नव्यानं बनवलेला टँकर घेऊन पम्या ट्रॅक्टर हाकीत गावाकडं निघालेला. डांबर उडून केवळ खडी शिल्लक उरलेल्या रस्त्यावरून जाताना त्याला मोठ्या स्पीकरवर गाणे वाजवायची हुक्की येते. चालू टॅक्टरवर तो बराच खटाटोप करतो, पण गाणी वाजत नाही. फक्त गुळणा धरल्यावानी ‘वाऽऽऽऊऽऽवं’ आवाज करून ते बंद पडतं. हे डब्बं त्याला शहरातल्या मोबाईलच्या दुकानात दिसलं होतं. त्याला मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह जोडायची सोय आहे अन् ब्लुटूथनं मोबाईल बी कनेक्ट होतो, म्हणून त्यानं हे डब्बं घेतलं होतं. त्याच्यावर गाणे अशे झंगारमंगार वाजायचे का, ऐकणारे पार नाचायलाच लागायचे. पण आता ते का वाजंना? हेच त्याला उमजंना! म्हणून तो टॅक्टर थांबवून बराच झटतो. पण काय फॉल्ट झालाय, त्याचा पत्ता त्याला लागत नाही. कटाळून तो टांगलेल्या पिसुडीतून पाण्याची बाटली काढतो. अन् न पाहताच झाकण उघडून नरड्यात काणं करतो. त्याच्यातून फक्त एक टिळका पाणी येतं. मागून निथरणारे थेंब जिभेवर घेत तो बुच लावीत गाणं गुणगुणू लागतो. ‘टिप टीप टपका पाणी, पाणी ने आग लगाई। आग लगी दिल में तो, दिल को तेरी याद आयी।…’
‘अय ढेबर्या! टँकरमधी पाणी आहे का?’ वेडी त्याच्यामागं उभी. हातात दोन-तीनशे लिटरचा ड्रम घेऊन. तसं तिचं नाव आईबापानं वेदश्री ठेवलेलं. पण गावात वेडी, येडी म्हणूनच तिला वळखित्या.
‘इथं पेयला पाणी नाही. टँकरमधी कुठून येईल?’ रिकामी बाटली दाखवत पम्या तिलाच कोडं घालतो.
‘मग हा टँकर मिरवायला चालवला का?’ वेडीचा तिरसटपणा.
‘अगं, आता नारळ फोडून गॅरेजातून काढलाय. हे गुलाल दिसंना का तुला? भाऊ म्हणी, बघ आखाजीच्या मुहूर्तावर कुठं पाणी भेटलं तर… रातभर भरून ठेवला तर लिकबिक सगळं कळंल,’ पम्या तिला सांगतो.
‘मग आता कुठं चालला? पाणी भरायला?’ वेडी विचारते.
‘कुठं जावा? मलाच काही माहिती नाही. हे धंदे आपुन कधी करेल नाही,’ पम्या तिलाच प्रतिप्रश्न करतो.
‘तिकडं नदीकाठला निंबाच्या मळ्यातल्या विहिरीवर सगळे टँकर जात्या. तिथं जाऊन बघ. मग जातो का? मला बी येऊ दे! एवढा ड्रम भरला तं पेयचं काम होईल माझं.’ तो नंदी बैलावानी मान हलवतो. वेडी ड्रम घेऊन टॅक्टरवर बसते. पम्या टॅक्टर चालू करतो. त्याचं कॉलेजला असल्यापासून वेडीवर प्रेम आहे, वन साईड. तिला विचारायची त्याची हिंमत कव्हाच झाली नाही. येता-जाता कॅज्युअल बोलणं व्हायचं. पण बाकी… त्याच्यात आज ती शेजारी बसली तर त्याला अगदी मोहरून आलं.
‘अय ढेबर्या! गाणी लाव ना! तुझं कलेक्शन लै भारीय म्हणी?’ वेडीला करमणूक पाहिजे.
