ज्यांच्याभोवती सुरक्षारक्षकांचं कडं असतं, ज्यांच्या सुरक्षेसाठी तीन तीन दिवस व्यवसाय बंद ठेवतात, लोकांना घरांत कोंडून घालतात, असे भ्याड नेते देशाचं संरक्षण कसं करतील?
– ज्ञानेश पोफळे, नसरापूर
अशा नेत्यांनी खरं तर देशासाठी स्वत:चा बळी द्यावा (राजकीय). देशाचं संरक्षण अपने आप हो जायेगा!
पुण्यातल्या सगळ्याच महिला तोंडाला स्कार्फ लावतात, पूर्ण झाकून घेतात तोंड. त्यांना ओळखीचे लोक ओळखत कसे असतील?
– श्रीपाद कोंडविलकर, नाशिक
काय राव… आपण नाशिकचे आणि उठाठेव पुण्यातल्या महिलांची करताय? आडून आडून विचारू नका… डायरेक्ट काय ते विचारा!
मी एक डोळा बंद करून टीव्ही पाहतो आणि विजेची बचत करतो, तरी वीज मंडळ मला पूर्ण बिल का पाठवते?
– रामनाथ कोळी, वरळी
उद्या बिलाची सुरळी केलीत तरी पूर्ण बिल भरावंच लागणार.. एका डोळ्याने सुरळीचा अंदाज येणार नाही, तेव्हा दोन्ही डोळ्यांनी बघा… टीव्ही हो!
यथा राजा, तथा प्रजा असं राजेशाहीत म्हटलं जायचं, लोकशाहीत मात्र यथा प्रजा, तथा राजा म्हणायला हवं ना?
– सुनंदन जोशी, डोंबिवली
राजेशाहीला लोकशाही म्हणताय, ते काय कमी आहे?
तुम्ही पंतप्रधान झालात तर ‘चाय पे चर्चा’, ‘मन की बात’ हेच कार्यक्रम कराल की तुमचा काही वेगळा कार्यक्रम असेल?
– मान्यता राऊत, पालघर
चाय पे वायफळ चर्चा, जोर जबरदस्ती से मन की बात असे कार्यक्रम असतील.. पण त्यासाठी पालघरच्या ‘राऊतां’नी सत्तांतर घडवून आणायला हवं आणि मला पंतप्रधान म्हणून ‘मान्यता’ द्यायला हवी!
कोण आहे हा संतोष पवार असं कोणीतरी तुम्हाला म्हणालं आणि मग तुम्ही ‘यदाकदाचित’कार संतोष पवार बनून त्याचे दात घशात घातले, असं काही ‘धंगे’बाज घडलं आहे का हो तुमच्या आयुष्यात?
– सोमनाथ शिंदे, कसबा पेठ, पुणे
असं कोणी काही बोललं की मी एकच मंत्र बोलतो, ‘गेला तेल लावत’ (मनातच बोलतो… नाही तर मला तेल लावून चोपतील).
दहावी-बारावीच्या परीक्षांचा काळ सुरू आहे, म्हणून विचारतेय, तुम्ही शाळेत कधी कॉपी केलीये का हो? कशी केलीत?
– सोनिया शिर्के, नायगाव, वसई
माझ्या एका मित्राने इंग्लिश कच्चं असल्याने पुढे बसलेल्या मुलाचा पेपर कॉपी केला होता… त्याच्या आईने जाम मारला होता त्याला… कारण ‘व्हॉट इज युवर फादर्स नेम’ या प्रश्नाच्या उत्तरात त्याने समोरच्या मुलाच्या बापाचं नाव लिहिलं होतं… तेव्हा कळलं होतं की कॉपी करायला पण अक्कल लागते. तेवढी अक्कल आपल्याला नाही, हे कबूल केलं आणि कधीच कोणाची कॉपी नाही केली.
आंबा तुम्ही कसा खाता, सोलून, कापून की चोखून?
– अक्षय कनाटे, वर्सोवा
कनाटे साहेब, तुम्ही तुमच्या अक्षय नावाला जागताय की मेरे मन की बात जागवताय?
कलिंगडाला टरबूज म्हणतात, हे मला तरी माहिती नव्हतं. मग हे लोक टरबुजाला काय म्हणतात?
– निमिष साने, पनवेल
मी याचं उत्तर दिलं तर मार्मिकच्या मुखपृष्ठावरून जसा गदारोळ झाला, तसा मलपृष्ठावरून गोंधळ होईल.. घेताय जबाबदारी??
नाय नो नेव्हर असं तुम्ही म्हणताय, पण मला अजून प्रश्न पडलाय की काय नाय नो नेव्हर?
– प्रवीण पन्हाळकर, सासवड
पडलेला प्रश्न उचलून बघा, उत्तर सापडेल. मैं आज भी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं नही देता!
आमच्या चाळीतले एक देशभक्त काका संस्कृत ही जगातली सगळ्यात प्रगत भाषा आहे, असं दिवसरात्र सांगत असतात. त्यांची दोन मुलं इंग्लिशमध्ये शिकून इंग्लंड आणि अमेरिकेत स्थायिक आहेत. काकांनी त्यांना संस्कृतमध्ये का शिकवलं नसेल?
– महेश पाटील, दादर
मुलांना संस्कृत शिकवायचा प्रयत्न केला असेल म्हणूनच मुलं वैतागून इंग्लंड अमेरिकेत स्थायिक झाली असतील.. म्हातारा नातवंडाना पण छळेल म्हणून!