दिवाळीनंतर माझा मानलेला परममित्र पोक्या पेढे आणि मिठाई घेऊन आला त्याचं कारण मला माहीत होतं. मुळात तो आणि त्याची होणारी मिसेस दिवाळीला इथे नव्हतेच. दुबईला भटकायला गेली होती दोघं. इथे आल्यावर शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाची वार्ता समजल्यावर तो पेढे आणि मिठाईचा बॉक्स (खोका नव्हे) घेऊन मला भेटायला आला. मी म्हटलं, आता राजकारणाचं बाजूला ठेव. समझने वालों को इशारा काफी है. आपण दुसरं काही बोलूया. रोज रोज चाललेल्या या कुरघोडीच्या राजकारणाचा मला कंटाळा आलाय. त्यापेक्षा तू दुबईतून काही आपलं फेव्हरिट आणलं असशील तर आरामात पीत बसू. चकणा डब्यात आहे तो बशीत काढून घे. आणि शुरू हो जा…
पण पोक्याच्या डोक्यात भलतंच काहीतरी सुरू असल्याचं दिसलं. तो म्हणाला, इथे आल्यावर मला समजलं असं नव्हे तर दुबईत असतानाच सर्व चॅनल्सवर ‘टिकली’ प्रकरणावर चर्चा सुरू होती. आमची ही टिकली लावतच नाही. माझंही या ‘टिकली’च्या बातम्यांकडे किंवा चर्चेकडे फारसं लक्ष नव्हतं, पण जेव्हा मिशावाला चेहरा पडद्यावर क्लोजअपमध्ये दोन-चारवेळा दाखवला, तेव्हा कुठे माझी ट्युब पेटली. ताबडतोब मी हिला बोलावलं. त्यावेळी ती मेकअप करत होती. म्हटलं, मेकअप राहूदे. आजपासून फॅशन म्हणून टिकली लावलीस तरी चालेल. त्यावर आमचा कडाक्याचा वाद झाला. मी म्हटलं, अगं टिकली हे सौंदर्याचं प्रतीक आहे. काही स्त्रियांना कपाळावरील टिकली शोभून दिसते, काहींना नाही. वहिदा रेहमान किंवा सायरा बानू यांनी टिकली लावून अभिनय केला असता तर त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नसतं. कारण टिकली न लावण्यातच त्यांचं सौंदर्य खुलून दिसत होतं. त्यावर ती म्हणाली, इथे सौंदर्याचा प्रश्नच नाही. ते मनोहरपंत भिडे त्या पत्रकार मुलीला चारचौघात काय म्हणाले माहिताय? ते म्हणाले, आधी कपाळाला टिकली लावून ये आणि मग मला प्रश्न विचार. बिचारी हिरमुसली. पण भिड्यांना कसलीच लाजभीड नव्हती. उलट टिकली हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे आणि भारतमातेने टिकली लावली नाही तर ती विधवा दिसेल असं काहीतरी ते बाष्फळ बडबडले. आपल्या सरकारने नवरा मृत पावल्यावर गळ्यातले मंगळसूत्र काढू नये वा हातातल्या हिरव्या बांगड्या फोडण्याचा विधीही करू नये अशा सुधारणावादी बदलांचा प्रसार करण्याचं आवाहन केलं आहे आणि हे परंपरावादी भिडे किती दिवस ते सती जाण्याचं, केशवपन करण्याचं, कपाळ पांढरंफटक ठेवण्याचं संस्कृतीरक्षणाचे खूळ डोक्यात घेऊन बसणार आहेत कोण जाणे!
