प्रबोधनकारांनी १९२३ची कॉन्सिल निवडणूक जवळून बघितली. त्याचं वर्णन त्यांनी करून ठेवलंय. ते वाचल्यावर आजही निवडणुकांमध्ये फार फरक पडलेला नाही, हे लक्षात येतं. आजच्या निवडणुकांमधल्या नैतिक अध:पतानाची सुरूवात तेव्हाच झाली होती.
– – –
निवडणुका ही आता भारतीय राजकारणाची ओळख आहे आणि सर्वसाधारणपणे निवडणुकांमध्ये नैतिकतेला रसातळाला जातेच. निवडणुका म्हणजेच राजकारण असं समजणारे पुढारी आता सत्तेच्या सर्वोच्च पदावर आले आहेत. त्यामुळे निवडणुकांचा नैतिक स्तर सर्वाधिक घसरला असल्याची टीका होते. पण याची सुरूवात आज झालेली नाही. आजपासून शंभर वर्षांपूर्वीही १९२३ सालच्या मुंबई इलाखा लेजिस्लेटिव कॉन्सिलच्या म्हणजे कायदेमंडळाच्या निवडणुकीतही उमेदवारांनी नैतिकता खुंटीलाच टांगून ठेवली होती. निदान सातारा जिल्ह्यातली निवडणूक अगदी जवळून बघणार्या प्रबोधनकारांना तरी त्यात नैतिकता कुठे दिसली नाही. त्यांनी या निवडणुकीत आलेले अनुभव लिहून ठेवले आहेत.
या निवडणुकीत मान्यवर नेत्यांचा नैतिकअधःपात कसा झाला, हे सांगताना प्रबोधनकार लिहितात, निवडणूक जिंकण्यासाठी कोण काय करील नि काय नाही, याचा धरबंदच नसतो. इरेला पेटला का संभावीतही आपला संभावीतपणा नि सचोटी लिलावात काढतो. मग जात्याच जे संभावीतपणाला पारखे, ते काय अनाचार करणार नाहीत? आधीच प्रबोधनकारांना समाजकारणासमोर राजकारणाचं कौतुक नव्हतं. त्यामुळे ते सातार्याची निवडणूक फारच जवळून तरीही तटस्थपणे बघत होते. भास्करराव जाधव, एव्ही आचरेकर वकील आणि धनजीशेठ कूपर हे ब्राह्मणेतर पक्षाचे तिन्ही उमेदवार प्रबोधनकारांचे स्नेही होते. धनजीशेठने तर निवडणुका लक्षात घेऊनच त्यांना जाळ्यात ओढून सातार्यात आणलं होतं. तरीही प्रबोधनकारांनी कोणाच्याही चुकांवर पांघरूण घातलेलं नाही. `प्रबोधन’च्या टीकेचा आसूड सगळ्या उमेदवारांवर चाललेला दिसतो. त्यातही भास्करराव जाधव आणि ए. व्ही. आचरेकर वकील यांच्यावर त्यांचा घणाघात होता. कारण ते एकमेकांची जात किती कमअस्सल आहे, हे गावोगावच्या सभांमध्ये सांगून मतं मागत होते.
तिकडे धनजीशेठ कूपर यांचा निवडणूक लढवण्याचा खाक्या एकदम वेगळा होता. कारण मुळात धनजीशेठ हे व्यापारी असल्यामुळे ते फायदातोट्याचा विचार करूनच लोकांशी वागत. लोकांना प्रभावित करून जिंकून घेणं, हा त्यांच्या हातचा मळ होता. प्रबोधनकार त्यांच्या स्वभावाविषयी सांगतात, चेहरा म्हणजे हृदयाची तबकडी, असे म्हणतात. पण कूपरच्या बाबतीत हा आडाखा साफ निराळा होता. चेहर्यावर अखंड स्मितहास्य. समोर कोणी किती का तावातावाने आरडाओरडा करो. हा पठ्ठ्या सारखा हसत असायचा. समोरच्याचा संताप संपला का त्याच्या खांद्यावर हात ठेवून कूपर अगदी मोजक्या शब्दांत आणि तोही हसत हसत, त्याला असा काही गारेगार करून रवाना करायचा, की शेण खाल्ले नि कशाला मी या भल्या माणसाशी होड घेतली, असे त्याला वाटायचे. कूपर बोलू लागला का त्याच्या तोंडात साखरेची गिरणी आहे की काय, असा अनुभव येत असे.
