शिवाजी पार्कसारख्या भागात राहणारा माणूस धारावी म्हटले की तो धारावीचा तिरस्कार करतो. पण धारावीवर मनापासून प्रेम करणारा, कुठलीही शोबाजी न करणारा, अतिशय साधी राहणी असलेला, निगर्वी आणि कुठल्याही प्रसिद्धी, प्रकाशापासून स्वतःला दूर ठेवणारा डॉक्टर अविनाश शेणोलीकर हा खरेच खूप मोठा माणूस आहे. त्यांचा स्वभाव असा की आपण डॉक्टर असल्यामुळे तिथल्या अडाणी लोकांना जणू काही प्रबोधनाचे डोस पाजायला आलो आहोत, असा त्यांचा आव कधीच नसे.
—-
डॉ. ह. वि. सरदेसाई, डॉ. पुरंदरे, डॉ. श्रीखंडे, डॉ. अजित फडके, डॉ. नंदू लाड, डॉ. हिंमतराव बाविस्कर, डॉ. संजय ओक, डॉ. तात्याराव लहाने असे अनेक सेवाभावी डॉक्टर्स प्रसिद्ध होते वा आहेत. अरुण बाळ, अनंत फडके, श्याम अष्टेकर, अनिल-सुनंदा अवचट, कुमार सप्तर्षी, बंग, आरोळे व कोल्हे दांपत्य, आनंद नाडकर्णी, अमोल अन्नदाते, अविनाश भोंडवे आणि नरेंद्र दाभोलकर असे अनेक सेवाभावी तसेच चळवळे डॉक्टर्स आपल्याला माहिती आहेत. पण मला आज डॉक्टर अविनाश शेणोलीकर यांच्याबद्दल सांगायचे आहे. ते बिलकुल प्रसिद्ध नाहीत. अविनाश यांच्या प्रॅक्टिसला १५ ऑगस्ट २०२१ रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली आणि अजूनही त्यांचे वैद्यककार्य अथकपणे, निरलसपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे, ते स्वतः दादरला शिवाजी पार्क येथे राहत असूनदेखील, प्रॅक्टिस करतात ते धारावीच्या झोपडपट्टीत! ‘धारावीत जीव गुंतला’ अशी त्यांची मन:स्थिती आहे… तेथील विविध जाती-धर्मांच्या, शोषित आणि वंचित वर्गांतील सामान्य माणसांचे ते अत्यंत लाडके डॉक्टर आहेत. हा असा डॉक्टर आहे, जो अत्यंत संवेदनशील, गरिबांबद्दल कणव असलेला आणि माणुसकी जपणारा आहे. आजकाल सर्वत्र कट-प्रॅक्टिसवाले किंवा आवश्यक नसतानाही गोळ्या व इंजेक्शनचा मारा करून पैसे कमावणारे डॉक्टर्स दिसतात. परंतु अविनाश यापैकी काहीही करत नाहीत. त्यांची फी अतिशय कमी आहे.
१९७१मध्ये दवाखाना सुरू झाला, तेव्हा डॉ. अविनाश शेणोलीकर यांची फी दोन रुपये होती आणि आज ती केवळ वीस रुपये आहे. म्हणजे पन्नास वर्षांमध्ये दोनपुढे केवळ एक शून्य लागले! त्यांच्यापेक्षा इतर डॉक्टरांची फी चार वा पाचपट तरी असेल! अनेकदा पेशंट गरीब असेल, तर अविनाश स्वतःच्या खिशातून पैसे काढून त्याला औषधासाठी देतात. धारावीकरांच्या हाकेला तत्परतेने ‘ओ’ देत, अविनाश त्यांच्या घरी व्हिजिटला घरी जातात. परंतु त्याचे पैसे आकारत नाहीत. लोकांनी स्वेच्छेने दिले, तर ठीक आहे, असा त्यांचा एकूण तुकोबांसारखा आतबट्ट्याचाच व्यवहार! धारावीकर त्यांना देवमाणूसच समजतात…
अविनाश यांचे वय आज ७८ वर्षांचे आहे. तरीदेखील ते रोज दवाखान्यात जातात. १९७०च्या दशकात ‘गरिबी हटाव’ घोषणेचा तो काळ होता. धारावीतच काय, सर्वत्र गरिबीच गरिबी होती. तेव्हा ३६३ नंबरच्या बसने अविनाश माटुंगा लेबर कँपवरून धारावीत पोहोचत. त्यांच्याकडे आजही स्कूटर वा कार नाही. बस हेच त्यांचे लाडके वाहन. आजूबाजूला नाले, तेथील दुर्गंधी हे सर्व सहन करत, चिखल तुडवत, कचर्याचे ढीग, मुतार्यांचे वास याकडे दुर्लक्ष करत, छोटीशी बॅग घेऊन दवाखान्यात जात. त्यांचा दवाखाना