विविध पुस्तकातून संकलित केलेल्या लतादीदींबद्दलच्या ९२ अनोख्या गोष्टी. याशिवाय काही मुलाखती, नेटवरील ब्लॉग्स आणि लेख यातूनही माहिती घेतली आहे. चूकभूल द्यावी घ्यावी.
१) १९२९ साली या दिवशी जन्मलेल्या लतादीदींचे नाव खरे तर हेमा हर्डीकर राहिले असते. पण ते झाले लता मंगेशकर!. का? ते खालील ६७व्या माहितीत बघा..
२) दीदींच्या वयाच्या १३व्या वर्षी म्हणजे १९४२ साली त्यांचे वडील म्हणजे मास्टर दीनानाथ हे जग सोडून गेले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत याच वर्षी वयाच्या १३व्या वर्षी दीदींनी त्यांचे पहिले गाणे `किती हसाल’ या मराठी चित्रपटात म्हटले. पण दुर्दैवाने ते चित्रपटात घेतले गेले नाही!
३) याच वर्षी म्हणजे १९४२ साली `पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटात `नटली चैत्राची नवलाई’ हे दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेले गाणे दीदींनी म्हटले आणि ते त्यांचे प्रथम गाणे म्हणून मानले गेलेय.
४) पुढच्या वर्षी म्हणजे १९४३ साली त्याचे प्रथम हिंदी गाणे आले. मात्र ते आले मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ या चित्रपटात! ‘माता एक सपूत’ असे त्याचे शब्द होते!
५) याच दरम्यान ‘गजाभाऊ किंवा ‘माझे बाळ’ या चित्रपटात त्यांनी छोट्याशा भूमिका देखील केल्या.
६) दीदींचे पहिले हिंदी चित्रपटातील गाणे १९४६ साली ‘आप की सेवा में’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘पाव लागू कर जोरी’ हे आले!
७) अभिनेता महिपाल, जे नंतर ‘नवरंग’ आणि इतर चित्रपटांमुळे नायक म्हणून प्रसिद्धीस आले, ते दिदींवरील प्रथम हिंदी चित्रपट गाण्याचे गीतकार होते!
८) पण या आधी किंवा या दरम्यान प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांनी दिदींचा आवाज ओळखला तो एका स्पर्धेत. या स्पर्धेत लहानग्या लताने ‘खचांजी’ चित्रपटातील नूरजहाँने गायिलेले गाणे गायले होते.
९) या स्पर्धेत जिंकल्याबद्दल लतादीदींना दिलरुबा हे वाद्य बक्षीस म्हणून मिळाले. पण नंतर जेव्हा गुलाम हैदर यांनी प्रसिद्ध निर्माते शशधर मुखर्जी यांना लताचा आवाज ऐकवला, तेव्हा त्यांनी तो फार पातळ आवाज आहे म्हणून सरळ नाकारला!
१०) १९४८ साली ‘जिद्दी’ चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जेव्हा लतादीदी लोकल आणि बसने फेमस स्टुडिओत जात होत्या तेव्हा एक तरुण त्यांच्याच पाठीपाठी पार स्टुडिओपर्यंत पोचला. दीदींना नंतर कळले की हा तरुण किशोरकुमार आहे आणि स्टुडिओच शोधतो आहे! त्या दिवशी दोघांचे पहिले द्वंद्वगीत रेकॉर्ड झाले!
११) दीदींची भारतभर खरी ओळख झाली ती १९४९ साली आलेल्या ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने! पण हे गाणे रेकॉर्ड झाल्यावर जेव्हा निर्माता सावक वाच्छा यांनी ऐकले तेव्हा त्यांना ते अजिबात आवडले नाही आणि त्यांनी चक्क ते चित्रपटातून काढून टाकायचे ठरवले. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी आग्रह केल्याने गाणे चित्रपटात राहिले आणि दिदींचा आवाज घराघरात पोचला.
१२) ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याच्या सुरवातीच्या ओळी ‘खामोश है जमाना….’ या दूर कुठून तरी गूढपणे येतात असा इफेक्ट हवा होता. पण तेव्हा तंत्रज्ञान फारसे प्रगत नसल्याने आणि रेकॉर्डिंगसाठी एकच मायक्रोफोन असल्याने तो
रेकॉर्डिंग रूमच्या मध्ये ठेवून दिदींना या ओळी दुरून माइक्रोफोनपर्यंत चालत चालत येत म्हणायला लावल्या, जेणेकरून असा दुरून कुणी गात असल्याचा इफेक्ट यावा! आता हे गाणे आणि या ओळी ऐकताना ही कसरत केली असेल असे वाटणारसुद्धा नाही!