‘हे डब्बं बंद पडलं. नुसतं मांजरावानी गुरगुरतं. आज काय झालं कानू? चालंनाच ते!’ पम्या बटणं दाबून दाखवितो तिला.
‘बरोब्बरे! माला पाहून बंद पडलं असंल.’ तिच्या कोटीवर तो गप्प होतो.
आता नदीकाठच्या निंबाच्या मळ्यात जायचं, म्हणजे आधीच्यापेक्षा खराब रस्ता. गाडचाकारीचा. नदीकाठ असून पण उजाड. भकास. दुरून दिसणारी नदी वाळूसाठी अशी खणली गेलीय जसा भलामोठा साप काठीने निर्दयीपणे जागोजागी ठेचलाय. ना आकार नीट राहिलाय, ना रुंदी-खोली सामान्य! काठा-काठानं टॅक्टर विहिरीजवळ जातो. पम्या खाली उतरतो. तिथं काही पाईप मोकळे पडलेले दिसताय. टॅक्टर बघून एकजण दुरून तिथं येतो.
‘काय पाहिजे?’ तो माणूस.
‘पाणी पाहिजे. टँकर भरून.’ वेडी खाली उतरत मागून बोलती.
‘किती लिटरचा टँकर आहे हा?’ तो माणूस पुढला प्रश्न करतो.
‘अँ? कानू! भाऊनं सांगितलं भरून आण. म्हणून आणलाय. मला नाही कळत त्याच्यातलं,’ पम्या गडबडतो.
‘मग किती देणार?’ तो माणूस डायरेक मुद्द्यावर येतो.
‘हां, जो भाव चालू असंल गावात तो देईन,’ पम्या खिशात घालून आणलेल्या काही नोटा बाहेर काढून मोजून बघू लागतो.
‘एवढ्यात होईल का? तू टँकरचा घेरा बघ. काय मोठा आहे ते. एवढ्यात लहाणे दोन टँकर मावतील. त्यात तुझ्या नोटा कमीच दिसू र्हायल्याय,’ तो माणूस शंका व्यक्त करतो.
‘वरचे जे होतील ते ऑनलाइन पाठवतो ना मी!’ पम्या हमी भरतो. पण तो माणूस काही बधत नाही.
‘ग्रामपंचायतच्या विहिरीवर जा. तिथं मिळंल पाणी,’ तो बोलतोय तवर वेडी जाऊन विहिरीत डोकावते.
‘थोडं दिलं असतं भाऊ…’ पम्या चाचरतो.
‘सांगळा निघालाय, आता काही नाही होणार!’ तो माणूस लिंब देतो.
‘कहाचं? पाणी आहे ना विहिरीत. निदान मला एवढा ड्रम तं भरून द्या! घरी पेयला पाणी नाहीय माझ्याकडं! रोख देऊ का लगेच?’ वेडी विहिरी जवळून विचारते.
‘लाईट गेलीय. पाईप फुटलाय. मोटर जळलीय. काय समजायचं ते समज! तू निघ इथून!’ तो जरा कडक भाषेत बोलतो.
पम्या वेडीला आवरत तिचा हात गच्च पकडून टॅक्टरकडं नेतो. आयुष्यात त्यानं पह्यल्यांदा पोरीचा हात धरला असंल. तिला बळजबरीनं टॅक्टरवर बसवतो. टॅक्टर चालू करितो. कुठं नाही तं तिथं दोनेक टँकर येऊन उभे राहत्या. ट्रकची बॉडी काढून टाकी बसवली. तो माणूस टँकरमधी पाईप लावून लगेच मोटर चालू करतो. पण त्याचं अवसान बघून पम्या तिथून निघतो.
‘तू आवरलं नसतं तर मी भांडलेच असते पम्या!’ वेडी अजून रागात आहे.
