विधानसभेच्या १९९० सालच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा युती होती, ती १९९२ साली राहिली नाही. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘१९९२ सालच्या मुंबई महापालिका निवडणुका सेना व भाजपा यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अर्थ युती मोडली असे नव्हे, तर ती स्थगित केली आहे. विभागांची पुनर्रचना झाली. काँग्रेसने त्रांगडी निर्माण केली. एकेका मतदारसंघावर दोन-दोन नगरसेवकांचे हक्क शाबीत होऊ लागले. तेव्हा आम्ही युती तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.’ मग शिवसेनेने दोनशे जागा लढवण्याचे ठरवले. सुमारे तीस नगरसेवकांना तिकिटे दिली नाहीत. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा काँग्रेसला ११२, शिवसेनेला ७० जागा मिळाल्या. भाजपाला फक्त १३ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेशी युती न केल्यामुळे भाजपला फटका बसला. शिवसेनेचे मुंबईतले वर्चस्व सिद्ध केले. मात्र या निकालानंतर माधव देशपांडे या जुन्या शिवसैनिकाने बाळासाहेबांच्या विरोधात आघाडी केली. ‘ठाकरे यांचे हिंदुत्व फक्त सोयीपुरते आहे. उद्धव व राज आता निर्णयप्रक्रियेत सामील होतात. त्यांचे संघटनेत योगदान काय? साहेबांनी आपल्याभोवती फक्त होयबा करणारे लोक ठेवले होते. त्यामुळे शिवसेनेला कमी जागा मिळाल्या, जुन्या शिवसैनिकांची घुसमट जाणूनबुजून केली जात आहे, असे बिनबुडाचे आरोप बाळासाहेबांवर केले गेले.
बाळासाहेबांना घराणेशाहीचा हा आरोप सहन झाला नाही. ‘ठाकरे’ घराणे जर शिवसेनेच्या वाटचालीत अडचण ठरणार असेल तर संपूर्ण ‘ठाकरे’ संघटनेपासून दूर राहतील. मग त्यांनी ‘सामना’मध्ये ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ या मथळ्याखाली आपले मनोगत व्यक्त केले.
‘जीवन कसे जगावे हा आदर्श आम्ही आमच्यापुरता पाळला. सुख-दुःखाचे हिशेब ठेवले नाहीत. अनेक सत्त्वपरीक्षांना सामोरे गेलो. शिवसेनेच्या उभारणीत, घडणीत आम्ही काय काय सोसले, काय भोगले याची कल्पना नसणार्या कुत्तरड्यांचा आता सुळसुळाट होऊ लागला आहे. ती आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करून भुंकत असतात. त्यांच्या मडक्यात मुंगीएवढादेखील मेंदू नाही. आपल्या मुलाला आणि पुतण्याला, शिवसेना ही खासगी मालमत्ता समजून ती वाटण्याचा विचार आमचा आहे हे त्याला कुठून कळले? आजपर्यंत आमची असंख्य राजकीय मरणे मरून झाली आहेत. आम्ही शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही. शिवसैनिक हे आमचे प्राण आहे, श्वास आहेत. त्यांनीही आम्हाला जीव लावला. सुख-दुःख वाटून घेतले. कुटुंब, संस्था, संघटना, राष्ट्र हे समर्थ नेत्याशिवाय जगू शकत नाही. मग आम्ही कुठे कमी पडलो? आमचा विचार फक्त मराठी माणसांचा आणि हिंदुत्वाचा.’
‘शिवसेनेचे आम्ही मालक नाही. संरक्षक आहोत. उद्धवला मुलुंड, परळ येथून उभे करा, म्हणून माझ्याकडे विचारणा झाली. त्याने स्वच्छ नकार दिला. राज भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे. आमचा नकार होता, पण सेनेच्या इतर पदाधिकार्यांनी राजच्या नावाचा हट्टच धरला. त्याचा असंख्य लोकांशी संपर्क आहे. बोलणे व वागणे मिठ्ठास आहे. थोडा बेदरकारही आहे. पण व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे. उद्धव सर्वांना सांभाळून, समजून घेतो. आमचा व्याप इतका वाढला आहे की सर्वांना भेटणे केवळ अशक्य. मग उद्धव व राज त्यांचे मनोगत जाणून घेतात. कुठलाही दबाव नाही. एका जरी शिवसैनिकाने मी तुमच्यामुळे शिवसेना सोडली असे सांगितले, तर आता शिवसेनाप्रमुखपद सोडून देऊ. आम्ही प्रॉपर्ट्या केल्या नाहीत. मुलांना घबाडे मिळू दिली नाहीत. ती उभी राहिली स्वत:च्या कर्तृत्वावर, बँकांची कर्जे घेऊन. मी निवडणूक कधी लढवली नाही. लढवणार नाही. तरी घराणेशाहीचे, भ्रष्टाचाराने आरोप? आम्हा ठाकरे कुटुंबीयांना कसलाही सोस नाही. लोभ नाही. आमच्या इमानाला, प्रामाणिकपणाला हीच किंमत असेल तर केवळ पुत्र वा पुतण्याच नाही, तर सर्व ठाकरे कुटुंबच सेनेबाहेर पडत आहे. आम्ही शिवसेनेला अखेरचा दंडवत घालत आहोत. माझ्या खडतर वाटचालीत सावलीप्रमाणे साथ देणार्या असंख्य शिवसैनिकांना आई जगदंबा उदंड आयुष्य देवो, त्यांची भरभराट होवो. तमाम मराठी माणसांना चांगले दिवस येवोत. आम्ही जे दिले ते घासून पुसून घ्या, पटले तर स्वीकारा. यापुढे आम्हाला उद्धव वा राजला भेटण्याचा प्रयत्न करू नका. आम्हीच आमचा मार्ग मोकळा करीत आहोत. आपणा सर्वांना जय महाराष्ट्र!’