म्हणजे, अर्ध्याकच्च्या बांधकामाची खोलीवजा झोपडीच. २००९ साली एका इमारतीत हा दवाखाना स्थलांतरित झाला. अविनाश यांच्याकडे पैसा नव्हता व नाही. त्यामुळे दादर, माहीम, माटुंगा इथे दवाखाना सुरू करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांचे कॉलेजचे मित्र दादरचे प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश कवळी यांच्याकडून त्यांना धारावीतली ही जागा कळली. वडीलबंधूंकडून (गुरूभाऊ) पाच हजार रु. मिळाले. अविनाश यांचा दवाखाना असा सुरू झाला. शेजारी लक्ष्मी विलास आणि ज्योती विलास ही फरसाण, चिक्की, चकल्या वगैरे बनवणारी आणि विकणारी दुकाने होती. शिवाय लगतच एक पानवाला होता. आसमंतात या सगळ्याचे वास यायचे.
धारावीत चर्मकारांचा व्यवसाय मोठा. तिथे ढोर वसाहत आहेच. शिवाय कुंभारवाडा आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख समुदायांच्या वस्त्या. तसेच माकडवाले, मद्रासी, तेलुगू, कानडी लोक यांची तसेच मराठी वस्तीदेखील. देशावरचे तसेच कोकणातले लोक. त्याकाळी तिथे दारू, मटका, जुगार सर्व चाले. दवाखान्याच्या समोरच जबरदस्त हाणामार्या चालत. अशावेळी शिवीगाळही व्हायची आणि नवनव्या ‘दर्जेदार’ शिव्यांचे ज्ञान व्हायचे… १९९२-९३च्या मुंबईतील दंगलींच्या काळात धारावीतही भडका उडाला होता. दवाखान्याच्या जवळपास तलवारी काढून मारामार्या झाल्या होत्या. या वातावरणातदेखील अविनाश दवाखान्यात जाऊन डॉक्टरी कर्तव्य बजावतच राहिले. त्यावेळी धारावीत इतका तणाव आहे, हे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले नव्हते. एरवी तसे धारावीत वेगवेगळ्या जातीजमातींच्या लोकांचे सण, उत्सव साजरे व्हायचे. भिन्नधर्मीय लोक एकमेकांच्या धार्मिक सणांना हजेरी लावायचे. एखाद्या दंगलीचा अपवाद वगळल्यास एकूण सलोख्याचे वातावरण होते व आहे.
अविनाश यांचा स्वभाव असा की आपण डॉक्टर असल्यामुळे तिथल्या अडाणी लोकांना जणू काही प्रबोधनाचे डोस पाजायला आलो आहोत, असा त्यांचा आव कधीच नसे. उलट अतिशय कमी खर्चात कसे जगता येते, हे मला त्या लोकांकडून शिकायला मिळाले, प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता जीवनात आनंदाचे धनी कसे व्हावे, आपली छोटी छोटी दुःखे कुरवाळत बसण्यात अर्थ कसा नाही हे धारावीकरांकडून मी शिकलो, असे अविनाश सांगतात.
अलीकडे कोरोना तीव्र असतानाच्या काळात धारावी पॅटर्न राबवण्यासाठी त्यांनी स्वत:ची सेवा देऊ केली होती. परंतु त्यांचे वय लक्षात घेता ती नाकारण्यात आली. परंतु अविनाश यांचा स्वभाव स्वत:च्या प्रकृतीचा बाऊ न करता लोकांसाठी धावून जाण्याचा कसा आहे, ते यावरून दिसते. तिथल्या लोकांनी त्यांना काही वर्षांपूर्वी ‘धारावी भूषण’ हा पुरस्कार दिला आणि त्यांचा सत्कार केला. पण अविनाश यांना कोणत्याही पुरस्काराचे असोशी नव्हती व नाही. मात्र जेव्हा धारावीतल्या बायाबापड्या किंवा काका-अण्णा त्यांना प्रेमाने स्वत: घरी बनवलेली पिठलंभाकरी वा पोहे-उपमा आणून देतात, तेव्हा अविनाश यांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. ते त्याचा मनापासून आस्वाद घेतात, कारण त्याला तिथल्या माणसांच्या प्रेमाची चव असते.
