बदलत्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे पडघम हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रंगभूमीवरल्या आविष्कारात पडतच असतात. नव्या वर्षात मनोरंजनासोबतच काही वेगळ्या विषयांवरची नाटके रसिकांपुढे आली आहेत. एकीकडे जाणकार, वैचारिक भूक असलेला प्रेक्षक विनोदी नाटकांच्या महापुराला कंटाळलाय. काहीतरी परिस्थितीशी ‘रिलेट’ करणारे वैचारिक खाद्य त्यांना हवे आहे. त्यातच समकालीन संवेदनांना भिडणारे तसेच मिश्कील तिरकी शेरेबाजी करून अंतर्मुख करणारे ‘चर्चा तर होणारच’ हे हेमंत एदलाबादकर यांचे नाटक रंगभूमीवर आलंय, ज्यात पोखरलेल्या व्यवस्थेची चिरफाड नाट्यपूर्ण ‘चर्चा’ नाटकातून होतेय.
पुणे शहरापासून काहीसा दूर असलेला आडवाटेवरला एक बंगला. तिथल्या दिवाणखान्यात तिघाजणांभोवती एकाच दिवसात आठ तास चाललेलं नाट्य. कॉर्पोरेट क्षेत्रातील रुबाबदार दिग्विजय देशपांडे तिथे दोघा स्पर्धकांची वाट बघतोय. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार दोन स्पर्धकांतून एकाला देण्यात येणार आहे. त्यातील सत्यशील देशपांडे आधी पोहोचतो आणि नंतर मृणाल! स्वतःची जात कळते म्हणून आडनाव न लावण्याची तिची तर्हा आणि त्यामागलं लॉजिकही खूप काही सांगणारं. दोघेही चळवळीतील वैचारिक भूमिका मांडणारे.
सत्यशीलचा प्रिंटिंग प्रेस आहे. त्यावरचं आठ लाख रुपयांचं कर्ज तातडीने फेडलं नाही तर बँकेची जप्ती अटळ आहे. त्या प्रेसमधून धार्मिक, देशभक्तीपर, संत साहित्याची पुस्तकं प्रसिद्ध होतात. धर्म परंपरा जगली पाहिजे असे त्याचे ठाम विचार आहेत. रस्त्यावरली पन्नासएक अनाथ मुलं सांभाळण्याची जबाबदारी मृणालने हाती घेतलीय. अनाथाश्रमात तिच्याही डोक्यावर नऊ लाखांचं कर्ज आहे. दोघेही सामाजिक कार्य करीत असताना आर्थिकदृष्ट्या अडकलेले आणि कर्जबाजारी.
एक अमेरिकन एनजीओ कंपनी दरवर्षी महाराष्ट्रातील एखादा जिल्हा निवडते आणि विजेत्याला हा पुरस्कार देते. यावेळी सांगली जिल्हा निवडलाय आणि विजेत्याला अकरा लाख ही वाढीव रक्कम निश्चित केलीय असं सूत्रधार कम संयोजक देशपांडे सांगतो आणि सुरू होतो दोघा स्पर्धकांमधला परस्परविरुद्ध वैचारिक वादविवादांचा संघर्ष.
त्यात स्थानिक आमदार रावसाहेब काळे यांचं आणखीन एक कथानक. अंधारातलं. जे या चर्चेत गुंतलं आहे. या आमदाराने वीसएक वर्षांपूर्वी अनुसयाबाई या स्वयंपाकिणीशी संबंध ठेवले. त्यातून तिला एक मुलगा झाला. ‘रावसाहेबाने त्या मुलाचे पितृत्व मान्य करावे’, ही मागणी सत्यशील करतोय. याबद्दल एक पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती. पण आमदाराने एकाही पत्रकाराला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही आणि सत्यशीलची मागणी अंधारातच राहिली. दुसरीकडे अनुसयाबाई मृणालच्याही संपर्कात आल्या होत्या. एका आठवड्यानंतर त्या कपटी, दुष्ट आमदाराच्या मुलीचं लग्न आहे. लग्नसमारंभात घुसून आमदाराचे वस्त्रहरण करण्याचा बेत हा मृणालने ठरवलाय. तिचा सारा प्लॅन तयार आहे. त्याचवेळी, सत्यशीलने एक ‘डीएनए’ रिपोर्ट तयार ठेवलाय, त्यातून आमदाराच्या मुलाला त्याचा हक्क मिळणार आहे. सत्यशीलचा गनिमी कावा तर मृणालचा थेट भिडण्याचा आंदोलनाचा मार्ग! आणि हे सारं या दोघांच्या स्पर्धेत सुरू असतं. हे उपकथानक कधी मुख्य कथानकाचं रूप घेतं हे कळत नाही.
