या कथा बहुदा प्रथमपुरुषी असत. त्यामुळे आपलाच एखादा अनुभव ते सांगत आहेत असे वाटे. जीवनाचे अनेक पदर उलगडताना छोटे मोठे तत्वज्ञान सांगणारे पंचेसही पेरीत. त्यामुळे कथा रंगत जाई. श्रोते अडकून जात. रोजचेच विश्व जे आपण अनुभवतो तेच कथेच्या रूपाने नाट्यमय होवून पुढे उभे ठाके.
– – –
कथाकथनाला व्यावसायिकतेचे कोंदण चढवून हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे लेखक होते व. पु. काळे… रंगमंच देखणा असेल तर उत्तम, पण अगदी साध्या रंगमंच असला एखादे पोडियम व माइक ठेवलेला असेल तर तेथेही वपु सहज येऊन उभे राहत… कपडे अत्यंत साधे, बरेचदा आडव्या पट्ट्याचा टी-शर्ट, पॅन्ट, मागे वळवलेले विरळ कुरळे केस, नाकावर चष्मा व आत हिरवट बुबुळे असलेले डोळे… अनेक लोकांचे डोळे निळे असतात, यांचे थोडे वेगळे होते. हातात पुस्तक वगैरे काही नसे. एखादा अनोळखी इसम घराचा पत्ता विचारताना जसा गोंधळलेला असतो, ते भाव चेहर्यावर घेऊन काळे कथाकथनाला सुरुवात करीत. कथा सुरू होईल असे वाटेपर्यंत कथा सुरू झालेली असे आणि कथेत आपण कधी गेलो हे कळायचेही नाही. कोणताही नाटकी अभिनिवेश, पल्लेदार शब्दांची आतषबाजी वा चढउतार नसे. दारापुढच्या ओट्यावर बसून भाजलेल्या शेंगा खात जणू गप्पा मारताहेत इतकी सहजता प्रतीत होई.
वपूंच्या कथा या ऑफिस टेबलवरच्या फायली, पीएफ, साहेब हेडक्लार्क, प्रमोशन, वात्रट मित्र, बावळट क्लर्क, लोकलचा डबा अशा बरेचदा मुंबईच्या वातावरणाच्या रिंगणातल्याच असायच्या. या कथा बहुदा प्रथम पुरुषी असत. त्यामुळे आपलाच एखादा अनुभव ते सांगत आहेत असे वाटे. जीवनाचे अनेक पदर उलगडताना छोटे मोठे तत्वज्ञान सांगणारे पंचेसही पेरीत. त्यामुळे कथा रंगत जाई. श्रोते अडकून जात. रोजचेच विश्व जे आपण अनुभवतो तेच कथेच्या रूपाने नाट्यमय होवून पुढे उभे ठाके. प्रत्येक तरुण तरुणीला आपण कथेतील पात्र आहोत असे वाटे. दीड एक तासात चार-पाच कथा होऊन जात. एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी कथा पुढे जात राही. कथा संपली की अलगद खुर्चीवर बसत आणि म्हणत आता आपण थांबू या. तेव्हा लोक भानावर येत आणि कडकडून टाळी पडे. समस्त स्त्रीवर्ग, तरुणी, मुली, कॉलेजियन मित्र-मैत्रिणी उच्चभ्रू तद्वत सांसारिक बायका वपुंच्या कथाकथनावर लट्टू असत. कथाकथन संपले की बायकांचा घोळका त्यांच्याभोवती जमा होई. ‘फार छान! सुंदर कथा! खूप सुंदर, खूप छान लिहिता,’ अशा अभिप्रायांचा वर्षाव होत राही. त्यांच्या स्वाक्षरीसाठी मुलींची झुंबड उडे. क्लिक कॅमेर्यांनी फोटो काढले जात. ते फार सुखावह वाटणारे असे… विशेषत: वपुंना… तेसुद्धा एन्जॉय करीत.