‘ती त्याची खाजगी विहीर आहे यडे! आपुन काय करू शकतो ना?’ पम्या अगतिकतेने बोलतो.
‘मी सकाळपासून फिरतेय. पण तांब्याभर पाणी मिळेना प्यायला!’ वेडी डोळ्यात पाणी आणून सांगते.
‘जाऊ, गावात जाऊ आपण! तिकडं बघू ना…’ पम्या काही बोलू पाहतो.
‘काय्ये गावात? प्रत्येक घरी एक नवा नळ बसवलाय. एक टाकीबी बांधलीय सिमीटची! पण सगळं कोरडंठाक! कुठं टिपूस नाही! ग्रामपंचायतच्या विहिरीत गणपती बुडवून कचरा-बिचरा फेकून विहीर पार बुजवून टाकलीय.’ वेडी तणफणते.
पम्या गप्प टॅक्टर चालवीत गावात नेतो. बरोबर तलाठी ऑफिसच्या पुढं टॅक्टर उभा करून आत जातो. तिथं तलाठी तात्या बसलेला आहे.
‘तात्या, पाण्याचं काय तरी करा राव!’ पम्या डायरेक विषय काढतो.
‘केलंय की! २७ गाव पाणी योजनेत नाव घातलंय. गावात माणसं कमी नाळ जास्त काढलेत आपण. आणखी काय पाहिजे?’ तात्या वर न पहाताच बोलतो.
‘पण नळाला पाणी येत नाही तात्या.’ पम्या तक्रार करतो.
‘नळ यायला ७० वर्षे थांबला का नाही? आता पाणी यायला थोडी कळ काढा. येईल कधीतरी! त्याच्यात काय?’ तात्या निर्विकारपणे बोलतो.
‘भाऊनं टँकर बनवलाय! त्याला सरकारी हेच्यात घेतलं तं…’ पम्या काही नातं लावू बघतो.
‘इथं सायेबांच्या साल्याच्या नावानं घेतलेले नवेकोरे टँकर टेंडरच्या प्रतीक्षेत गंज धरू र्हायले. त्यांना टेंडर मिळणार नसेल तर आपल्या भागात दुष्काळ दाखवला जाणार नाही. असं वर ठरलंय.’ तात्या खालमानेने सांगत जातो.
‘मग आता?’ पम्या पुन्हा प्रश्न करतो.
‘लई अडचण असंल तर एखाद्या विहिरीत लटकून रील कर. ते मीडियात दे! त्याची सॉल्लिड न्यूज झाली आणि मग वरून सांगितलं तर लावू तुझा टँकर!’ इति तात्या!
‘पण दरसाली तुम्ही उन्हाळ्यातलं नियोजन आधी का करती न्हाई? कुठं पाणी कमी असतं. कुठं गळती होते. कुठं काय..?’ दारात उभी वेडी प्रश्नं करते.
‘मग असतं ना नियोजन! जिल्हाधिकारी कार्यालयात! कुठला भाग कुठल्या टँकर माफियाला द्यायचा याचे रेट आधी ठरतात. कुठल्या नदीतून चिखलाच्या नावानं वाळू उपसायची. याचं नियोजन वसूल खातं ठरवतं. आणि धरणात पाणी शिल्लक असलंच. तर आवर्तन देण्याचं नियोजन बंधारे खात्यात बसून नामदार ठरवित्या. मतदानाचा पॅटर्न काढून. सोपं आहे का हे? आँ?’ तात्या शांतपणे बोलतो.
वेडी आणि पम्या शांतपणे बाहेर येतो. वेडी ड्रम फेकून देते.
‘मी पाणी असलेल्या गावचाच नवरा शोधील. हे गाव मला नकोय आता!’ वेडी चिडून काही बोलते. पम्या काही बोलूच शकत नाही. दोन आळ्या सोडून कुठूनतरी गाण्याचा आवाज येतोय, ‘पानी रे पानी! तेरा रंग कैसा?…’