२००३ ते २०१० यादरम्यान इन्स्टिट्यूशनल केटरिंगचे काम सुरू होते, तेव्हा स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली आणि मनात आलं की आपण एगलेस केक तयार करून विकले तर? हाच व्यवसाय सुरू करायचा हे एका क्षणात ठरवून टाकले. २०१३पासून या व्यवसायाला सुरुवात झाली. फ्रेंच क्युझिनमध्ये मास्टर असलेला, अनेक काँटिनेंटल मांसाहारी पदार्थ बनवणारा मी एगलेस केक का बनवतो? विनाअंड्याचा केक हा काही केक असतो का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. माझ्या हातचे केक खाण्याआधी अनेकांना हे प्रश्न पडायचेच. अनेकांनी मला विनाअंड्याचा केक कोण खाणार, असेही बोलून दाखवले होते. पण मी माझ्या विचारावर ठाम होतो.
—-
मी शेफ म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हापासूनच एक गोष्ट मनात पक्की होती… आपण तयार करतो त्या पदार्थाची आणि आपली स्वतःची स्वतंत्र ओळख असायला हवी… १९८०च्या दशकात मनात रूजलेला हा विचार प्रत्यक्षात यायला ३० वर्षं उलटावी लागली… २०१३ साली सुरू केलेल्या होम बेकरच्या व्यवसायातून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकलं… तोवरचा नोकरीचा मार्ग सोडून मी हा वेगळा मार्ग पत्करला…
खानपानाच्या, केटरिंगच्या शिक्षणाकडे वळायचे बाळकडू मिळाले ते माझ्या मामाकडून. १९८०च्या सुमारास केटरिंगचे फील्ड तसे नवीन होते, तिथे करियरची संधी चांगली होती. शेफ म्हणून शिक्षण घेतले की चांगल्या पगाराची नोकरी मिळत होती. हेच लक्षात घेऊन मी या क्षेत्रात जायचे पक्के केले आणि १९८१पासून या क्षेत्रातला माझा प्रवास सुरू झाला. १९८१ ते ८५ या काळात मुंबईच्या पेडर रोडवरील केटरिंग कॉलेजमधून मी शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर मुंबईच्या ताज हॉटेलमधून ट्रेनी शेफ म्हणून कामाची सुरुवात झाली. तिथे पाच वर्ष काम केल्यानंतर १९९०मध्ये बर्मुडामधील साऊथ प्रिन्सेसमध्ये काम सुरू झाले. तिथे दोन वर्षं काम करत असताना भरपूर काही शिकायला मिळाले. १९९३मध्ये ऑस्ट्रेलियातल्या कोमो हॉटेलमध्ये रुजू झालो, त्यानंतर काही काळ ल मेरिडियनमध्ये काम करून ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास एअरलाइन्समध्ये शेफ म्हणून कामाला सुरुवात झाली. काँटिनेंटल शेफ म्हणून काम करत असताना चिकन, मटणापासून ते शाकाहारी पदार्थ बनवायचो. अत्यंत नाजुक असं फ्रेंच क्विझिन बनवण्यात माझा पहिल्यापासूनच हातखंडा होता. आयुष्यातील १३ वर्षे विदेशांतील नामांकित हॉटेलांमध्ये काम करत असताना मन चांगले रमले होते, पण मातृभूमीची ओढ निर्माण झाली आणि २००३मध्ये भारतात परतलो.
मायदेशी परतल्यावर आपली स्वतंत्र ओळख असायला हवी, असे फार वाटायचे. पण तो विचार तेवढ्यापुरता डोक्यात यायचा आणि क्षणात हवेत विरून जायचा, पुढे काहीच व्हायचे नाही. पुण्यात परतल्यावर पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ई स्क्वेअरमधल्या रेस्तराँचा श्रीगणेशा करत असताना तिथले पदार्थ डिझाइन करण्यापासून ते नव्या डिशेस तयार करण्याची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली. त्या कामात गुंगून गेलो होतो. स्वतंत्र कामाचा विचार मागे पडला होता. एक दिवस घरात एका कार्यक्रमासाठी मी बिनाअंड्याचा केक तयार केला. जमलेल्या पाहुण्यांनी त्याचे अगदी तोंडभरून कौतुक केले. पुढे बिनाअंड्याचा केक तयार करणे हा माझ्यासाठी एक छंदच बनला. सुटीच्या दिवशी, फावल्या वेळात मी तो केक बनवायचो.
