‘गहराई’ अशा क्षणी संपतो जिथे प्रेक्षकांना धक्काही बसलाय आणि नक्की कोणाला दोषी मानायचं हेही कळत नाही. चित्रपटात भूतपिशाच्च, तंत्रमंत्र अशा गोष्टी अंधश्रद्धेला खतपाणी घालू शकतील असा आरोप होऊ शकतो. पण त्या काळात अगदी मुंबईसारख्या शहरी भागात भानामती वगैरे गोष्टींचं खूळ होतंच. स्टोनमॅनसारखे हादरवणारे प्रकार होते तर तीन मुंडीवाली बाई अशा अफवा होत्या.
—-
मृत्यू आणि वेदना या दोन गोष्टींच्या संभाव्यतेने निर्माण होतं ते भय. भय ही फारच विस्तार असलेली भावना आहे. धोका दिसला की आपण भयभीत होतो. मग तो धोका जीवाला असेल की शरीराला त्यावर भयाची व्याप्ती ठरते. आणि मनोरंजनसुद्धा.
मानवी भावभावनांचे कृत्रिम, रचित अनुभव देणार्या कला म्हणजे कथा, संगीत, नृत्य, चित्र इत्यादी मनोरंजनाचा एक भाग बनल्या. त्यात हास्य, शृंगार, वीर याच बरोबर भय हा रसही माणसाचं प्रिय मनोरंजन आहे. कथा, चित्रपट यातून भयाचा अनुभव घेणं हे एखाद्या व्यसनाप्रमाणे आहे. कारण भीती ही केवळ मनात नसते तर मेंदूकडून सूचना मिळाल्यावर शरीरात कॉर्टिसोल आणि अड्रेनलीन अशी संप्रेरकं निर्माण होतात. रक्तदाब वाढतो. हृदयाचं पंपिंग वाढतं. शरीर ‘फाइट ऑर फ्लाइट’साठी सज्ज होतं. आणि एखादा चित्रपट हा सगळा अनुभव देत असेल तर तो आपण आपल्याला झेपेल इतका घेऊ शकतो ही एक वेगळीच मजा असते. म्हणूनच जगभरात भयपटांना प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग आहे. आणि जगातल्या विविध संस्कृतीची गडद झलक त्या तिथल्या भय, गूढ साहित्यात, कलाकृतीत दिसते.
हॉरर या बाबतीत पाश्चात्य आणि पौर्वात्य जगात अनेक संदर्भ बदलताना दिसतात. आशिया खंड, विशेषत: आपला देश तर या बाबतीत फारच समृद्ध आहे असं म्हणायला लागेल; कारण आपल्या देशातल्या अनेक संस्कृती, भाषा, परंपरा वगैरेंमध्ये भयकथांचे वैविध्यपूर्ण दाखले आढळतात.
हिंदी सिनेमा मात्र कसा कोण जाणे भयपट या प्रकारात जरा बटबटीत राहिला आहे. रामसे बंधू आणि मोहन भाकरी अशा निर्माता दिग्दर्शकांनी आपले सिनेमे बी ग्रेड राहतील अशी खबरदारी घेतली की काय, ही शंका यावी इतपत. प्रस्थापित आणि काही अपवाद वगळता नामांकित बॉलिवुड निर्मिती संस्था, अभिनेत्यांनी हॉरर हा जॉनर लांबच ठेवला होता. राम गोपाल वर्मासारख्या माणसाने हे चित्र बदलेपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत हॉरर सिनेमा म्हणजे चित्रविचित्र मुखवटे लावलेलं भूत, उन्मादक प्रणयदृश्यं, नायिकेचं अंगप्रदर्शन, संबंध नसलेले विनोदी प्रसंग असा प्रकार होता. भारतात १९८०च्या आसपास रामसे बंधूंचे भयपट या फॉर्म्युलानुसार बनत होते, त्या काळात भयानक दिसणारं भूत, स्पेशल इफेक्ट्स हे सगळं नसलेला पण तरीही नखशिखांत भीतीचा अनुभव देणारा एक सिनेमा येऊन गेला होता, हे आज बर्याच लोकांना माहिती नाही…
…तो होता ‘गहराई’.