१३) हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले तरी या गाण्याच्या रेकॉर्डवर गायिका म्हणून लता मंगेशकर नव्हे तर ‘कामिनी’ हे नाव होते! कारण त्यावेळी रेकॉर्डवर गाणे चित्रपटातील ज्या भूमिकेवर चित्रित झाले त्याचे नाव द्यायची पद्धत होती! आणि या चित्रपटात मधुबालाने केलेल्या भूमिकेचे नाव ‘कामिनी’ होते! पुढे ही पद्धत बदलली!
१४) मराठी चित्रपटांना दिदींनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिले आहे. हा शब्द त्यांना रामदास स्वामींच्या लिखाणातून सुचला. आधी भालजी पेंढारकर यांनी दीदींना ‘जयशंकर’ हे नाव सुचवले होते, पण ते त्यांना फारसे आवडले नाही!
१५) हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांच्या ‘आनंद’ या सुप्रसिद्ध चित्रपटासाठी लताजींना संगीतकार म्हणून विचारणा केली होती. पण तेव्हा पार्श्वगायनात संपूर्ण व्यस्त असल्याने त्यांनी नकार दिला. नंतर या चित्रपटाचे संगीत सलील चौधरीजी यांनी दिले.
१६) सचिन देव बर्मन यांच्याशी पाच वर्षे अबोला राहिल्यानंतर ‘बंदिनी’ चित्रपटातील ‘मोरा गोरा अंग लै ले’ हे गाणे दोघांच्या दिलजमाईचे प्रथम गाणे!
१७) रेकॉर्डिंगच्या आधी बहुतेक वेळा लता दीदी व्हायोलीन वादकास शेजारी बसवून गाण्याची पूर्ण चाल ऐकायच्या. गाणे व्यवस्थित लयीत गाण्यासाठी त्याचा उपयोग होतो असा त्यांचा विश्वास होता.
१८) संगीतकार चित्रगुप्त यांचे छोटे सुपुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार आनंद-मिलिंद जोडीतील मिलिंद यांचे जन्मनाव लतादीदींनी सुचवले होते. मिलिंद माधव असे त्यांनी सुचवलेले नाव पुढे मिलिंद असे झाले!
१९) ७०च्या दशकातील ‘इंतेकाम’ सिनेमातील ‘आ, जाने जा…’ हे कॅब्रे गीत गाण्यासाठी त्यांनी नकारच दिला होता. पण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सतत प्रयत्नामुळे आणि हे गाणे छचोर होणार नाही या ग्वाहीमुळे त्यांनी ते गायले. आज लताजींनी गायिलेल्या थोडक्या क्लब गीतांमध्ये हे एक प्रमुख आणि लोकप्रिय गाणे मानले जाते.
२०) ‘वोह कौन थी?’ या चित्रपटातील ‘लग जा गले’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय गीत रेकॉर्ड झाल्यानंतर दिग्दर्शक राज खोसला यांना मात्र पसंत पडले नव्हते आणि त्यांनी ते चक्क चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. संगीतकार मदन मोहन यांनी अभिनेता मनोज कुमारकरवी राज खोसला यांना समजावून सांगितल्यावर हे गाणे चित्रपटात ठेवले गेले! आज ते लताजींच्या अत्यंत लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे!
२१) ७०च्या दशकाच्या मध्ये लतादीदी आणि हृदयनाथजी यांनी संगीतकार जोडी म्हणून काम करायचे म्हणून जवळपास नक्कीच केले होते, पण मग पुन्हा लताजींच्या अतिव्यस्त पार्श्वगायनामुळे हा बेत बारगळला!
२२) ४०च्या दशकात अगदी सुरवातीला दिलीप कुमार यांनी लताजी यांना त्यांच्या उर्दू उच्चाराबद्दल ‘तुम्हारे ऊर्दू में मराठी दाल भात की बू आती है’ असे गमतीने म्हटल्यावर, लताजी यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि ऊर्दूची शिकवणी लावून आपले ऊर्दू उच्चार अगदी परफेक्ट केले.
२३) आणि नंतर जेव्हा ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे लोकप्रिय झाले तेव्हा नर्गिसची आई आणि तेव्हाची प्रसिद्ध अभिनेत्री, संगीतकार जद्दनबाई यांनी लताजींना शाबासकी देत म्हटले की या गाण्यात ‘बगैर’ हा शब्द ज्या तर्हेने उच्चारला आहे त्यावरून वाटत नाही की एका मराठी मुलीने हे उच्चारण केलेय!
२४) प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान जेव्हा गंभीर आजारी होते तेव्हा त्यांच्या अंतिम काळात त्यांनी हॉस्पिटलमधून लताजींना ‘रसिक बलमा’ हे गाणे फोनवरून ऐकविण्याची विनंती केली होती. हे गाणे ऐकल्यावर खूप शांतता आणि समाधान मिळते यावर त्यांचा विश्वास होता.