बटाट्याच्या चाळीवाले पु.ल., वर्हाडवाले लक्ष्मण देशपांडे, दिलीप प्रभावळकर आदींनी साभिनय प्रयोग केले. बहुरंगी रंगमंचावर. याउलट वपुंनी कोणताही बडेजाव न करता दीड दोन दशके कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम केले. या कथांमध्ये खळखळून हसवणारे विनोद, अंगविक्षेप, संगीत काही नसे. सांगण्याचे कसब मध्यमवर्गीयांच्या मनाला स्पर्शणार्या कथा एवढेच काय ते भांडवल. ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटाचे कथानक याच पठडीतले. सिनेमा खूपच गाजला होता. कथा वपुंचीच होती. वपुंचे हस्ताक्षर अत्यंत सुंदर होते. कथा भरमसाट मोठ्या नसत. मोजके शब्द पण खूप आशयपूर्ण. पु. वि. बेहेरे यांच्या मेनका प्रकाशनाने त्यांची अनेक पुस्तके छापली. ती मोठ्या प्रमाणात खपलीसुद्धा; कारण एक तरुण पिढी त्यांच्या कथांवर लट्टू होती.
मी ज्या नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये शिकलो त्या हायस्कूलमध्ये वपुंचे कथाकथन ठेवायचे होते. माझ्या ओळखीचे म्हणून प्रिन्सिपल मला म्हणाले, वपु गॅदरिंगसाठी येतील तर बघ ना. त्यावेळी वपु थिएटर शो करत नसत. फक्त शाळा-कॉलेजेसमध्ये जात. गदिमा, मिरासदार, शंकर पाटील यांसारखी मंडळीही कथाकथन करीत, पण थिएटर शो हा प्रकार तेव्हा अस्तित्वात नव्हता. तिकीट काढून कथाकथनासाठी थेटरला जाण्याइतकी मानसिकता प्रेक्षकांमध्ये नव्हती, नाटकाला मात्र जायचे. वपुंना फोन केल्यावर ते म्हणाले, येईन मी, पण तुमची शाळा पैसे देईल ना? माझे जाण्या-येण्याचे भाडे शंभर रुपये, चारशे रुपये मानधन मी घेईन. कारण शाळा कॉलेजवाले फुकटात कार्यक्रम मागतात. आमचे प्रिन्सिपल म्हणाले, आपण अवश्य देऊ. वपु खूप मोठे लेखक आहेत. वपु टॅक्सीने नाशिकला आले. मी एका हॉटेलात त्यांची राहायची सोय केली. शाळा पैसे देणार होती. जेवायला अर्थातच ते माझ्याकडे आले. माझी पत्नी अनुने केलेला स्वयंपाक त्यांना खूप आवडला. रेसिपीविषयी अनेक प्रश्न विचारले. कारण वपू स्वयंपाक अत्यंत उत्तम करतात असे मीसुद्धा ऐकून होतो. कुणी मित्रमंडळी येणार असली तर ते स्वतः फ्लॅटमधल्या छोट्या किचनेटमधील पाकखान्यात उभे असायचे. जेवताना भात वाढताना भाताचा पोर्शन वाढताना थोडा खाली सांडला. त्यावर वपूंंनी म्हटले, वहिनी, आणताना छोटे-छोटे पिसेस करावेत. म्हणजे वाढताना सोपे पडते. मी स्वतः ताट करतो, त्यावेळी कोणता पदार्थ कोठे असावा, लिंबू, चटणी, लोणचं, वरण, आमटी वा श्रीखंडाच्या वाट्या यांची छान मांडणी करतो. जमिनीवर जेवताना आपण जशी छानशी रांगोळी ताटाभोवती काढतो, ताट तितकेच सुबक दिसले तर आणखी छान वाटते. पुढच्या वेळी येईन तेव्हा वांग्याचे भरीत करून दाखवेन, मजा येईल बघा. त्या वेळेपासून आमच्या घरात शिरा वा भात काप करुन वाढला जातो. भाताच्या ढिगाला ताटात उडी मारायची सोयच ठेवली नाही.