त्यावेळी पतीपत्नी असलेल्या अरुणा-विकास या दिग्दर्शकद्वयीच्या या चित्रपटाने नक्कीच खळबळ माजवली होती. त्याचं कारण आपण बघणार आहोतच; पण तत्पूर्वी थोडं अरुणा-विकास जोडीबद्दल. अरुणा राजे पाटील आणि विकास देसाई या पती-पत्नीच्या जोडीनेच विनोद खन्ना, शबाना आझमी यांना घेऊन ‘शक’ नावाचा सिनेमा केला होता आणि वेगळ्या कथेमुळे, अनवट हाताळणीमुळे प्रेक्षकांचं आणि हिंदी चित्रपटसृष्टीचंही लक्ष वेधून घेतलं होतं. अरुणा राजे या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या महिला तंत्रज्ञ आहेत. मेडिकल कॉलेज सोडून फिल्म्सच्या वेडाने त्यांनी एफटीआयआयला प्रवेश घेतला आणि अल्पावधीतच त्या निष्णात एडिटर म्हणून नावारूपाला आल्या. शेखर कपूरच्या ‘मासूम’चं सहसंकलनही त्यांनी केलं आहे. विकास देसाई यांच्यापासून विभक्त झाल्यानंतरही अरूणाजींनी स्वतंत्ररीत्या उत्तम चित्रपटनिर्मिती केलेली आहे. ‘रिहाई’सारखा गाजलेला चित्रपट हे एक उदाहरण.
‘गहराई’ची मूळ कल्पना त्यांना ‘शक’ची निर्मिती करताना सुचली होती. त्यांना १९७३च्या ‘दि एक्झॉर्सिस्ट’नेसुद्धा प्रभावित केलं होतं. नंतर ती कल्पना त्यांनी विकास देसाई आणि प्रख्यात लेखक पटकथाकार विजय तेंडुलकरांसह चित्रपट म्हणून लिहिली.
‘गहराई’ची कथा आहे बंगळुरूमध्ये राहणार्या चनबसप्पा यांच्या कुटुंबाची. सुखी चौकोनी कुटुंब असलेल्या चनबसप्पा यांच्या घरात ते, त्यांची पत्नी सरोजा, कॉलेजला जाणारा मुलगा नंदिश, शाळकरी मुलगी उमा हे चौघे आहेत. घरात एक रामा नावाचा आचारी आणि हरकाम्या नोकर आहे. चनबसप्पा यांची गावी बर्यापैकी बागायती आणि शेतजमीन आहे. ती तिथला केअर टेकर बस्वा सांभाळतो आहे. चनबसप्पा यांना बंगळुरूमध्ये मालकीचं घर बांधायचं आहे म्हणून ती गावची प्रॉपर्टी विकायचा निर्णय ते घेतात. बस्वाला बंगळुरूमध्ये किंवा तिथेच पर्यायी व्यवस्था देण्याची योजना करूनच. मात्र जमिनीला आई मानणारा बस्वा मनातून धुमसत असतो. चनबसप्पा परत बंगळुरूला येतात आणि काही काळात त्यांची मुलगी उमा विचित्र वागू लागते. अर्वाच्य भाषेत बोलू लागते. उमाला हे झटके येत नसून तिला कुणा आत्म्याने झपाटलंय असं चनबसप्पा यांचा नोकर रामा म्हणतो. पण चनबसप्पांचा यावर विश्वास नाही. ते उमाला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जातात. तरीही उमाचा त्रास वाढतच जातो. नंदिश आणि सरोजा मांत्रिक तांत्रिक बघू लागतात. या सर्व गोंधळात एक असा भूतकाळ आणि एक असं दडवलेलं सत्य समोर येतं ज्याने चनबसप्पांचं कुटुंब हादरून जातं..
‘गहराई’ अशा क्षणी संपतो जिथे प्रेक्षकांना धक्काही बसलाय आणि नक्की कोणाला दोषी मानायचं हेही कळत नाही. चित्रपटात भूतपिशाच्च, तंत्रमंत्र अशा गोष्टी आहेत ज्या अंधश्रद्धेला खतपाणी घालू शकतील असा आरोप होऊ शकतो. पण त्या काळात अगदी मुंबईसारख्या शहरी भागात भानामती वगैरे गोष्टींचं खूळ होतंच. स्टोनमॅनसारखे हादरवणारे प्रकार होते तर तीन मुंडीवाली बाई अशा अफवा होत्या. चित्रपटात रामसे बंधूंचे भयपट जोरात होते. राजकुमार कोहलींचा ‘जानी दुश्मन’ तिकीटबारीवर चांगला चालला होता. एकंदरीत भयरसाला पूरक वातावरण होतं. शिवाय ‘गहराई’मधला मंत्रतंत्राचा भाग बाजूला ठेवला तरीही ‘गहराई’ हा त्या काळातील एक उत्कृष्ट भयपट म्हणून उरतोच. खरंतर त्या काळातील नव्हे तर आजही.