२५) ‘बैजू बावरा’ चित्रपटातील ‘तू गंगा की मौज मैं जमुना का धारा’ हे गाणे रेकॉर्ड करताना लताजींना १०२ डिग्री ताप होता. रेकॉर्डिंगच्या अखेरीस तर तापामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. पण हे गाणे ऐकताना हे कुठेही जाणवत नाही!
२६) ४०च्या दशकाच्या सुरवातीला ‘बडी माँ’ या चित्रपटात लताजींनी एक छोटीशी भूमिका केली होती. या चित्रपटाच्या अभिनेत्री नूरजहाँ होत्या. त्याआधी त्यांचेच ‘खचांजी’ चित्रपटातील गीत एका स्पर्धेत गाऊन लताजींनी बक्षीस मिळवले होते. त्यांची आणि नूरजहाँची प्रथम भेट या ‘बडी मां’ चित्रीकरणादरम्यान कोल्हापूरला झाली आणि नूरजहाँने लहानग्या लताला ‘तू पुढे खूप मोठी गायिका होशील’ असा आशीर्वाद दिला, तो पुढे अत्यंत खरा ठरला.
२७) १९४७नंतर भारत सोडून गेल्यावरही नूरजहाँ आणि लताजींचा स्नेह कायम होता. पाकिस्तानवरून बर्याचदा नूरजहाँ लताजींना फोन करताना ‘धीरे से आजा री अंखियन में’ हे गाणे ऐकवण्याची विनंती करायच्या आणि अर्थात लताजी त्या पूर्ण करायच्या.
२८) एके निवांत रात्री उस्ताद बडे गुलाम अली खान रेडिओ ऐकत असताना लताजींचे ‘ये जिंदगी उसी की है’ हे ‘अनारकली’ सिनेमातील गाणे लागले, तेव्हा ‘कम्बख्त, ये लडकी कभी बेसुरी नही होती!’ हे प्रशंसेचे उद्गार त्यांनी काढल्याचे सर्वविदित आहे.
२९) ‘महल’ आणि इतर चित्रपटातील रेकॉर्डस्वर जरी गायिका म्हणून लताजींचे नाव नसले तरी नंतर अभिनेत्रींच्या भूमिकेचे नाव रेकॉर्डवर देण्याची ही पद्धत नंतर बदलली आणि ‘बरसात’ या १९४९च्या चित्रपटापासून लताजींचे नाव पहिल्यांदा रेकॉर्डवर आले!
३०) लताजींनी गाण्याचे शब्द छचोर वाटतात म्हणून ‘संगम’ चित्रपटातील ‘मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया’ हे गाणे गायला नकार दिला होता. राज कपूर यांनी ‘हे गाणे फक्त गंमत म्हणून चित्रपटात आहे’ हे समजावून सांगितल्यावर त्यांनी हे गाणे गायले.
३१) गाण्यांच्या शब्दांच्या याच कारणास्तव त्यांनी १९५३ सालच्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटातील ‘मैं बहारों की नटखट रानी’ हे गाणेही गायले नाही. हे गाणे नंतर आशाजींनी गायले!
३२) हिंदी सिनेमाच्या सर्व प्रमुख संगीतकारांपैकी फक्त ओ. पी. नय्यर यांनी लताजींचा आवाज कधीही आपल्या संगीतात वापरला नाही!
३३) संगीताव्यतिरिक्त लताजींना फोटोग्राफीची आवड आणि मूळापासून माहिती होती. कॅमेरा आणि त्याची तांत्रिक अंगे त्यांना चांगल्या रीतीने ठाऊक आहेत. ज्वेलरी डिझाईन ही त्यांची दुसरी प्रमुख आवड!
३४) सामान्यतः स्त्रिया चांदीचे पैंजण वापरतात पण लताजींचे पैंजण हे नेहमी सोन्याचे असत. श्रेष्ठ गीतकार आणि मंगेशकर कुटुंबाचे स्नेही पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सांगण्यावरून त्यांनी कधीही चांदीचे पैंजण घातले नाहीत.
३५) माईकसमोर जाण्याच्या आधी शक्यतो पादत्राणे काढून ठेवायची सवय लताजींना होती. लंडनच्या अल्बर्ट हॉल येथे कार्यक्रम करताना त्या हे करायला गेल्या तेव्हा तेथील थंडीमुळे आयोजकांना त्यांना पादत्राणे घालायची विनंती करावी लागली!
३६) अभिनेत्री मधुबाला बर्याचदा तिची सर्व गाणी फक्त लताजी म्हणतील असा आग्रह निर्माता/दिग्दर्शकांकडे करायची. अनेकदा आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ती तसे नमूद करण्याचा आग्रह करायची!
