लतादीदींच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ सिनेपत्रकार मंदार जोशी संपादित ‘तारांगण’ या लोकप्रिय मासिकाचा सप्टेंबर २०१९चा अंक संपूर्ण लता मंगेशकर विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला होता. या अंकातील प्रत्येक लेख लतादीदींच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाशझोत टाकणारा होता. त्यातल्या एका लेखातून लतादीदींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील संगीतकार या पैलूचा, ‘आनंदघन’चा उलगडा झाला होता… तो केला होता लतादीदींचे बंधू, प्रतिभावान संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी… लतादीदींना आदरांजली म्हणून हा लेख आम्ही पुन:प्रकाशित करीत आहोत…
– – –
मराठी चित्रपटसृष्टीत काही दशकांपूर्वी ‘आनंदघन’ या नावाने मोठे वादळ उठविले होते. विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मोहित्यांची मंजुळा’ चित्रपटामधील सर्व गीते त्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात वाजत होती. लोकसंगीताच्या अद्भुत रसात न्हायलेल्या या गीतांनी रसिकांना धुंद केले होते. मात्र, या गीतांना जन्म देणार्या ‘आनंदघन’ या संगीतकाराबद्दल प्रेक्षक-श्रोते अनभिज्ञ होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीच ‘आनंदघन’ हे टोपण नाव घेऊन संगीत दिल्याचे सत्य कालांतराने उघड झाले. ‘आनंदघन’ या नावाने दीदीने काही मोजक्या चित्रपटांसाठी अवघी ३२ ते ३३ गाणी संगीतबद्ध केली. ही सर्व गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
तब्बल सात दशकांपूर्वी पडद्यावर आलेल्या ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाला दीदीने ‘लता मंगेशकर’ या नावाने संगीत दिले होते. मात्र, त्यानंतर तिने गायनावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. भालजी पेंढारकर आम्हा मंगेशकर कुटुंबाला गुरुस्थानी होते. १९६४च्या सुमारास ते ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटाच्या निर्मितीत मग्न होते. या चित्रपटाला लतादीदीनेच संगीत द्यावे, असा त्यांनी आग्रह धरला. भालजींबरोबर घनिष्ठ स्नेह असल्यामुळे लतादीदीला त्यांचा आग्रह मोडता येईना. लोकप्रिय व्यक्तीला समाजात वावरताना खूप काळजी घ्यावी लागते. दोन्ही बाजूंनी बोलणारे अनेक असतात. त्यामुळे दीदीने ‘आनंदघन’ या टोपणनावाने संगीत देण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे भालजींनीसुद्धा आपल्या चित्रपटांमध्ये ‘योगेश’ या टोपणनावाने गीतलेखन केले होते. भालजींचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षे संगीतरसिक ‘योगेश’ या नावाबाबतही अनभिज्ञ होते.
‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटाचे संगीत खूप लोकप्रिय ठरले. मात्र लतादीदी, भालजी आणि ध्वनिमुद्रण करणारे तीन-चार कलावंत वगळता इतरांना ‘आनंदघन’ या नावाचा रहस्यभेद झाला नव्हता. या चित्रपटातील गीतांच्या ध्वनिमुद्रणावेळी मी उपस्थित असे. त्यामुळे मीच ‘आनंदघन’ हे टोपणनाव घेऊन या चित्रपटाला संगीत दिले असावे, अशी अनेकांची समजूत झाली होती. तेव्हा ‘आनंदघन’ हे नाव आपले नसल्याचा खुलासा मला करावा लागला. माझ्या इन्कारानंतर रसिकांचा रोख ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक दत्ता डावजेकर यांच्याकडे वळला होता. मात्र त्यांनीही इन्कार केल्यानंतर रसिकांमध्ये आणखीनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तोपर्यंत ‘साधी माणसं’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन त्यातील गीतेही लोकप्रिय ठरली होती. सर्वोत्कृष्ट संगीतासह या चित्रपटाला राज्य सरकारचे आठ पुरस्कार मिळाले होते. ‘मोहित्यांची मंजुळा’च्या वेळी दीदीने पुरस्कार स्वीकारला नव्हता. त्यामुळे ‘आनंदघन’ नावाची व्यक्ती पुरस्कार स्वीकारायलाही का येत नाही, असा प्रश्न लोकांना पडला होता. यावेळी सरकारने भालजींना कोल्हापूरला पत्र पाठवून त्यांच्याकडून ‘आनंदघन’ नावाच्या व्यक्तीचा पत्ता मागविला. तेव्हा भालजी आणि माझ्या आग्रहानंतर दीदीने रसिकांना ‘आनंदघन’ नावामागचे रहस्य उलगडले.
