उपवास… हल्ली ज्याला डिटॉक्स म्हटले जाते, त्याचे जुने भारतीय रूप म्हणजे उपास. पचनसंस्थेला पूर्ण विश्रांती मिळावी, या दृष्टीने उपास असायचे. धार्मिक जोड दिली, की लोक पाळतील हा हेतू होताच. अर्थात आता उपास म्हणजे खरोखरच दुप्पट खा असे दिसू लागले आहे.
आषाढी एकादशी किंवा शिवरात्र असे दिवस जवळ आले की उपास थाळी, उपवास नाश्ता, उपवास मिठाई यांच्या जाहिराती दणादण येवू लागतात आणि होते काय की लोक नेहमीच्या आहारापेक्षा दुप्पट जड पदार्थ खातात. बाहेर किंवा घरी. आणि आपल्याकडे तर साबुदाणे, बटाटे असे वातुळ पदार्थ अतिशय भावतात. परत त्यात तूप-शेंगदाणे पडतात. म्हणजे पोटाला डबल काम. उपास असतो तेव्हा फक्त पातळ ताक, एखादे फळ, काकडी, चहा असे सेवन करावे हा हेतू असतो. आणि ते योग्य आहे. पण ऐसी जीभ लपलापाई असं होतंच; या कोविड काळात तर काहीतरी वेगळे हवे, या इच्छेतून वडे-खिचडी दणादण हाणली जाते.
वास्तविक आपल्याकडे साबुदाणा + शेंगदाणा + बटाटा या उपासत्रयीच्या (किंवा ‘होली ट्रिनिटी’ म्हणू) व्यतिरिक्त अनेक पौष्टिक आणि पोटाला हलके पदार्थ आहेत. पण ते फारसे लोकप्रिय नाहीत. लाल भोपळा भाजी खा, असे सांगितले तर, भरपूर तुपातली बटाटा भाजी हाणली जाते, आणि वरी खा सांगितले तर साबुदाणा वडे फस्त होतात. भारतात वरी, रताळी, लाल भोपळा, काकडी, राजगिरा (लाडू नाही, धान्य), कुटकी/कुट्टी असे अनेक उपास पदार्थ आहेत. मुख्य म्हणजे स्वस्त आणि कमालीचे पौष्टिक.
नेहमीच्या तांदूळ आणि साबुदाणा यापेक्षा ती पचायला हलकी नक्की असतात.
तुपकट साबुदाणा खिचडी आणि तेलकट वडे, थालीपीठ खाण्याऐवजी वरीचा पुलाव, राजगिरा डोसा असे काही वेगळे करून या एकादशीला खाऊन पाहा.
राजगिरा आणि कुटकी/कुट्टी डोसा
कुटू म्हणजे कुटकी/ बकव्हीट. महाराष्ट्रात हे धान्य विशेष परिचयाचे नाही.पण दक्षिण भारत, उत्तर प्रदेश झालेच तर हिमाचल या ठिकाणी उपासावेळी कुटकी खाल्ली जाते. आपल्याकडे आदिवासी भागात पण खातात. अतिशय पौष्टिक आणि पचायला हलके धान्य आहे आणि मोठ्या दुकानात किंवा ऑनलाईन सहज मिळते.
राजगिरा वेगळा सांगायला नको.
राजगिरा पीठ १ वाटी, कुटकी पीठ १/२ वाटी, दही थोडे, मीठ, जिरे
कृती : दोन्ही पिठे एकत्र करून, एक तास दह्यात भिजवून ठेवायची. खूप घट्ट मिश्रण असल्यास थोडे पाणी घालून सरसरीत करून मीठ+जिरे घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचे. उपासाला सोडा चालत असेल तर चिमूटभर टाकू शकता.
तव्यावर तूप घालून या पिठाचे डोसे काढायचे.
फार पातळ पसरवू नये.
खमंग लाल झाले की काढायचे.
खोबरे + मिरची + आले यांच्या चटणीसोबत द्यायचे किंवा गूळ आणि ओले खोबरे यांचा चव झक्कास लागतो.
आवडत असल्यास आले-जिरे-मिरची वाटून पिठात घालता येते, किंवा सैंधव पण चालते. म्हणजे चटणी वेगळ्याने करायला नको. बटाट्याची उपवास भाजी यात घालून फराळी मसाला डोसा होवू शकतो.
वरी/भगर/समा पुलाव
वरी तांदूळ : १ वाटी
रताळी/ बटाटे/ लाल भोपळा यापैकी काहीही किंवा सर्व, चौकोनी मोठ्या फोडी करून : अर्धी वाटी
आले मिरची वाटून, जिरे, मीठ, तूप, ओले खोबरे
कृती : वरी तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावा.
कुकरमध्ये तूप तापवून त्यात जिरे तडतडू देवून आलेमिरची वाटप घालावे.
भाज्या तुकडे घालून परतावे. यावेळी आवडत असल्यास काजू घालू शकता. फक्त किंचित लालसर करावे.
दोन वाट्या पाणी बाजूला गरम करत ठेवावे.
वरी तांदूळ कुकरमध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यावे. वाटल्यास दाणे कूट टाकावे.
गरम पाणी, मीठ घालून ढवळून बाजूने लिंबू रस थोडासा सोडावा.
कुकर बंद करून, दोन शिट्या घ्याव्यात.
खाताना वरून ओले खोबरे पेरावे.
नियमात बसत असेल तर फोडणीत काळे मिरी, दालचिनी, तमालपत्र असा अख्खा मसाला पण घालू शकता.
सोबत खमंग काकडी किंवा खोबरे-मिरची चटणी असे घ्यावे.
नंतर पातळ ताक.
असा हलका आणि पौष्टिक आहार घेऊन उपास केला तर पुण्य आणि आरोग्य दोन्ही मिळते!
– शुभा प्रभू साटम
(लेखिकेचे ‘पारंपरिक अन्न’ या विषयावर प्रभुत्व आहे.)