‘साहेब, जेव्हा पहिल्यांदा शेखरने ह्या स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा मी फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर दुसर्या वेळी तो म्हणाला की, ’जिचा खून होणार आहे ती बाई प्रेग्नंट वाटते आहे.’ विश्वास ठेवा दयासाहेब त्याने हे सांगितले आणि त्याच दिवशी मला समजले की, तब्बल अकरा वर्षाच्या संसारानंतर आम्ही आईबाबा होणार आहोत.’ श्यामलच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच इन्स्पेक्टर दयानंदला समजेना. हे प्रकरण त्याला धक्क्यावर धक्के देत होते.
– – –
इन्स्पेक्टर दयानंद शांतपणे समोर बसलेल्या तिघांचे निरीक्षण करत होता. तिघेही साधारण पस्तिशीच्या आतबाहेर असतील… दिनेशच्या बरोब्बर समोर बसलेला पुरुष काहीसा अस्वस्थ वाटत होता. सतत हाताचे तळवे एकमेकांवर घास, इकडे तिकडे नजर भिरभिरत ठेव असे त्याचे उद्योग चालू होते. त्याच्या शेजारी बसलेली स्त्री अत्यंत लावण्यवती होती, मात्र कोणत्याशा काळजीने तिचा चेहरा आता चांगलाच म्लान पडलेला दिसत होता. त्या स्त्रीच्या डाव्या हाताला बसलेला पुरुषसुद्धा एरवी अत्यंत रुबाबदार आणि देखणा दिसत असणार हे नक्की. पण सध्या त्याच्या चेहर्यावर काहीसे धास्तावलेले भाव दिसत होते. त्या तीन चेहर्यांवरच्या तीन वेगवेगळ्या भावांमागचे अर्थ लावण्यात इन्स्पेक्टर दयानंद गुंतलेला होता. शेवटी ती शांतता असह्य होऊन समोर बसलेल्या त्या अस्वस्थ व्यक्तीने उगाच खाकरून दयानंदला भानावर आणले.
‘ओह सॉरी!’’ काहीसे ओशाळत दयानंद म्हणाला, ‘तुम्ही काही चहा, कॉफी घेणार?’
‘नाही.. धन्यवाद. आपण बोलायला सुरुवात करायची का?’ त्या अस्वस्थ पुरुषाने अजिजीने विचारले.
‘शुअर शुअर.. त्यासाठी तर आपण इथे जमलो आहोत,’ दयानंद म्हणाला.
‘मी ओळख करून देतो. मी डॉक्टर शेखर दळवी. ही माझी पत्नी श्यामला दळवी आणि हा माझा धाकटा भाऊ शशी दळवी. मी मानसशास्त्राचा डॉक्टर असून, जगभर अनेक ठिकाणी माझी व्याख्याने होत असतात. माझी बायको समाजसेवा करते आणि विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांसाठी ती एक ट्रस्ट देखील चालवते. माझा भाऊ शशी गेली सहा वर्षे अमेरिकेला होता. तो सहाच महिन्यांपूर्वी हिंदुस्तानात परत आला आहे.’ शशीची ओळख करून देत असताना शेखरच्या चेहर्यावरचे अस्वस्थ भाव काहीसे आणखी वाढले होते. त्यावरून प्रकरण बहुदा ह्या शशीशी संबंधित असावे ह्याचा दयानंदला अंदाज आला होता.
‘अमेरिकेत काय करायचे हे?’
‘मी तिथे शेअर ट्रेड करणार्या एका मोठ्या कंपनीत ब्रोकर म्हणून काम करत होतो. पैसा खूप कमावला, पण माणसे मात्र गमावली. मधल्या काळात माझे आई, वडील दोघेही वारले. वडील गेले तेव्हा एक फार मोठे डील असल्याने मला येता आले नाही. मात्र तेव्हा मला त्याचे फारसे काही वाटले नाही; कारण मी पैसा कमावण्याच्या व्यसनात पूर्ण गुरफटलो होतो. मात्र सहा महिन्यांपूर्वी माझ्या पत्नीने मला सोडून सरळ दुसरा घरोबा केला आणि मी हादरलो. पैशाच्या नादात आपण काय काय गमावून बसतो आहोत ह्याची जाणीव झाली. आपली माणसे, त्यांचे प्रेम, त्यांची माया, त्यांचा आधार ह्या सगळ्याचे महत्त्व जाणवले आणि मी सरळ सर्व काही मागे सोडून स्वदेशात परत आलो,’ शशीने आपली कर्मकहाणी ऐकवली.
