श्री गणरायांचे उत्साहात आगमन झाले आणि हा हा म्हणता त्यांच्या विसर्जनाचे वेधही लागले… गणेशोत्सवाचा हा प्रवास नेहमीच फार उत्सुकतेने वाट पाहायला लावणारा, गणपती आले की उत्साह दुथडी भरून वाहायला लावणारा आणि चटका लावून झर्रदिशी संपून जाणारा… पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, असे आर्त हाकारे सगळ्या आसमंतात उमटवणारा… या प्रवासाचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या कुंचल्याने घडवलेलं चित्रमय दर्शन आहे १९८१ सालातलं. गणपती बाप्पा हे आपल्या घरातलेच ज्येष्ठ व्यक्ती आहेत, मित्र आहेत, त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं करावं, सुखदु:खाच्या चार गोष्टी सांगाव्यात, असं सगळ्याच मराठी माणसांना वाटतं… आपल्या मनातलेच गणराय इथे बाळासाहेबांनी साकारलेले आहेत. उत्सवासाठी आगमनानंतर जवळचं भाडं नाकारणारा टॅक्सीवाला त्यांनाही घेऊन जायला नकार देतो, इथून हा प्रवास सुरू होतो. व्यापार्यांची मुजोरी, अल्पसंख्याकांची दादागिरी आणि कडाडलेल्या महागाईने संतापून वीणा फेकून लाटणं हाती घ्यायला निघालेली माता सरस्वती यांचं दर्शन घडवत हा प्रवास विसर्जनापाशी संपतो तिथे तो नाट्याचा कळसाध्याय ‘रावा, असा बिंदू दाखवतो… सगळ्या तापांना गांजलेला भक्त त्यांना म्हणतोय, थांबा, मी पण येतो!… आजही परिस्थिती तीच आहे, पण मोबाइलच्या खुळखुळ्यातून रोज नवनवे आवाज निघतात, रोज नवीन टास्क दिली जातात, त्यामुळे ‘बिग बॉस’च्या ‘कैदे’तल्या भक्तगणांना आपल्या दुरवस्थेचंही भान राहिलेलं नाही.