दै. ‘सामना’तील या मनोगतामध्ये महाराष्ट्रात अभूतपूर्व खळबळ उडाली. शिवसैनिकांचा मातोश्रीवर जनसागर लोटला. तुफान गर्दी केली. बरेचजण स्वतःची डोकी आपटून, फोडून घेऊ लागले. काहींनी आत्मदहनाची तयारी केली. साहेब निर्णय मागे घ्या, निर्णय मागे घेतल्याशिवाय येथून जाणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. तीन तास खूपच अनिश्चिततेत गेले. शेवटी बाळासाहेबांनी बाहेर येऊन शिवसेना सोडणार नसल्याचे जाहीर केले. ‘मला विस्तव हवा, राख नको,’ असे शिवसैनिकांना सांगितले. मरगळलेले, थंड शिवसैनिक काही करू शकणार नाहीत. आक्रमक, पेटून उठणारे शिवसैनिक हवेत. पूर्वीचे समाजवादी, राष्ट्रसेवा दलातून आलेले पत्रकार, त्यांना एका व्यंगचित्रकाराला प्राप्त झालेले महत्त्व पाहवत नाही. म्हणून ते आगपाखड करत आहेत. एक वादळ घोंघावत होते. सुदैवाने ते शांत झाले.
शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्यावरून वादळ
सांगली येथील एका सभेत ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर’ विषयाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना ठाकरे यांनी नामांतराला विरोध दर्शविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण आदर असल्याचे सांगून ते म्हणाले की, हैद्राबाद मुक्ती लढ्याच्या वेळी डॉ. आंबेडकर निजामाच्या बाजूने होते. एवढंच नव्हे तर ते निजामाचे सल्लागार होते. याच्या मोबदल्यात डॉ. आंबेडकरांना शंभर एकर जमीन मिळाली, हा इतिहास आहे. असं असताना विद्यापीठ नामांतराला मराठवाड्याची जनता मान्यता कशी देईल आणि ती का द्यावी, असा सवाल ठाकरे यांनी केला. एका वर्तमानपत्रात छापण्यात आले की, ठाकरे, डॉ. आंबेडकर यांच्याविषयी बोलताना ते निजामाचे हस्तक होते असे म्हणाले. या बातमीमुळे महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेविषयीचे गैरसमज वृत्तपत्रातून असे पसरविले जात होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा नेण्यात येईल असे ‘नामांतर संघर्ष समिती’ने जाहीर केले. दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी जे उद्गार काढले त्याबद्दल त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याला मारतात तसे गोळ्या घालून मारलं पाहिजे. ते पुढे म्हणाले, ठाकरेंविरुद्ध देशव्यापी आवाज उठविला पाहिजे आणि ठाकरेंची मुजोरी मातीमोल केली पाहिजे. तुळशीच्या बागेत भांगेचा जन्म घेतलेल्या या वांड कार्ट्याला रिल्डल्सच्या वेळी माफ केलं आता मात्र सोडणार नाही.
या आरोपासंबंधी शिवसेनाप्रमुखांनी २५ ऑगस्टच्या ‘सामना’मध्ये पुन्हा स्पष्ट केले की, डॉ. आंबेडकर संदर्भात आपण ‘हस्तक’ हा शब्द वापरलेला नाही. हा शब्द माझा नाही. दै. ‘लोकसत्ता’ने चुकीचे रिपोर्टिंग केले, त्यांनी माझ्या तोंडी हा शब्द घातला. संदर्भित पत्रकार परिषदेची टेप माझ्याकडे आहे. पत्रकारांनी ती ऐकावी म्हणजे खात्री पटेल. यानंतर बाळासाहेब आणि नामदेव ढसाळ यांची भेट झाली आणि पूर्ण समाधान झाल्यामुळे मातोश्रीवरचा नियोजित मोर्चा ढसाळांनी रद्द केला. त्यानंतर बाळासाहेब आणि नामदेव ढसाळांची दोस्ती कायमची घट्ट झाली.
यावर्षी विधानपरिषदेवर शिवसेनेतर्पेâ भारतीय कामगार सेनेचे रमेश मोरे आणि राज्यसभेवर सतीश प्रधान निवडून गेले. १९९२चा शिवसेनेचा प्रतिवर्षी होणारा शिवतीर्थावरील दसरा मेळावा धुंवाधार पावसामुळे रद्द करण्यात आला.
राष्ट्रपतीपदाच्या १३ जुलैच्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. १९९२ साली झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच भाग घेतला आणि ४८ जागांवर विजय मिळवला. मग नंतरच्या काळात अनेक जिल्हा परिषदेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष निवडून आले.