३७) ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट संगीतकार म्हणून राज कपूर यांनी हृदयनाथजी यांना देतो म्हणून कबूल केल्यावर नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना दिला. या कारणामुळे या चित्रपटाची गाणी गायला लताजींची इच्छा नव्हती. राज कपूर आणि स्वत: हृदयनाथजी यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी या चित्रपटाची गाणी गायली.
३८) १९४२ ते १९४८ पर्यंत संघर्ष करताना आणि वेगवेगळ्या स्टुडिओत पोचताना लताजी लोकल आणि बसनेच जायच्या. १९४८ साली त्यांनी त्यांची पहिली कार ‘ग्रे हिल्मन’ घेतली आणि हा लोकलचा प्रवास थांबला.
३९) ‘वीर झारा’ या चित्रपटाकरिता त्यांनी एक पैसाही मानधन घेतले नाही तेव्हा निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मर्सिडीज त्यांना भेट दिली.
४०) सगळ्या संगीतकारांशी लताजींचे संबंध सौहार्दाचे असले तरी मदन मोहन यांच्याशी मात्र भावाचे नाते होते. मदन मोहन यांची मुले संजीवजी आणि संगीताजी यांनासुद्धा त्यांनी मुलासारखा लळा लावला.
४१) मंगेशकर हे त्यांचे आडनाव जगात प्रसिद्ध असले तरी त्यांच्या वडिलांच्या घराण्यात हर्डीकर हे नाव होते. काहीजण ‘अभिषेकी’ हे आडनाव होते असेही सांगतात.
४२) लताजी २० वर्षाच्या आसपास असताना त्यांना एक स्वप्न सारखे पडायचे ज्यात त्या एका मंदिराच्या पायर्यांवर बसल्या आहेत आणि खाली समुद्राच्या लाटा येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करताहेत! लताजींच्या आई, माई मंगेशकर यांनी याचा अर्थ ‘तुला देवाचा आशीर्वाद आहे. एक दिवस तू खूप मोठी होशील’ असा सांगितला. ही घटना १९४८च्या आसपासची असावी.
४३) त्यांचे नाव ४०च्या दशकाच्या शेवटी बर्यापैकी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या रेडिओवरच्या बर्याच प्रशंसकांनी ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रखदा’ आणि ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ या गाण्यांबद्दल मात्र ‘त्यांनी अशी सुमार आणि हलक्या अर्थाची गाणी गाऊ नयेत’ म्हणून तीव्र नापसंती दर्शवली होती. अर्थात आज ही गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत.
४४) लहान असताना लताजी थोर गायक के. एल. सैगल यांच्या गायनाच्या वेड्या होत्या. त्या लहान वयात लग्नाचा अर्थ माहिती नसतानासुद्धा ‘मी लग्न करीन तर के. एल. सैगलशीच’ असा त्यांचा बालहट्ट होता! मात्र १९४७ मध्ये सैगल साहेबांचा मृत्यू होईपर्यंत त्यांची आणि सैगल साहेबांची कधीही भेट झाली नाही.
४५) लताजींनी शोभना समर्थ, नंतर त्यांच्या मुली नूतन आणि तनुजा आणि नंतर तनुजाची मुलगी काजोल अशा तीन पिढ्यांसाठी गाणी म्हटली. तीन पिढ्यांतील नायिकांसाठी एकाच गायिकेने गाणी म्हटल्याचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे! (शोभना समर्थ : सिनेमा : नृसिंह अवतार १९४९)
४६) गाणे रेकॉर्ड करायच्या आधी लताजी आपल्या हस्ताक्षरात गाणे हिंदीत लिहून घेत. कागदावर सुरवातीला श्री लिहिलेले असे. मग त्या लिहिलेल्या गाण्यात कुठे पॉज घायचा, कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा, कुठे श्वास घ्यायचा याबद्दल खास त्यांचा खुणा असत.
४७) गाण्यातील शब्दांचे महत्व, त्यांचे उच्चारण आणि कुठल्या शब्दांवर त्याच्या अर्थानुसार जोर द्यायचा याचे प्राथमिक महत्व संगीतकार गुलाम हैदर साहेबानी त्यांना सांगितले. तेव्हापासून शब्दोच्चारावर लताजींचा नेहमी कटाक्ष असे.
४८) लताजींच्या विरहगीतांनी श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू येत असले तरी स्वतः लताजींना दुःखी चित्रपट फारसे आवडायचे नाहीत. उलट त्यांना खेळकर, गंमतीप्रधान चित्रपट जास्त आवडायचे. सीआयडी ही त्यांची आवडती सिरीयल होती आणि ‘माताहारी’ हा ४०च्या दशकातील गुप्तहेरप्रधान इंग्रजी चित्रपट हा त्यांचा पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट आहे.
