नाटक अथवा चित्रपट नाट्यगृहात अथवा चित्रपटगृहात बघणे, हा एक वेगळा अनुभव असतो. घरात कितीही आलिशान टीव्ही आणि साऊंड सिस्टीम असले तरी थिएटर ते थिएटर. खासकरून नाटक हा तर मराठी माणसाचा प्राण… मधल्या दोन ओसाड वर्षानंतर मराठी रंगभूमी बहरून गेली आहे. म्हंजे हे नाटक बघू की ते असे होतेय… पण… हा ‘पण’ लै बेकार. मला तर कधी कधी वाटते, त्यावरील जगन्नियंत्याला फक्त मीच दिसत असावी. कोणताही आनंद निखळ पूर्ण मिळू देत नाही.
नाटक पाहताना पूर्ण शांतता हवी, खासकरून गंभीर आशयप्रधान नाटक सुरू असताना तर प्रत्येक शब्द संवाद मला काळजीपूर्वक ऐकायचा असतो. ते तादात्म्य पावणे बिवणे असते, ते माझे नाटक पाहताना होते. समोर रंगमंचावर काही कळीचा मुद्दा सादर होत असतो आणि प्रेक्षकांत कोणाला तरी नेमका त्यावेळी खोकला उसळतो… खोकला नाय तर शिंक… अथवा घसा खाकरणे… बरं इथे नाटकात अॅक्शन रिप्ले होणे शक्य नाही.
आता म्हणाल, हा काय दुष्ट प्रकार, बिचारा कोणी आजारी असेल… माझी पूर्ण सहानुभूती आहे हो त्याला… तथापि ही खोकला साथ थिएटरमध्ये पसरते. हा थांबला तर दुसरा, मग तिसरी.
एक तर नाटकाची तिकिटे कचकचीत किंमतीची. त्यात पुढील रांग असेल तर मग झालेच. अशावेळी हे असले खोकले बिकले वीट आणतात. हल्ली ते मोबाईल वाजणे मात्र खूप कमी झालेय.
जर माझ्या नशिबाने कोणी खोकला बहाद्दर नसेल तर, आपापसात कुचुकुचू करणारे लोक असतात आणि माझे नशीब ग्यारेंटेड फुटके असल्याने, ही जमात माझ्याच मागे बसते. भुंगा गुणगुण करतो तसे सतत बोलत असतात. तुम्हाला अनुभव नसेल, पण यामुळे माझे होते काय की समोर काय चालले आहे त्यावरील लक्ष उडते आणि या मानवरुपी भुंग्याच्या गुंजारवावर लागते. सतत गुणगुण सॉरी भुणभुण…
हे कमी की काय, म्हणून कधीतरी महाभारतातील संजय मानवरुपात येतात. त्यांचे साधारण असे असते. ‘बघ हा आता हा कप फेकणार/अरे बघत राहा, आता तो अमुक येईल, मग बेदम राडा होईल… आता ही साडी बदलून येईल.’
माझा धृतराष्ट्र आपोआप होतो. बरं काही बोलायची सोय नाही. तरी एकदा नाटक संपले की मी या मनुक्षप्राण्याला गाठून माझा नंबर दिला होता की असे तुम्ही थेटरात माझ्याच मागे बसून सांगता, ते पुढील वेळी मोबाईलवर सांगा. तिकिटाचे पैसे तरी वाचतील.
सिनेमा बघताना तर मागे वेफर्स खाणारे असायलाच हवेत. सारखं कुरुम्म कुरूम सुरू असते.
कधी तरी हे डोक्याला शॉट देणारे मोठे लोक नसले तर कोणीतरी लहान पोट्टे असते, त्याचे एक काम निष्ठेने चालू असते, समोरच्या सीटच्या पाठीला लाथ मारणे.. त्यातून चेंज हवा असेल, तर दर दोन मिनिटांनी आईबापामागे चलो ना घर, घर कब जायेंगे ही रेकॉर्ड आळवणे.
लहान मुलांना थेटरमध्ये कायद्याने बंदी घालायची वेळ आली आहे.
या माझ्या मतावर एक आई म्हणाली होती की मग आईबापांनी काय मजा करूच नये का? जरूर करा हो, पण आम्हाला त्रास न देता. यात त्या मुलांची चूक काहीएक नसते.. ती कंटाळणारच… प्रश्न तुमचा आहे… तुम्ही करा ना नीट व्यवस्था.
हे झाले मागचे लोक, पुढे बसणारे पण डोक्यात जातात कधीतरी. सतत हालचाल करत राहतात. एकदा इकडे मान,एकदा तिकडे… मधूनच अर्धवट उभे राहून निरीक्षण करणार… हल्ली मोबाइल काढून शूटिंग करणार्यांचंही प्रमाण वाढलंय…
हॉटेल्समधे सॉरी रेस्टरांटमध्ये जेवताना बाजूच्या टेबलावर प्रचंड मोठा गोतावळा असतो आणि साहजिक मोठा कलकलाट. आधी या हॉटेल्समध्ये ते मुजिक वैताग आणणार्या डेसिबलवर असतं, त्यात बाजूला हा गदारोळ. पुन्हा त्यात बारकी पोरं असली तर विचारायला नको. पूर्ण जागेत इथून तिथे धावणे, हा यांचा संपूर्ण वेळेचा कार्यक्रम असतो. एकदा अशा एका उसेन बोल्टच्या शिष्याने माझ्या टेबलक्लॉथला खेचले होते. अर्थात मी आधीच सावध होऊन माननीय अजित डोवालसारखी बारीक नजर ठेवून असल्याने माझे सोनेरी द्रव्याने भरलेला चषक उपडी होता होता वाचला. सिंगल माल्ट घशात न जाता टेबलावर सांडणे याचं दु:ख अस्सल पिवय्या म्हणजे मद्यप्रेमीच जाणू शकेल.
होतं काय की आपण नाटक-सिनेमा-जेवणाचा आस्वाद घ्यायला जातो आणि तिथे हटकून भेटणार्या असल्या नमुन्यांमुळे एकूण अनुभवाची लागते वाट आणि डोक्याला बसतो भयंकर शॉट!!!