नंतर वपुंचे कथाकथन गाजू लागले. महाराष्ट्रभर कार्यक्रम होऊ लागले. नाशिकला त्यांचे सतत कार्यक्रम होऊ लागले. कधीतरी ते त्यांच्या पत्नी वसुंधरा वहिनींना घेऊनच जेवायला आले होते. नाशिक चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध, म्हणून त्यांनी ममपत्नी अनुराधास सोबत घेऊन दुकानातून मुलीसाठी पैंजण तोरड्यासारख्या छोट्या-मोठ्या वस्तू अत्यंत आवडीने खरेदी केल्या. कथाकथन करून आल्यावर वपूंनी त्या वस्तू चिकित्सकपणे पाहिल्या. सूचना केल्या. नाजूकपणा कसा असावा, पैंजण कसे असावेत यावर टिप्पणी दिली.
मी एक ऑब्झर्व केलं आहे. काही माणसांचं पाहाणं हे नितळ असतं मात्र काही माणसे झाडाझडती घ्यावी अशा नजरेने पाहतात. अरविंद इनामदार, व. पु. काळे, ‘मेनका’चे बेहरे, पु. भा. भावे आणि अनेकजण. जणू डोळ्यांचे स्कॅनिंग मशीन फिरवत आहेत. जेवणावरून एक आठवण सांगतो, असं म्हणत त्यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, एक कार्यक्रम आटोपून मी व गदिमा एकाच टॅक्सीने घराकडे निघालो. माझे घर अलीकडे होते. रात्रीचे आठ वाजले होते, गदिमा पुढे जाणार होते. मी त्यांना म्हटलं, आठ वाजून गेलेत. माझ्या घरी जाऊ, थोड पिठलं-भात खाऊ, नंतर तुम्ही पुढे जा. मी खूपच आग्रह केला तेव्हा समजुतीच्या सुरात ते म्हणाले, वपु, असं अचानक गेल्यावर तुझी बायको पिठलं-भात छानच खाऊ घालील यात वाद नाही. तुमचं-माझं पोट भरेल पण त्या माऊलीला खंत राहील. एवढे गदिमांसारखे थोर साहित्यिक आमच्या घरी आले आणि मी वेडीने त्यांना पिठलं-भात वाढलं. त्यापेक्षा एकदा मी ठरवून येईन त्यावेळेस तिला हवं ते करु दे. गोड-तिखट काहीही चालेल. असे झाले तरच ती अन्नपूर्णा मनातून सुखावेल. म्हणून आज नको नंतर कधीतरी. पण मी चुकलोच कारण ती वेळ नंतर कधी आलीच नाही. गदिमा गेले आणि ते माझ्याकडे पिठलं-भात सुद्धा जेवले नाहीत, याची खंत मला मात्र कायम राहिली.
वपू वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट होते. मुंबई महापालिकेत गार्डन्स प्लॅनिंगला ते होते. पण खट वरिष्ठांशी त्यांचे पटेना म्हणून नोकरीचा राजीनामा देऊन ते पूर्णवेळ लिखाण करू लागले. वाचकांच्या मनातली सुंदर घरे ते सजवू लागले. सुविचारांची झुंबरे मनामनात दिसू लागली. छोट्या छोट्या कोट्सचा खजिना वाचकांसाठी त्यांनी मोकळा केला. सोशल मीडियावर त्यांचे कोट्स लोक आवर्जून वाचतात. ठाव लागू नये इतका मोठा फिलॉसॉफर त्यांच्या मनात खोलवर वस्तीस असावा. ऑडिओ कॅसेट विश्वातील ते पहिले मराठी लेखक होते. त्यांच्या कथा व सुविचार यांच्या अनेक कॅसेटस् निघाल्यात. एका दिवाळी अंकात मी लेखकांवर चित्रमाला केली होती. अनेक लेखकांना लिखाणासाठी मन:स्वास्थ्य मिळत नाही म्हणून त्यांना उत्तर ध्रुवावर ठेवले तर? असा विषय निवडला होता. काही मंडळी तेथे पोहोचली. त्यात दुर्गा भागवत, शांताबाई शेळके, रमेश मंत्री, शिवाजीराव भोसले इत्यादिंवर खूप मिस्किल कार्टून्स रेखाटली होती. तात्यासाहेब शिरवाडकर यांनी शेक्सपिअर व कालिदासाचे मेघदूत बरोबर नेले शांतपणे वाचण्यासाठी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट तिथेही कविता वाचन करायचे. पावसाळ्यात पाडगावकर पापड जाहिरातीसाठी चित्र होते, ते पापड लाटत आहेत व त्यांचीच कविता ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे’ म्हणत आहेत. त्यात वपुंवरचे चित्र होते. वपु कथाकथन करीत आहेत आणि चार पाच मत्स्यकन्या मन लावून ऐकत आहेत… कॅप्शन होतं ‘वपू म्हटले की बायका आल्याच’.
