प्रबोधनकार कोल्हापूरला छापखाना चालवत असताना अचानक पाहुणे म्हणून स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीचे जनुभाऊ निंबकर आले. याच जनुभाऊंनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांना शून्यातून घडवण्यासाठी आठवण प्रबोधनकारांनीच लिहून ठेवलीय. ती मुळात वाचायला हवी.
—-
कोल्हापुरात प्रबोधनकारांचं तसं चांगलं बरं चाललं होतं. छापखाना जेमतेम पोटापुरतं का असेना पण देत होता. छापखान्याच्या कामाचा ताण नव्हता, त्यामुळे इतर कामं करता येत होती. त्यात पोर्ट्रेट पेंटिंगची कामं प्रमुख होती. बाबुराव पेंटर ज्यांना गुरू मानत ते त्यांचे चुलत भाऊ आनंदराव पेंटर प्रबोधनकारांना भेटण्यासाठी छापखान्यावर नियमित येत. बाबुराव आणि आनंदराव दोघेही तेव्हा नाटकांचे पडदे रंगवण्यासाठी प्रसिद्ध होते. ललितकलादर्शमध्ये आनंदरावांची प्रबोधनकारांशी मैत्री जमली होती. आता दोघांनीही कंपनी सोडली होती. त्यामुळे आनंदराव नेहमी छापखान्यात येत. प्रबोधनकारांना पोर्ट्रेट करताना सूचना करत. स्वतः ब्रश आणि रंग घेऊन चित्रात बदल करत. तेव्हा आनंदरावांनी केलेल्या अनेक सूचना या व्यवसायात प्रबोधनकारांना आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरल्या. आनंदरावांचं पुढे फार कमी वयात निधन झालं, नाही तर ते स्वदेशी मातीत बनलेला सिनेमाचा पहिला कॅमेरा बनवणारे भारतीय कलावंत ठरले असते. पुढे ते श्रेय बाबुरावांना मिळालं.
छोट्या छापखान्यावर भागणार नाही, हे उघड होतं. प्रबोधनकार आहे त्यात समाधान मानणारे नव्हतेच. त्यामुळे ते कायम नव्या संधीच्या शोधात असत. त्यात संधी स्वतः चालत प्रबोधनकार राहत होते त्या गंगावेशीतल्या पाटलाच्या माडीवर येऊन दाखल झाली. स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीचे प्रमुख जनुभाऊ निंबकर पूर्वीची काहीही ओळखदेख नसताना पाहुणे म्हणून मुक्कामाला आले. स्वदेशहितचिंतक ही तेव्हाची एक महत्त्वाची कंपनी होती. ती किर्लोस्कर कंपनीच्या तोडीस तोड नाटकं करत असे. प्रबोधनकारांच्या मते तर अनेकदा त्यांचे प्रयोग अधिक चांगले होत असत. जनुभाऊ हे नाटक व्यवसायातलं महत्त्वाचं नाव होतं. त्यामुळे त्यांचा पाहुणचार करणं खानावळीत जेवून छापखान्याचा व्यवसाय करणार्या प्रबोधनकारांसाठी सोपं नव्हतं. त्यात पाहुणे स्नानसंध्या आणि जपजाप्यात अधूनमधून मग्न असत.
प्रबोधनकारांना जनुभाऊंविषयी विशेष आदर होता. `जुन्या आठवणी’ या पुस्तकात प्रबोधनकार त्यांच्याविषयी लिहितात, `जनुभाई निंबकर– विसरला महाराष्ट्र बिचार्याला! आणि रंगभूमीच्या विद्यमान पुरस्कर्त्यांना तरी त्याची आठवण कशाने नि का व्हावी? स्वदेशहितचिंतकाच्या यशाची नि ऐश्वर्याची चैतन्यशक्ति म्हणजे जनुभाऊ. स्वरज्ञानाच्या बाबतीत जनुभाऊंचा हात धरणारा त्यावेळी कोणी नव्हता आणि आज तरी तितका कसबी मला कोणी दिसत नाही. स्व.हि.च्या प्रसादाने तयार होऊन महाराष्ट्रात चमकलेल्या अनेक संगीत नटतार्यांच्या भाग्याचे नि लौकिकाचे विश्वकर्मा जनुभाई होते. केशवराव भोसले, किशाबापू काशीकर, विष्णुपंत पागनीस यांच्या रंगभूमीवरील यशाचे गुरू जनुभाऊ निंबकर. फार काय. पण कृष्णराव गोरे, राजारामपंत सोहोनी यांच्याही गायकीला स्पष्ट, सुबोध आणि ठसकेदार वळण लावण्याची कामगिरी जनुभाऊंनीच केलेली आहे.’
