जळगावातल्या पाच सहा महिन्यांच्या मुक्कामाने प्रबोधनकारांना संपादक बनवलं. नानासाहेब फडणीस यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सारथी नावाचं मासिक सुरू केलं. म्हणून प्रबोधनकार जळगावला आपल्या पत्रव्यवहाराची जन्मभूमी म्हणतात.
—–
ग्रामोफोन घेऊन बार्शी, पंढरपूरपर्यंतचा दक्षिणेचा प्रवास केल्यानंतर प्रबोधनकारांनी थोडी विश्रांती घेऊन उत्तरेच्या दिशेने कूच केलं. आता लक्ष्य होतं खानदेश. त्याची दोन कारणं दिसतात, एक म्हणजे रेल्वे. ट्रेनने खानदेशात जाणं सोयीचं होतं. दुसरं म्हणजे प्रबोधनकारांचे धाकटे भाऊ यशवंतराव तेव्हा जळगावमध्येच पीडब्ल्यूडी खात्यात नोकरीला होते. त्यामुळे जळगावात मुक्काम करून प्रबोधनकार आजूबाजूच्या शहरी भागांमध्ये ग्रामोफोन घेऊन दौरे करत राहिले. त्यांचा हा मुक्काम तब्बल सहा-सात महिन्यांचा होता.
प्रबोधनकार जिथे जात तिथले साहित्यिक त्यांच्याशी जोडले जात असावेत, असं दिसतं. त्यांचा मोकळा गप्पिष्ट स्वभाव, मोठ्या शहराचा तोरा न दाखवता माणसं जोडण्याची कला आणि प्रचंड व्यासंग यामुळे छोट्या शहरांतली विद्वान मंडळी त्यांच्याशी आपोआप जोडली जात असावीत. त्यानुसार जळगावचे नाना फडणीस म्हणजे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांची जळगावात गेल्या गेल्या ओळख झाली. प्रबोधनकार भेटले तेव्हा ते व्यवसायात सक्रिय होते आणि त्यांची भरभराट सुरू होती.
नानासाहेबांनी प्रबोधनकारांच्या जन्माच्याही आधी म्हणजे तीन जानेवारी १८८० रोजी ‘प्रबोधचंद्रिका’ हे साप्ताहिक सुरू केलं होतं. रा. के. लेले यांनी `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ग्रंथात नानासाहेबांचं कर्तृत्व सांगितलंय. त्यानुसार जळगाव तेव्हा तालुक्याचंही गाव नव्हतं. त्यामुळे तिथे एखादं साप्ताहिक सुरू करणं हे मोठंच आव्हान होतं. त्या परिसरात शिक्षणाचं प्रमाण तोकडं होतंच, पण नानासाहेबांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. तरीही त्यांनी लोकजागृतीच्या हेतूने कर्ज काढून छापखाना सुरू केला. प्रबोधनकारांनी बघितलेला त्यांचा बाबजी छापखाना हा शिळा आणि खिळा अशा दोन्ही प्रकारचा होता.
नानासाहेबांनी सुरुवातीला ‘प्रबोधचंद्रिका’च्या संपादनाबरोबरच शिळाछापाचे दगड घासणं, छापखान्याचं मशीन चालवणं, अशी सगळी कामं भाऊ हरी यांना सोबत घेऊन केली. अडचणी आल्या पण चिकाटीने साप्ताहिकाला मान्यता मिळवून दिली. हळूहळू ते खानदेशाचं मुखपत्रच बनलं. रा. के. लेले प्रबोधचंद्रिकाच्या योगदानाविषयी लिहितात, `लोकजागृती आणि सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचा पुरस्कार हे पत्राचे ध्येय होते. पत्र चालवताना गावातले सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित लोक यांचा रोष सहन करावा लागणं अपरिहार्य होतं. पण म्हणून प्रबोधचंद्रिकेने कधी लाचारी पत्करली नाही व आपल्या मार्गापासून ती कधी विचलित झाली नाही. जळगाव शहराच्या वाढीलाही पत्राचा खूपच हातभार लागला. इतरत्र हिंदू-मुसलमानांचे दंगे होत असताना दंग्याचे लोण जळगावात आले नाही. कार्तिकी एकादशीला रामाचा रथ मशिदीवरून सवाद्य जाऊ शके. या वातावरणाला संपादक नानासाहेब फडणीस व त्यांचे पत्र कारणीभूत होते.’
