अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवी सिंहेत, मंगळ बुध कन्येत, शुक्र तुळेत, केतू वृश्चिकेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन (वक्री) कुंभेत. १५ सप्टेंबर रोजी गुरूचा पुन्हा मकरेत प्रवेश. १७ सप्टेंबर रोजी रविचे सिंहेत आगमन. चंद्र तुळेत त्यानंतर वृश्चिक आणि धनूमध्ये.
दिनविशेष – ११ सप्टेंबर रोजी ऋषिपंचमी, १७ सप्टेंबर रोजी परिवर्तन एकादशी.
मेष – सौख्य, आनंद याचा अनुभव तुम्हाला या आठवड्यात येणार आहे. प्रेमप्रकरणात हमखास यश मिळेल. वैवाहिक संबंध दृढ होतील. सप्तमातील शुक्र-चंद्र योग, पंचमातील स्वराशीचा रवि मित्रपरिवार आणि संततीसौख्यासाठी शुभदायक. विवाहासंदर्भात बोलणी सुरू असतील तर होकार मिळेल. गणपतीबाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काहीतरी शुभवार्ता कानावर पडेल, आठवडा आनंदात जाईल.
वृषभ – येत्या आठवड्यात शुभघटनांचा अनुभव येणार आहे. राशिस्वामी शुक्राचे तुळेतील स्वराशीचे राश्यांतर फायदेशीर राहणार आहे. कर्ज अथवा पैशासंदर्भातील व्यवहार सफल होतील. शत्रूपासून मुक्ती मिळेल. कायदेकानून संदर्भात काही विषय सुरू असतील तर ते मार्गी लागतील. नोकरीसंदर्भातील प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. लेखक, पत्रकार यांना विशेष आर्थिक लाभाचा काळ राहील.
मिथुन – राशिस्वामी बुधाची उच्च स्थिती, शुक्र-गुरू-नेपच्यून नवपंचम योग यामुळे सुखद आणि आनंददायी अनुभव देणारा काळ अनुभवयास मिळणार आहे. परदेशातील मित्रमंडळींसमवेत सलोख्याचे संबंध निर्माण होतील, त्यामुळे मन आनंदी राहील. रवी-गुरू समसप्तक योगामुळे मोठे अधिकार प्राप्त होतील. गणेशोत्सवात धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हातून शुभकार्य होईल. विद्यार्थीवर्गास शुभदायी काळ आहे.
कर्क – राशिस्वामी चंद्राचे सुखस्थानातले शुक्राबरोबरचे युतीतील भ्रमण कौटुंबिक सौख्य आणि सोहळ्याचे ठरेल. नवीन वास्तूसंदर्भातील चर्चा पुढे सरकतील. मनासारख्या वास्तूचा लाभ होईल. अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग जुळून येत आहेत. संवादकौशल्याच्या क्षेत्रात विशेष लाभ होतील. परदेशातील कामात चांगला फायदा मिळेल. सप्तमातील वक्री शनी-प्लूटो कामासंदर्भात अडथळे निर्माण करतील, त्यामुळे योग्य खबरदारी घ्या.
सिंह – गेल्या महिन्यापासून स्वराशीत असलेल्या रवीने तुमचे मनोधैर्य बळकट केलेलं आहे. बदललेल्या ग्रहस्थितीमुळे काही घटनांमधून विपरीत अनुभव येतील. वाचास्थानात असलेल्या कन्येच्या मंगळामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. विसंवादामुळे मने दुखावतील असे वर्तन टाळाल तर फायद्यात राहाल. सुखस्थानात असलेल्या केतूमुळे कौटुंबिक वाद होतील. जुने येणे असेल तर ते हातात पडेल. गणपतीबाप्पाच्या आशीर्वादाने नवीन कामाची संधी मिळेल, त्यातून मोठे आर्थिक लाभ होतील. त्यामुळे खूष राहाल.
कन्या – राशीस्वामी बुध उच्च स्थानावर आहे, त्यात मंगळाच्या आगमनामुळे आत्मविश्वास वाढीस लागेल. डोके मात्र शांत ठेवा. धनस्थानात स्वराशीतल्या शुक्रामुळे चांगले आर्थिक लाभ होतील. पंचपक्वान्ने, मिष्टान्नभोजनाचा लाभ होईल. मित्रमंडळीचा सहवास लाभेल. उद्योग-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. महिलांनी आरोग्य सांभाळावे, ओटीपोटाच्या तक्रारींना निमंत्रण मिळू शकते.