मी माझ्या भावी पत्नीच्या म्हणण्याला होकार दिला. स्त्रियांनी कपाळावर कुंकू किंवा टिकली न लावणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हे सगळेच म्हणतात. त्यात ज्या स्त्रियांचं कपाळ टिकली किंवा कुंकू लावल्याने अधिक सुंदर दिसतं, त्यांनी त्या अवश्य लावाव्या. काहीजणींच्या कपाळावर अर्धचंद्राकृती कोर किती शोभून दिसते. पण भिड्यांसारख्या हट्टी बुजूर्गांनी ती पाहिली तर म्हणतील, अर्धी टिकली लावू नका, पूर्ण गोलाकार लावा. टिकल्यांचे गोल आणि अर्धचंद्राकृतीचं काय, कितीतरी आकाराच्या रंगीबेरंगी प्रकार बाजारात मिळतात. ज्यांना आवडतात त्या स्त्रिया ते घेतात आणि आपल्या चेहर्याचं सौंदर्य खुलवतात. पण टिकली लावलीच पाहिजे हा फतवा कशासाठी भिड्यांनी काढला हेच समजत नाही. मी असं म्हणाल्यावर माझ्या होणार्या सौने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
ती म्हणाली, लग्न झालेल्या स्त्रीने कुंकू, टिकली लावणं हे भारतीय समाजात सौभाग्याचं प्रतीक समजलं जातं. पण पुरुषांना या बाबतीत कसलंच बंधन नाही. लग्न झालेली स्त्री गळ्यातील मंगळसूत्र, हातातल्या हिरव्या बांगड्या यामुळे सौभाग्यवती म्हणून सारे ओळखतात. पण लग्न झालेल्या पुरुषांच्या बाबतीत त्याच्या विवाहलंकाराच्या कसल्याच खुणा, दागिने, गंध, किंवा लोकांना दिसेल अशी बाह्य निशाणी त्याच्या अंगावर नसते. त्यामुळे विवाहित कोण आणि अविवाहित पुरुष कोण हे समाजात वावरताना कुणालाच कळू शकत नाही. त्यामुळे काही विवाहित पुरुषांची स्त्रियांना अविवाहित असल्याचं सांगून बाहेर उंडगेगिरी सुरूच असते. त्यामुळे विवाहित पुरुषांनाही विवाहित असल्याचे प्रतीक म्हणून गळ्यात, कपाळावर किंवा लोकांना दिसेल अशा जागी विशिष्ट प्रकारचा गंडा-दोरा, दागिना सक्तीने लायसन म्हणून कंपल्सरी घालण्याचा फतवाही भिड्यांनी सरकारला काढायला सांगावा. म्हणजे समाजात उजळ माथ्याने अविवाहित असल्याचे भासवून तरुणींना फसवण्याचे आणि त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करणार्यांचा भंडाफोडही होईल. पण भिडे त्यासाठी प्रयत्न करणार नाहीत. कारण फक्त भारतीय स्त्री आणि तिची तथाकथित संस्कृती ही एकच बाजू त्यांना दिसते. त्यापलीकडे बघण्याची त्यांच्या बुद्धीची झेपच नाही. भाजपा आपल्या संस्कृती रक्षणाच्या नावाखाली नको त्या गोष्टी कुरवाळत बसला आणि त्यांचे अनेक नेते व भक्तगणही कसलाही सारासार विचार न करता धर्म आणि जातीपातीच्या मागे लागून समाजात फूट पाडून सत्ता काबीज करण्याची स्वप्नं पाहू लागले.
तिच्या म्हणण्यात तथ्य असल्याचं मला पटत होतं, पण मग माझे वांदे झाले असते ना! या ब्रह्मचारी लोकांचं बरं असतं. काही खरोखर ब्रह्मचारी असतात तर काही जगाला दाखवण्यापुरते ब्रह्मचारी असतात. काही हे खुलेपणाने कबुल करतात, तर काही शेवटपर्यंत आपल्या भानगडींचा पत्ता लागू देत नाहीत. मोठ्या लोकांच्या भानगडीही मोठ्या, आपण त्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या. आपण थोडेच त्या भिड्यांसारखे ज्ञानी पुरुष आहोत. ते तर कुठल्या झाडाचा आंबा खाल्ल्याने मुलगा होतो हे जसं अचूक सांगतात तसं आपल्याला थोडंच सांगता येणार आहे. पण मला वाटतं टिकलीमागच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाला काही वैज्ञानिक सिद्धांताचा आधार असावा. उद्या आपण त्यांना जाब विचारायला गेलो तर ते कपाळाच्या मध्यभागी असलेल्या चक्राबाबत शास्त्रीय माहिती द्यायला सुरुवात करतील आणि आपल्याला चक्रावून टाकतील. उलट पुरुषांनीही टिळा लावणं का आवश्यक आहे हे पटवून देतील. तसेच त्यांच्या झुबकेदार पांढर्याशुभ्र मिशांचं रहस्य विचारल्यास प्रत्येकाने तरुण वयापासून तशा मिशा वाढवल्यास त्याचे किती फायदे आहेत हे साग्रसंगीत सांगतील. परवा त्यांना कुणीतरी ‘दो रास्ते’मधलं मुमताजचं ‘बिंदिया चमकेगी, चुडी खनकेगी’ या गाण्याचा व्हिडीओ मोबाईलवर दाखवला, तेव्हा त्यांनी तो पूर्णपणे पाहूनच नंतर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे खरं सौंदर्य. त्या मुलीला हेच सांगण्याचा माझा प्रयत्न होता… मी हात जोडले. त्यांना आणि ‘बीजेपी माझा’ चॅनेलला!