२००३ ते २०१० यादरम्यान इन्स्टिट्यूशनल केटरिंगचे काम सुरू होते, तेव्हा स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली आणि मनात आलं की आपण एगलेस केक तयार करून विकले तर? हाच व्यवसाय सुरू करायचा हे एका क्षणात ठरवून टाकले. २०१३पासून या व्यवसायाला सुरुवात झाली. फ्रेंच क्युझिनमध्ये मास्टर असलेला, अनेक काँटिनेंटल मांसाहारी पदार्थ बनवणारा मी एगलेस केक का बनवतो? विनाअंड्याचा केक हा काही केक असतो का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. माझ्या हातचे केक खाण्याआधी अनेकांना हे प्रश्न पडायचेच. अनेकांनी मला विनाअंड्याचा केक कोण खाणार, असेही बोलून दाखवले होते. पण मी माझ्या विचारावर ठाम होतो. मी एगलेस केक बनवतो कारण मी शाकाहारी आहे, मांसाहारी नाही. सुरुवातीपासून माझी इस्कॉन संप्रदायाशी जवळीक राहिली आहे. आपण केटरिंगचा व्यवसाय करणार असलो तरी तो शाकाहारी पदार्थाचा असेल, हे मी पक्के केले होते.
पहिल्या दिवसापासून मेड टु ऑर्डर, फ्रेश क्रीम केक आणि एगलेस हा फॉर्म्युला कायम केला. अगदी काही काळातच मी तयार करत असलेले केक लोकांच्या पसंतीला उतरले आणि विशेष म्हणजे त्याची माऊथ टू माऊथ प्रसिद्धी होत गेली. त्यामुळे मिक्स फ्रूट, स्ट्रॉबेरी, हनी आमंड, स्पेशल अल्फान्सो अशा अनेक अनोख्या फ्लेवर्सचे केक लोकांना आवडत गेले, त्यांची ख्याती सर्वदूर पसरत गेली. ‘आमच्या घरात मधुमेह असणारी मंडळी आहेत, पण त्यांनाही या केकची गोडी लागली’, असे अभिप्राय मिळू लागले. तुमच्या केकची चव जिभेवर खूप काळ रेंगाळते, केक तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो, ऑसम टेस्ट आहे, असे अभिप्राय अंगावर मूठमूठ मांस चढवत गेले आणि कुठेही, कोणतीही जाहिरात न करता स्वतःची ओळख निर्माण करण्याचे ध्येय पूर्ण करू शकलो. ग्राहकांचं समाधान, त्यांचा संतोष या एकाच भांडवलाच्या बळावर आठ वर्षांपासून सुरू असणारा बेकिंग टू पॅकिंगपर्यंतचा वन मॅन शो असलेल्या या व्यवसायाची घडी बसवण्यात यशस्वी झालो.
अलीकडच्या काळात केक खाण्याची व्याख्या देखील बदलून गेली आहे. पूर्वी फक्त वाढदिवसाला केक-पेस्ट्री असायची. आता अनेकजण मिठाईला पर्याय म्हणून त्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. दिवाळीत भेट देण्यासाठी एकाने ८० केक ऑर्डर केले होते, म्हणजे पाहा. या व्यवसायाचा विस्तार करण्यापेक्षा ठरावीक संख्येने येणार्या ग्राहकांना व्यक्तिगत स्वरूपाची सेवा देऊन, पर्सनल टचचे केक देऊन संतुष्ट करायचे, हे तत्व कायम ठेवणार आहे.
कोणताही व्यवसाय करताना जोखीम आलीच. ती घेतली नाही तर व्यवसाय यशस्वी होऊच शकत नाही. व्यवसाय सुरू करताना त्याचा आराखडा तयार करायला हवा. कच्च्या मालाच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये. उत्पादन सर्वोत्कृष्ट दर्जाचे कसे होईल, यावर सुरुवातीपासून भर दिला की व्यवसायाला यश मिळत जाते, हा माझा अनुभव आहे. व्यवसायात भरपूर यश मिळाले, म्हणजे हुरळून न जाता त्याकडे अधिक लक्ष देऊन तो अधिक नावारूपाला कसा नेता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नियोजन करून जा व्यवसाय सुरु केला तर त्यामध्ये लवकर किंवा उशिरा का होईना हमखास यश मिळते, पण त्यासाठी संयम देखील तितकाच महत्वाचा असतो हे मात्र, विसरून चालणार नाही.