलेल्या एका सुसंस्कृत आज्ञाधारक मुलाची कुचंबणा त्यांनी अतिशय समर्थपणे दाखवली. सुरुवातीचा श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडलेला, आर्थिक न्यूनतेतून उभा राहू पाहणारा आणि नंतर सुखवस्तू झालेला आणि स्वतःच्या सख्या आईवडिलांपासून दुरावलेला व शेवटी आईच्या प्रेमापुढे निष्प्रभ होऊन विव्हळणारा नायक त्यांनी कुठेही मेलोड्रामा न करता सदर केला.
तीच गोष्ट ‘मानिनी’ चित्रपटातल्या भूमिकेची. माझ्या दृष्टीने १९६१चा हा चित्रपट मराठी चित्रपटांतील क्लासिक म्हणावा असा आहे. अनेक चमत्कार (पौराणिक चित्रपटात असतात तसे नव्हे) या सिनेमात पाहायला मिळतात. सुपरहिट तमाशापट दिग्दर्शित केलेल्या अनंत माने या एका दिग्गजाने हा चित्रपट दिग्दर्शित केला. शहरी मराठी सुसंस्कृत श्रीमंत उद्योगपतीच्या घरातली मुलगी एका शाळामास्तराच्या घरी लग्न होऊन जाते आणि सामाजिक विषमतेच्या चक्रात दोन्ही कुटुंब सापडतात. जयश्री गडकर यांनी त्या मुलीची भूमिका ‘सांगत्ये ऐका’ची इमेज पुसून टाकत साकारली. हाही चमत्कारच होता. त्यात रमेश देव यांनी खलनायकाच्या जवळपास जाणारी मोठ्या भावाची भूमिका केली, जी अनेक कंगोरे दाखवणारी होती, तर इंदिरा चिटणीस या खाष्ट सासूच्या भूमिकेत मुरलेल्या अभिनेत्रीने चक्क प्रेमळ आईची भूमिका करून आश्चर्यचकित केले होते. आणखी एक चमत्कार म्हणजे या चित्रपटात गाणी म्हणून चक्क बहिणाबाई या कवयित्रीच्या कविता घेण्यात आल्या होत्या. वसंत पवार या संगीत दिग्दर्शकाने दिलेल्या चाली आजही अनेक वाद्यवृंदात ऐकायला मिळतात. ‘अरे संसार संसार’, ‘अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला.. जसा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’, ‘मन वढाय वढाय त्याच्या ठायी ठायी वाटा’ अशी गाणी त्या चित्रपटात होती. तमाशा समर्थपणे मराठी चित्रपटात उभा करणारे अनंत माने या सिनेमांत काळजाला हात घालणारी दृश्ये उभी करतात, हाही चमत्कारच होता. किंबहुना नंतर जेव्हा व्ही. शांताराम यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाने ‘पिंजरा’सारखा मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले, तेव्हा सहदिग्दर्शनाची मोठी जबाबदारी त्यांनी मानेसाहेबांवर सोपवली, याची बीजे ‘सांगत्ये ऐका’ आणि ‘मानिनी’ या दोन चित्रपटात सापडतात. त्या तमाशापटांच्या लाटेच्या काळात रमेश देव, सीमा, सुलोचना दीदी, राजा परांजपे, श्रीकांत मोघे, अरुण सरनाईक यांनी शहरी आणि कौटुंबिक मराठी चित्रपटांची एक बाजू समृद्ध करून ठेवली आहे. पुढे राजदत्त यांचा काळ सुरु झाला. त्यात ‘अपराध’ हा चित्रपट त्यांनी रमेश देव, सीमा आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या समर्थ अभिनयानं अजरामर केला. विवाहबाह्य संबंधांची मराठी मालिकांमध्ये पुढे लाट आली, पण ‘अपराध’ या चित्रपटात नायकाची झालेली दोन बायकांना सांभाळायची घालमेल पुढे इतक्या गांभीर्याने क्वचितच पाहायला मिळाली. हा एक प्रकारचा थ्रिलरच होता, त्यात विवाहबाह्य संबंधांचा थिल्लरपणा नव्हता. रमेश देव तोपर्यंत अनेक हिंदी सिनेमांची मुशाफिरी करून आले होते. त्यामुळे त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात एक स्टायलिश अभिनेता मिसळलेला होता. तो या भूमिकेसाठी अगदी चपखल बसला होता. त्यातल्या दत्ता डावजेकर यांच्या अप्रतिम संगीतावर प्रत्यक्ष नृत्य नसूनसुद्धा मोहून टाकणार्या हालचाली रमेश देव आणि सीमा यांच्या आविष्कारातून दिसल्या.
पुढे हृषीदांच्या ‘आनंद’ चित्रपटात या सुशिक्षित मराठी जोडप्याची निवड होणं हा आपल्या सर्वांसाठी भाग्यकार योग होता. सुपरस्टार राजेश खन्ना आणि तत्कालीन स्ट्रगलर अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड अभिनय सीमा आणि रमेश देव यांनी केला. तो काळ निगेटिव्हवर सिनेमा शूट करण्याचा होता. निगेटिव्हचा एकेक डबा अत्यन्त महागडा असे. रिटेक म्हणजे चैन होती. कमीत कमी रिटेकमध्ये मोठे मोठे शॉट्स देणं हा रमेशजींचा हातखंडा होता. त्याच बळावर नट किंवा नटी निर्मात्यांमध्ये लोकप्रिय होत असे. अशा पट्टीच्या कलावंतांमध्ये रमेशजींची गणना होतं होती. त्यामुळे त्यांना हिंदीत खूप मागणी होती. प्राण, प्रेम चोप्रा, प्रेमनाथ यांच्यासारखे प्रचंड हिट खलनायक हिंदीत असूनसुद्धा रमेश देव यांनी खलनायक म्हणून अनेक मोठे चित्रपट केले आणि गाजवले.
मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीत वावरताना त्यांनी नाटकांतही अनेकविध भूमिका केल्या. यशवंत पगार या नाट्य निर्मात्याबरोबर त्यांनी पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचे भरपूर प्रयोग केले. तेही षण्मुखानंद हॉलमध्ये ‘स्पेशल जनता शो’ नावाने हाऊसफुल्ल व्हायचे. गंमत म्हणजे त्या काळातील अनेक सिनेस्टार त्यात भूमिका करीत. डॉ. काशिनाथ घाणेकर, राजा परांजपे, शरद तळवलकर, सीमा देव, रमेश देव, राजा नेने अशी स्टारकास्ट या एकाच नाटकात पाहायला मिळत असे. तशात पुलंचे गाजलेले नाटक… प्रयोग तुफान हाऊसफुल्ल जायचे. या सर्व मराठी स्टार्सना नाटकात बघणे ही पर्वणी असायची.
अजिंक्य या सुपुत्राला लॉन्च करण्यासाठी पुढे ते निर्मितीक्षेत्रात उतरले. राजदत्त यांच्या दिग्दर्शनात अजिंक्य देव हा देखणा नायक त्यांनी ‘सर्जा’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीला दिला. अजिंक्य थिएटर्स ही स्वतःची नाट्यसंस्था काढून त्यामार्फत अनेक नाटके सादर केली. रमेश देव प्रॉडक्शन ही माहितीपट आणि जाहिरात संस्था सुरू केली त्याद्वारे दुसरा सुपुत्र अभिनय देव जाहिरात क्षेत्रात नावाजला जाऊ लागला.
ज्या रमेश देव-सीमा यांना लहानपणापासून पाहिले, सिनेमांत अनुभवले, त्यांच्याशी नंतर प्रत्यक्ष संबंध आला तो वेगळ्याच स्वरूपात… अजिंक्य थिएटर्सची बस होती, ती आम्ही ‘टूरटूर’साठी मुंबई, पुणे, नाशिक दौर्यासाठी नेहमी वापरत असू. अगदी मराठवाडा-विदर्भ दौराही केला त्या बसने. सीमाताई त्या बसचे व्यवहार पाहत. त्यानिमित्ताने सीमाताईंशी बोलणे व्हायचे. त्यांच्याशी बोलताना ‘आनंद’मधल्या सुमनशीच बोलतोय असे वाटायचे.
रमेशजींनी नव्वदी क्रॉस केली तरी ते स्वावलंबी असल्यासारखे फिरायचे. दोन वर्षांपूर्वी आमदार आशिष शेलार यांच्या एका कार्यक्रमात आम्ही दोघेही पाहुणे होतो. त्यांना रिसिव्ह करायला मी स्टेजवरून खाली गेलो, वर चढण्यासाठी त्यांचा हात पकडला तर त्यांनी तो धरू दिला नाही. नंतर भाषणासाठी उभे राहत होते, तेव्हा मी पुढे झालो तर म्हणाले, पुरुषोत्तम, मला हे असलं आवडत नाही… तिथेच थांब..
२००८ साली मी ‘निशाणी डावा अंगठा’ हा सिनेमा करीत होतो. त्यात एक छोटी भूमिका होती, एका वृद्ध कीर्तनकाराची… ती त्यांनी करावी अशी इच्छा होती, पण ते करतील का याचं टेन्शन होतं… तरीही धीर करून मी फोन केला, तो मेसेजवर गेला… मी रेकॉर्डेड निरोप ठेवला… पण त्यांनी तो ऐकला नसावा… चार दिवस वाट बघून आम्ही दुसरी निवड केली आणि सातार्याला निघालो… वाटेत त्यांचा फोन… अरे मी आज मेसेज ऐकला… मित्रा मला कामं करायचंय… केव्हा कुठे यायचं सांगा… माझी कुचंबणा झाली… मी क्षमा मागून माझा झालेला नाईलाज सांगितला… त्यावर त्यांनी चक्क हळहळ व्यक्त केली… आणि पुढच्या वेळी मी अशी चूक करणार नाही असे म्हणून स्वतःवरच सगळा दोष घेतला… त्या दिवशी स्टेजवरसुद्धा माझ्या कानात म्हणाले… ‘नवीन काही करणार असशील तर मला सांग हां…’
रमेश देव आणि निवृत्ती या दोन गोष्टी ३६च्या आकड्यासारख्या एकमेकांच्या विरोधात शेवटपर्यंत उभ्या राहिल्या… ते त्यांचं वय सांगताना म्हणायचे, ‘अरे, मी देव आनंदपेक्षा एक वर्षाने मोठा आणि दिलीप कुमारपेक्षा तीन वर्षांनी लहान…’
चिरतरुण रमेश देव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘आनंद’ चित्रपटामधलं ते डॉक्टर भास्करच्या तोंडचंच वाक्य शेवटी वापरावंसं वाटतं.. ‘आनंद मरा नहीं… आनंद मरते नहीं…!