याचं कारण म्हणजे दिग्दर्शकद्वयी अरुणा-विकास यांनी ठेवलेली चित्रपटाची कमाल संयत आणि वास्तववादी शैली. अगदी आपल्या शेजारच्या घरात हे सर्व घडतंय असं वाटत राहतं बघणार्यांना. आणि त्यामुळेच हा सरळ साधा वाटणारा चित्रपट प्रेक्षकांची भीतीने गाळण उडवतो. काही प्रसंग अफलातून आहेत. वानगीदाखल, एका प्रसंगात उमा बाहेरून घाबरून धावत आलीय. घरी आलेला आर्किटेक्ट बसून चनबसप्पा, सरोजा आणि नंदिशला नव्या घराचं रेखाटन दाखवतोय. उमाची अवस्था बघून तो आवरून निघतो. तोवर आतल्या खोलीत नंदिश आणि सरोजा उमाची विचारपूस करतायत. चनबसप्पाही येऊन बसतात आणि अचानक उमा जणू काही गावच्या पारावर बसली आहे, अशी एक पाय वर घेऊन दुमडून बसते. कोणालाही संदर्भ नसलेली नावं घेत अर्वाच्य भाषेत बोलू लागते. चनबसप्पा, सरोजा आणि नंदिशला हा धक्काच आहे. दुसरा एक प्रसंग म्हणजे उमाला आत्म्याने पछाडलेलं आहे या घरच्यांच्या म्हणण्याने कावलेले चनबसप्पा एका रात्री बेडरूम बाहेर असलेल्या खोलीत येणार्या टेबलाच्या सरकण्याच्या कर्कश्य आवाजाने जागे होतात. दिवा लावून बघतात. काही दिसत नाही म्हणून परत बिछान्यावर अंग टाकतात आणि परत टेबल सरकवल्याचा आवाज येतो. अगदी साधा प्रसंग आहे. विशेष पार्श्वसंगीतही नाही. तरीही तो आवाज आला की प्रचंड भीती वाटू लागते. अजून एक म्हणजे शेवटचा नंदिश आणि एका मुसलमान मांत्रिकाचा जंगलातला प्रसंग अतिशय थरारक झालेला आहे. विशेषत: मागून येणार्या भयानक किंकाळ्या, आवाज, चित्कार हे सगळं त्या अंधार्या, भयाण जंगलाला अजूनच भेसूर बनवतात. मात्र सर्वात हायलाईट आणि वर म्हटल्याप्रमाणे चर्चा किंबहुना वाद घडवून आणणारा प्रसंग म्हणजे उमाला तांत्रिक पुट्टाचारी अघोरी साधनेसाठी नग्न पूजेला बसवतो तो. भयापेक्षा या दृश्यात एक अनपेक्षित धक्का आहे तो कोवळी उमा पाठमोरी नग्न बसलेली दिसणं. नंदिश कसाबसा उमाला त्या बंधातून बाहेर काढतो पण प्रेक्षक त्या धक्क्यातून सावरत नाहीत.
‘गहराई’मधलं पद्मिनी कोल्हापुरेचं बालकलाकार असताना दिलेलं हे दृश्य (काहींच्या माहितीनुसार ते बॉडी डबलकडून करवून घेतलं आहे) प्रचंड खळबळजनक ठरलं होतं. पण त्याहीपेक्षा जास्त परिणामकारक आहे पद्मिनीचा अभिनय. कोवळ्या उमाचे हाल, असहाय्यता, झपाटलेपण, त्यातला आवाजातला बदल हे पद्मिनीने तुफान दाखवले आहेत. एकदा सगळं कुटुंब कॅरम खेळत बसलं असताना ती सोंगटी पडलेल्या पॉकेटकडे एकटक बघत उद्गारते, ‘बहुत गहरा है ये कुंआ. उसका चेहरा सड़ गया है. बदन गल गया है..’ भयानक… चनबसप्पा बनलेल्या डॉ. लागूंनी चनबसप्पाचा कट थ्रोट भावनाशून्य बिझनेसमन, विचारी पण प्रसंगी कठोर होणारा पिता, आपली चूक होतेय हे ज्याला उमजतच नाही असा माणूस उत्तम रंगवला आहे. अनंत नाग प्रचंड देखणे तर दिसले आहेतच आणि नंदिशचा भावनाशील, उत्कट स्वभाव त्यांनी अप्रतिम रेखाटला आहे. एका प्रसंगात नंदिश हताश होतो. आपल्या बहिणीला या अवस्थेतून बाहेर काढायला आपण काहीच करू शकत नाही या भावनेतून तो आपली मिशी काढतो हा प्रसंग म्हणजे अभिनय, लेखन, दिग्दर्शन या तिन्ही गोष्टींचा समसमा संयोग आहे. आई बनलेल्या इंद्राणी मुखर्जी उत्तम तसेच तांत्रिक बनलेले अमरीश पुरी आणि शास्त्री म्हणून येणारे सुधीर दळवी हे अभिनेत्यांचं अचूक नियोजन आहे. सुहास भालेकर यांनी बस्वाची तळमळ उत्कृष्ट दाखवली आहे. रिटा भादुरी छोट्या भूमिकेत आहेत पण चित्रपटाच्या शेवटी त्याच लक्षात राहतात.