१९६४ ते १९६९ ही वर्षे ‘आनंदघन’ची अर्थात दीदीची होती. ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘तांबडी माती’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’ या चित्रपटातील दीदीने संगीतबद्ध केलेली गीते आजही रसिकांच्या मनात घर करून बसली आहेत. ‘आनंदघन’च्या वाटचालीचा अत्यंत निकटचा साक्षीदार असल्याने, तसेच स्वतः संगीतकार असल्याने मला दीदी किती प्रतिभावंत संगीतकार आहे, याची जाणीव झाली. दीदीने ‘आनंदघन’ या नावाने फक्त ३३ गीते संगीतबद्ध केली. मात्र, प्रत्येक गीत रसिकांच्या मनास भिडले.
दीदीच्या संगीताचा जेव्हा मी तटस्थपणे विचार करतो, तेव्हा मला तिच्या संगीतातली सहजपणा आणि साधेपणा विशेष भावतो. तिला चाली देण्यासाठी अजिबात झगडावे लागत नाही. पाच-दहा मिनिटांमध्ये तिची चाल तयार होई. विशेष म्हणजे त्या काळात हिंदी चित्रपटांसाठी दीदी अनेक गीते गात असली, तरी तिने संगीतबद्ध केलेल्या एकाही गीताला हिंदीचा वास नव्हता. ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘मराठा तितुका मेळवावा’ हे ऐतिहासिक चित्रपट होते. तेव्हा दीदीने काही वेगळ्या संगीतप्रवाहाच्या वाटेला न जाता या चित्रपटांच्या ऐतिहासिक बाजाला शोभेल असेच संगीत दिले. दीदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिला गीताचा मुखडा आणि अंतरा सहज सुचायचा. तिच्या संगीतातील सहजतेमागचे बहुधा हेच कारण असावे.
एकदा भालजींनी तिला लावणीची चाल बांधायला सांगितले. त्या काळातील लावण्यांमध्ये शृंगाररस अधिक असे. भालजींच्या कथानकातील स्त्री चांगल्या घरातील असल्याने त्यांना साधी लावणी हवी होती. भालजींना नेमके काय हवे आहे, याची दीदीला कल्पना आली होती. ज्या दिवशी आम्ही भालजींना भेटलो, त्याच दिवशी दीदीने रेडिओवर एक मद्रासी गाणे ऐकले. हे गाणे रेडिओवर वाजत असतानाच तिने मला जवळ बोलावले आणि भालजींना हवी असलेली लावणी सापडल्याचे सांगितले. वास्तविक, भालजी आपल्या चित्रपटांची गीते प्रथम लिहीत आणि त्यानंतर दीदी त्याला संगीत देत असे. मात्र यावेळी उलटे झाले. दीदीने प्रथम चाल तयार केली. ही चाल त्वरित आम्ही शांता शेळकेंना ऐकविली आणि शांताबाईंनी या चालीवर ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ असे शब्द लिहून लावणी पूर्ण केली. पुढचा इतिहास तर सर्वज्ञात आहे. दीदींच्या संगीत दिग्दर्शनाखाली मलाही तीन गीते गाण्याची संधी मिळाली. ‘नको देवराया अंत आता पाहू’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘जीवाशिवाची बैलजोड’ या गीतांच्या चाली ऐकल्या की दीदीच्या संगीतातील उत्स्फूर्तता लक्षात येते. जुन्या काळात मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ खूप कमी असल्यामुळे निर्माते संगीतावर हात राखून खर्च करीत. त्यामुळे भालजींची निर्मिती असणार्या चित्रपटांच्या ध्वनिमुद्रणासाठी दीदीने फक्त चारपाच कलावंतांचे साह्य घेतले. परंतु, आमचे सुदैव म्हणजे या कलाकारांमध्ये पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, अण्णा जोशी यांचा समावेश होता. दीदीने संगीत दिलेल्या गीताचे आम्ही वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करायचो. आश्चर्य म्हणजे अवघ्या दोन ते अडीच