या दोघांच्या वादविवादातून देशपांडे हा नेमकं काय साध्य करतो? त्यामागलं त्याचं प्रयोजन काय? राजकारणी रावसाहेब काळे यांची काय भूमिका आहे? या प्रश्नांची उत्तरे ही उघड करणं म्हणजे कथानकातील उत्कंठा संपविण्यासारखं होईल. प्रत्यक्ष नाटक बघणं उत्तम. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक अधिक धक्कातंत्राने बांधला आहे त्यामुळे काही मुखवटे उघडे पडतात.
नाटककार हेमंत एदलाबादकर यांचे एकहाती लेखन आणि दिग्दर्शन असल्याने संहितेला त्यांनी शंभर टक्के न्याय दिला आहे. अशा ‘गोळीबंद आकृतिबंध’ असणार्या संहिता अभावानेच व्यावसायिकवर आल्या आहेत. वादग्रस्त राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक संदर्भही जागोजागी पेरले आहेत. त्यातून संहिताकाराचा सखोल अभ्यास नजरेत भरतो. ‘चर्चानाट्य’ असल्याने गंभीरता ही जरूर आहे, पण मिश्कील शैलीत मांडणी असल्याने विषय डोक्यावरून जात नाहीत. तीन कलाकार, एकाच दिवसातले आठ तास, एका बंगल्यातला दिवाणखाना या घट्ट चौकटीत जे वैचारिक नाट्यमंथन होते, ते नाट्य अभ्यासकांच्या दृष्टीनेही अभ्यासाचा विषय ठरेल. कोपरखळ्या मारून मुद्दे मांडण्याचा प्रकार मस्तच जमलाय.
आदिती सारंगधर ही एक ताकदीची अभिनेत्री. जवळजवळ सातएक वर्षांच्या मध्यंतरानंतर ती रंगभूमीवर प्रगटली आहे. आंदोलक मृणालच्या भूमिकेत तिने वेगळेपणा सिद्ध केलाय. तिची देहबोली आणि गावरान ठसक्याची शैली नजरेत भरते. अनाथ मुलांबद्दलचा जिव्हाळा तसेच मतलबी राजकारणी यांच्याबद्दलचा तिरस्कार चांगलाच प्रगट होतो. ‘प्रपोजल’ या गाजलेल्या नाटकानंतर तिचे हे पुनरागमन स्वागतार्ह आहे. सत्यशील कुलकर्णीच्या भूमिकेत आस्ताद काळे याने खटकेबाज चर्चेतून ‘लढाई’ केलीय. त्यातून साधीसरळ राहणी, श्रद्धाळू विचारसरणी दिसून येते. देश, परंपरा, इतिहास याबद्दलचा अभिमान संवादातून आणि अभिनयातून नेमकेपणानं आलाय. जणू, दोन परस्परविरुद्ध ग्रहावरले हे दोघे आणि त्यातून एकमेकांवर होणारे प्रहार, जुगलबंदी. क्षितिज झारापकर यांचा एनजीओचा प्रतिनिधी देशपांडे हा या दोघांना लढाईत गुंतवून ठेवण्याचे काम चोख करतो. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा पंच म्हणून प्रत्येक प्रसंगात पकड चांगली आहे. रंगभूमीवरचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्याने भूमिकेतली सहजता दिसून येते. या तिघा कलाकारांची निवड करून दिग्दर्शकांनी पहिलाच डाव जिंकला आहे. कारण या संहितेत उत्स्फूर्त अॅडिशन, अनावश्यक प्रतिक्रिया किंवा आपल्या मनातले संवाद फेकणं किंवा बदल करणं कलाकारांना कदापि शक्य होणार नाही, एवढी संहिता गोळाबंद आहे. लवचिकता त्यात नाही.
