□ विरोधक एकत्र लढले तर २०२४मध्ये भाजपला ५० जागांवर रोखू : नीतीश कुमार.
■ विरोधक एकत्र लढले नाहीत तर त्यांची संख्या ५०वर येईल, हे लक्षात घेतलं नाही, तर अवघडच होईल.
□ मंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकर्यांनी ‘पन्नास खोके, मंत्री ओक्के’ अशा घोषणा दिल्या…
■ या सगळ्यांच्या नातवंडांच्या नातवंडांचीही ‘गद्दार’ आणि ‘पन्नास खोके’ घराण्यातले वंशज अशीच ओळख करून दिली जाणार आहे भविष्यात.
□ मंत्रिमंडळ विस्तारावरून फुटीरांच्या गटात धुसफूस! कमळाबाईंना टेन्शन!
■ हिंदुत्व वाचवायला गोळा झालेत ना ते? त्यांना कशाला हवीत मंत्रिपदं?
□ देशाच्या डोक्यावर ६२० अब्ज डॉलरचे परकीय कर्ज.
■ प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणं राहिलं बाजूला, उद्या कर्जवसुलीसाठी असतील नसतील ते पैसे काढून घेतले नाहीत कर्जदारांनी म्हणजे मिळवली!
□ रेशन दुकानात मोदींचा फोटो का नाही? -अर्थमंत्री निर्मला सीतारामन कडाडल्या.
■ प्रत्येकाच्या लस प्रमाणपत्रावर फोटो लावून पोट नाही भरलं का? आता काय आधार कार्डावर पण मोदींचा फोटो लावताय की काय? जनतेच्या पैशातून देताय ना रेशन की ते पीएम केअर्स फंडातून देताय, त्यांचा फोटो लावून किळसवाणी जाहिरातबाजी करायला?
□ तीस्ता सेटलवाड यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारला फटकारले.
■ इतक्या थोबाडीत बसतात, तरी सुधारत नाहीत.
□ वन खात्याचे नियम झुगारून गुजरातमधल्या खासगी प्राणीसंग्रहालयासाठी गडचिरोलीचे तीन हत्ती बळजबरीने रवाना केले गेले.
■ खासगी प्राणीसंग्रहालय रिलायन्सचे आहे, म्हणजे अर्ध्या देशाच्या परात्पर मालकांचेच आहे की! चाकर हुकूम बजावणारच.
□ संपूर्ण भारतीय बनावटीच्या विक्रांत युद्धनौकेचे लोकार्पण, नौदलाचा ध्वज बदलला, छत्रपती शिवरायांच्या ध्वजाची प्रेरणा
■ या नौकेचे ६० टक्के काम मोदींची सत्ता येण्याच्या आधी झाले होते, ४० टक्के काम आठ वर्षे रखडून पूर्ण झाले, तरी राष्ट्रपतींचा मान हिसकावून घेऊन फोटो काढून घ्यायला ते सगळ्यात पुढे!
□ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचे छापे का पडत नाहीत? हे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का? : तेजस्वी यादव यांचा सवाल.
■ अहो, वॉशिंग पावडर भाजपाची कमाल आहे ती… कोळसासुद्धा पांढराशुभ्र होतो ती लावल्यावर.
□ ईडी सरकार तोंडावर आपटले; कल्याणच्या विजय तरूण मंडळाच्या देखाव्याला उच्च न्यायालयाची परवानगी.
■ मोदी मध्ये बसलेले आणि दोन गणपती हातात फुलं घेऊन शेजारी उभे, या देखाव्याने यांच्या भावना दुखावत नाहीत, महाराष्ट्रातल्या फोडाफोडीवरच्या देखाव्याने पोटशूळ उठतो… आता न्यायालयानेच कायमचूर्ण दिले हे बरे झाले.
□ मी पुण्याचा पालक मंत्री होणार नाही, पुण्यातून दिल्लीलाही जाणार नाही : देवेंद्र फडणवीस
■ उत्तम… आता कोल्हापूरचं पार्सलही पाठवा परत, नाहीतर पुणेकर पाठवतील नॉटपेड करून.
□ शिवसेनेची मतपेढी फोडण्यासाठी भाजपकडून मनसेचा वापर
■ शिवसेनेकडे शेठजी पार्टीसारखी मत’पेढी’ नाही, कडवट, निष्ठावान सैनिक शिवसेनेवर प्रेम करणार्या मतदारांच्या भरवशाची हुंडी आहे… साक्षात ब्रह्मदेव उतरला तरी तोही ती वटवू शकत नाही. बाकीच्यांची गोष्टच सोडा!
□ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदू धर्माचे गौरवपुरुष : रामदेव बाबा.
■ पतंजलीच्या उत्पादनांमधल्या बनवाबनवीकडे यंत्रणांनी ‘काणा’डोळा करावा आणि कवडीमोल भूखंड घशात घालावेत, यासाठी ही चाटुगिरी करतोय हा भगव्या कपड्यांतला घोटाळेबाज पळपुटा!
□ शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न.
■ हजारोंच्या तोंडून ‘पन्नास खोके एकदम ओके’ ऐकून लाज काढून घ्यायची खुजली आलेली आहे का?
□ उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे, मराठा नेत्यांचा वापर करून घेतात आणि नंतर फेकून देतात, हे मी जवळून पाहिले : रामदास कदम.
■ यांची ५२ वर्षांची कारकीर्द शिवसेनेत गेली, त्यातली किमान १२ वर्षे याच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली काढली, तेव्हा दातखीळ बसली होती का? घशाशी येईपर्यंत खाऊन झाले, आता बोटे घालून उलट्या काढत आहेत गद्दार…