‘सध्या काय करताय तुम्ही इथे?’
‘पैसा तर माझ्याकडे भरपूर होता, पण त्याचे काय करावे हा प्रश्न होता. मग मी सरळ एक शेअर ट्रेडिंगचा छोटासा स्टार्टअप सुरू केला आहे आणि श्यामलताईची आवड बघून तिच्या जोडीने आता दादाने सांगितले तो ट्रस्ट देखील सुरू केला आहे. मात्र ट्रस्टचे सगळे काम ताईच बघते.’
‘ताई?’ दयानंद काहीसा बावचळला.
‘अरे हो.. तुमचा गोंधळ उडाला ना? त्याचे काय आहे की आम्हा दोघांनाही बहीण नाही. वडील तिरसट असल्याने कोणी नातेवाईक फारसे जवळचे असे बनलेच नाहीत. आम्हाला कायम बहिणीची कमतरता जाणवायची. माझी नाही, पण श्यामलच्या रूपाने शशीची मात्र बहिणीची कमतरता भरून निघाली. ह्या वर्षीच्या रक्षाबंधनाची त्याची गिफ्ट म्हणजेच हा नवा ट्रस्ट.’ भावाचे कौतुक सांगताना प्रथमच शेखरच्या चेहर्यावरची अस्वस्थता काहीशी कमी होऊन कौतुकाचे भाव आले होते.
‘कमिशनर साहेबांनी मला तुमची भेट घेण्यास सांगितले होते. ह्या ट्रस्टसंदर्भात काही घडले आहे का?’ दयानंदने अंदाज घेत विचारले.
‘नाही.. प्रकरण काहीसे विचित्र आहे. कसे सांगावे तेच सुचत नाहीये..’ शेखर काहीसा चाचरत म्हणाला.
‘अगदी निर्धास्तपणे बोला. आपल्या चौघांच्या बाहेर ती गोष्ट जाणार नाही ह्याची खात्री बाळगा,’ दयानंदने त्याला आश्वस्त केले.
‘साहेब, मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला प्रचंड आश्चर्य वाटेल. कदाचित इतकी शिकली सवरलेली माणसे हे असे खुळ्यासारखे कसे बोलत आहेत असे देखील वाटेल. पण तुम्ही पूर्ण कथा नीट ऐका आणि मगच त्यावर तुमचे मत बनवा.’ शेखरने वाक्य पूर्ण केले आणि दयानंदने समजूतदारपणे मान हालवली.
‘हे सर्व प्रकरण सुरू झाले साधारण पाच महिन्यांपूर्वी. शशीला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला होता आणि त्याच्या आग्रहाखातर आम्ही त्याच्या नव्या बंगल्यात त्याच्यासोबत कायमचे राहायला गेलो होतो. शशीच्या स्विमिंग पुलाचे नूतनीकरण चालू होते. एकदा संध्याकाळी मी बागेत फेरफटका मारता मारता सहज त्या दिशेने गेलो आणि वाटेत एका सळईला अडखळून थेट कोरड्या स्विमिंग पुलमध्ये पडलो आणि बेशुद्ध झालो. त्याचवेळी ड्यूटी संपवून घरी निघालेल्या प्रकाशने म्हणजे आमच्या ड्रायव्हरने माझी अस्फुट किंकाळी ऐकली आणि नशिबाने मला वेळीच मदत मिळाली. जखम काही झाली नव्हती, किरकोळ खरचटले होते. पण डॉक्टरांनी तरी देखील संपूर्ण शरीराची, मेंदूची एकदा पूर्ण तपासणी करून घेतली आणि काही काळजीचे कारण नसल्याचा निर्वाळा दिला.’
‘म्हणजे प्रकरण थोडक्यावर निभावले तर..’ दयानंद म्हणाला.
‘खरे प्रकरण तर इथून सुरू झाले..’
‘म्हणजे?’
