राजधानी दिल्लीतला एक प्रिय, लाघवी मित्र विनोदच्या जाण्याने अनेकांनी गमावला. मी त्या अनेकांमधला एक. ग्रेस यांची एक कविता आहे, ‘पाऊस आला, पाऊस आला गारांचा वर्षाव, रानामध्ये गुरे अडकली दयाघना तु धाव…’ कोविडच्या हाहाकाराने गेल्या दोन वर्षात देशातील लाखों माणसांचे आकडे बनले; या आकड्यांचे कळपच्या कळप काळाने हिरावुन नेले. माणसांचे हे कळप त्या रानात अडकलेल्या गुरांसारखेच होते. कुठलाच ‘दयाघन’ त्यांच्यासाठी धावून आला नाही. सगळ्याच संवेदना हरवलेल्या काळातली आपण माणसं. त्यांच्यातला ‘दयाघन’ थबकलेला आजचा काळ. त्याने विनोद दुआ नावाच्या एका अस्सल, सुसंस्कृत माणसाला आपल्यातुन हिरावून नेले.
पत्रकार म्हणून तो श्रेष्ठ होताच. निवडणूक विश्लेषण पहायची सवय प्रणव रॉय आणि विनोदने १९८०च्या दशकांत देशाला लावली. त्याच्या भूमिका – राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नावरच्या – अत्यंत स्पष्ट होत्या. त्याची किंमतही त्याला अलिकडच्या काळात द्यावी लागली.
अत्यंत दिलखुलास माणूस होता विनोद. लोकसभेच्या १९९८च्या मध्यावधी निवडणुकीच्या वेळी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीत दिल्लीत असताना निवडणूक विश्लेषण कार्यक्रमाच्या निमित्ताने विनोदची ओळख झाली आणि आमच्या तारा जुळल्या त्या कायमच्या. विनोद त्या वाहिनीच्या निवडणूक विश्लेषणविषयक कार्यक्रमांचा चेहरा बनला. त्याचा छोट्या पडद्यावरचा वावर अगदी सहज असायचा. आणि पडद्यामागच्या आम्हा सर्वाशी त्याचा अत्यंत प्रेमळ संबंध असायचा. त्याच्या मतांशी तो ठाम असायचा. पण कधीच आक्रस्ताळा नव्हता.
काम संपल्यानंतरच्या विनोदमधला सर्जनशील माणूस भन्नाट होता. एकदा आमच्या टीमचे प्रमुख पत्रकार शैलेशकुमार यांच्या घरी काही लोकांनी भेटायचं ठरवलं. विनोदला विचारताच तो लगेच तयार झाला. आणि मग ती संध्याकाळ विनोदने जी खुलवली त्याला तोड नव्हती. त्याच्या बालपणापासून ते त्याच्या अनेक दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेल्या भ्रमंतीचे किस्से सांगत विनोदने ती संध्याकाळ रम्य करून टाकली. त्याने तिथे मला एक वेगळाच धक्का दिला. किस्से सांगता सांगता विनोदची अदाकारी सुरू झाली. गझल, शास्त्रीय सांगीत यावर तो बोलू लागला आणि गाऊही लागला. याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची बैठक आहे, हे तिथे लक्षात आलं. त्यावर विचारणा केल्यावर ‘मी शास्त्रीय संगीत शिकलो आहे; मैं किराना घराने का गायक हूं… जिंदगी आगे बढती गयी और गाना पीछे छूट गया…’ असं विनोद म्हणाला. ‘मुझे मराठी तो आती नहीं, लेकिन मैं समझ लेता हूं… पंडित वसंतराव देशपांडे का गाना मुझे बहुत पसंद है’, असं सांगत विनोदने पंडितजींचं ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ हे गाणं पूर्णपणे सादरच केलं…! ती संध्याकाळ विनोदने माझ्या मनावर कोरली ती कायमची. ‘मधु सेवनानंद, स्वच्छंद, धुंद, घेई छंद’ गातानाचा विनोद आजही माझ्या डोळ्यासमोर उभा असल्याचा भास मला होत राहतो.
२०१४ पासुन देशांतलं वातावरण बदललं. त्याआधी विनोद काही काळ माध्यमापासून थोडा दूरच होता. नंतर ‘द वायर’ या देशातील, प्रामुख्याने दिल्लीतील काही पत्रकारांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या माध्यम प्रयोगात विनोद सहभागी झाला. सर्वच वाहिन्यांनी आणि खाजगी प्रसार माध्यमांनी नांगी टाकलेली असताना विनोद त्याचा कार्यक्रम घेऊन ‘द वायर’वर दाखल झाला आणि त्याची निर्भीड पत्रकारिता पुन्हा समोर आली. पण त्याच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. प्रसिध्दीच्या ऐन झोतातल्या अनेक लोकांवर ‘मी टू’ मोहिमेचा एक वादळी झंझावात येऊन आदळला. तसा तो विनोदवरही आदळला. त्याने त्या आरोपांना न्यायालयात आव्हानही दिलं. ‘मीडिया ट्रायल’चा आजचा काळ. झालेले आरोप खरे होते की नाही, याचा निवाडा व्हायच्या आतच विनोदचा तो कार्यक्रम बंद करण्यात आला. एक प्रकारचा हा विनोदवरचा अविश्वासच होता. विनोद या आव्हानाच्या कालखंडात पुन्हा दृष्टिआड गेला.
नंतर कोविडच्या वादळाने विनोदला आणि त्याची पत्नी चिन्नाला घेरलं. पहिल्या लाटेतून विनोद वाचला, पण चिन्ना वाचू शकली नाही. तिच्याबद्दल विनोद खूप प्रेमाने आणि आदराने बोलत असे. ती गेली आणि विनोद खचला. कोविडमधून बाहेर आलेल्या विनोदची प्रकृती नंतर ढासळतच गेली. काल विनोद काळाच्या पडद्याआड गेला. फाळणीनंतर पाकिस्तानातल्या पेशावरमधून निर्वासित म्हणून आपल्या आईवडिलांबरोबर दिल्लीतल्या निर्वासितांच्या छावणीत येऊन वाढलेल्या विनोदच्या व्यक्तिमत्वात जराही द्वेषभावना नव्हती. माणसांचं जगणं हे केवळ त्यांचा धर्म, श्रद्धा, यातून घडत नाही, तर लोकजीवन, लोकसंस्कृती – ज्यात आपल्यातल्या विविधतेचा मोठा ठेवा असतो – यातून ते जगणं फुलतं, असं एकदा विनोदने ‘परख’ या त्याच्या कार्यक्रमामागच्या संकल्पनेबद्दल सांगितलं होतं. तो लाघवी, पारखी आपण गमावला.
– नितीन वैद्य
ज्येष्ठ पत्रकार, मालिका व चित्रपट निर्माते