या दिवसांत मोदक चापायला फार आवडतं मला. पण ते अंगावर येतात. सारखी झोप येते हो. मग काय करायचं?
– नाना फाटक, तारकर्ली
जुलाब होण्यासाठी औषध घ्या.
बायको म्हणते, दारू सोडा. मी पण म्हणतो, दारू आणि सोडा. तरी आमच्यात या विषयावरून भांडण का होतं?
– राम शिंदे, भवानी पेठ, पुणे
एकच विषय आहे, पण बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. त्यामुळे भांडणं होतात. पण बायकोचं बरोबर आहे. तिचं ऐका.
दक्षिण भारतीय सिनेमेच आता हिंदीत पण चालणार, असं बरेच लोक बोलत असताना विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ सणकून आपटला. असं कसं झालं असेल?
– नेत्रा दळवी, पोलादपूर
चित्रपट, नाटक किंवा कुठल्याही कलाकृतीत कुणी भाकीत करू नये.
अनुपम खेर यांच्याशिवाय ज्यांनी कधी सिनेमे केले नाहीत, असे अनेक निर्माते-दिग्दर्शक आता अनुपम यांच्याशिवाय सिनेमे बनवतायत. आपल्याला कोणीच बोलावत नाही, अशी अनुपम यांची तक्रार आहे. का वागत असतील हे लोक त्यांच्याशी असं?
– भालचंद्र गोडबोले, सटाणा
काही कल्पना नाही बुआ…
सिनेमाच्या क्षेत्रात घराणेशाही आहे, म्हणून गुणवंतांवर अन्याय होतो, हा आरोप तुम्हाला पटतो का?
– नेहा माळवी, माळवाडी
हो.
अनेक राजकारणी नेते, धार्मिक गुरू, मौलवी वगैरे घसा खरवडून ओरडून ओरडून, रेटून बोलताना दिसतात… समोर माइक आहे, आम्हाला नीट ऐकू येतंय, मग हे इतके ओरडून का बोलतात?
– महादेव देसाई, शिंगणापूर
तुम्ही चुकीचे असता तेव्हा ओरडूनच बोलता ना…
तुम्ही लग्नात उखाणा घेतला होता का? घेतला असता तर कोणता घेतला असता?
– सायली पांढरे, बुलडाणा
मी नाही घेतला कधी…
तुम्ही कधी परदेशांत गेला होता का? तिथे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आणि सगळ्यात जास्त काय आवडलं नाही?
– ऋत्विक जोशी, पालघर
हो… शिस्त आणि स्वच्छता.
विज्ञान जिथे संपतं, तिथे आध्यात्म सुरू होतं, असं अनेक आध्यात्मवादी म्हणतात… तुम्हाला काय वाटतं?
– सुनंदा पांचाळ, हरचेरी
विज्ञान कुठेच संपत नाही… खरं तर जिथे संपलंय असं वाटतं, तिथेच विज्ञानाचा संघर्ष सुरु होतो…
नॉलेड्ज असं लिहायचं आणि नॉलेज म्हणायचं, सोल्डियर असं लिहायचं आणि सोल्जर म्हणायचं, हा चावटपणा नाही का इंग्लिश भाषेचा? सरळ उच्चाराप्रमाणे स्पेलिंग लिहायला काय जातंय यांचं?
– मारुती शिंदे, लोणावळा
नका बोलू किंवा शिकू नका तुम्ही… काही बिघडत नाही इंग्लिशचं… तुमच्या भाषेतही किती शंका आहेत, त्या निस्तरा आधी.
शाळा कॉलेजात गेल्याने माणूस साक्षर होतो की सुशिक्षित? खरंच तिथे शिक्षण मिळतं का? ज्ञान वाढतं का?
– वैदेही जोगळेकर, सातारा
संस्कार काय आहेत समाजात त्यावर अवलंबून आहे… कार्यकारण भावच शिकवलं नसेल तर कितीही शिकलात तरी त्याचा फायदा नाही.
पुण्यात हवेत उडणारी बस आणणार, असं नितीन गडकरी म्हणाले. पुणेकर हवेत उडणार्या सायकली, स्कुटरीही काढतीलच पाठोपाठ. एवढ्या गाड्यांचं पार्किंग कुठे करतील पण?
– श्रीपाद ब्रीद, सदाशिव पेठ, पुणे
अहो आधी आणू देत, मग पाहू… तसेही पुणेकर उडतच असतात. त्यांना उडणार्या वाहनांची काय गरज?
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता, तेव्हा त्यांच्या मनात गणेशोत्सवातून जनजागृती करण्याचा जो मनोदय होता, तो आजच्या गणेशोत्सवातून सफल होतो, असं वाटतं का तुम्हाला? काय केलं तर तो साध्य होईल?
– पद्मा भांडारे, दादर
आपल्याकडे नेहमीच ज्या हेतूने जी गोष्टी सुरु केली जाते ती नंतर वाह्यातच होते.