४९) लताजी गाणी गाताना श्वास कसा आणि कुठे घेतात याबद्दल पुष्कळ लोकांना कुतूहल असायचे, कारण त्यांच्या गाण्यात अशी श्वास घेतल्याची जागाच आढळत नाही. श्वासोश्वासाचे हे तंत्र त्यांना अगदी सुरवातीला संगीतकार अनिल बिश्वास यांनी शिकवले होते आणि ते त्यांनी समर्थपणे हाताळले.
५०) संगीतकार सज्जाद हुसेन हे अगदी परखड आणि फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. पण लताजींबद्दल बोलताना मात्र त्यांनी काढलेले उद्गार ‘एक लता गाती है, बाकी सब रोती है’ प्रसिद्ध आहेत!
५१) १९५९ सालापर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये गायकांकरिता कुठलेही अवॉर्ड नव्हते. याचा निषेधार्थ लताजींनी १९५७च्या फिल्मफेअर अवॉर्ड्स कार्यक्रमात ‘रसिक बलमा’ ही गाणे गायला नकार दिला. पुढे १९५९ सालापासून गायकांकरिता असे
अवॉर्ड आले. आणि १९६७पासून स्त्री आणि पुरुष गायकरिता स्वतंत्र अवॉर्ड्स सुरु झालीत.
५२) ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’ या ‘वह कौन थी’ सिनेमातील गाण्याचे शूटिंग साधनावर करायची तयारी झाली, पण लताजी लंडनला असल्याने गाणे लताजींच्या आवाजात तोपर्यंत रेकॉर्ड झाले नव्हते. शूटिंग वाया जाऊ नये म्हणून मग संगीतकार मदन मोहन यांनी स्वतःच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड केले आणि या पुरुषी आवाजावर साधनाला गाणे शूट करावे लागले! नंतर हे गाणे लताजींच्या आवाजात रेकॉर्ड होऊन चित्रपटात आले!
५३) फोटोग्राफीप्रमाणेच लताजींना क्रिकेटचीसुद्धा प्रचंड आवड होती आणि सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर त्यांचे अत्यंत आवडीचे खेळाडू होती. सचिन तर त्यांना आईसमानच मानायचा!
५४) ८०च्या दशकात कॅनडा दौर्यात असताना त्यांनी तेथील प्रसिद्ध गायक ऑने मरे याने गायिलेले ‘यू निडेड मी’ हे संपूर्ण इंग्रजी गाणे गायिले होते. त्यांनी गायिलेले हे बहुधा एकमेव इंग्रजी गाणे!
५५) हिंदी सिनेसंगीतात त्यांचे नाव जगविख्यात असले तरी त्यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि त्यातील बीथोवन आणि मोझार्ट यांच्या सुरावटी ऐकायला फार आवडत.
५६) सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात स्टुडिओ ते स्टुडिओ अशी पायपीट त्यांनी केली असली तरी नंतर त्यांचा स्वतःचा स्टुडिओ होता. काही वर्षांपूर्वीच त्यांचा लता मंगेशकर स्टुडिओ आणि ‘एल. एम. म्युजिक’ नावाने त्यांची कंपनी देखील आली.
५७) २००६नंतर त्यांनी हिंदी सिने संगीत जवळपास बंदच केले असले तरी भक्तीगीतांचे अल्बम त्या गात असत. वयाच्या ८८-९०व्या वर्षी त्यांनी भक्तीगीतांच्या अल्बममध्ये आवाज दिला होता.
५८) कुणाही स्त्रीला आवड असावी तशी त्यांना हिर्यांची खूप आवड होती आणि स्वतःचे हिर्यांचे दागिने त्या स्वतःच डिजाईन करत.
५९) ४०च्या दशकात हिंदी सिनेमात गायन सुरु केल्यानंतर सगळी मंगेशकर बहीण भावंडे आईसोबत मुंबईतील नाना चौक येथे दोन खोल्यांच्या घरात राहायचे. १९६० मध्ये त्यांनी प्रभुकुंज या पेडर रोडवरील बिल्डिंगमध्ये एक पूर्ण मजला घेतला आणि गेली ६० वर्षे त्या तिथेच राहिल्या.
६०) ४०च्या दशकातील सुरवातीची काही वर्षे हिंदी सिने संगीतात लताजींचा सूर काहीसा अनुनासिक वाटेल. कदाचित त्यावेळच्या प्रसिद्ध गायिकांचा किंवा त्या वेळच्या ट्रेंडचा तो परिणाम असेल. पण काही काळातच लताजी आपल्या मोकळ्या आवाजात गाऊ लागल्या. १९४६ सालच्या ‘सौभद्र’ चित्रपटातील ‘सांवरिया हो, बांसुरीया हो’ हे गाणे याचे द्योतक आहे. १९४९पासून हा आवाज पूर्णपणे मोकळा झाला!
