हल्ली भारतात ज्यांचा युद्धाशी थेट काही संबंध येत नाही, अशांमध्ये युद्धज्वर तापासारखा फणफणला आहे. भारतावर दहशतवादी हल्ला करणार्या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अद्दल घडवली पाहिजे, यात काही शंकाच नाही. पण, भारताची भूमी गिळंकृत करणार्या चीनबद्दल बोलताना सरकारची आणि पाकिस्तानच्या बाबतीत चेव चढणार्या सरकारभक्तांची जीभ लुळी पडते. युद्धाच्या उन्मादाने कोणाचे किती नुकसान होईल, दीर्घकालीन काय परिणाम होतील, या सगळ्याचा विचार सत्तेने करायचा असतो. त्या बाबतीत दोन्हीकडे आनंदी आनंदच आहे. युद्धाची झिंग चढलेली गोदी मीडियामधली वावदूक माध्यमं रोज ज्या प्रकारे यासंदर्भात बातम्या देण्याच्या नावाखाली वेगवेगळे तारे तोडत आहेत, ते पाहिल्यावर नेहरूयुगात बिजू पटनाईक यांचा अतिउत्साह ओसंडून चालला होता, त्याची आणि त्यावर बाळासाहेबांच्या कुंचल्याने ओढलेल्या फटकार्यांची आठवण होते. तेव्हा एकीकडे पं. नेहरू विरोधकांना संवेदनशील माहिती देता येत नाही, हे सांगत होते आणि दुसरीकडे पटनाईक युद्धसज्जतेचे तपशील त्यांच्याच पाठीवर मांडून सगळ्या जगाला दाखवत होते, असे चित्रण बाळासाहेबांनी केले आहे. भारत कसा भारी आहे, याच्या बातम्या देताना आपण पाकिस्तानबरोबरच चीनलाही माहिती देतो आहोत, याचं भान माध्यमांनी बाळगलेलं बरं.