‘मला स्वप्नं अशी कधी फारशी पडत नाहीत किंवा पडत असली तरी कधी लक्षात राहिली नाहीत. मात्र ह्या अपघाताच्या आठेक दिवसांनंतर मला एके रात्री एक स्वप्न पडले. काहीशा अंधारलेल्या त्या स्वप्नात मला एक गाडी झाडावर आदळताना दिसली. पण त्या केवळ सावल्या होत्या. गाडी कोणती होती, गाडीत कोण होते ते काही दिसले नाही. का माहिती नाही, पण हे स्वप्न माझ्या अगदी लख्ख लक्षात राहिले. पुढे दोन दिवसांनी रात्री तेच स्वप्न अगदी जसेच्या तसे पुन्हा पडले. मात्र ह्यावेळी ती गाडी होंडा सिव्हिक असल्याचे मला स्पष्ट दिसले, गाडी चालवणार्याचा चेहरा मात्र अजूनही अस्पष्ट होता. पुढे चार दिवसांनी तेच स्वप्न परत पडले आणि.. आणि..’ शेखरने पटकन पुढे झुकत टेबलावरचा पाण्याचा ग्लास रिकामा केला.
‘..आणि दादाला ह्यावेळी गाडी चालवणार्याचा चेहरा स्पष्ट दिसला. तो.. तो. प्रकाश होता; आमचा ड्रायव्हर.’ थरथरत्या आवाजात शशीने उरलेली घटना सांगितली.
‘तिसर्याच दिवशी प्रकाश मला आणायला येत असताना त्याची गाडी नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली. भगवंताची कृपा म्हणून त्याला फारसे काही झाले नाही,’ श्यामलने पहिल्यांदाच संभाषणात सहभाग नोंदवला.
‘आणि तो चालवत असलेली गाडी?’
‘मी नवी घेतलेली होंडा सिव्हिक..’ थरथरत्या आवाजात शशी म्हणाला आणि दयानंद सुन्नपणे त्याच्याकडे पाहत राहिला.
‘त्यानंतर दोन तीन महिने किरकोळ घटना सोडल्या तर फारसे काहीच घडले नाही. सगळे काही नॉर्मल सुरू होते. पण पंधरा दिवसांपूर्वी मला पुन्हा एकदा स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात मी एका स्त्रीचा खून होताना पाहिले. हळूहळू स्वप्न स्पष्ट होत गेले. ती स्त्री श्यामल होती…’ तळव्यात चेहरा खुपसत हताशपणे शेखर म्हणाला.
‘आणि खुनी?’ आता स्वत:चा आवाजदेखील थरथरत असल्यासारखे दयानंदला वाटले.
‘मी…’ भयाण आवाजात शशीने उत्तर दिले आणि दयानंद पुन्हा एकदा सुन्न अवस्थेत पोहोचला. ‘आणि दोनच दिवसात श्यामलच्या बॅगमध्ये विषारी साप निघाला…’ शेखरने त्यात पुन्हा भर घातली.
—
‘माफ करा, मी तुम्हाला दोघांनाच भेटायला बोलावले. खरे तर मला शेखरच्या अनुपस्थितीत तुमच्याशी काही बोलायचे आहे,’ समोर बसलेल्या श्यामल आणि शशीच्या मनातला गोंधळ कमी करत दयानंद म्हणाला.
‘त्याच्या नकळत असे काय बोलायचे होते तुम्हाला?’
‘मी तुमच्यावर अविश्वास दाखवतोय असे नाही मिस्टर शशी, पण शेखरच्या स्वप्नाला तुम्ही इतके महत्त्व का देत आहात? तो साप चुकून देखील शिरलेला असू शकतो. श्यामल मॅडम स्त्रियांच्या मदतीसाठी अनेकदा दुर्गम भागात जात असतात.’
‘तुम्हाला वाटते तितके सरळ प्रकरण नाहीये हे इन्स्पेक्टर साहेब.’
‘श्यामल ताई तुम्हाला देखील असे वाटते?’
‘साहेब, जेव्हा पहिल्यांदा शेखरने ह्या स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा मी फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर दुसर्या वेळी तो म्हणाला की, ’जिचा खून होणार आहे ती बाई प्रेग्नंट वाटते आहे.’ विश्वास ठेवा दयासाहेब त्याने हे सांगितले आणि त्याच दिवशी मला समजले की तब्बल अकरा वर्षाच्या संसारानंतर आम्ही आईबाबा होणार आहोत.’ श्यामलच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच दयानंदला समजेना. हे प्रकरण त्याला धक्क्यावर धक्के देत होते.
