माझा मानलेला परममित्र पोक्या याच्या अंगात त्या दिवशी वीरश्री संचारलेली पाहिली तेव्हा मी धन्य झालो. दाढीवाल्यांना भेटून आल्यापासून तो चालू राजकारण अजिबात सिरीयसली घेत नाही. उलट तो मला म्हणतो की टोक्या, आजच्यासारखे विनोदी राजकारण पुढे कधीच बघायला मिळणार नाही. मी तर त्याकडे आदरणीय नितीनजी गडकरींच्या नजरेने बघतो. तरच समोर चाललेल्या राजकारणाचा मनसोक्त आनंद घेता येतो. महागाईने पोळलेली जनतासुद्धा टीव्हीवरील बातम्या पाहून हसत असते. ‘येस मिनिस्टर’ ही राज्यकर्त्यांची खिल्ली उडवणारी टीव्हीवरील सिरीयल तिला आठवते, त्यातील इरसाल राजकारणी आणि त्यांची उडणारी भंबेरी आठवते.
सध्याचं राजकारण म्हणजे एक विनोदी सिरीयलच आहे, असं जेव्हा पोक्या बोलला, तेव्हा मी त्याला त्याचं स्पष्टीकरण करायला लावलं. तो म्हणाला, आजच्या राजकारणात कोणत्याही चित्रपटापेक्षा ती शंभरपट हास्यस्फोटक करमणूक असते. त्याशिवाय पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षकांची उत्कंठा दर दिवशी ताणून धरणारी इतकी उत्कंठावर्धक सिरीयल दुसरी कोणतीही नसेल. या सिरीयलमध्ये आज कोण बाजी मारणार, उद्या कुणाच्या जाहीर सभेचा फ्लॉप शो होणार याची कल्पना नसली तरी आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी पाहून आणि तमाशातील जुगलबंदीवर ताण करणारे सवाल-जवाब पाहून आपण तोंडात बोटं घालतो. अरे टोक्या तूच विचार कर, कधीतरी अलिबाबा आणि चाळीस चोर भाजपच्या कमळपुष्प वाहनातून उड्डाण करून गुजरात आणि गौहातीची सैर करतील, याची ब्रह्मदेवाच्या बापाने तरी कल्पना केली असेल का? चुना आयोगाचा (निवडणूक आयोगाला हल्ली पोक्या चुनाव आयोग म्हणण्याऐवजी चुना आयोगच म्हणतो) आणि सुप्रीम कोर्टाचा क्लायमॅक्स तर सर्वांची मति गुंग करून गेला. अमेरिकन सुपरहीरो सिरीजच्या थानोसची आठवण करून देतील असे मोदी-शहांसारखे सुपर व्हिलन, आसुरी महत्त्वाकांक्षेने पछाडलेले फडणवीस व दाढीवाले, विनोदसम्राट किरीट सोमय्या, डबल ढोलकीपटू गिरीश महाजन, विघ्नसंतोषी शेलार मामा, बाल्या डान्सर रामदास कदम, चिंबोरी संशोधनपटू तानाजी सावंत, कोड्यात बोलणारे दीपक केसरकर, शंकेखोर विनोद तावडे, कोकणातील संकासूर उदय सामंत, बोलघेवडे बावनकुळे अशी कितीतरी पात्रे या सिरीयलला रंगत आणीत असतात. ते जेवढे सिरीयसली वागतात, बोलतात, त्याच्या दुपटीने प्रेक्षक त्यातून स्वत:ची करमणूक करून घेतात.
पोक्याचं हे बोलणं ऐकल्यावर मी त्याला विचारलं, या सिरीयलमधील बीबीसी चॅनलच्या कार्यालयावर धाडी टाकण्याच्या सीनबद्दल तुला काय वाटतं?