बरून मुखर्जी यांचा कॅमेरा गोष्टीमधली गूढता वाढवत ठेवतो. सुरुवातीच्या दृश्यातली चनबसप्पा इस्टेटमधली गर्द हिरवाई किंवा चनबसप्पा यांच्या घरातले प्रसंग, उमा शाळेतून सायकलने येत असताना घाबरते आणि पळत सुटते तो प्रसंग म्हणजे कॅमेरा कथेला धरून त्यातला रस किती प्रभावीपणे पोहोचवू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. कॅमेरा आणि ई. डॅनियल्स यांचं जबरदस्त पार्श्वसंगीत ‘गहराई’ची सामर्थ्यस्थळं आहेत. पार्श्वसंगीतात केलेला भारतीय वाद्यांचा वापर हा अंगावर काटा आणतो. १९७६च्या ‘हा खेळ सावल्यांचा’मधल्या गाण्यांमध्ये आणि पार्श्वसंगीतामध्ये भारतीय तालवाद्यांचा असा वापर झालेला आहे. दुर्दैवाने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत (एक गीत) गुलजार यांनी लिहिलेलं, किशोरकुमार यांनी गायलेलं असूनही प्रभाव पाडत नाही.
‘गहराई’ हा एरवी एक सामान्य भयपट राहिला असता पण स्क्रिप्ट लिहिताना असलेला विजय तेंडुलकरांचा सहभाग सिनेमाला एक वेगळीच खोली देतो. वर वर पाहता कथा एका झपाटल्या गेलेल्या शाळकरी मुलीची असली तरी ‘गहराई’मध्ये शोषक आणि शोषित या अनादी काळापासून चालत आलेल्या प्रमेयाचा, तसंच शहरी मानसिकता विरुद्ध निसर्गाच्या ऋणात राहणं या प्रवृत्तींचा संघर्ष, हा आंतरप्रवाह आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रॉपर्टीवर आलेल्या चनबसप्पाला, बस्वा उत्साहाने ‘अण्णा जमिनीत अमुक करूया. अण्णा तमुक करूया’ असं म्हणत आपल्या योजना सांगतोय. ‘फसल के लिये नया दलाल देखना पडेगा. पुराना दलाल मर गया और उस के बेटे ने बंगलोर में नोकरी कर ली’ म्हणत गावातल्या लोकांचं पारंपरिक व्यवसाय सोडून शहराकडे वळणं फार काही न बोलता लेखक-दिग्दर्शक सांगून जातात. चालता चालता चनबसप्पाच्या पुढ्यात एक नाग येतो. घाबरून आणि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून चनबसप्पा त्याला मारायला काठी उगारतो. बस्वा त्याचा हात धरतो आणि म्हणतो, ‘राखणदार आहे तो. काही करणार नाही.’ चनबसप्पाची प्रतिक्रिया ही अधिकांश लोकांची असू शकते. ज्याची आपल्याला भीती वाटते, त्या गोष्टीचा आपल्याला त्रास असो वा नसो, ती नष्ट करण्याची गरज नसतानाही आपण ते नाहीसं करायला जातो. मात्र बस्वासारखा माणूस निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपल्या जिवाइतकंच जपतो. चनबसप्पाचा निर्णय त्याला अजिबात मान्य नाही. पण त्याच्यासमोर बस्वा बोलू शकत नाही. तो रात्री आपल्या चेमकीला, त्याने ठेवलेल्या बाईला धुसफूसत म्हणतो, ‘अण्णा आपल्या आईलाही विकेल का?’ ही बाई चेमकी त्याची बायको म्हणून राहतेय. बस्वाची बायको महादेवअम्माने फार पूर्वी विहिरीत उडी टाकून जीव दिला आहे. मुलगी चेन्नी हिला बस्वाच्या जबाबदारीवर सोडून. चेमकी खालच्या जातीतली आहे हे चनबसप्पाला पसंत नाही. पण बस्वा म्हणतो, ज्याला सहारा हवा तो जातपात कुठे बघत बसेल.