‘दया साहेब तुम्ही म्हणालात की आम्ही एवढे शिकलेले असून असा विश्वास कसा ठेवतो आहोत. पण ही स्वप्नांची मालिका म्हणजे काही अंधश्रद्धा नक्की नाही. प्रकाशचा अपघातच नाही, तर दादाने त्यानंतर पाहिलेली काही किरकोळ स्वप्ने, जसे की शेजारच्या घराच्या कुंपणाला लागलेली आग, दादाचे स्वत:चे घड्याळ रस्त्यात हरवणे हे तंतोतंत सत्यात उतरले आहे. आणि जगात काही मोजक्या व्यक्तींना यापूर्वी भविष्यात घडणार्या घटना जशाच्या तशा स्वप्नात दिसल्याची उदाहरणे देखील आहेत. खुद्द विज्ञान त्यामागच्या कारणांचा अभ्यास करत आहे. स्वत: दादाने या विषयावर काही ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत.’ शशीच्या माहितीमुळे दया चांगलाच बुचकळ्यात पडला होता हे नक्की.
‘ते सतत ह्या विषयाचा अभ्यास करत असतात त्यामुळे कदाचित..’ दया बोलला खरे पण स्वत:च्या शब्दांवर त्यालाच विश्वास बसत नव्हता. हे जे काही होते ते सारे अगम्य होते हेच खरे!
‘हे नक्की काय घडते आहे तेच समजत नाहीये. आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांची मते देखील घेत आहोत. पण ह्या सगळ्या तणावात श्यामलताईची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे. तिला हा मानसिक त्रास सहन करणे अशक्य झाले आहे. काल रात्री कोणीतरी तिच्या खिडकीतून डोकावत असताना तिला दिसले आणि ती भीतीने किंचाळत बेशुद्ध पडली होती. मुळात वाद होण्यासारखे आमच्यात काही घडण्याची शक्यता देखील नसताना मी असा खून का करेन हेच ती समजून घेत नाहीये.’
‘तुम्ही काळजी करू नका मिस्टर शशी. मी लवकरात लवकर काहीतरी तोडगा नक्की काढतो.’
—
‘नमस्कार
डॉ. बॅनर्जी. मी इन्स्पेक्टर दयानंद.’
‘नमस्कार. बसा बसा.. बोला काय मदत करू शकतो मी?’
‘डॉ. बॅनर्जी, तुम्ही शेखरचे मित्र आहात आणि सध्या श्यामलवर उपचार देखील करत आहात. त्या संदर्भात मला तुम्ही शक्य होईल तेवढी माहिती देऊ शकाल का?’
‘शुअर! शेखरला मी लग्नाच्या आधीपासून ओळखतोय. शार्प आणि ब्रिलियंट. मानसशास्त्राच्या अभ्यासात त्याचा हात धरणारा कोणी नाही. श्यामल सुद्धा गुणी मुलगी आहे. दोघांचा संसार देखील सुखाचा चालला होता..’
’होता? म्हणजे?’
‘आपल्याला मूलबाळ नाही ह्याची खंत शेखरला कधी जाणवली नाही, पण श्यामल मात्र कायम आतल्या आत कुढत असे. शिकली सवरलेली तिची सासू तिला कधीकधी यावरून टोमणे मारत असे. त्यावेळी सुद्धा श्यामल डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हा देखील मी उपचार केले होते. शेवटी दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू श्यामल सावरली. पण शेखरचे घराबाहेर राहणे मात्र वाढले. काहीसा दुरावा निर्माण झाला. मात्र आता ती आई होणार आहे. इतकी वर्षं ज्याची वाट पाहिली; ते सुख तिला मिळणार आहे. अशावेळी शेखरला पडलेल्या विचित्र स्वप्नामुळे ती पुन्हा एकदा धास्तावली आहे, मानसिक ताणाखाली आली आहे. होणार्या बाळासाठी ती ’ओव्हर प्रोटेक्टिव’ झाली आहे. तिचा संताप, राग कधीकधी अनावर होतो आहे. त्या अचानक आणि विनाकारण येणार्या संतापावर, मनत सतत दाटत असलेल्या तिच्या भीतीवर सध्या मी उपचार करत आहे. शेखर देखील जमेल ती मदत करत आहे. ह्या प्रचंड ताणाखाली ती मोडून जाईल अशी कधी कधी भीती वाटते मला.’