जनुभाऊंच्या तालमीत तयार झालेलं सगळ्यात महत्त्वाचं नाव हे अर्थातच संगीतसूर्य केशवराव भोसलेंचं. जनुभाऊंनी `केशवरावचा केशवराव भोसले कसा केला’ याची कथा `जुन्या आठवणीं’मध्ये लिहिली आहे. हे घडत असताना प्रबोधनकार स्वदेशहिंतचिंतकात नव्हते इतकं नक्की. तरीही त्यांनी झालेला सगळा घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा केलाय. प्रबोधनकारांनी लिहिलेला हा तुकडा, अगदी जागेनुसार थोडासा एडिट करून–
वर्ष आठवत नाही. स्व.हिं.ची छावणी कोल्हापूरला होती. शनिवार-रविवार शारदेचे प्रयोग धुमधडाक्याने चाललेले होते. गुरुवारी दुपारी शारदेचा पार्टी कृष्णा देवळी तापाने आजारी पडला. शुक्रवारी संध्याकाळी
डॉक्टरांनी न्यूमोनिया `डिक्लेअरला.’ खेळाच्या जाहिराती तर सकाळीच्या लागल्या. शारदेचा पार्टी भयंकर आजारी नि कंपनी खेळ कसा करणार? ही बोलवा सर्व शहरभर फैलावली. शनिवारी सकाळी खुद्द शाहू महाराज कंपनीच्या बिर्हाडी आले. कृष्णाची प्रकृती पाहिली. पेशंटला हालचाल करता येणार नाही, असं डॉक्टराने खडसून सांगितलं. आजचा खेळ बंद ठेवा, महाराज म्हणाले. गंभीर खर्जस्वरांत मॅनेजररावजी गोपाळ म्हसकर उद्गारले. `स्वदेशहितचिंतकाचा जाहीर झालेला खेळ कधी बंद राहत नाही.’
डॉक्टर किंचित चिडून म्हणाले, `अशा अवस्थेत पेशंटला स्टेजवर नेऊन काय ठार मारायचा आहे?’
म्हसकर– याला स्टेजवर न्या, असं माझं म्हणणं कुठे आहे? पण काही झाले तरी मला खेळ बंद ठेवता येणार नाही. तो झालाच पाहिजे.
महाराज– अरे म्हसकर, मुख्य पार्टीच्या बदली दुसरा कुणी आडूमाडू उभा करून खेळाचा विचका का करायचा आहे तुला?
म्हसकर– हा प्रश्न तालीम मास्तरांचा आहे, सरकार. त्यांनी करावी योग्य ती व्यवस्था. मी खेळ बंद ठेवणार नाही. वेळ पडली तर मिशा भादरून दीक्षिताऐवजी शारदेचे काम मी करीन, पण खेळ बंद ठेवणार नाही.
म्हसकरांच्या मिशा म्हणजे एक प्रचंड प्रकरणच होते. ते भादरण्याची प्रतिज्ञा ऐकताच महाराजांसकट सगळे खोखो हासले. पण जनुभाऊ मात्र बरेच गंभीर दिसल्ो. तेच तालीम मास्तर. अर्थात योग्य पार्टीची योजना करण्याची जबाबदारी त्यांचेवर. शिवाय म्हसकरांनी ती बोचक शब्दांत त्यांना जाणवलेली!
बराच वेळ गंभीर मुद्रेने शतपावली केल्यावर जनुभाऊ एकदम मोठ्याने ओरडून म्हणाले, `कुठे गेलाय रे केशव? त्याला बोलावून आणा पाहू लवकर.’
स्व.हिं.कडे वल्लरीचे काम केशव नावाचा एक झिपटा लुकडासा पोरगा करत असे. या मुलाची आजी त्यांच्या थोरल्या भावासह कंपनीतच कामधाम करून रहात असे. केशवचे शिक्षण काहीच नसले तरी तो मोठा चलाख, चौकस आणि कमालीचा एकपाट्या होता. तालमीत अथवा रंगभूमीवर कोणी कसलीही अवघड तान घेतली का लगेच तो तिची नक्कल हुबेहूब वठवून दाखवायचा. हव्या त्या पात्राची नक्कल त्याला नेहमी पाठ असे आणि वेळी रंगभूमीवर शेजारचे पात्र अडखळले, तर तो चटकन त्याला
प्रॉम्प्टिंग करायचा. लहान वय, तेव्हा स्वभाव मनस्वी खेळाडू, हातावर पाणी पडले का स्वारी लोखंडी चाक घेऊन गावातल्या इतर पोरांबरोबर रस्त्यावर हुंदडायला पसार. शोधता सापडायचा नाही.
केशवला शोधायचे म्हणजे सगळ्यांची धावाधाव. त्याची लंगोटीची वावडी फडाफडा उडत आहे, उघडा बोडका, हातात चाक घेऊन गावातल्या पोरांबरोबर तो कुठे भटकत जायचा त्याचा नेम नाही. पण आज तो जवळच एका गल्लीत सापडला. जनुभाऊ बोलावताहेत असं कळताच, स्वारी धडपडत आली. चाक दिलं अडगळीत फेकून आणि तशीच धुळीभरली राहिली येऊन जनुभाऊपुढे उभी.
