मराठी माणूस तसा भटक्या म्हणायला हव्या. कारण तो जग फिरण्यात अव्वल झाला आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी वाढते तेव्हा तेव्हा बाजार व्यवस्था त्याची दाखल घेते आणि त्या त्या सेवा पुरवण्यासाठी व्यावसायिक पुढे सरसावतात. साहजिकच प्रवासाच्या बाबतीत देखील हेच झालं. मराठी माणसाला जगभर फिरवायला कितीतरी प्रवासी कंपन्या सज्ज झाल्या. खिशाला परवडतील अशा विविध योजना त्यांच्याकडे सदैव तयार असतात. प्रवाशांना निर्धास्त फिरता यावं म्हणून जे काही पैसे लागत असतील ते सगळे इथं मायदेशात भरायचे आणि ‘आपल्या माणसा’सोबत बिनधास्त कुठेही फिरायचं ही सोय नक्कीच सुखावह आहे. डोक्याला कसलाही ताण नाही नी काही नाही. त्यामुळं गोव्याच्या भाषेत सांगायचं तर अशा ‘सुशेगाद’ फिरतीवर जायला कुणालाही आवडणं साहजिक आहे. म्हणूनच कुठलाही त्रास, कसलीही जबाबदारी नसलेल्या या सहलींना मराठी माणसाने भरभरून प्रतिसाद दिला. तो दिला नसता तरच नवल नवल वाटलं असतं.
प्रवासी संस्था, विशेषतः मराठी प्रवासी संस्था, प्रवाशांची खूप चांगली काळजी घेतात. एकदा पैसे भरले की मग संपूर्ण प्रवासात पुन्हा खिशात हात घालायला नको इतकी बडदास्त त्या ठेवतात. हॉटेल बुकिंग, विमानाची तिकिटं, स्थानिक प्रवासाची सोय सर्व त्यांची जबाबदारी असते. ना आपल्याला कुठं रांगेत उभं राहावं लागत ना कुठेही प्रवेशाची चिंता करावी लागत. सगळ्या गोष्टींचं ओझं त्यांच्या खांद्यावर असतं. तुम्हा आम्हाला विशिष्ट प्रकारच्या जेवणाची सवय असते. ही आवडनिवड या संस्था जपतात. प्रवाशांना घरच्यासारखं जेवण मिळेल याची दक्षता घेतात. स्वीत्झर्लंडमध्ये माऊण्ट टिटलिसवर बर्फामध्ये गरमागरम भजी, बटाटे वडे खाऊ घालतात.
त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे अशा संस्थांसोबत जाण्याने आपल्याला सुरक्षित वाटतं. न जाणो काही दुर्घटना घडली तर संस्था आपल्याला सुरक्षित घरी आणतील असं विश्वास वाटतो. थोडंसं निर्धास्तपणे फिरता येण्याची चंगळ करता येते.
अर्थात या सोयीची एक वेगळी बाजू देखील आहे. यातल्या बहुतेक सहली प्रवाशांना पाहायच्या असलेल्या सामायिक जागा गृहित धरून आखलेल्या असतात. मग ‘युरोप’ म्हटलं की ठरलेल्या जागांना भेट दिली की संपतं. सहल एकट्याची नसते, त्यामुळं प्रवासी कंपन्यांचाही नाईलाज असतो. वेळेचं भान राखून, तीस चाळीस वेगवेगळे स्वभाव, तितक्याच व्यक्ती वल्ली, निरनिराळे वयोगट, प्रत्येकाचा चालण्याचा वेग, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, व्यक्तिगत कमीजास्त शारीरिक क्षमता या सगळ्याची बूज राखत राखत त्यांना हे नियोजन करावं लागतं. शिवाय सगळेजण ठरवून दिलेल्या वेळी न येणं, चाळीस पन्नास माणसं बसमधून उतरायला आणि चढायला लागणारा वेळ, खरेदीचा उत्साह किंवा सवयी, हे पाहिलं की कधी कधी तर पाहायच्या स्थळांना केवळ ‘भोज्या’ करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. मग कधी एखादी जागा मनसोक्त पाहायची आपली इच्छा अपुरी राहते, तर कधी त्या त्या ठिकाणच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचं राहून जातं.