अविनाश यांनी तरूणपणी कॉलेजच्या नाटकांतून कामेही केली होती. आयुष्यभर त्यांनी नाटकांवर प्रेम केले आहे आणि कित्येक नाटके आवडीने बघितली आहेत. त्यांचे वाचनवेड जबरदस्त आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक डॉक्टरकडे जाताना अनेकदा स्वतःची अक्कल पाजळत डॉक्टरलाच सल्ला देत असतात वा त्यांचा डॉक्टरवर विश्वास नसतो. अशा लोकांपेक्षा धारावीतील विविध प्रांतातील, कष्टकरी वर्गातील एकोप्याने राहणारे निरक्षर लोक, कुठलाही आगाऊपणा न करता अविनाश यांच्यावर विश्वास दाखवतात आणि लळा लावतात, तेव्हा अविनाश भरून पावतात… त्यामुळेच अविनाश यांना गेली पन्नास वर्षे धारावीची ओढ वाटत राहिली.
एरवी शिवाजी पार्कसारख्या भागात राहणारा माणूस धारावी म्हटले, की ‘शी:, घाण!’ असे उद्गार काढतो. धारावीचा तिरस्कार करतो. पण धारावीवर मनापासून प्रेम करणारा, कुठलीही शोबाजी न करणारा, अतिशय साधी राहणी असलेला, निगर्वी आणि कुठल्याही प्रसिद्धी, प्रकाशापासून स्वतःला दूर ठेवणारा डॉक्टर अविनाश शेणोलीकर हा खरेच खूप मोठा माणूस आहे. त्यांची तिन्ही मुले परदेशांत उच्चपदी काम करतात. मुले आणि नातवंडे त्यांच्यावर खूप प्रेम करतात. तेही तिकडे जाऊन आलेले आहेत. पण तरीही ते इथे मुंबईतच एकटे आनंदाने राहतात. कारण मुंबई व धारावी, हीच त्यांची कर्मभूमी आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे, शिल्पाताईंचे निधन झाले. त्यांच्या आठवणी अविनाश यांच्यासोबत सदैव असतात. या आठवणी आणि आईवडिलांचा मिळालेला आशीर्वाद यामुळे अविनाशना ताकद मिळते. दोन मुली व एक मुलगा आणि नातवंडे शरीराने दूर राहत असली, तरी मनाने त्यांच्या सदैव जवळच असतात. सत्त्वशील व सत्शील आईवडिलांचे संस्कार अविनाश यांच्यावर झाले आहेत. डॉक्टर अविनाश शेणोलीकर हे धारावीतील आरोग्य क्षेत्रातील माणुसकीच्या
पॅटर्नचे प्रतीक आहे. डॉ. अविनाश यांना व त्यांच्या कार्याला माझा कडक सलाम!
फक्त पैसा, प्रसिद्धी व खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या दुनियेत असा हिरा मिळणे मुश्किल असते. सत्कार सोहळे, बक्षिसे, मानमरातब किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला मोठेपणा देणे याचा डॉ. अविनाश शेणोलीकर यांना मनापासून तिटकारा आहे. त्यांच्या दवाखान्यात अनेक वर्षांपूर्वी काही परदेशी अभ्यासक येऊन गेले. धारावीत ते कशा प्रकारे प्रॅक्टिस करतात, याचे त्यांनी एक अभ्यास म्हणून शूटिंगही केले. परंतु एरवी आपल्याबद्दल कोणालाही काहीही न सांगणारा आणि फक्त नेकीने आपले कर्तव्य करणारा असा हा माणूस आहे.
मेरे प्रभु…
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना
गैरों को गले न लगा सकूँ
इतनी रुखाई कभी मत देना
ही अटलबिहारी वाजपेयी यांची कविता मनावर कोरूनच जणू अविनाश यांची वाटचाल सुरू आहे. हा हिर्याच्या किमतीचा देवमाणूस माझा मावसभाऊ आहे, याचा मला खरोखरच अभिमान वाटतो!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)