जनुभाऊ– शारदेची नक्कल आहे तुझी पाठ?
केशव – शारदेची आहे. कोदंडाची आहे. सगळे नाटक आहे पाठ. जनुभाऊ, मला कोदंडाचे काम द्या. दाखवू करून आता?
दूर एका झोपड्यात तबला पेटी गेली. जनुभाऊंनी केशवला जवळ घेऊन तब्बल तीन तास संगीताची तालीम घेतली. एका ठराविक पदावर मात्र त्यांनी विशेष करामत वठवून घेतली. रात्री थेटरावर साशंक प्रेक्षकांची गर्दी उसळली. वल्लरीचा पार्टी केशव आज म्हणजे शारदेचे काम करणार!
थेटर चिक्कार भरले. स्वतः शाहू महाराज खेळाला आले. तिसर्या घंटीला पडदा वर गेला. `बघुनि त्या भयंकर भूता’ म्हणत शारद (केशव) आली. वल्लरीच्या नाचर्या नि खेळकर वृत्तीच्या जागी गंभीर वृत्तीचा केशव पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. आता `मूर्तिमन्त भीति उभी’ पद आले. दोन्ही विंगांतून भीमपलासाचे खर्ज स्वर अत्यंत हळूवार येऊ लागले. शारदा खिन्न मुद्रेने आकाशाकडे निश्चळ टक लावून पहात एकटीच उभी आहे. आजवर हे पद इतर पदांप्रमाणेच सपाटेबंद साध्या तालांत नि ठेक्यांत गायले जात असे. पण आजचा प्रकारच काही न्यारा! कमाल ठायीत सुरुवात झालेली. शारदेने पेटीच्या स्वरांत आएस्ते भूएए ध्वनी मिसळला. भीमपलासात करूण स्वरांचे ध्वनी असे काही मिश्र होत गेले का सारे प्रेक्षक तल्लीन झाले. जिकडे तिकडे गंभीर शांतता पसरली. पद रंगत गेले. स्वरातल्या कंपांनी श्रोत्यांची हृदयेही कंपित होत गेली. पद संपताच वन्समोरचा टाळ्यांचा प्रचंड गडगडाट उडाला. आजवर कोणी ऐकली नाही, अशी या पदाला आकर्षक मुरड घालून जनुभाऊनी केशवकडून `मूर्तिमन्त’ पदाला एक अभूतपूर्व रंग चढवून केशवच्या भाग्याचा पाया घातला.
बारा वेळ वन्समोर झाले. स्वतः जनूभाऊ विंगेमध्ये उभे राहून विवक्षित हावभावानी नि खुणांनी केशवला उत्तेजन देत होते. बारा वेळ वन्समोर होतात, जयिष्णु भावनेने जनुभाऊ शेजारच्या एका नोकराला म्हणाले, `कुठे आहेत रे तुमचे मॅनेजर? बोलाव त्यांना.’ जनुभाऊंना म्हसकरांचा टोमणा जाणवत होता. म्हसकर येताच ते गोरेमोरे होऊन त्यांना म्हणाले. `डोळ्यांना दिसतंय का काही? माझ्या पोराचा काय जीव घ्यायचा आहे वाटतं तुला?’ म्हसकरांनी सस्मित आदराने जनुभाऊंना प्रणाम केला नि तसंच तडक स्टेजवर गेले. हात जोडून प्रेक्षकांना म्हणाले, `आपल्या उत्तेजनाबद्दल कंपनी आभारी आहे. पण मुलाच्या जीवाकडे पाहून वन्समोरचा आग्रह झाला इतका पुरे.’ शाहू महाराज मोठ्याने ओरडून म्हणाले, `आता एकदाच वन्समोर रे म्हसकर.’
`मूर्तिमन्त भीति उभी’ या पदाच्या नव्या मुरडीने जनुभाऊंनी केशवला असामान्य यशाचा मार्ग दाखवला. त्याने तो केशवचा केशवराव भोसले झाला. केशवचे नुसते `मूर्तिमंत’ पद ऐकण्यासाठी पाच पाच रुपये देऊन पिटात उभे राहिलेले लोक मी पाहिलेले आहेत. केशवरावला जनुभाऊंनी खरोखरच एक तारा बनवले आणि अजोड तेजाने रंगभूमीच्या क्षेत्रांत थोडा वेळच चमकून हा तारा आला तसाच झपकन लुप्त झाला. `मूर्तिमन्त भीति उभी’ आणि केशवराव भोसले ही मर्हाठी रंगभूमीची अजरामर स्मारकं आहेत.
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)