प्रत्येक विषयाचा इतिहास असतो आणि इतिहासाच्या डोलार्यावरच वर्तमान घडत असतो. म्हणून इतिहासातील काही माणसे आणि धडे वगळून समृद्ध आणि निकोप समाज घडवता येणार नाही. आणि चुकीच्या मार्गाने जाणार्यांना जागरूक नागरिकांनी जाब विचारला नाही तर लोकशाही ठोकशाही व्हायला वेळ लागणार नाही.
– – –
भारतीय समाज इतका आध्यात्मिक का आहे, या प्रश्नावर विचार करतांना देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी त्यांच्या ‘सायन्स अँड सोसायटी’ या पुस्तकात प्राचीन भारतातील दोन विचारधारांचा आधार घेतला आहे. आदर्शवाद आणि भौतिकवाद होय, दोन्हींची तुलना उपनिषद काळातही झालेली आहे, याज्ञवल्क्य आणि उद्दालक यांच्या संवादातून दोन्ही बाजू अधोरेखित होतात. याज्ञवल्क्य मुनींनी आदर्शवाद तर उद्दालक मुनी भौतिकवादावर भर देताना दिसतात. कालांतराने आदर्शवादाचा उदोउदो झाला आणि भौतिकवाद बदनाम झाला.
काय आहेत हे दोन्ही विचार? आदर्शवाद हा एक आधिभौतिक दृष्टिकोन आहे, जो भौतिक वस्तूंऐवजी मनातील कल्पनांशी वास्तविकता जोडतो. हे अनुभवाच्या मानसिक किंवा आध्यात्मिक घटकांवर भर देते आणि भौतिक अस्तित्वाच्या कल्पनेचा त्याग करते. तर भौतिकवाद हा तात्विक अद्वैतवादाचा एक प्रकार आहे, जो असे मानतो की पदार्थ हा निसर्गातील मूलभूत पदार्थ आहे आणि मानसिक घटना आणि चेतना या सर्व घटना शारीरिक परस्परसंवादाचा परिणाम आहेत. जे काही अस्तित्वात आहे, ते भौतिक आहे. जे अनुभव आणि प्रत्यक्ष प्रमाण तसेच डोळ्यांना दिसते ते सत्य असे होय.
या सर्वाचा विचार करण्याची गरज पडली कारण आदर्शवाद बळावत गेला आणि भौतिकवाद मागे पडत गेला कारण देवदेवता या कल्पनांवर आधारित होत्या, आणि समाजात विकसित होत गेल्या. विज्ञान कमकुवत होत गेले. सध्या सुरू असलेल्या विज्ञानाच्या विरोधातील वातावरण आणि धार्मिकता बोकाळत जाणे आणि त्यासाठी विरोधाचा आवाज अशक्त होणे ही आदर्शवादाचा उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी इतिहासाची मोडतोड आणि ढवळाढवळ ही काही नवीन गोष्ट नाही. इतिहास ही सतत बदलत जाणारी बाब आहे कारण जसजसे पुरावे समोर येत जातात, नवनवीन बाबी समोर येतात. पण राज्यकर्ते आपल्या हिशोबाने तोडमोड करत असतात, म्हणून जेत्यांचा इतिहास असतो असे म्हटले जाते. तरीही आजकाल इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशनचा धडा काढून टाकणे म्हणजे एक प्रकारे स्वत:चा इतिहास पुसून टाकणे आहे. जो सत्तेवर आला त्याने याआधी सुद्धा अशी ढवळाढवळ केली आहे, पण जेव्हा अनेक पिढ्या या फक्त द्वेषाचा इतिहास शिकत आल्या आहेत आणि तिथेच मग परत बुध्दिवंतांनी विचार करायची गरज आहे.
‘कारवां’ या इतिहासाच्या तरूण विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या व्याख्यानमालेत एक तज्ज्ञांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. प्रोफेसर आदित्य मुखर्जी, प्रोफेसर अन्वेशा घोष, प्रोफेसर मृदुला मुखर्जी, प्रोफेसर पंकज झा आणि सोहेल हाशमी यांनी सहभाग घेतला होता. त्यात आदित्य मुखर्जी म्हटले की, १९४७पासून आरएसएसवर बंदी घातली होती. सांस्कृतिकतेच्या नावाखाली सरस्वती शिशुमंदिर स्थापन झाली आणि एका प्रकारे कम्युनल इतिहासाची शिकवण सुरू झाली. मुस्लीमविरोध हे प्रमुख हत्यार वापरले गेले. १९७७मध्ये जगातील सर्वात चांगले भारतीय तज्ज्ञ एनसीआरटीने बोलावून अभ्यासक्रम तयार केला पण जनता पार्टी सत्तेत आल्यावर त्यांनी ती पुस्तके बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे राष्ट्रप्रेम व राष्ट्रांच्या गौरवाला इजा पोचते असा दावा केला गेला, परंतु त्याविरोधात काही वृत्तपत्रे आणि पत्रकार यांनी आवाज उठवला आणि तो निर्णय मागे घेतला गेला. इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या काही तज्ज्ञांची समिती बसवून चुका काढून एका प्रकारे परीक्षण केले गेले. पण आता युजीसीसारखी फंडिंग एजन्सी सिलॅबस तयार करते आहे. डार्विनच्या तर्काला १०० वर्षांपूर्वी जसा कट्टरपंथीयांनी विरोध झाला होता, तसाच आता होतो आहे. एका प्रकारे स्वत:चा भूतकाळ पुसून टाकायचा हा प्रकार आहे.