६१) १९४९ साली राज कपूर यांच्या ‘बरसात’ चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी ‘उद्या या’ म्हणून एक देखणा तरुण लताजींच्या घरी सांगायला आला. तेव्हा लताजींनी आशाताईंना ‘राज साहेबांच्या ऑफिसची निरोप देणारी माणसेसुद्धा स्मार्ट दिसतात’ असे गमतीने म्हटले. दुसर्या दिवशी रेकॉर्डींग करताना कळले की तो घरी आलेला स्मार्ट युवक म्हणजे संगीतकार शंकर-जयकिशनमधील जयकिशन होते!
६२) ९०च्या दशकात आलेला आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीत दिलेला ‘साज’ हा चित्रपट त्यांच्या आणि आशाताईंच्या जीवनावर असल्याचे म्हटले जाते. अर्थात चित्रपटात तसे कुठे म्हटलेले नाही किंवा लताजी किंवा आशाताई यांनी सुद्धा तशी काही वाच्यता केली नाही.
६३) लताजींनी पिता-पुत्रांच्या अनेक संगीतकार जोड्यांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. सचिनदेव बर्मन-आर. डी. बर्मन, रोशन-राजेश रोशन, चित्रगुप्त-आनंद मिलिंद, शंभू सेन-दिलीप समीर सेन, कल्याणजी-आनंदजी-विजू शाह, मदन मोहन-संजीव कोहली अशा आणि इतरही संगीतकार पिढ्यांसोबत गायन केलेय!
६४) त्यांच्याशी नामसाध्यर्म्य असलेल्या इतर गायिकांसोबत त्यांची गाणी आहेत. अगदी सुरवातीच्या काळातील ‘पहिली मंगळागौर’ चित्रपटात स्नेहलता प्रधान या गायिकेसोबत, ‘चूप चूप खडे हो’ या गाण्यात प्रेमलतासोबत तर ‘कच्चे धागे’ या आणि इतर चित्रपटात हेमलतासोबत त्यांची द्वंद्व गीते आहेत!
६५) ‘जंगली’ चित्रपटातील ‘एहसान तेरा होगा मुझ पर’ हे गाणे गायला कठीण गेल्याचे लताजी यांनी एकदा सांगितले होते. कारण मुळात हे गाणे प्रथमतः पुरुषी आवाजाकरिता तयार केले गेले होते आणि त्यात मुखडा आणि कडवे यात खूप चढ उतार आहेत!
६६) ‘लेकिन’ हा चित्रपट लताजींनी निर्मित केलेला चित्रपट आहे. चित्रपटाच्या नामावलीत मात्र हृदयनाथजी यांचे नावसुद्धा निर्माता म्हणून आहे.
६७) इंदोर येथे २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्म झाल्यानंतर त्यांचे नाव हेमा ठेवले गेले. असे म्हणतात की तेव्हा आडनाव हर्डीकर असे होते. नंतर त्यांचे नाव बदलून ‘लतिका’ असे ठेवल्या गेले, कारण दीनानाथजींच्या ‘भावबंधन’ या संगीत नाटकातील एका स्त्री पात्राचे ते नाव होते. नंतर गोव्याच्या मंगेशी या कुलदैवताचे स्मरण म्हणून आडनावसुद्धा हर्डीकरवरून मंगेशकर झाले असे सांगतात. म्हणून हेमा हर्डीकर याचे रूपांतर लता मंगेशकर असे झाले!
६८) लताजींना सहावेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी त्या स्पर्धेतून दुसर्या गायिकांना संधी मिळावी म्हणून माघार घेतली. याशिवाय त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पारितोषिक, भारतरत्न आणि किमान १० विद्यापीठांची डी.लिट ही पदवी मिळाली होती.
६९) हृदयनाथजी यांच्या म्हणण्यानुसार लताजींचा आवाज सातही स्वरात आणि सगळ्या २८ श्रुतींना स्पर्श करू शकायच्या. अशी किमया असणार्या त्या बहुधा एकमेव गायिका असाव्यात. पुरुषी आवाजामध्ये बडे गुलाम अली खान साहेब यांच्याबाबत असे म्हटले जाते.
७०) त्यांचे ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटातील ‘आ अब लौट चले’ या गाण्यातील ‘आजा रे… आ जा..’ ही तान ऐकली तर मानवी आवाज अंतिमतः जिथे पोहचू शकतो त्या सप्तकाच्या शेवटच्या ठिकाणास स्पर्श करणारा आणि तरीही तेथे स्थिर राहून अजिबात विचलित न होण्याची किमया साधणारा हा अद्भुत आवाज होता.
७१) ‘आझाद’ चित्रपटातील ‘अपलम चपलम’ ही गाणे उषा मंगेशकर यांचे हिंदी सिनेमातील दुसरेच गाणे आणि लताजींसोबत प्रथम द्वंद्वगीत. पण हे गीत गाताना उषाजी खूप नर्वस होत्या. त्यांना लताजींनी समजावून धीर दिला तेव्हा हे गाणे रेकॉर्ड झाले आणि आता ते या चित्रपटातील एक प्रमुख लोकप्रिय गाणे आहे!