परदेशीच कशाला, आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागात फिरलं तरी अनेक संस्कृतींची, अनेक प्रकारच्या खाण्याची ओळख व्हायला हरकत नाही. प्रत्येक प्रांतातली कला वेगळी, वागायची, पेहेरावाची पद्धत भिन्न. या सगळ्याशी एकरूप व्हायचं, त्या त्या ठिकाणाचा असा आनंद लुटायचा तर तिथल्या लोकांसोबत मिसळायला हवं. तामिळनाडूमध्ये ‘किरी’ म्हणजे खरबुजाचं पेय प्यायला हवं. गोव्यात एखाद्या कोपर्यातल्या, लहानशा, पण अत्यंत चविष्ट मासे खायला घालणार्या हॉटेलमध्ये जेवायला हवं. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेताना ‘पुस्तकांचं गाव’ अनुभवायला हवं. कोलकात्यात गेल्यावर भल्या पहाटे उठून तिथल्या चिनी बाजारात फेरफटका मारायला हवा, केरळमध्ये कथकलीचे नर्तक मेकअप वा शृंगार करताना पाहायला हवं तर ते खरं देशाटन होईल. आग्य्राला जाऊन नुसता ताजमहाल सगळेच पाहणार. पण पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेला ताजमहाल न्याहाळायला हवा. अर्थात हे सर्व करायचं तर प्रवासाची आखणी आपल्या मर्जीनुसार, करायला हवी.
असं करायचं तर यावर दोन उपाय असतात. एक म्हणजे आपल्या मनाप्रमाणे स्थळं निवडून त्याचं नियोजन एखाद्या प्रोफेशनल प्रवासी कंपनीला करायला सांगायचं किंवा स्वतःच सगळं आखायचं. मनाप्रमाणे भटकंती करायची. नेहेमीच्या रुळलेल्या जागा पाहायच्याच पण वेगळ्या, अनवट वाटा देखील चोखाळायच्या. हवं तिथं हवे तितके दिवस राहायचं. हवं ते खायचं. हवं ते ल्यायचं. स्थानिक लोकांशी मस्त संवाद साधायचा. तिथल्या वाहनांनी प्रवास करायचा. म्हटलं तर बरेच पैसे वाचवायचे. येताना प्रचंड कडूगोड आठवणींचा खजिना सोबत आणायचा. अर्थात प्रवासी कंपनीबरोबर जाताना जी सोय असते ती इथं नसते. आपणच आपले मालक, आपणच आपले नोकर. जी काही गैरसोय सोसावी लागेल ती आपल्यालाच. ‘आपल्या माणसा’ची ऐष इथं नाही. पण अनेक प्रकारचे, कधी गमतीदार, तर कधी घाबरवून टाकणारे अनुभव मात्र गाठीला पडतात.
स्वतःहून प्रवास करण्याचा केवळ अनुभव वेगळा नसतो. अशा प्रवासादरम्यान आपल्या आवडी निवडी जपत फक्त हवी ती ठिकाणं आपण पाहू शकतो. कोणाला इतिहासात स्वारस्य असतं तर कोणाला त्या जागेच्या कलेमध्ये रुचाr असते. काही मंडळी जगातली काहीतरी वैशिष्यपूर्ण ठिकाणं पाहण्यासाठी आसुसलेली असतात. काहींना जंगल आणि जंगली प्राणी यांची ओढ असते. अशांना जे पाहिजे तेच पाहण्याचा आनंद मिळवताना स्वतःच प्रवास करणं सोयीचं वाटतं.