दुसरीकडे चनबसप्पा हा वरकरणी आधुनिक विचारांचा आणि कर्तबगार माणूस आहे. तो बस्वाच्या पंगतीला बसतो, पण दोन्ही पाय एका बाजूला घेऊन. जेणेकरून बस्वाच्या मांडीला मांडी लावून बसलो असं होऊ नये. चनबसप्पा आदर्श कुटुंबप्रमुख आहे. रॅशनल आहे. पुरोगामी आहे. मुलीला मार्क्स कमी पडले तरी न चिडणारा. मुलाच्या मैत्रिणीशी खेळीमेळीने वागणारा. चोख व्यवहारीसुद्धा आहे. कामगारांना किंवा बस्वाला नुकसान भरपाई दिली, मोबदला दिला की संपला विषय. दुसर्यांच्या भावनेचा फारसा विचार तो करत नाही. प्रत्येक गोष्ट तर्काने जोखणार्या चनबसप्पाला आपल्या मुलीला कोणी आत्म्याने झपाटलं आहे हे मान्य करणंच कठीण जातं. आपल्या तरुण मुलाचा विरोध आणि रोष पत्करून डॉक्टर म्हणतात तसं वागणारा एक ठाम माणूस आहे तो. कालांतराने हडेलहप्पी करणारा चनबसप्पा परिस्थितीमुळे खलनायक ठरू लागतो.
त्याला कारण आहे चनबसप्पाचा भूतकाळ. ज्यात एक भयंकर रहस्य आहे जे उमाला होणार्या त्रासाचं मूळ आहे. इथेच ‘गहराई’चा आशय खोल बनतो. निव्वळ सूड-भयकथा न राहता ‘गहराई’ चित्रपट दुर्बल घटकांचं समाजात सहज होणारं शोषण, विकासाच्या शहरी व्याख्यांचं सरसकटीकरण, निसर्गावर अवलंबून असलेल्या जीवनपद्धतीचं कारखान्यांच्या अतिक्रमणाने होणारं नष्टचर्य यावर प्रकाश टाकतो. यातला कल्पनाविस्तार आणि भूत प्रेत भाग बाजूला केलं तर आपल्याला निसर्गाविषयी कृतघ्न असणार्या समाजाचं, म्हणजे आपलंच रूप त्यात दिसतं. पैसा, प्रतिष्ठा या बळावर बस्वासारख्या आर्थिकदृष्ट्या दुबळ्या आणि समाजाच्या रचनेत असहाय्य असलेल्या माणसांना दाबून गाडून टाकलं जातं. एखाद्या राक्षस किंवा पिशाच्चापेक्षा भयानक आहे माणसाच्या डोक्यावर चढलेलं लोभाचं भूत, ताकदीचा माज…
इकडे आत्म्याने झपाटणे ह्या प्रकारालाच एक वेगळा आयाम मिळतो. एखाद्या आत्म्याने एखादं शरीर पछाडणं हे इथे त्या निर्मम, अत्याचारी वृत्तीची झाडाझडती आहे. बलाढ्य समाज लोभी, असंवेदनशील विचारसरणीने जो संहार करू शकतो त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला विचारलेला जाब आहे हा. अमानुष अत्याचाराचा बळी असलेल्या एका पिचलेल्या माणसाने घेतलेला अमानवी बदला आहे हा.
अरुणा-विकास यांचा दिग्दर्शक म्हणून ‘गहराई’ हा सर्वोत्तम चित्रपट नसेलही, पण भारतीय भयपटांमध्ये ‘गहराई’चं स्थान नेहमी फार वरचं राहील. कारण चित्रपटाच्या शेवटी नंदिश चिडून बस्वाच्या आत्म्याला त्याने असं का केलं हे विचारतो, तेव्हाची उत्तरं तो कोरड्या व्यावहारिकतेने जोखतो… त्यापुढे बस्वाचा ‘वो जमीन मेरी मां थी’ हा आक्रोश ना नंदिशला ऐकू येत…
आणि दुर्दैवाने ना आपल्याला… हीच ती गहराई.
कट इट!
– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)