पंतप्रधान मोदींचे गुणगान करून थकलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना मोदींमुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याची स्वप्नं पडत आहेत. दिल्लीवरून एका आठवड्यात महाराष्ट्रात तीन-तीन भाषणं करण्यासाठी येणार्या मोदींसाठी पायघड्या घालण्याचं आणि त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करण्याचं कंत्राट मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात त्यांना मिळालंय. मोदींनी केलेल्या विकासामुळे महाराष्ट्रातील जनता सुखी आणि समाधानी असल्याचं चित्र शिंदे यांना सर्वत्र दिसतंय. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून देणार याची शंभर टक्के खात्री शिंदेंना आहे. त्यामुळे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी पिटाळला. तीच ही मुलाखत.
– नमस्कार शिंदे साहेब.
– नमो नम: बोला, काय खाणार, काय घेणार? संकोच करू नका. कसलेही प्रश्न विचारा. मी मला हव्या असलेल्या सर्व जागा आमच्या पक्षाच्या पदरात पाडून घेतल्या की नाही! आदरणीय शहा साहेबांसकट अनेकजणांचा विरोध असतानाही मोदी साहेबांना माझी दया आली आणि त्यांनी त्या जागांचं दान माझ्या पदरात नव्हे सदर्यात घातलं.
– पण एखाद्याचे पाय त्याच्याच गळ्यात घालून त्याला भोग आपल्या कर्माची फळं असं सांगण्याचा हेतू नसेल ना त्यांचा? कारण, तुम्ही मागितलेल्या सर्व जागा जर पडल्या तर तुमचा काटा आपोआपच निघेल असं वाटत असेल त्यांना, या भाजपवाल्यांचं तुम्ही मला काही सांगू नका. कामापुरता मामा करतील एखाद्याचा. असली-नकली शिवसेना करत दोघांना परस्परांत झुंजवून संपवण्याची स्वप्नं पाहात असतील ते.
– हे बघ. ते काहीही असलं तरी आमचीच शिवसेना असली असल्याचं सर्टिफिकेट दिलंय निवडणूक आयोगानं. तेही अगदी धनुष्यबाण चिन्हासह. त्याशिवाय आता भाजपाची पालखी वाहण्यास सिद्ध झालेले उमेदवार अॅडव्होकेट उज्वल निकम यांनी तर त्यावेळीच निवडणूक आयोगाची बाजू उचलून धरली होती.
– हे बघा. त्या पक्षपाती, अन्यायकारक निकालाचा कोळसा उगाळून त्याचा पार भुगा झालाय. येत्या निवडणुकीत जनताच निकाल देणार आहे अस्सल कोण आणि नकली कोण, याचा. तेव्हा बाराच्या भावाच जाईल तुमचा पक्ष. गद्दारी करून मीच मुलाचा बाप असल्याचा दावा करणार्या तुमच्या बेगडी पक्षाला जनतेने नाही हद्दपार केलं राजकारणातून तर नाव नाही सांगणार हा पोक्या.
– पोक्या, तू एकतर्फी बाजू घेऊन बोलू शकत नाहीस. पत्रकार म्हणवतोस आणि असत्याची बाजू घेतोस?
– असत्य तुमच्या बाजूला आहे. फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनता ओळखते असली शिवसेना कुणाची आहे ते. मोदी आणि शहा इथे येऊन आम्हाला असली-नकलीचे धडे देणार? महाराष्ट्रातील मतदार हे कधीच खपवून घेणार नाहीत. लोक म्हणतात की, तुम्ही माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जिवावर मोठे झालात आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सन्मानाची पदं उपभोगून गद्दारी करत भाजपचरणी लीन झालात. तेही सुरतमार्गे गौहातीला जाऊन. जनता हे विसरलेली नाही. निकालात तुमच्या गद्दार पक्षाला कसे फटके बसतील हे तुम्ही फक्त पहात राहा. तुम्हाला कायमचा धडा शिकवण्यासाठी लोक इतर कुठल्याही मुद्द्याचा विचार करणार नाहीत.
– पोक्या, तू असा पिसाटल्यासारखा का बोलतोयस? तुला जसं वाटतं तसं नाहीय ते. लोक फक्त आदरणीय, परमपूज्य मोदी साहेबांनी केलेल्या विकासाचाच विचार करणार आहेत.
– कसला बोडक्याचा विकास. सगळी थापेबाजी चाललीय. अहो, वाढत्या महागाईने जनता मेटाकुटीला आलीय. गॅस सिलिंडरच्या भावात झालेली चौपट वाढ नागरिकांचा श्वास गुदमरून टाकतेय. अन्नधान्याचे, भाजीपाल्याचे दिवसागणिक वाढणारे भाव सामान्य माणसाला परवडेनासे झालेयत. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गेल्या दहा वर्षांत चढत्या भाजणीने वाढले आहेत. मोठमोठ्या इमारती, टॉवर्स मराठी माणसांनी फक्त डोळ्यांनी बघायच्या. त्याचा उपभोग घ्यायचा परप्रांतीयांनी. मराठी माणूस राहतोय चाळीत, झोपडपट्टीत, पत्र्यांच्या घरात, म्हाडाच्या अरुंद जागेच्या बिल्डींगमध्ये. घर चालवायलाही पुरेसा पैसा नसतोय त्यांच्याकडे. मोदींनी दहा वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख पडतील अशा थापा मारल्या आणि वर तो निवडणुकीचा जुमला होता असं स्पष्टीकरणही निर्लज्जपणे दिलं. प्रत्येक निवडणुकीत फक्त भरघोस थापा आणि विकासकामांच्या खोट्या जाहिराती. करोडोपती सहीसलामत सुटतात घोटाळ्यातून आणि सामान्य माणसाच्या, मध्यमवर्गीय बँक खात्यावर यांची नजर. हिंमत असेल तर अब्जावधी, कोट्यवधींचे घोटाळे करून तुमच्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये आलेल्या भ्रष्टाचार्यांवर करा ना कठोर कारवाई. उलट त्यांना उमेदवार्या देऊन आपण भ्रष्टाचाराचेच पाठीराखे आहोत हे सिद्ध करताहेत हे भाजपाचे नेते. जनता वाटच बघतेय निवडणुकीत त्यांच्या पाठीत लाथ घालण्याची. म्हणून तुमचे मोदी आणि शहा सारखे लोटांगणं घालत वार्या करताहेत ना महाराष्ट्राच्या. पण काही उपयोग होणार नाही. भाजपाचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही पानिपतच होणार आहे येत्या निवडणुकीत. ना स्त्रिया सुरक्षित, ना बेरोजगारांना रोजगार. उलट धर्मांधतेने पछाडलेले आणि जातीधर्मात फूट पाडणारे राजकारण करणारे धर्मांध आणि ढोंगी नेते ज्या पक्षात आहेत त्यांनी राममंदिरच काय आणि कितीही, कोणत्याही देवांची मंदिरं बांधली तरी त्यांनी केलेली पापं या देशातील जनता कधीच विसरणार नाही.
– अरे, तू माझी मुलाखत घ्यायला आलायस की मला लेक्चर द्यायला? तुझ्या मतांना मी काडीचीही किंमत देत नाही. सारा महाराष्ट्र माझ्या मागे आहे आणि मी मोदींच्या मागे आहे. तुझ्यासारखी वायफळ बडबड नाही ऐकायचीय मला. चल फूट.