बहुतेक सर्वसाधारण माणसांनी फक्त ठराविक ठिकाणाविषयी वाचलेलं असतं. त्यांना जगातली ठळक ठिकाणं ज्ञात असतात. उदा. युरोपमध्ये पिसाच्या झुकत्या मनोर्याचं आपल्याला कोण कौतुक वाटतं. परंतु ब्राझिलमधल्या साओ पावलो राज्यातल्या सॅन्टोसच्या समुद्रकिनार्यावर कितीतरी इमारती वेगवेगळ्या कोनात झुकलेल्या आहेत हे आपल्याला माहित नसतं. आपण इंडोनेशियाला जाऊन येतो, पण त्या देशातमधल्या माउंट केलिमुटूजवळच्या लेक्स फ्लोरेस या तलावातलं पाणी रोज रंग बदलतं हे आपल्या गावीही नसतं. अमेरिकेतल्या बॉस्टन शहराची भेट आपण घेतलेली असते, पण त्या शहरातल्या एमआयटी या जगविख्यात युनिव्हर्सिटीमधल्या रॅगिंगचा पुरावा आपण पाहिलेला नसतो. युरोप प्रवास करून येतो परंतु स्थापत्यकलेचा अत्यंत सुरेख नमुना असलेली तिथली मेट्रो स्टेशनं आपण डोळ्याखालून घातलेली नसतात. यासाठी हवा तिथं पुरेसा वेळ देणं आणि पाहण्याची इच्छा नसलेल्या ठिकाणांना फाटा देणं गरजेचं बनतं. मुद्दाम वाकडी वाट करून अनवट वाटा चोखाळायच्या तर त्याची आखणी स्वतः करण्याला पर्याय नसतो.
सुदैवानं आता प्रवास फार सोपा झालाय. पर्यटनस्थळांची साग्रसंगीत माहिती देणारी कित्येक संकेतस्थळं इंटरनेटवर आहेत. अनेक संकेतस्थळांवर प्रवाशांचे प्रत्यक्ष अनुभव, त्यांच्या झालेल्या सोयी गैरसोयी त्यांच्याच शब्दात मांडलेल्या असतात. त्यामुळं त्या ठिकाणांबद्दल निर्णय घेणं सोपं होतं. थोडासा अभ्यास केला आणि थोडीशी जोखीम पत्करण्याची तयारी ठेवली की मग हा प्रवास कठीण राहत नाही. युरोपमध्ये रेल्वेचं उत्तम जाळं आहे. लंडन, टोकियो, कौलालंपूरसारख्या कित्येक शहरांमध्ये मेट्रोची सुरेख व्यवस्था आहे. ती आपल्या मदतीला धावून येते. त्या त्या शहरांमध्ये तिथल्या हॉटेल्समध्ये, स्टेशन्सवर, विमानतळांवर किंवा प्रमुख ठिकाणी नकाशे उपलब्ध असतात. हॉटेल्समधला स्टाफ थोडंबहुत इंग्रजी बोलणारा असतो. त्यांच्यामुळं आपली बरीच सोय होते. आपल्याला हव्या त्या गोष्टी स्थानिक भाषेत लिहून द्यायला ती मंडळी तत्पर असतात. चीन, जपान सारख्या चित्रमय भाषा वापरणार्या देशांचा प्रवास हे लोक बर्यापैकी सुकर करून देतात. नाही म्हणायला अतिशय बारीक सारीक तपशील देणारी प्रवासी गाईड्स उपलब्ध आहेत. त्यात स्थानिक प्रवासादरम्यान येऊ शकणार्या प्रश्नांची आणि समस्यांची सूची असते. प्रसंगी त्या समस्या कशा हाताळता येतील याचं समर्पक विवेचन असतं. कुठली हॉटेल्स स्वस्त, कुठली महाग, त्या हॉटेल्सचं शहराच्या मुख्य, केंद्रीय भागापासूनचं अंतर किती हे सगळं सगळं तपशीलवार मांडलेलं असतं. सर्वात शेवटी आणि सर्वात चांगला पर्याय म्हणजे आपण ठरवून दिलेला प्रवासाचा आराखडा सुखनैव पार पडावा म्हणून त्याची काटेकोर आखणी करून द्यायला, त्यासाठी थोडेसे पैसे आकारून मदत करायला प्रवासी कंपन्यांची नेहेमीच तयारी असते.
आम्ही दोघांनी आपापल्या कुटुंबासमवेत असे स्वतःहून प्रवास करण्याचे भरपूर अनुभव घेतले. जगातली कित्येक शहरं पालथी घातली. तेच तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. दर पंधरा दिवसांनी आपण एकमेकांच्या भेटीला येणार आहोत. आपलं आपण केलेल्या प्रवासातल्या कडूगोड आठवणींना उजळा देणार आहोत.