तासांत दीदी एक गाणे ध्वनिमुद्रित करीत असे. गायनक्षेत्रात दीदी सर्वोच्च स्थानी पोचल्यानंतरही तिच्यावर संगीत देताना कसलेही दडपण नसायचे. हल्ली चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शकांना गुणवत्ता थोडी बाजूला ठेवून निर्मात्यांच्या मागणीप्रमाणे चाली द्याव्या लागतात. मात्र, त्या काळात भालजींसारखे दिग्दर्शक दीदीला दूरध्वनीवरून केवळ कथानक सांगत आणि दीदी केवळ कथानक ऐकून इथेच गीताचे ध्वनिमुद्रण करीत असे. भालजींचा दीदींवर मोठा विश्वास असल्याने त्यांना ध्वनिमुद्रित गीतेच ऐकविली जात. प्रतिभावंत लेखक क्षणार्धात चांगली ओळ लिहून जातो. दीदीचेही तसेच होते. दीदीची प्रत्येक चाल हृदयातून येत असे. चाल सुचल्यावर ती रसिकांना आवडेल की नाही, याचा विचार ती करीत नसे. लतादीदीचे बालपण खानदेश आणि कोल्हापुरात गेले. ‘आनंदघन’ नावाने दीदीने दिलेल्या संगीतात या मातीचे संस्कार स्पष्टपणे जाणवतात. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलील चौधरी आणि हेमंतकुमारसुद्धा दीदीच्या संगीताचे चाहते होते. एका चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणासाठी ते उपस्थित होते. यावेळी हेमंतकुमार यांनी एका गीतातील श्लोक आपण म्हणणार असल्याचा हट्ट दीदीकडे धरला. अर्थातच दीदीने तो पूर्ण केला. एके दिवशी तर प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक गुलाम मोहम्मद आणि नौशाद यांचे सहाय्यक महंमद शफी यांनी आमच्या ध्वनिमुद्रणावेळी स्टुडिओस भेट दिली. त्यावेळी गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेला ‘पाकिजा’ चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी या चित्रपटातील गीते लोकप्रिय झाली होती. या दोघांनाही दीदीची चाल आवडली. मात्र, गुलाम मोहम्मद स्पष्ट मत व्यक्त करताना म्हणाले, ‘लतादीदी, गाना तो अच्छा है, लेकिन खाली खाली लगता है.’ पूर्वीच नमूद केल्याप्रमाणे कमी ‘बजेट’मुळे मोजक्याच कलावंतांसह आम्हाला गाणी ध्वनिमुद्रित करावी लागत. या गीतातील ढोलकीचे बोल मोहम्मद यांना स्पष्टपणे ऐकू येत नव्हते. तेव्हा दीदीवरील स्नेहाखातर महंमद शफी यांनी हार्मोनियमचा ताबा घेतला आणि गुलाम मोहम्मद यांनी ढोलकीवर आपली थाप उमटविली.
‘आनंदघन’ नावाने लतादीदीच संगीत देत असल्याची खात्री पटल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक निर्मात्यांनी तिला त्यांच्या चित्रपटासाठी संगीत देण्याचा आग्रह केला. परंतु दीदीने केवळ भालजींच्या आग्रहाखातर संगीत दिले असल्याने तिचा इतरांना नकार ठरलेलाच होता. सख्खी बहीण उषा मंगेशकरलाही दीदीने नकार दिला. ‘पवनाकाठचा धोंडी’ या आपण निर्मिलेल्या चित्रपटासाठी दीदीने संगीत द्यावे, अशी उषाताईची अपेक्षा होती. मात्र दीदी तिची अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. काही वर्षांपूर्वी मीसुद्धा तिला पुन्हा संगीत देण्याचा आग्रह केला होता. परंतु दीदी तिच्या निर्णयावर ठाम होती. हल्ली मला तिचा ठामपणा पटू लागला आहे. कारण कोणत्याही कलेचा जन्म उत्स्फूर्ततेमधूनच होतो. फूल हे आपोआपच फुलते. दीदीच्या संगीताचा सुगंध तिने संगीतबद्ध केलेल्या गीतांमधून दरवळला आहे आणि तो वर्षानुवर्षे असाच दरवळत राहणार आहे.