ऑस्लो या नॉर्वेच्या राजधानीनंतर आमचा मुक्काम होता कोपनहेगन या शहरात. हे डेन्मार्क देशातलं शहर. बर्यापैकी मोठं. तिथं पाहण्यासारखं देखील बरंच आहे. पण आम्ही तिथं फक्त एक दिवस, एक रात्र इतकाच वेळ देऊ केला होता. हे खरं तर अन्यायकारक होतं. पण आमचा नाईलाज होता. आमची ट्रिप आटोपशीर राखण्यासाठी इतकं करणं आवश्यक होतं. उपलब्ध असलेल्या वेळात जितकं काही पाहता येईल ते आपलं, असा विचार करून ही आखणी केली होती.
कमी वेळात सगळं पाहणं कधी शक्य नसतं. वेगळं तितकं मनसोक्त पाहायचं आणि इतर गोष्टींना धावती भेट द्यायची, हे योग्य ठरतं. अशावेळी आपल्या सहाय्याला येतो तो ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ हा प्रकार. आपल्याकडे हा फारसा रुजलेला नाही. आपल्याकडे बहुदा पॅकेज टूर्स अधिक प्रमाणात दिसतात. त्यासाठी एक पक्की स्थलदर्शनाची यादी समोर ठेवली जाते. त्या यादीप्रमाणे ठराविक वेळ त्या त्या ठिकाणी दिला म्हणजे सहल नियोजकांचं काम संपतं. स्थलदर्शनच्या आणि तिथं घालवायचा वेळेबाबत तुम्हाला विचार करायला वाव नसतो. आपल्याकडच्या शहरांमधली ट्रॅफिकची समस्या यामुळं ‘हॉप ऑन हॉप ऑफ’साठी आवश्यक असलेलं वेळेचं नेमकं नियोजन करणं शक्य होत नसावं.
परदेशात बहुतेक शहरांमध्ये हा प्रकार चांगलाच रुजला आहे. त्यासाठी अशी सेवा देणार्या कंपन्या असतात. नेमून दिलेल्या एका विशिष्ट मार्गाने ठराविक अंतराने कंपनीच्या बसेस धावत असतात. शहरातल्या, भेट द्यायलाच हवी अशा, महत्वाच्या ठिकाणी त्या थांबतात. तुम्ही त्या बसमध्ये चढायचं, जे ठिकाण पाहायचं तिथं उतरायचं. जितका वेळ त्या स्थळाकडे घालावावासा वाटतो, तितका घालवायचा. पुन्हा स्टॉपवर येऊन त्या कंपनीच्या बसमध्ये चढायचं आणि पुढच्या पर्यटनस्थळाकडे जायचं. एकदा तिकीट घेतलं की ते ठराविक वेळेपर्यंत चालतं. तितक्या काळात तुम्ही कितीही वेळेला बसमध्ये चढू-उतरू शकता. प्रत्येक वेळी वेगळं तिकीट काढायची आवश्यकता नसते.
हा प्रकार फारच सोयीस्कर आहे. कारण मोजकी स्थळं निवडून तिथं पुरेसा वेळ घालवायचा आणि ज्या जागेमध्ये तितकं स्वारस्य नसेल त्याचं खाली न उतरता बसमधूनच ‘पॅनोरॅमिक’ दर्शन घ्यायचं, हे त्यातून सहजगत्या करता येतं. शहर अगदीच बघितलं नाही असं नाही आणि त्यासाठी खूप वेळ घालवावा लागला, असं देखील नाही. आणखी एक फायदा म्हणजे बस चालवणारे ड्रायव्हरच तुमचे टूर गाईड असतात. आपण बसमधून जात असताना ते सतत बोलत असतात आणि आजूबाजूच्या भागाची माहिती देत असतात. पुढच्या स्थळाबद्दल सांगत असतात. त्यामुळं आपलं ‘बघणं’ ‘अर्थपूर्ण’ व्हायला चांगलीच मदत होते.
कोपनहेगन पाहायला आम्ही हा पर्याय निवडला. आधीच लांबचा प्रवास करून आल्यानंतर मुळात आम्हाला सगळंच पाहण्यात स्वारस्य नव्हतं आणि तितकी ताकद देखील उरली नव्हती. त्यात खूप थंडी सोसून आम्ही कावलो होतो. त्यामुळं ‘हॉप ऑन हॉप ऑफ’वर आमचं एकमत झालं. प्रत्यक्षात चौकशी केली तेव्हा कळलं की अशा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बसेस लाल, हिरवी आणि जांभळी अशा तीन प्रकारच्या आहेत. तिन्ही वेगवेगळ्या मार्गाने जातात. तिन्ही शहराचे वेगवेगळे भाग दाखवतात. हिरवा रंग केवळ ओळख दाखवण्यासाठी नाही. ती बस कोपेनहेगनच्या उपनगरी भागात जाते. तिथली स्थळं दाखवते. या भागात भरपूर हिरवळ देखील आहे. त्यामुळं हिरवा रंग हिरवळीचं द्योतक असावा का हा प्रश्न पडतो. जांभळ्या रंगाची बस कोपेनहेगनच्या रंगीत आयुष्याची सफर घडवते. रस्त्यावर थाटलेले खाण्याचे स्टॉल, ऑपेरा ज्या भागात आहेत त्या भागात जाते.