नानासाहेबांनी घालून दिलेला हा पाया इतका भक्कम आहे की येत्या जानेवारीत ‘प्रबोधचंद्रिका’ १४२वा वर्धापनदिन साजरा करेल. नानासाहेबांचे चिरंजीव वासुदेव उर्फ दादासाहेब, नातू श्रीनिवास यांचे पणतू कमलाकर फडणीस या साप्ताहिकाची जबाबदारी सांभाळत आहेत. हे साप्ताहिक इतकी वर्षं सगळ्या चढउतारांचा सामना करत एका छोट्या शहरातून सुरू आहे, हे महाराष्ट्रात इतरत्र कुठे क्वचितच झालं असेल.
‘प्रबोधचंद्रिका’चं इतकं बलदंड कर्तृत्व असतानाही नानासाहेब फडणीसांचं नाव मात्र काव्यरत्नावलीशीच जोडलेलं आहे. त्यांनी १८८७मध्ये पूर्णपणे कवितेला वाहिलेलं मासिक सुरू करण्याचं धाडस दाखवलं. मराठी कवितेच्या इतिहासात हे योगदान इतकं महत्त्वाचं ठरलं की त्यांची ओळख काव्यरत्नावलीकार हीच झाली. केशवसुतांना केशवसूत हे नाव काव्यरत्नावली म्हणजे नानासाहेबांनीच दिलंय, यावरूनच त्याचं मोठेपण कळू शकेल.
मराठीतले आजचे एक महत्त्वाचे कवी अशोक कोतवाल नानासाहेबांविषयी सांगतात, `स्वातंत्र्यपूर्वकाळात जळगावचा परिसर काव्यतीर्थ म्हणून ओळखला जाई. त्यात नानासाहेबांचं योगदान मोठं होतं. काव्यरत्नावली ही मराठी साहित्याच्या इतिहासातली महत्त्वाची घटना आहे. या मासिकाच्या ४८ वर्षांत ४५४ अंकांच्या १० हजार ४५ पानांमध्ये ६५० कवींच्या एक लाख ८३ हजार कविता प्रकाशित झाल्यात. त्यात केशवसूत, बालकवी, ना. वा. टिळक, साने गुरूजी असे सगळे कवी आहेत. काव्यरत्नावलीची आठवण म्हणून जळगाव शहरातल्या एका मुख्य चौकाला काव्यरत्नावलीचं नाव दिलं गेलंय आणि त्याचं शिल्पही उभारण्यात आलंय. विशेष म्हणजे कवयित्री बहिणाबाईंची एक आठवण नानासाहेबांच्या छापखान्याशी जोडलेली आहे. शेतात येता जाता बहिणाबाईंना कोर्या कागदावर छापलं कसं जातं, याचं खूप नवल वाटायचं. त्यावर त्यांनी एक कविताही लिहिलीय, मानसापरी मानूस, राहतो रे येडजाना। अरे होतो छापीनसा, कोरा कागद शहाना।’
प्रबोधनकारांनी केलेली काव्यरत्नावलीची नोंद महत्त्वाची आहे, `नाना जातिवंत कवी होतेच. पण अनेक नामांकित कविवर्यांच्या काव्यांना मुद्रित करून त्यांनी त्यांना चिरंजीव केलेलं आहे. काव्यरत्नावली नसती तर आज बहुतेक मराठी कवी नामशेष तरी उरले असते की नाही, कोण जाणे. पण त्या मासिकाला लोकांकडून काहीही आश्रय मिळत नसे. कोणी रसिक आले भेटीला, तर नाना काव्यरत्नावलीची बांधीव वार्षिक पुस्तके त्यांना आग्रह करून भेट द्यायचे.’
