दिवसभर टीव्हीवर बातम्या आणि जाहिराती यांचा प्रचंड मारा सहन करावा लागतोय. दूरदर्शनच्या काळामध्ये ठराविक वेळेत सौम्य भाषेत बातम्या सांगणार्या बायका आवरून सावरून बातम्या देत. आताशा बातम्या सांगणार्या बायका इतक्या किंचाळायला लागल्यात की एखादा वकील जणू कोर्टात भांडतोय की जज्जाच्या आवेशात मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठवतोय, हे समजत नाही. पूर्वी बातम्या सलग ऐकायला मिळायच्या. आता बातमीमध्ये जाहिरात, जाहिरातीत बातमी असते. उदा.
मंत्री म्हणाले की, ‘आंदोलकांवर… जाहिरात… हिट फवारा मारा, निर्धास्त व्हा!
बातमी- दोन सरकारी अधिकार्यांकडून दोन कोटी कोटींचा घोटाळा..
जाहिरात- मारी गोल्ड खाव… ..खुद जान जाओ!
शिवाय जाहिरातींमध्ये शाहरुख, अमिताभ बच्चन, विराट कोहली, रणबीर, अक्षय कुमार यांच्यासारखे नट-क्रिकेटर्स असतात आणि भरमसाठ कमावतात. त्यात शंभर एक चॅनल्सवर जाहिराती सतत चालूच असतात. बच्चन साहेबांचे तर बोलायलाच नको. गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी त्यांच्या फक्त एक दोन जाहिराती कमी असतील. नवरत्न तेलापासून लहान मुलांच्या टॉनिक्सपर्यंत जाहिराती करीत आहेत. गुटगुटीत बाळांचा हक्क डावलून. भूतकाळात गेलेल्या जुन्या नट्यांना पुन्हा रिपेअर करून जाहिरातून दाखविल्या जात आहेत, ते वेगळेच.
जाहिरात स्टंट हा एक प्रकार पूर्वी होता. राजेश खन्ना सुपरस्टार झाला होता, त्यावेळी अनेक मुली त्याच्यावर लट्टू होत व त्यांच्या वक्षावर त्याची सिग्नेचर घेत. शेकडो मुली त्याच्या आशीर्वाद बंगल्याजवळ जमा होत, वगैरे… नंतर उलगडा झाला की ती त्याची स्टंटबाजी होती. तशीच स्टंटबाजी हल्ली मंत्री आणि पुढारी करीत आहेत. त्यांचे खरेखोटे शब्द झेलण्यासाठी मीडियाचे लोक सकाळपासूनच कॅमेरे घेऊन उभे असतात. काही मंत्री वावडी उठवतात, आम्हाला फोनवर खुनाची धमकी आली… तुमच्या कुटुंबीयांना किडनॅप करू वगैरे. मग समर्थक, मीडिया, लवाजम्यासह मंत्री वा पुढारी पोलिसात तक्रार नोंदवायला जातात. पोलीस प्रोटेक्शन वाढवण्यात येते. दोन-चार दिवस हे महोदय प्रसिद्धीझोतात मिरवून घेतात. पोलिसांची धावपळ होते. फोन करणारा सापडला तर तो मनोरुग्ण म्हणून जाहीर केला जातो.
जाहिरात झाली की बातमी हवेत विरून जाते. कधीतरी भरगच्च क्रिकेट मैदानात मॅच चालू असताना एखादी विवस्त्र तरुणी इकडून तिकडे पळते. अशी रोमँटिक जाहिरात झाली की, आठ दिवस मीडिया ढोलताशे बडवीत राहतो. ती तरुणी आनंदाने मुलाखती देत फिरते. वेबसिरीज वा सिनेमात छोटी मोठी कामे मिळवते. आताशा उघड्या अंगाच्या टवटवीत मॉडेल्सच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती आपण चवीने पाहतो. ते पैसे आपल्या पाकिटातून जातात हे आपल्याला कळतच नाही. दोन पाच रुपये मूल्य असलेल्या औषधाचे दोन तीनशे रुपये औषध निर्माते जाहिरातींच्या जोरावर गठाळतात. कुत्र्याची शेपूट सरळ होत नाही, या इतकंच सत्य हे आहे की लक्स साबण लावल्याने आपला काळा रंग गेला नाही आणि टवटवीतपणा वाढलेला नाही. जडीबुटीची औषध बनवणारा रामदेव बाबा, त्याची पांढरी होत चाललेली दाढी काळी ठेवू शकला नाही. डायबिटीस-गुडघेदुखी औषधांच्या जाहिराती छान धंदा करत आहेत. पिडलेल्या हजारो पेशंट्सना बरे न करता.
कोरोना काळात जाहिरातीत मातबरी गाजवणारी दैनिके मात्र बरीचशी डबघाईस आली. साप्ताहिके आणि पाक्षिके यांचा हिशेबच नाही. वार्ताहरांना जाहिराती आणायचं कंपल्शन आलं, बातमी नको, पण जाहिराती आणा, असं धनदांडग्या मालकांनी फर्मान काढलं.
