महाराष्ट्राला व्यंगचित्रांची खरी ओळख कुणी करून दिली, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे उत्तर असेल, ‘मार्मिक’. १९६०पासून प्रसिद्ध होत असणार्या या साप्ताहिकाचे वेगळेपण आजही कायम टिकून आहे. त्यामुळेच मराठी माणसाला ते आपले वाटते.
सुरुवातीपासूनच ‘मार्मिक’ची भाषा रोखठोक राहिलेली असली तरी त्यामध्ये माधुर्य आणि आपलेपणा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक नियतकालिके आली आणि गेली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे आणि आजूबाजूला घडत असणार्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर नेमकं भाष्य यामुळे ‘मार्मिक’ने मराठी माणसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवले आहे. सुरुवातीच्या काळापासून राजकीय विषयांवर सडेतोड विचार त्यात वाचायला मिळत आहेत. त्याने मराठी माणसांची मने जिंकली आहेतच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम ‘मार्मिक’ अव्याहतपणे करत आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अग्रलेखाच्या भाषेत जो प्रखरपणा असायचा तोच त्यांच्या व्यंगचित्रातून दिसायचा आणि विशेष म्हणजे तो मनाला खूप भावायचा. कुंचल्यातून साकारणार्या व्यंगचित्रात काय ताकत असते, हे ‘मार्मिक’च्या चित्रांमधून चांगले उमगते. यामुळेच की काय गेल्या ३० वर्षांपासून माझी मार्मिकबरोबर झालेली मैत्री दिवसागणिक अधिक घट्ट होत चालली आहे.
पुण्यातल्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (म्हणजे बीएमसीसी) शिकत असतानाच वाचनाची गोडी अधिक वाढत गेली. तेव्हा अवांतर पुस्तकांबरोबर दर आठवड्याला येणारी मराठी, इंग्रजी मासिके वाचण्यासाठी मी काहीसा वेळ काढून ठेवायचो. तेव्हा डेक्कन जिमखाना बस स्टॉपसमोर पेपर स्टॉल होता. सोमवार उजाडला आणि नवीन आठवडा सुरू झाला की मला ओढ लागायची ती ‘मार्मिक’च्या नवीन अंकाची. गुरुवारची सकाळ उजाडली की मी कॉलेजला जाण्याअगोदर वाट वाकडी करून तिथे जायचो, ते खास ‘मार्मिक’चा अंक घ्यायला. अंक हातात पडला की तडक कॉलेज गाठायचे, लेक्चरला बसायचे आणि मधल्या वेळात मित्रमंडळी, गप्पागोष्टी यांना फाटा देऊन एक निवांत जागा निवडायची आणि तिथे बसून ‘मार्मिक’चा सगळा अंक वाचून काढायचा, असा नित्यनियम कॉलेज संपेपर्यंत अव्याहतपणे सुरू होता. पुढे, माझा व्यवसाय सुरू झाला, पण ‘मार्मिक’चे वाचन थांबले नाही. कधी काही कारणामुळे अंक हातात पडायला आणि वाचायला उशीर झाला की खूप चुकल्याचुकल्यासारखे वाटायचे. खासकरून त्यात प्रसिद्ध होणारे सिनेमावरील खास शैलीतले लिखाण मला खूप आवडायचे. शुद्धनिषाद यांचे हे सिनेप्रिक्षन वाचूनच नवा सिनेमा पाहायचा की नाही हे आम्ही मित्रमंडळी ठरवायचो.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अद्याप सुटलेला नाही, ‘मार्मिक’ने कायमच हा विषय मांडल्यामुळे आज हा प्रश्न मराठी माणसाच्या मनात कायम आहे. आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील लेख मार्मिकमध्ये प्रसिद्ध झाला की वाचकांच्या नजरेतून तो सुटत नाही. हा विषय किती ज्वलंत आहे, याचे महत्व ‘मार्मिक’नेच महाराष्ट्राला पटवून दिले आहे. कधी काही कामानिमित्त बेळगावला जाणे झाले की तिथे मला ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरील लेख आठवतातच.
पूर्वीपासून अगदी आजपर्यंत ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध होत आलेली व्यंगचित्रेही खूपच बोलकी राहिली आहेत. व्यंगचित्रामध्ये काय ताकद असते ते ‘मार्मिक’मुळेच महाराष्ट्राला समजले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्राकडे आकर्षित होऊन महाराष्ट्रात अनेक नवीन व्यंगचित्रकार तयार झाले आहेत आणि आजही होत आहेत. सामाजिक विषय असो किंवा राजकीय; बाळासाहेबांनी एखाद्या विषयावर चपखलपणे काढलेले व्यंगचित्र मनाला भावायचे. एखादा प्रश्न असेल तर त्यामागे किती विचार असतात, हे नव्या पिढीला पटवून देणायचे काम मार्मिक आजही करत आहे.
सुरुवातीपासूनच एक सडेतोड साप्ताहिक अशी ओळख असणार्या या ‘मार्मिक’ने मराठीजनांची मने जिंकली होती. खास करून तरूण मंडळी त्याच्या प्रेमात होती. आज नव्या रंगात, ढंगात निघत असलेल्या मार्मिकबद्दल आजही मराठी माणसाच्या मनात आपलेपणची भावना कायम आहे. मराठीजनांच्या हृदयात त्याला असणारे स्थान हे खूपच वेगळे आहे.