असा आतबट्ट्याचा व्यवसाय असतानाही नानासाहेबांनी ‘काव्यरत्नावली’ १९३५पर्यंत म्हणजे जवळपास ५० वर्षं चालवलं. अशा कर्तृत्ववान कवीची प्रबोधनकारांशी मैत्री जमली नसती तरच नवल. ती इतकी झाली की सकाळचा चहा झाला की प्रबोधनकारांची बैठक त्यांच्या घरी होऊ लागली. तिथे अर्थातच गप्पांचा फड जमायचा. काव्यशास्त्रविनोदाचा पाऊस पडायचा. नानासाहेबांचा एक मुलगा काही महिन्यांपूर्वी वारला होता. त्या प्रसंगावर नानासाहेबांनी स्मशानात एक उत्स्फूर्त कविता म्हटली होती. ती कविता प्रबोधनकारांना पुन्हा ऐकवताना त्यांनी तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. त्यानंतर जवळपास साठ वर्षांनी आत्मचरित्र लिहिताना प्रबोधनकारांनी त्यातल्या दोन ओळी नोंदवून ठेवल्यात. त्या अशा, `या क्रूर माझिया हाती। लोटितो तुझ्यावर माती। दगडाची करूनिया छाती। शिशुवरा।।’
विशेष म्हणजे नानासाहेबांनी केलेली आणखी ऐतिहासिक गोष्ट म्हणजे त्यांनी प्रबोधनकारांमधल्या संपादकाला ओळखून त्यांना एक मासिक सुरू करायला लावलं. प्रबोधनकार म्हणतात तसं जळगाव ही `माझ्या पत्रव्यवहाराची जन्मभूमी’ होती. म्हणजे त्यांच्या पत्रकारितेची खर्या अर्थाने सुरुवात जळगावातच झाली. नानासाहेबांच्या सक्रिय उत्तेजनाने प्रबोधनकारांनी `सारथी’ नावाचं मासिक सुरू केलं. प्रबोधनकार याचं श्रेय नानासाहेबांना देताना म्हणतात, `माझ्या पत्रव्यवसायाचा श्रीगणेशा नानांनीच हात धरून काढविलेला आहे.’ याचा अर्थ नानासाहेबांनी त्यांना अंक छापून तर दिलाच असेल. पण लेखन, संपादनाचे धडेही दिले असावेत. जळगावात असताना सारथीचे चारपाच अंक निघाले. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी पुढे वर्षभर हे मासिक सुरू ठेवलं.
प्रबोधनकारांच्या नोंदीनुसार हे सगळं १९०६-०७मध्ये घडत होतं. याचा अर्थ प्रबोधनकार अवघ्या २१-२२व्या वर्षी संपादक बनले. त्यानंतर तेरा चौदा वर्षांनी त्यांनी प्रबोधन सुरू केलं. नंतर साप्ताहिक लोकहितवादी, वर्षभरासाठी साप्ताहिक प्रतोद, गाडगेबाबांचं जनता जनार्दन या नियतकालिकांचं संपादन त्यांनी केलं. शेवटी साप्ताहिक मार्मिकची पायाभरणीही त्यांनीच केली. या सगळ्या पत्रकारितेची सुरुवात जळगावातच आहे. ४० आणि ५०च्या दशकात त्यांनी सगळ्यात जास्त लिहिलं ते बातमीदार या जळगावाच्याच साप्ताहिकात. प्रबोधनकारांच्या पत्रकारितेच्या सगळ्या टप्प्यांचा जळगाव साक्षीदार आहे. पण प्रबोधनकारांच्या पत्रकारितेची जन्मभूमी असलेल्या जळगावच्या लोकांना त्याची माहितीही नाही.
या अज्ञानामुळे १४० वर्षांच्या इतिहासाचा दस्तावेज मात्र काळाबरोबर संपण्याच्या बेतात आहे. प्रबोधचंद्रिकाचे सध्याचे संपादक कमलाकर फडणीस सांगतात, `प्रबोधकारांचा प्रबोधचंद्रिका आणि काव्यरत्नावलीचा ऋणानुबंध नव्याने शोधण्याची गरज आहे. प्रबोधनकारांचं लिखाण आणि कविता यात छापून आलं होतं की नाही, याचा शोध घ्यायला हवा. आम्ही आतापर्यंतचे सगळे अंक आमच्या परीने जपून ठेवले आहेत. पण त्याची नीट जपणूक करणं एकट्या दुकट्याचचं काम नाही. आता कागदाच्या पानांचे तुकडे होऊ लागले आहेत. ते जपून ठेवणं कठीण होऊ लागलंय.’ प्रबोधनकार एक संपादक म्हणून ज्या प्रबोधचंद्रिकामुळे घडले, त्याचे अंक टिकवून ठेवण्यासाठी मदतीची हाक देत आहेत. ते ऐकणारं कुणी आहे का?
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)