कल्पक नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी बंगल्यातला पॉश भव्य दिवाणखाना दिमाखात उभा केलाय. त्यात अनेक बारीकसारीक बाबींचा विचार केलाय. कोच, टेबल, खुर्च्या यांची मांडणी योग्य. हालचालींना अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली आहे. मंगल केंकरे यांनी वेशभूषेत एनजीओचा टिपिकल प्रतिनिधी सुटाबुटात, तर धर्माभिमानी कार्यकर्त्याला शर्ट-जीन्स पण खादीचा स्पर्श दिलाय. आक्रमक आंदोलक मृणालला भडक लाल रंगाचा कुर्ता जो तिच्या स्वभावाला साजेसा आहे. प्रकाशयोजना आणि संगीत यथायोग्य. तांत्रिक बाजू या चर्चानाट्याला साथ देणार्या आहेत. यात ‘मोबाईल’देखील महत्त्वाची भूमिका पार पाडतोय.
‘एकच भाकर. आणि आपण एकट्यानं खाणं याला प्रकृती म्हणतात. दुसर्याची खेचून खाणं याला विकृती आणि आपल्याजवळ एक भाकर असताना, समोरचा उपाशी असताना त्याला अर्धी भाकर देणं याला संस्कृती म्हणतात,’ हा विचार हे दोघे सांगतात. ‘विचार एकच पण भाषा मात्र वेगळी!’ असं शेवटी मृणाल म्हणते. जे अर्थपूर्णच. राष्ट्रवाद, हुकूमशाही, लोकशाही, गांधी तत्त्वप्रणाली, क्रांतिकारकांचे कृत्य, लोकशाहीतले खलनायक, जातीयता समाजातील मारक तारक असे अनेक विषय हे यात ओघाने येतात खरे, पण ते इथे चपखल बसतात. तसे हे दोघाजणांचे व्यक्तिचित्रण ठरत नाही, तर ते वैचारिक म्होरके ठरतात. त्या दृष्टीने सारा रचनाबंध आहे. चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, प्रेमानंद गज्वी, महेश एलकुंचवार, वृंदावन देशपांडे, शफाअत खान, अच्युत वझे, अतुल पेठे, किशोर यशवंत अशा अनेक अॅब्सर्ड नाटककारांच्या संहितेच्या जोडीला ही संहिता उभी राहते. व्यावसायिक नाटकांना, किंबहुना रसिकांच्या अभिरुचीला एक नवं वळण लावण्याचा प्रयत्न व प्रयोग होतोय, हे महत्त्वाचे. मराठमोळी नाटके चेहरामोहरा बदलत पुढे चालली आहेत. वैचारिक संकल्पनेला काळानुसार नवे परिमाण अशा कलाकृतीतून दिलं जातंय, जी मनाला भिडणारी आणि मन ढवळून काढणारी आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर अशा गंभीर आव्हानात्मक आशयावरील नाट्य निर्मिती करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल निर्मात्या कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी अभिनंदनाला पात्र आहेत. कॉमेडी नाटकांच्या गर्दीत ‘चर्चा तर होणारच’ यावर निश्चितच ‘चर्चा’ होईल.
हाडाचा कार्यकर्ता हा कुठल्याही जाती, धर्म, राजकीय पक्षाचा नसतो. तो फक्त कार्यकर्ताच असतो. त्यामुळे नाटक संपतं, तिथेही दोघांमधला वादविवाद संपत नाही… तो पुढे चालूच राहतो… कारण चर्चा तर होणारच!
चर्चा तर होणारच!
लेखन / दिग्दर्शन – हेमंत एदलाबादकर
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – राहुल रानडे
प्रकाश – अमोघ फडके
वेशभूषा – मंगल केंकरे
सूत्रधार – नितीन नाईक
निर्माते – कल्पना कोठारी / विनय अलगेरी
निर्मिती – रंगनील क्रिएशन्स / वेद प्रॉडक्शन