महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे एक उत्तुंग नेते. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या लेखणीच्या तडाख्यातून आणि ब्रशच्या फटकार्यांतून तेही कधी सुटले नाहीत. मात्र, ही टीका विषयानुरूप असायची, व्यक्तिगत सुडाच्या राजकारणाचा तिला स्पर्श नव्हता. यशवंतरावांची उंची आणि योग्यता यांच्याविषयी बाळासाहेबांच्या मनात कधीही संदेह नव्हता. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या असंतुष्टांनी यशवंतरावांना पर्यायी नेतृत्त्व उभं करण्याच्या गावगप्पा सुरू केल्या तेव्हा बाळासाहेबांचा कुंचला असुडासारखा कडाडला आणि त्यांनी यशवंतरावांसारख्या शेषनागाला आव्हान देणारी चिरकुट गांडुळं रेखाटली… इथे यशवंतरावांच्या चेहर्यातील वळणांचा वापर करून त्यांनी नागराजाचा फणा कसा रेखाटला आहे, तो नवोदित व्यंगचित्रकारांसाठी अभ्यासाचाच विषय आहे. माणसांचं प्राणी-पक्ष्यांमध्ये स्वभावदर्शनासह लिलया रूपांतर करण्यात बाळासाहेबांची अफाट मास्टरी होती. तिचंही दर्शन घडवणारं हे व्यंगचित्र आहे.