□ दहा दिवसांत मंदिरे उघडा नाहीतर जेल भरो आंदोलनात सामील होईन : अण्णा हजारे
■ ‘मंदिरजीवीं’च्या फौजेत दाखल होण्याची इतकी हौस असेल तर दिल्लीत केंद्र सरकारला हा इशारा द्या; कडक निर्बंध घालण्याचे आदेश तिकडून येतात अण्णा!
□ कोरोनाचे सुपरस्प्रेडर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मुसक्या आवळा : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी
■ जनतेच्या जीवितरक्षणासाठी कधीतरी सरकारला हे करावंच लागेल.
□ सर्वाधिक गुन्हे दाखल झालेले नेते भाजपमध्येच आहेत
: नवाब मलिक यांची टीका
■ सुबह का गुन्हेगार अगर शाम को भाजपा में जाए तो उसे गुन्हेगार नहीं कहते नवाबसाहब; उसे आदरणीय विधायक/सांसद/मंत्री महोदय कहते हैं.
□ सत्यासाठी सत्तेला जाब विचारा
: न्या. धनंजय चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती
■ ते इतके निगरगट्ट आहेत की तुम्हालाही ठेंगा दाखवतात, तिथे सामान्य माणसांना कोण विचारतो!
□ गरीबांचा बर्गर महागला, वडापाव आता २० रुपयांना
■ २० रुपयांचा वडापाव काही गरीबांचा नव्हे; गरिबांच्या वडापावाची किंमत १२ रुपयांवरून आता १० रुपयांवर आलेली आहे, कारण गरीब ग्राहकाला तो १२ रुपयांनाही परवडत नाही.
□ गर्दीचे कार्यक्रम टाळावेत : केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश
■ जरा साताठदहा प्रती जास्तीच्या काढून इकडे राज्यातल्या तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनाही पाठवा! अनावश्यक पिटिर पिटिर कमी होईल त्यांची.
□ छापेमारीची संस्कृती भाजपने निर्माण केली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप
■ ही संस्कृती त्यांनी निर्माण केली नाही, पण तिचा ‘विकास’ करण्याचं श्रेय मात्र भाजपला जातं- यापुढे या यंत्रणा चुकून कधी गंभीरपणे आपलं काम करतील तेव्हाही लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही.
□ ऑलिम्पिकने भारतीय तरुणांचे मन बदलले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ हो ना, कष्ट खेळाडूंचे आणि त्यांच्या यशात शून्य वाटा असलेल्यांचेच फोटो त्यांच्यापेक्षा मोठे, हे चित्र पाहिल्यावर तरुणांनी कपाळावर हातच मारून घेतला असणार!
□ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळयाच्या पोस्टरवरून नेहरूंचा फोटो वगळला
■ लहान बाळांनी पाटीवरच्या खडूच्या रेघोट्या पुसल्या म्हणजे काळ्या दगडावरच्या रेघा पुसल्या जात नाहीत, बाळांचं लहानपण तेवढं अधोरेखित होतं.
□ सोशल मीडियावरच्या लेखनाने उथळ लेखकांची सृजनशीलता वाढवली : प्रवीण दवणे
■…आणि ते अधिकाधिक उथळ लिहू लागले की काय?
□ चीनमध्ये मुलांच्या ‘ऑनलाइन गेमिंग’वर निर्बंध; आठवड्यातून फक्त तीन तास मुभा
■ हे असले निर्बंध नेमके कसे लागू केले जात असतील? मोबाइलवरून गेम खेळणारी व्यक्ती लहान मूल आहे की मोठा माणूस, हे समजण्याचंही सॉफ्टवेअर चीनने विकसित केलं की काय?
□ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता
: त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला विश्वास
■ असा विश्वास अनेकांना होता हो- पण त्यांनी २०१४ला स्वत:च त्याच्यावर बोळा फिरवला ना!
□ कर्णकर्कश्श हॉर्नचा सूर बदलून भारतीय वाद्यांचे सूर देणार : नितीन गडकरी यांची सूचना
■ टिपिकल भारतीय पद्धतीचा विचार- लोकांना मुळात गरज नसताना हॉर्न वाजवता कामा नये, हे शिकवलं पाहिजे आणि हॉर्नची गरज भासू नये, अशी वाहतुकीची शिस्त निर्माण केली पाहिजे… त्याऐवजी असले मलमपट्टीवाले ‘फ्लायओव्हर’ उभारत सुटणं सोयीचं असतं.
□ महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकायला येतो : चंद्रकांत पाटील
■ सतत अकारण खुळखुळतो त्याला चिल्लरखुर्दा म्हणतात दादा!
□ तिसर्या लाटेची लोकांना भीतीच नाही : हायकोर्टाचे प्रतिपादन
■ कोरोना विषाणू हे कुभांड आहे, अशा आशयाच्या व्हॉट्अॅप संदेशांवर अधिक विश्वसणारा समाज आहे- ऑक्सिजन पातळी ९३च्या खाली उतरेपर्यंत विश्वास बसत नाही, नंतर बसून फायदा होत नाही.