७२) हिंदी सिनेमात लताजी आणि आशाजी यांची जवळपास ९३ द्वंद्व गीते आहेत. दोघींचीही शैली वेगवेगळी असली तरी दोन स्त्री गायिकांनी गायिलेली द्वंद्वगीतांची ही महत्तम संख्या म्हणावी लागेल!
७३) ‘अंदाज’ चित्रपटात ‘डरना मुहब्बत करले’ या गाण्याच्या वेळी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची लताजींची प्रथमतः भेट झाली, त्यावेळी संगीतकार नौशाद यांनी ‘बिलकुल नूरजहाँ की तरह गाती है, लेकिन पतली आवाज में’ अशी ओळख करून दिली. पुढे मजरुह साहेब लताजी आणि कुटुंबियांचे घनिष्ठ मित्र झाले.
७४) ६०च्या दशकाच्या मध्यात लताजींना अचानक आवाजाचा त्रास आणि सतत उलट्या होऊ लागल्या. अन्नातून विषप्रयोग केला गेल्याच्याही बातम्या तेव्हा आल्या. त्याचा स्वयंपाकीसुद्धा तेव्हा अचानक घर सोडून निघून गेला. या घटनेनंतर बरीच वर्षे उषाजींनी स्वयंपाकघर सांभाळले!
७५) ‘आज फिर जिने की तमन्ना है’ हे लताजींचे गाईड सिनेमातील अतिशय लोकप्रिय गाणे तेव्हा देव आनंद याला आवडले नव्हते आणि ते चित्रपटात न ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्याचा लहान भाऊ आणि गाईडचा दिग्दर्शक गोल्डी उर्फ विजय आनंद याने त्याला शूट केलेले गाणे पाहून एकदा निर्णय घे असे सांगितले आणि देव आनंदचे मत बदलले!
७६) अगदी सुरवातीच्या काळात लताजींचे गुरु अमानत खान साहेब यांनी एकदा संगीतकार सज्जाद हुसेन साहेबाना सांगितले की त्यांच्याकडे लता नावाची विद्यार्थिनी आहे आणि अतिशय हुशार आणि काहीही सांगितले तरी चटकन आत्मसात करणारी आहे. कुठलीही तान, मुरकी असो, ती कधी चुकत नाही. पुढे ‘हलचल’ या सिनेमाच्या वेळी सज्जाद हुसैन साहेबांना लताजींच्या गाण्यात याचा पूर्ण प्रत्यय आला!
७७) मन्ना डे यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की सामान्यतः पुरुष गायकांचा पीच हा स्त्री गायिकांपेक्षा जास्त असतो. पण लताजी आणि आशाजींबाबत असे अजिबात नाही. त्या कुठल्याही पीचवर पोहोचू शकतात. ‘दैया रे दैया रे कैसो रे पापी बिच्चूवा’ या ‘मधुमती’ सिनेमातील गाण्यात माझ्या ओळींनंतर ज्या प्रकारे लता ‘ओये ओये ओये ओये’ करीत गाण्यात येते ते ऐकून मी स्तंभित झालो होतो असेही त्यांनी यात म्हटले होते!
७८) बर्याच संगीतकारांचे असे म्हणणे होते आणि आहे की लताजींच्या आवाजात प्रसाद गुण आहे. त्यामुळे भक्तिगीते, हळुवार प्रेमगीते, भावगीते या प्रकारात त्यांचा आवाज अगदी चपखल आहे. त्यामुळे या प्रकारातील त्यांची गाणी विशेष लोकप्रिय आहेत.
७९) संपूर्ण जग जरी लताजींची गाणी दररोज ऐकत असले तरी स्वतः लताजी घरी असताना पंडित भीमसेन जोशी, उस्ताद बडे गुलाम अली खान किंवा मेहंदी हसन साहेब यांचे गायन ऐकणे पसंत करत.
८०) यश चोप्रा यांचा ‘चांदनी’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी हिट झाल्यानंतर त्यांनी त्याचा तेलगू रिमेक बनवला. त्यात लताजींनी प्रत्येक तेलगू शब्द काळजीपूर्वक शिकून पूर्ण चार गाणी गायली. आज कुणाही तेलगू व्यक्तीस विचारले तर या गाण्यातील तेलगू शब्दोच्चरात बारीकशीसुद्धा चूक आढळणार नाही!
८१) १९७२ च्या ‘मीरा’ सिनेमासाठी संगीतकार आणि थोर सतारवादक पंडित रविशंकर याना खरे तर लताजींचाच आवाज हवा होता. पण त्याआधीच लताजींनी गायिलेल्या मीराबाईच्या भक्तीगीतांचा अल्बम आला असल्याने ते होऊ शकले नाही. मग या सिनेमाची गीते वाणी जयराम यांनी गायिली.