एकदा बेहेरे यांच्या घरी बेहरे, वपु व मी गप्पा मारीत होतो. गप्पा गप्पात वपुंची कथा सुरू होई. ते म्हणाले, आठ दिवसांपूर्वी दोन वयस्कर गृहस्थ घरी आले ते म्हणाले, आम्ही वृद्धाश्रमातून आलो आहोत. दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे गॅदरिंग आहे. आपण प्रमुख पाहुणे म्हणून यावे, ही विनंती करायला आलो आहोत. थोडेफार मानधन नक्की देऊ. पण आपण आलात तर चार गोष्टी ऐकायला मिळतील. थिएटरमध्ये आपला कार्यक्रम ऐकायला यायला ना भाड्यासाठी पैसे ना तिकिटाला! मी म्हणालो, काका आपण पत्ता, तारीख वेळ सांगा, मी विनामूल्य अवश्य येईन. त्यांना चहापाणी दिला व निरोपासाठी दाराशी गेलो. अत्यंत समाधानाने ते परतत असताना अचानक वळले व म्हणाले, वसंतराव, त्या दिवशी बरोबर कॉलेजचे चार पाच तरुण बरोबर आणता आले तर फार बरे होईल. तेवढे प्लीज जमवा. चार दिवसांपूर्वी कॉलनीतल्या चार तरुणांना घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांना खूप आनंद झाला. वपु काळे आले हे त्यांच्या दृष्टीने फार आनंदाचे होते. पाच-पंचवीस वृद्ध व काही महिला नटून थटून स्टेजवर घोटाळत होत्या. एका वयस्कर गृहस्थांनी प्रास्ताविक केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. काही वृद्धांनी गाणी म्हटली, काहींनी वाद्ये वाजवली. आईबापांना विसरलेल्या मुलांवरचे एक नाटक सादर करण्यात आले. प्रसंग तसा हृदयस्पर्शी होता, पण कुणाचाच इलाज नव्हता. मी दोन कथा सांगितल्या, कडकडून टाळ्या पडल्या. त्यादिवशी यानिमित्ताने ते लोक पोटभर हसले. समारोपाआधी शेवटचा कार्यक्रम लावणीचा होता त्यासाठी एक सुंदर तरुण मुलगी चार-पाच मैत्रिणींबरोबर नटून थटून आलेली होती. स्पीकरवर लावणीची गाणी व मुलींचा नाच सुरू झाला. लावणी रंगात आली आणि माझ्याबरोबरच्या मुलांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली, म्हणजे दाद दिली. वृद्धांनी ताल धरला. काहींनी टोप्या उडविल्या. वृद्धाश्रम आनंदाने झळाळून निघाला. कार्यक्रम संपला आणि आम्ही निघालो. माझ्या घरी आलेले म्हातारबुवा जवळ आल्यावर म्हणाले, वपु साहेब मनापासून आभार. आपण आलात, विशेषत: या तरुणांना आणलत हे फार छान केलंत. आता लक्षात आलं असेलच ना त्यांना का बोलावलं ते? लावणीचा कार्यक्रम ठेवल्यावर तो खुलविण्यासाठी शिट्या हव्याच असतात. आमच्या कुणाच्याच तोंडात दात नाहीत, शिट्या वाजवणार कशा? म्हणून मी आपणास विनंती केली होती. मनापासून आभार! आम्ही सगळे मनापासून हसलो. त्यांचाच मला एक सुविचार आठवला, ‘कलासक्त मन असेल तर कोठडीतील छोट्या झरोक्यातून दिसणार्या चंद्रकोरीचा सुद्धा आनंद घेता येतो. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण आकाशात भरारी घेणार्या गरुडाच्या जिद्दीचं काय… इत्यलम्!