आमच्याकडे असलेला मर्यादित वेळ या सगळ्यासाठी खूपच अपुरा होता. त्यामुळं आम्हाला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फक्त महत्वाच्या स्थळांनाच भेट देणं शक्य होतं. ती सगळी स्थळं लाल रंगाच्या बसच्या मार्गावर होती. साहजिकच आम्ही लाल मार्ग निवडला. हाच मार्ग सर्वात लोकप्रिय आहे हे आम्हाला तिथं कळलं.
आमच्या लाल मार्गावर तशी महत्वाची बरीच स्थळं होती. त्यातलं कदाचित सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे रोझेंबर्ग किल्ला म्हणता येईल. एका भल्या मोठ्या बगिच्याच्या मध्यभागी हा किल्ला आहे. चौथा ख्रिश्चियन नावाच्या राजाने तो बांधला. अर्थात या युरोपियन किल्ल्यांच्या मानानं कितीतरी छान आणि उत्तुंग किल्ले आपल्याकडे आहेत. पण त्या काळातल्या स्थापत्यकलेचा नमुना म्हणून याला भेट द्यावीशी वाटते खरी. नाय हवन (Nyhavn) असा काहीसा उच्चार असलेलं ठिकाण देखील यात अंतर्भूत होतं. डॅनिश भाषेत याचा अर्थ नवं बंदर. बोटीने येणारा माल पूर्वी इथं उतरायचा. कालांतरानं बोटींचा आकार मोठा झाला आणि हे बंदर मागे पडलं. माल जिथं साठवून ठेवायचा त्या वखारींची आता हॉटेल्स झालेली आहेत.
एका रांगेत लहान बोटी किंवा पडाव थांबून प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी अनेक धक्के इथं आहेत. याना लांगेलींनी म्हणतात. इथं कालवे आहेत. त्या कालव्यांतून ने-आण करणार्या बोटी प्रवाशांना स्थलदर्शन देखील करवतात. त्यामुळं रांगेत हे धक्के आहेत.
काल्व्हेबॉड विव्ह्स (उच्चाराचं काही खरं वाटत नाही) हे कोपेनहेगनमधलं अगदी नवं कोरं पर्यटनस्थळ म्हणता येईल. अनेक घसरगुंड्या एकत्र रचल्या तर जसं दिसेल, तसा हा नदीकाठ बनवला गेला आहे. गर्मीच्या दिवसांमध्ये तिथे अतोनात गर्दी असते असं कळलं. अर्थात आम्ही या ठिकाणी उतरलो नव्हतो. पण बसमध्ये बसल्या बसल्या उन्हाळ्यात कोपनहेगनला कधीतरी यायला हवं असा संकल्प काय तो केला!
कार्ल्सबर्ग ही बिअर बनवणार्या कंपनीचं मुख्यालय कोपेनहेगनमध्ये आहे. सगळी टूर त्याच ठिकाणी सुरू होऊन तिथंच संपली असती, अशी भीती वाटल्यामुळं की काय, आमच्यातल्या टूर लीडरनी याची फारशी वाच्यता केली नाही. पण कार्ल्सबर्ग कंपनीला पन्नास वर्षं पूर्ण झाल्याबद्दल कंपनीने शहराला दान केलेला झेफियान की गेफियान कारंजा मात्र आम्ही चवीनं पहिला.
आमची भ्रमनिराशा केली ती ‘लिटिल मरमेड’नं. स्थळाचं नाव वाचून आम्ही बरेच भारावून गेलो होतो. काहीतरी झकास पाहायला मिळणार म्हणून आमची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. त्यासाठी ‘हॉप ऑन हॉप ऑफ’च्या बसस्टॉपवरून पळत पळत त्या ठिकाणी पोचलो. प्रत्यक्षात तिथं ब्राँझचा की इतर कुठल्या तरी धातूचा जलपरीचा एक पुतळा होता. पाण्यातल्या एका खडकावर तो होता. आम्हाला दार्जिलिंगची आठवण झाली. तिथं एक तेनसिंग रॉक नावाचा कातळ आहे. तेनसिंग नॉर्गे हा एव्हरेस्टवीर चांगलाच परिचयाचा. त्यामुळं उत्सुकता ताणली गेलेली. पण प्रत्यक्षात रस्त्याच्या बाजूला उभा असलेला तीन पुरुष उंचीचा ओबडधोबड कातळ पाहून तितकेसे सुखावलो नव्हतो. तसाच काहीसा अनुभव होता.
अमेलियानबोर्ग पॅलेस देखील आम्ही लांबूनच पहिला. याहून कितीतरी सुंदर राजवाडे आपल्याकडे आहेत, हे एक कारण; पण त्यापेक्षा वेळेची कमतरता हे दुसरं महत्वाचं कारण. त्यात आम्हाला राजवाड्यात प्रवेश मिळतो की नाही याचीही नीट माहिती मिळाली नाही. या एकूण चार इमारती आहेत मधल्या चौकात फ्रेडरिक राजाचा अश्वारूढ पुतळा आहे. एका इमारतीत आता हॉटेल झालंय राणी सोफिया अमेलियाच्या नावावरून राजवाड्याचं नाव पडलंय, वगैरे वगैरे मौखिक माहिती सहप्रवाशांकडून ऐकली. डेन्मार्कच्या नॅशनल म्युझियम आणि सिटी हॉलच्या बाबतीत देखील हेच घडलं. त्यांचंही ‘दूर’ दर्शन घेतलं.
पुन्हा कधीतरी शहरात उन्हाळ्यात परत यायचं आणि शहर नीटपणे पाहायचं असं ठरवलं. त्यावरच समाधान मानून आम्ही कोपनहेगन शहराचा निरोप घेतला. अर्थात तो योग अजूनही आलेला नाही.