८२) प्रभुकुंज या त्यांच्या इमारतीतील घराच्या दरवाजावर त्यांच्या इंग्रजी सहीची नेम प्लेट आहे. ही सही त्यांच्या देवनागरी सहीसारखीच पल्लेदार आणि लयदार आहे!
८३) लताजींचे स्वतःचे नाव असलेले १९५१ च्या ‘दामन’ चित्रपटातील के दत्त यांनी संगीतबद्ध केलेले ‘गाये लता गाये लता’ हे गाणे असे एकमेव असावे! याच चित्रपटाततील ‘ये रुकी रुकी हवायें’ हे लता-आशा यांचे पहिले द्वंद्व गीत आहे!
८४) लताजींवर अनेक पुस्तके निघाली असली तरी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच धाकट्या भगिनी मीना खडीकर यांनी ‘मोठी तिची सावली’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्याच धाकट्या भगिनींनी लिहिले असल्याने कदाचित यापेक्षा जास्त अधिकृत माहितीचा स्रोत असणारे दुसरे पुस्तक नसावे. याचा इंग्रजी अनुवाद मीनाजींच्या कन्या रचना शाह या करताहेत! याच्या आधी ‘लता : इन हर ओन व्हॉईस’ हे नसरीन मुन्नी कबीर यांचे पुस्तक लताजींच्या मुलाखतींवर आधारित आहे आणि म्हणून अधिकृत आहे.
८५) लताजींच्या आवाजाच्या अतिशय उंच पीच आणि रेंजमुळे हिंदी सिनेसंगीतात बर्याच संगीतकारांनी त्यांची बव्हंशी गाणी उंच सप्तकात ठेवली. पण त्यांची अतिशय हळुवार आणि मंद्र सप्तकातील गाणी ‘कुछ दिल ने कहा’, ‘दिल का दिया जला के गया’, ‘अपने आप रातो में’ किंवा ‘ऐ दिल ए नादान’ ही गाणीसुद्धा अमाप लोकप्रिय आहेत.
८६) संयोगवश ‘लता मंगेशकर’ या नावात सात सुरांप्रमाणे सात अक्षरे आहेत. आणि ल-ता या अक्षरांचा लय आणि ताल यांच्याशी दृढ सांगीतिक संबंध आहे!
८७) जवळपास २१०० हिंदी चित्रपटात गायन, १७५ संगीतकारांकडे गाणी आणि अंदाजे २५० गीतकारांची गीते लताजींनी गायिली. त्यांच्या हिंदी सिनेसंगीतातील गाण्यांची संख्या ५१००चे वर आहे आणि एकूण गाण्यांची संख्या साधारणतः ७०००चे वर आहे.
८८) ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटातील ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे’ या गाण्यात, चित्रपटाच्या तीन हिरोंना (अमिताभ, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर) तीन पुरुष गायकांचे आवाज आहेत (किशोर, मुकेश आणि रफी) मात्र सोबतच्या तीनही हिरोइन्ससाठी फक्त एकच आवाज आहे आणि तो लताजींचा! विशेष म्हणजे या तीनही हिरोईनच्या भूमिकांचे स्वभाव वेगवेगळे असल्याने या गाण्यात लताजींचा आवाज प्रत्येकीकरिता वेगवेगळा वाटतो!
८९) मदन मोहन आणि लता यांची गाणी सगळ्यांना जिवापाड प्रिय आहेत. मदनजींकडे लताजींनी एकूण २२७ गाणी गायली त्यातही १७५चे वर सोलो गाणी आहेत! पण मदनजींच्या पहिल्या चित्रपटात (आँखे १९५०) लताजींचे एकही गाणे नव्हते!
९०) १९४८च्या ‘मजबूर’ चित्रपटातील ‘अब डरने की कोई बात नाही, अंग्रेजी गोरा चला गया’ या गाण्याच्या वेळी लताजी आणि मुकेश यांची प्रथम भेट झाली आणि १९७६ मध्ये अमेरिका दौर्यावर असताना डेट्रॉईट येथील कार्यक्रमाच्या आधी शेवटची भेट! याच कार्यक्रमात हार्ट अटॅक येऊन मुकेश यांचा मृत्यू झाला!
९१) लताजींनी एकूण ३६ भारतीय भाषेत तर गाणी गायिली आहेत. पण डच, फिजियन, रशियन, स्वाहिली आणि इंग्रजीतसुद्धा गायले आहे (मुख्यत्वे कार्यक्रम दरम्यान).
९२) आपण सर्वांनी आपल्या हयातीत हा दैवी आवाज प्रत्यक्ष ऐकला/ऐकतो आहोत ही सर्वात मोठी आणि अहोभाग्याची गोष्ट!!