‘शेखरच्या ह्या स्वप्नांबद्दल काय सांगाल?’
‘वेल.. मानवी मेंदू आणि मन यांचा संपूर्ण अभ्यास मानवाला अजूनही झालेला नाही. मी चमत्कार म्हणणार नाही, पण सध्याच्या विज्ञानाच्या कक्षेत नसलेले असे काहीतरी शेखरच्या बाबतीत होत आहे. श्यामल एकदा सावरली की मी स्वत: ह्या क्षेत्रातील इतर तज्ज्ञांच्या मदतीने शेखरची केस स्टडी करणार आहे.‘
‘धन्यवाद डॉक्टर साहेब. काही मदत लागली तर पुन्हा त्रास देईनच…’ हसत हसत दयाने त्यांचा निरोप घेतला.
—
दया एका जागी खिळून समोरचे दृश्य पाहत होता. बेडरूमच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात शशीचे प्रेत पडलेले होते. बेडरूमच्या एका कोपर्यात शून्य नजरेने त्याकडे बघत बसलेली श्यामल होती आणि तिच्या बाजूलाच एक रिव्हॉल्व्हर पडलेले होते. दयाच्या मागेच धावत धावत शेखर आला आणि आतले दृश्य बघून गुडघ्यावर कोसळला.
‘सॉरी मिस्टर शेखर, पण नक्की तुमच्या भावाची कोणती कृती श्यामलला घाबरवणारी होती ते माहिती नाही, पण बिथरलेल्या श्यामलने..’ पण दयाचे बोलणे पूर्ण ऐकण्याआधीच शेखरची शुद्ध हरपली होती.
—
‘ये प्रकाश…’
‘शेखर साहेब, श्यामल…’
‘तिला उपचारासाठी सरकारी मानसोपचार केंद्रात हालवले आहे. जर ह्या सगळ्यातून ती पुन्हा सावरली, तर मग कोर्टात उभे करून खटला चालवला जाईल.’
‘असे घडायला नको होते साहेब…’
‘ज्याने हे घडवले, ज्याला हे घडवायला तू साथ दिलीस, त्यालाच हे सांगतोस होय?’
‘काय करणार साहेब? आमच्या दोन पिढ्या तुमच्या चाकरीत गेल्या. तुम्ही आम्हाला कधी परके मानलेच नाही. अशा देवमाणसाची बायको जर त्याला फसवत असेल, त्याच्या सख्ख्या भावाबरोबर रंग उधळत असेल.. तर गप्प तरी कसे बसायचे? का त्या देवमाणसाची फसवणूक होऊ द्यायची?’
‘तू योग्य तेच केलेस प्रकाश. मला एका शब्दाने जरी दोघे बोलले असते, तर मी एका क्षणात बाजूला झालो असतो. पण दोघांना मला फसवण्यात मजा वाटत होती, माझ्या मूर्खपणावर हसायचे दोघं. तेव्हाच मी ठरवले की, दाखवून द्यायचे, असा सहजी फसणार आणि विश्वासघातक्याला माफ करणारा हा डॉ. शेखर नाही! खरे तर दोघांचाही काटा दूर करणार होतो, पण ऐनवेळी श्यामल गरोदर असल्याचे कळले. त्या लहान लेकराची काय चूक? म्हणून तिचा जीव वाचवला. पण उपयोग काय? आयुष्य तर आता वेड्यांच्या सोबतीत काढायचे. हे पाप आहे का नाही मला माहिती नाही; पण जे काही केले त्यात तू जी माझी साथ दिलीस त्याबद्दल तुझे खूप आभार.’
‘मी तर फक्त तुम्ही सांगितले तेच केले. खरी मदत तर श्यामलच्या मनाची झाली, जे तुमच्या प्रत्येक खेळीला बळी पडत गेले. स्टडीमधले रिव्हॉल्व्हर तुम्ही बेडरूममध्ये हालवलेत तेव्हाच मला जाणीव झाली होती…’ उठता उठता प्रकाश म्हणाला आणि सावकाश बाहेर पडला.