कूपरने इतर उमेदवारांसारखा प्रचारसभा आणि त्यातल्या भाषणबाजीवर भर न देता वैयक्तिक संपर्काचा अपूर्व असा मार्ग शोधला. तो रस्ता जात होता दारूच्या बाटलीतून. विश्वकोशातल्या नोंदीनुसार धनजीशेठ यांचे वडील बोमनजी कूपर हे सातार्याच्या सरकारी दारू गोदामात सुतारकाम करत. त्याच परिसरात धनजीशेठ यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. पण त्यांना तरूणपणातच अबकारी कंत्राटदारीच्या खाचाखोच्या कळल्या. त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या दारूविक्री व्यवसायावर त्यांनी एकहाती वर्चस्व मिळवलं. प्रबोधनकार सांगतात तसं, `जिल्हाभरची दारूविक्रीची दुकानं निरनिराळ्या नावांची असली तरी त्यांचा मध्यवर्ती सूत्रधार कूपरच. त्याचे स्नेही नि सहाय्यक कट्टर इनामदार. `धनजीशेठचं जिल्हाभर नेटवर्क होतंच. गावोगाव त्यांच्या ओळखीचे आणि उपकाराने दबलेले लोक होते. त्यामुळे ते धनजीशेठच्या प्रचाराची प्रत्येक मोहीम चुपचाप कुणालाही न कळता पूर्ण करायचे.
मुळात धनजीशेठना निवडणूक नवीन नव्हतीच. त्यांनी सातारा शहराचे नगराध्यक्ष, सातारा जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष, जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष अशी पदं या निवडणुकीच्या आधीच भूषवलेली होती. जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचं वर्चस्व होतं. मराठी विश्वकोशातल्या त्यांच्यावरील नोंदीमध्ये लिहिलंय, राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणने १९२० साली स्थापन झालेल्या ब्राह्मणेतर पक्षात धनजीशा सामील झाले. सातारा जिल्ह्यातील ब्राह्मणेतर पक्षावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे या पक्षाच्या नेत्यांत मतभेद होऊन गटबाजी निर्माण झाली. यावेळी धनजीशा यांनी जिल्ह्यात स्वतःचा राजकीय गट बांधला. तो कूपर पार्टी या नावाने ओळखला जात होता. सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा लोकल बोर्ड, स्कूल बोर्ड इ. संस्था १९२०पासून सुमारे दोन दशके या पार्टीच्या वर्चस्वाखाली होत्या.
अशा प्रकारे अत्यंत चतुर आणि यशस्वी राजकारणी असणार्या धनजीशेठने कॉन्सिलची निवडणूक जिंकण्याची भयंकर क्लृप्ती शोधून काढली होती. ती यशस्वीही ठरली. त्या योजनेचा इत्यंभूत वृत्तांत प्रबोधनकारांनी त्यांच्या आत्मचरित्रात नोंदवला आहे. राजकारणी सर्वसामान्य मतदारांना फसवून त्यांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी काय काय करू शकतात, हे तर दिसून येतंच. त्याचा राग आणि किळस दोन्ही येत असली, तरी प्रबोधनकारांनी त्याचा आंखो देखा हाल मात्र फर्मान रंगवला आहे. तो त्यांच्या शब्दांतच वाचायला हवा.
प्रबोधनकार लिहितात, कूपरचे सहाय्यक केंद्राकेंद्राच्या ठिकाणी आजूबाजूच्या १५-२० खेड्यांतल्या वजनदार खेडूत नेत्यांना आपापल्या घरी मेजवानीला बोलवायचे. दारू मटनाचा चमचमीत बेत. पंगती बसण्यापूर्वी पीत्वा पीत्वा होऊन, मंडळी पानांवर जमताहेत, तोच अचानक अकल्पित (हे सारे आधी ठरलेलेच असायचे) कूपर साहेबांच्या मोटारीचा कर्णा ऐकू यायचा. `अरेच्चा! खानबहाद्दुर आले, अलभ्य लाभ. असा गलका व्हायचा. नेता खानबहाद्दुरांना सामोरा जायचा. वाहवा वाहवा, भाग्य आमचे, वगैरे हस्तिदंती करायचा. खानबहाद्दुरांचे स्पेशल पान वाढण्याची गडबड (तीही अगोदर ठरलेली असायची) चाललेली पाहताच, स्वारी म्हणायची, छे छे पाटील, अहो हे आमचे सारे भाईबंद बसले आहेत, त्यांच्याच पंगतीला मी बसणार. लगेच पंगतीत एखादे पान रिकामे असेल तेथे कूपर जाऊन बसायचा. पुंडलीक वरदा हाएरी इट्टल गर्जनेत भोजन चालू व्हायचे. मुख्य पक्वानांबरोबर तीर्थप्राशनही चालू असायचे. कूपर मात्र स्पर्श करायचा नाही. जेवण अर्ध्यावर आले. भोजक मंडळींची तार पंचमावर चढली, म्हणजे यजमान पाटील पंगतीमध्ये उभे राहून संभाक्षिण करायचे. मित्र हो, खानबहाद्दुर येत्या विलेक्षनात हुबं हायीत. त्येनी समद्या जिल्ल्यासाठी लोखंडी नांगराचा कारखाना काढलाय. शेतकर्याच्या हितासाठी अगदी सवस्त्यात. तवा आज आपून समद्यांनी समूरच्या भाकरीवर हात ठेवून, आपल्या समद्या गावची मतं फकस्त खानबहाद्दुरांनाच देणार, अशा शपथा घेतल्या पाहिजेत. भराभर सारी मंडळी शपथा घ्यायची. हे एवढे काम झाले का खानबहाद्दुरांची मोटार निसटलीच दुसर्या ठिकाणच्या तसल्याच कार्यक्रमाला. ही हकिकत मी स्वानुभवाने लिहीत आहे. कारण त्या बड्या गाड्याबरोबर या छोट्या नळ्याचीही यात्रा जागोजाग होत असे.’