डार्विनच्या थेअरीच्या अभ्यासक्रमातून काढून टाकायच्या विरोधात दोन हजार शास्त्रज्ञांनी विरोध केला आहे. तसेच पायथागोरसच्या सिध्दांतालाही कात्री लावत काय साधले आहे कोण जाणे. एखाद्या विचारधारेला स्थान देण्यासाठी प्रस्थापित विज्ञानाला कात्री लावण्यासारखे आहे. आपल्या पुस्तकातून काढले तरी जगाच्या इतिहासात त्या गोष्टी राहतीलच आणि जेव्हा हे विद्यार्थी ते वाचतील तेव्हा आपण खोटा इतिहास शिकवला म्हणून आपल्याला जबाबदार ठरवतील. इतिहास हा फक्त राजेरजवाडे आणि त्यांच्या जयजयकार याचा नसतो तर विविध वैचारिक दृष्टिकोन असलेल्या सुसंवादातून आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक तसेच निसर्ग आणि माणूस यांच्यातील संघर्षात तसेच समन्वयातून कसा उत्कांत होत गेला आणि निरीक्षणाच्या जोरावर आपली प्रगती करत गेला, ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करत गेला हा आहे, त्याला फक्त वांशिकतेच्या जोरावर द्वेष फैलावून आजचा वर्तमान दूषित करणे योग्य नाही.
तज्ज्ञांच्या मतांमध्ये विरोधाभास असणे आणि चर्चेतून नवीन विचार येत जाणे ही प्रक्रिया आहे आणि प्राचीन काळापासून वादविवाद करून आपला मुद्दा मांडला जात असे. ‘नन ऑफ अस हॅव मोनोपोली ऑफ ट्रुथ’. लोकशाही एकच संस्था सर्वांवर ताबा ठेवते हे चित्र चुकीचे आहे. विविध दृष्टिकोनातून वैचारिक टीकात्मक दृष्टीने मंथन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जावा.
आपल्या देशातील निम्मे म्हणजे जवळपास चाळीस टक्के जनता निरक्षर आहे. आणि लोकशाहीचे स्तंभ, प्रसारमाध्यमे ही जाहिराती आणि राजकीय नेत्यांना विकली गेली आहेत. एका प्रकारे दुसर्या महायुद्धानंतर राष्ट्रप्रेम हे फक्त मिलीटरीशी जोडले गेले आहे, ज्या कवायती १५ ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होतात, त्यातील जनसहभाग कमी झाला आणि मिलीटरीचे शक्तिप्रदर्शन होत आहे. ४५ करोड रूपये फक्त प्रसारमाध्यमांवर सरकारचे खर्च होतात, जिथे निम्मे जनता अशिक्षित आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.
प्रश्न हा आहे की, इतकी ढवळाढवळ करण्याइतपत इतिहास हा महत्त्वाचा आहे का? आणि असला तर का? कसा? सत्य सतत बदलत असते. सामाजिक शास्त्रे अभ्यासण्याची एक शास्त्रीय पध्दत विकसित झालेली आहे. नवीन तथ्ये शास्त्रीय तंत्रज्ञान वापरून समोर येत आहेत. पुरातत्वीय पुरावे, भाषिक पुरावे आणि साहित्यिक पुरावे यांच्या द्वारे माणसाचा प्रवास कसा झाला याचा ताळमेळ लागत आहे. सतत भोवताली काही घडत असते. राजकीय विचारसरणी ही एखाद्या वैज्ञानिक शास्त्राला लावून एक प्रकारे अडचण किंवा व्यत्यय येतो. शास्त्रीय जाणिवांना गालबोट लागते. पुरावे तपासून पहाणे, तर्काला धरून समीक्षण करणे, या शास्त्रीय पद्धती आहेत. मिथके आणि इतिहास या दोन वेगवेगळ्या गोष्टी पण एकत्र वाढलेल्या असतात. ज्ञानाचा संवाद, पुनर्विचार पण अडगळीच्या बाबी वगळून होय.
जबरदस्तीने भीतीने ज्ञानात वाढ कशी होणार? कारण, ‘कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन’. पब्लिक ओपिनियन तयार व्हायला तसे वातावरण निर्माण करायची गरज आहे. काही विद्यार्थ्यांना वाटते की इतिहास सर्वांना शिकवायला हवा म्हणजे प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांना होय. कारण प्रत्येक विषयाचा इतिहास असतो आणि इतिहासाच्या डोलार्यावरच वर्तमान घडत असतो. म्हणून इतिहासातील काही माणसे आणि धडे वगळून समृद्ध आणि निकोप समाज घडवता येणार नाही. आणि चुकीच्या मार्गाने जाणार्यांना जागरूक नागरिकांनी जाब विचारला नाही तर लोकशाही ठोकशाही व्हायला वेळ लागणार नाही.