पूर्वी पेपरात जाहिराती देणं स्वस्त आणि मस्त होतं. पाचशे रुपयांत तीन-चार कॉलमी जाहिरात छापून येई. एप्रिल-मेमध्ये मी कार्टून वर्कशॉप मुलांसाठी घेई. थोड्या पैशात प्रसिद्धी होई. मुलांनाही फी परवडत असे. अलिकडे खप असलेल्या दैनिकांनी भरमसाठ रेट वाढवले. पेपरात आठ कॉलम असत, त्याचे दडपून दहा कॉलम केले. इंच जाऊन सेंटिमीटर आले आणि भरमसाट दर लावले. अलीकडे जाहिराती इतक्या टाकतात की बातमी शोधावी लागते. निधनाच्या वार्ता ‘पेड’ झाल्या. परिणामी मोठ्या कंपन्या, सरकारी व मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या लाखो रुपये किंमतीच्या जाहिराती फक्त दिसू लागल्या. कारण तो खर्च त्यांचे उपकृत ठेकेदार, बिल्डर्स, कारखानदार करतात. मात्र पायउतार झाला की त्याची एखाद दुसरा कॉलम जाहिरात पेपरात कुठेतरी येते. तो क्रम अद्याप चालू आहेच. खरे तर लहानपणी अन्नाला, शिक्षणाला मोताद असलेले हे नेते. असो!
नासिकच्या एका चांगल्या खपाच्या दैनिकात कार्टून वर्कशॉपची जाहिरात द्यायची वेळ आली. तेथे सरव्यवस्थापकाला जास्त किंमत होती (संपादक पगारी, नामधारी). या सरव्यवस्थापकाने माझ्याकडून अनेकदा अनेक कार्यक्रम फुकट करून घेतले होते. ‘सोनार साहेब, तुम्ही आमचे घरचेच. प्रेम असू द्या,’ असे ते नेहमीच तोंड भरून म्हणत. मी त्यांच्याकडे जाहिरात आणि बरोबर एक वर्कशॉपची छोटीशी बातमी दिली आणि लिहिले, ‘कृपया जाहिरातीस रीतसर डिस्काउंट देऊन माझी वर्कशॉपची छोटीशी बातमी टाकावी, ही विनंती!’ यथाकाल जाहिरात आली दीडपट रेटने. बातमी आलीच नाही. मी त्यांना फोन करून घडले ते सांगितले, तेव्हा त्यांनी फुकाची नक्राश्रूसारखी हळहळ दाखवली आणि म्हणाले, पुढच्या वेळी असे होणार नाही. आमच्या लोकांना घरचादारचा कळत नाही वगैरे… चार सहा महिन्यांनी त्यांच्या पेपरातल्या लहान मुलांच्या पुरवणीच्या सोशल क्लबसाठी कार्यक्रम होता. त्यांच्या सेक्रेटरी बाईने फोन करून म्हटले, ‘साहेबांनी तुम्हाला आग्रहाने निमंत्रित केले आहे. तुमचा दीड तासाचा चित्र प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम हवा आहे. मी म्हटले, येईन, पण माझे मानधन इतके इतके आहे. ती म्हणाली, साहेबांना सांगते. जरा वेळाने तिचा फोन आला तिने सांगितले, ‘साहेब म्हणाले की सोनार साहेब आपले घरचे आहेत. त्यांना म्हणावं, मानधन घ्यायला नकोच खरंतर पण निदान कमी करा. फार होतेय! तुम्ही घरचेच ना? यावर मी म्हणालो, साहेबांना सांगा… सोनार घरचे होते, पण आता परके झालेत. पूर्णच मानधन द्यावे लागेल. मी फोन ठेवला. कार्यक्रम प्रसिद्धी माझ्या नावासह केलेली असल्याने झकत तिप्पट मानधन वसूल करून मी हिशेब पुरा केला.
या दोन दशकांत टीव्ही मीडियम पावरफुल झाल्याने जाहिरातींचा रोख तिकडे वळला. सकाळ-दुपार-संध्याकाळ झुरळे मारण्याची औषध, अपचन चुर्ण, खोकला, सर्दीची टॉनिक्स, साबण, कीटकनाशके- वळवळणार्या अळ्यांसह, शाम्पूच्या, तेलांच्या, फाइव्ह स्टार निसर्ग उपचार केंद्रांच्या अगणित जाहिराती अगदी जेवताना, खाताना, पिताना, झोपताना कर्णकर्कश संगीतावर फेर धरून नाचू लागल्या. सिरीयल्स पाहताना मिनिटानंतर रसभंग व्हावा इतक्या जाहिराती. या स्पर्धेत मोबाईलही मागे नाही आणि मोबाईलमध्ये फेसबुक, युट्युबवर अश्लीलतेने कळसच गाठलाय. सर्व थरातील स्त्री-पुरुष, म्हातारे, मोलकरणी, नोकरदार, तरूण-तरुणी शाळेतील मुलं याची शिकार झालेत. कदाचित तरूण पिढीला काळाचे देणे म्हणून याची सवय होईल किंवा श्लील-अश्लील हा भेदच उरणार नाही.