तूळ – या आठवड्यात अपेक्षांची पूर्तता होणार आहे. त्यामुळे आनंदी राहाल. परदेशप्रवासाचा योग जमून येईल. आठवड्याच्या सुरुवातीला शुक्र-चंद्र लक्ष्मी योग विशेष लाभदायक. आकर्षणाच्या माध्यमातून नवीन मैत्री जमेल, पण थोडी सावधानता बाळगा. नाहीतर अडचणीत याल. शुक्र-चंद्र-गुरू नवपंचम योग आणि रवी-गुरू समसप्तक योग यामुळे घबाडप्राप्तीचे योग जमून येत आहेत. चांगला फायदा होईल.
वृश्चिक – राशीस्वामी मंगळाचे लाभातील बुधाबरोबरचे भ्रमण होत असल्याने अप्रत्यक्षपणे लाभाचे योग जुळून येतील. मार्केटिंग, संवादक्षेत्रात काम करणारी मंडळी, प्रकाशक, पत्रकार, लेखक, यांना चांगले लाभ मिळतील. दशम स्थानातील स्वराशीतील रवीमुळे विशेष फायदा मिळेल. राजकीय क्षेत्रात काम करणार्या मंडळींना मोठी संधी मिळू शकते.
धनू – येत्या आठवड्यात चांगले लाभ मिळणार आहेत. राशिस्वामी गुरूचे मकरेत होणारे वक्री आगमन आणि शनि-गुरू-प्लूटो युती यामुळे काही प्रमाणात कटकटीचा सामना करावा लागू शकतो. घरातील शांततेकडे लक्ष द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दशमातले मंगळाचे आगमन, स्वराशीतला उच्चीचा बुध आणि लाभातले शुक्राचे राश्यांतर यामुळे चांगले व्यावसायिक लाभ होतील. भाग्यातील रवीचे १७ सप्टेंबरपर्यंतचे भ्रमण शुभ आणि भाग्यवर्धक ठरणारे राहील.
मकर – येत्या आठवड्यात द्विधा मन:स्थिती राहणार आहे, त्यामुळे महत्वाचे निर्णय घेताना दमछाक होऊ शकते, योग्य ती काळजी घ्या. राशीस्वामी शनि, प्लूटो त्यामध्ये त्याच्या सोबतीला येणारा वक्री गुरू यामुळे थोडे गोंधळून जाल. योगकारक शुक्राच्या तुळेतील भ्रमणामुळे व्यावसायिक बाजू भक्कम राहील. विद्यार्थ्यांना हा आठवडा शिक्षणात लाभदायी राहील. संवादकौशल्यामुळे नवीन दारे उघडतील.
कुंभ – साडेसातीचा काळ सुरू असला तरी काही ग्रहयोगामुळे भाग्य उजळणार आहे. राजयोगकारक शुक्राच्या भाग्यातल्या भ्रमणामुळे अनेक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. दूरच्या प्रवासाचे बेत सफल होतील. जनसंपर्काच्या माध्यमातून प्रतिष्ठा वाढेल. सरकारी ठिकाणी काम करणारी मंडळी बदलीसाठी प्रयत्न करत असतील तर ते सफल होतील. राजकीय मंडळींना चांगले लाभ मिळण्याचे योग आहेत.
मीन – या आठवड्यात अकल्पित घटनांचे साक्षीदार राहणार आहात. अपेक्षित कामे सहजपणे मार्गी लागतील, त्यामुळे चेहर्यावर आनंद दिसेल. परदेशातील व्यक्तीबरोबर जर मैत्री असेल तर ते नातेसंबंध अधिक दृढ होतील. नोकरी-व्यवसायातून चांगले लाभ होतील. शेअरबाजारातून अपेक्षित लाभ मिळतील. त्यामुळे एखाद्या ठिकाणी नवीन गुंतवणूक करतात. खिशात चांगले पैसे राहतील, पण खर्च करताना काळजी घ्या.