त्यावर पोक्या हसत हसत म्हणाला, तो प्रसंग तर इतका विनोदी होता की मी पंधरा मिनिटे पोट धरून हसत होतो. ‘खाई त्याला खवखवे’ असा सारा प्रकार होता. इंग्लंडमधले सर्व राजकीय नेतेही या प्रकारावर पोट धरून हसले. त्यांचे पंतप्रधान तर म्हणाले, हा बालिशपणा आहे. बीबीसी आमच्या राजकीय नेत्यांवरही हवी तशी टीका करते. आमची असलेली नसलेली सर्व लफडी जगासमोर आणते. म्हणून काही आम्ही त्यांना दमदाटी करत नाही की त्यांच्याबद्दल शत्रुत्वही बाळगत नाही. त्यांना देशद्रोहीही म्हणत नाही. इतकं विचारस्वातंत्र्य आमच्या देशात आहे. खुन्नस काढण्याचा प्रकार म्हणजे हुकूमशाहीच आहे. आम्ही असे प्रकार गांभीर्याने कधीच घेत नाही. आपल्यावर होणार्या टीकेकडे आपण नीट लक्ष दिले तरी त्यातून आपल्याला सुधारण्याची संधी मिळते. पण ही टीका करण्याची संधीच प्रसारमाध्यमांना दिली नाही व त्यांनी केलेल्या टीकेमुळे सूड घेण्याचा प्रयत्न केला, तर सारं जग हसेल त्यावर. म्हणून आम्हीही खूप हसलो त्या कृतीवर.
पोक्याच्या या बोलण्याशी मीही सहमत झालो. मी म्हटलं, पोक्या तू म्हणतोस आणि इंग्लंडचे नेते म्हणतात याच्याशी मीही सहमत आहे. सत्तेचा माज चढला ना की रेड्यांना समोरची माणसं दिसत नाहीत. मग सूर्याजी पिसाळ त्यांच्या अंगात संचारतो आणि ते काय बोलतात, काय करतात याचं भान नसल्यामुळे ते विनोदाचे विषय होतात. त्यात दाढीवाले हा सगळ्यात विनोदाचा विषय आहे. त्यांची लोकप्रिय होण्यासाठी चाललेली धडपड आणि त्यातून निर्माण होणारे हास्यास्पद प्रसंग यामुळे भरपूर हास्यरस गळू लागतो. मुळात ते भाजपच्या, पर्यायाने फडणवीसांच्या हातातले कळसूत्री बाहुले आहेत. त्यांना पुढे करून नंतर मागे खेचणे हा खेचाखेचीचा खेळही तितकाच हास्यस्फोटक आहे. त्यामुळे व्यासपीठावरून भाषण करताना, मुलाखत देताना, विधानभवनात बोलताना त्यांचा तोल कधी जातो, हे त्यांनाही कळत नाही. मग ते चहापानाला न आल्यामुळे विरोधी पक्षांना देशद्रोह्यांची उपमा देतात. मग चहा आणि देशद्रोह या विषयावर चर्चा करताना अजितदादांची हसून हसून मुरकुंडी वळते.
चुना आयोगाने सगळे नियम फाट्यावर मारून त्यांच्या बाजूने दिलेल्या निकालामुळे आपणही कोणीतरी महान अलिबाबा आहोत, याचा साक्षात्कार त्यांना झालाय आणि ते ‘दुनिया मेरी मुठ्ठी में’ आल्यागत कुठेही, कसंही, काहीही बोलतात. सभागृहातही बोलताना त्यांचं भान सुटतं. कामाच्या नावाने बोंब असल्यामुळेच विधानभवनात जवळ जवळ तीनशे फाईल्स त्यांनी सह्या न केल्यामुळे धूळ खात पडल्या आहेत. ‘आम्ही गद्दार आहोत,’ हे गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे मान्य केल्यामुळे त्यांची आणखी पंचाईत झाली आणि त्यातूनही भरपूर विनोद निर्माण झाले. त्यांची बूटचाटूगिरी करणारे चाळीस आमदार एखादे मंत्रीपद आपल्याला मिळावे म्हणून कसे तळमळत आहेत, हे विदारक दृष्यच डोळ्यांसमोर उभं केल्यास भरपूर करमणूक होईल.
ते कोकणातील संकासूर दाढी आणि ढेरी वाढल्यामुळे चालताना बागुलबुवासारखे डुलतात. ते कोकणात कधी उभे राहतात आणि त्यांना कधी पाडतो असं कोकणवासीयांना झालं आहे. इकडून तिकडे बेडकासारखे उड्या मारून गेलेल्या अलिबाबा आणि चाळीस चोरांना जन्माची अद्दल घडवण्याची वाट सारा महाराष्ट्र पाहात आहे. या कॉमेडीचं ट्रॅजिडीत रूपांतर कोणत्याही क्षणी होईल याची कल्पना खुद्द त्यांना आणि विरोधकांनाही आहे. आपल्यालाही या डार्क कॉमेडीची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.