डोक्याला खूप तेल चोपडलं की आपली बुद्धी तैलबुद्धी होते, अशी समाजातल्या काही मान्यवरांची समजूत दिसते. तुमचा अनुभव काय?
– रामानंद पाटील, पालघर
तेल चोपडलं की माणूस तेलकट होतो असं आधी वाटायचं… पण आताचा अनुभव असा आहे की तेल लावून लावून माणूस तेलकट नाही तर हलक्या डोक्याचा हर्ले होतो…
मला ती खूप आवडते. पण, तिला ते सांगायचा धीर होत नाही. मला काहीतरी मोटिव्हेशनल मार्गदर्शन कराल का?
– प्रथमेश पाटील, बेलापूर
तिला सांगायचा धीर होत नाही, पण माझ्यासारख्या पुरुषाला सांगताय, हा प्रॉब्लेम डॉक्टरांना सांगायला हवा.
माणसाच्या जीवनात अखेर काय महत्त्वाचे असते?
– सुशांत देवकर, करमाळा
बायकोचा मूड!
देव जर सर्वत्र आहे, तर आपल्याला एवढ्या मंदिरांची गरज काय?
– अशोक परब, ठाणे
एवढी मंदिरं नसती तर तुम्ही हा प्रश्न विचारू शकला असतात का? उगाच गरिबी… रोजगार… महागाई अशा फालतू विषयांवर प्रश्न विचारले असतेत…
आक्षी चित्रातल्या रूपवान बाईगत असलेल्या बाईशी दुसर्या बाईचे जोरदार भांडण लागल्यावर आपण काय करायचं?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
त्यांच्या भांडणात पडून खानदानाचा उद्धार करून घ्यायचा!!
साहित्य संमेलन, नाट्य संमेलन यांच्यातून खरंच काही साधतं का हो?
– नामदेव कोळी, जिंतूर
लेखक… रसिक… कलाकारांचं काही साधल्याचं ऐकिवात नाही… केटरिंगवाल्यांना विचारावं लागेल…
निर्मलाक्कांनी सादर केलेल्या बजेटवर तुमची एक्स्पर्ट टिप्पणी काय?
– मेघना सुतार, दापोली
बजेट वाईट नाहीये… लोकांच्या अपेक्षा वाढल्यायत… (त्यात मी लसूण कांदा खाणारा माणूस.. मला बजेटमधलं काय ‘तास’ कळतंय?)
मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या की भाजप हरतो, ईव्हीएमवर झाल्या की जिंकतो, हे काय गौडबंगाल आहे?
– मार्कुस पापडीकर, वसई
हल्ली मी ‘उघड गुपित’ या शब्दाचा अर्थ शोधतोय… तो सापडला की तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल…
अदानीमध्ये गुंतवणूक करणारे अडाणी म्हणायचे की शहाणे?
– नंदन पारसनीस, इचलकरंजी
महा… देशभक्त!!
सिरीयल, विनोदी मालिका, रिअॅकलिटी शो यांच्यामध्ये काम केल्यावर झटपट प्रसिद्धी मिळते. लोक स्टार बनतात. तुम्ही या क्षेत्रात, म्हणजे टीव्हीवर फारसे का दिसत नाही?
– गौरीश पाटील, कागल
मला एवढं बघावंसं वाटतं तर नाटक बघायला या… नाटकात फार दिसतो मी (असं नाटकात फारसे न दिसणारे बोलतात). झटपट प्रसिद्धी फार काळ टिकत नाही (असं अजिबात प्रसिद्ध नसणारे बोलतात).
काल एका पाकीटमाराला पोलीस अटक करायला गेले, तर तो म्हणाला, मला अटक हा भारतावरचा हल्ला आहे… आता पोलिसांनी काय करावं?
– वसंत विनायक वैद्य, पाटोदा
पोलिसांनी त्या पाकीटमाराला परदेशात पळून जायला मदत करावी… पण मी हे सांगून पोलीस माझं ऐकायला मी काय मोठा चाणक्य लागून गेलोय की काय?
स्वत:ला उच्च संस्कारी म्हणवणारी, सगळ्या जगाला आध्यात्म, विज्ञान आम्हीच शिकवलं, असं सांगणारी माणसं सोशल मीडियावर इतकी शिवराळ का असतात?
– वंदना भिरवंडेकर, लांजा
जगात त्यांना काय किंमत आहे हे त्यांना समजलेलं असतं… किंवा सोशल मीडियावर भुंकलं की कोणी दगड मारू शकत नाही हे त्यांना उमजलेलं असतं.
व्हॅलेंटाइन डेला पूर्ण दिवस माझ्यासोबत काढ, असा तिन्ही प्रेयसींचा आग्रह आहे… आग्रह मोडवत नाही; आता मी काय करू?
– अद्वैत विजापुरे, सोलापूर
तिघींना एकत्र बोलवा… एक दिवसासाठी महाविकास आघाडी करा!