याचा व्हायचा तो परणिाम झालाच. निवडणुका उत्साहात पार पडल्या. धनजीशेठ कूपर अगदी सहजपणे निवडून आले. ब्राह्मण पक्षाचे भाऊसाहेब सोमण हे एकच उमेदवार असल्यामुळे ते निवडून येणार होतेच. भास्करराव जाधव आणि आचरेकर वकील यांच्या टकरीत अस्सलपणाचा दावा करणारे भास्करराव जिंकून आले. मुळात ते मातब्बर उमेदवार होतेच. त्यात त्यांच्या जातीय प्रचाराचा अपेक्षित परिणाम झाला.
यात आचरेकर मात्र पडले. त्यांच्या पराभवाविषयी प्रबोधनकार लिहितात, बिचारा आचरेकर कोसळला! आचरेकर सातारचा एक बहुश्रुत तल्लख विद्वान वकील होता. २३च्या निवडणुकीत त्याला कोल्हापूरच्या पिशवीचा उबारा लाभला होता. या पराभवामुळे सातारी बामणेतरी पुढार्यांबद्दल कोल्हापूरकर भयंकर रूष्ट झाले. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी आचरेकरांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिला होता. भास्करराव जाधवही कोल्हापूर दरबारशी संबंधित. त्यामुळे यात दरबारी राजकारण असू शकतं. त्यात आपण पाठिंबा दिलेला उमेदवार हरल्यामुळे राजाराम महाराज नाराज झाले. प्रबोधनकार सांगतात तसं ए.व्ही. आचरेकर वकील हे खरंच एक चांगले उमेदवार होते. ब्राह्मणेतर चळवळीत लोकजागृतीसाठी त्यांनी मेहनत केली होती. चळवळीच्या संघटनेसाठीही त्यांनी चांगले प्रयत्न केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते जवळचे मित्र होते. बाबासाहेब सातार्यात येत तेव्हा ते आचरेकरांकडेच थांबत. बाबासाहेबांच्या चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता.
प्रबोधनकार म्हणतात की त्यांना या निवडणुकीत पण्टर नावाच्या प्राण्याची ओळख झाली. त्याचं वर्णनही त्यांनी केलं आहे, मुंबईबाहेर पडल्यामुळेच मला या नवीन पण्टर प्राण्यांची ओळख झाली. सुरवंटाप्रमाणे हा प्राणी फक्त निरनिराळ्या निवडणुकांच्या हंगामात जन्माला येतो. पितरपाखाची (म्हणजे पितृपक्षाची) खीर खाऊन सुरवंट नाहीसा होतो, तसा हा पण्टर प्राणी निरनिराळ्या उमेदवारांच्या थैल्या आरपार चाटून आपले घर भरल्यावरच भूमिगत होतो. किंवा अहम् विशेषोस्मि थाटाने समाजात मिरवितो. कूपरच्या पाडळीच्या एका पण्टराने मला दीडशे रूपयांच्या खाड्यात अलगद नेऊन गाडले. उमेदवाराला कसकसल्या थापा देऊन पण्टर लोक बनवितात, याची अनेक उदाहरणे मी पाहिलेली आहेत. विशेष म्हणजे प्रबोधनकारांनी शंभर वर्षांपूर्वी पाहिलेला पण्टर हा प्राणी आजही निवडणुका आल्या की दिसतोच. राजकीय वर्तुळामध्ये त्याची उठबस सुरू होते. एकंदर काळ बदलला तरी भारतीय निवडणुकांचा साचा आहे तसाच आहे.
शनिमहात्म्य या पुस्तकात प्रबोधनकारांनी या निवडणुकांचं वर्णन थोडक्यात केलं आहे, ते असं, इलेक्शनच्या धामधुमीच्या षड्रस मेजवान्या झडल्या, डावपेचाच्या झटापटी घडल्या आणि छापखान्यातून मॅनिफेस्टो हॅण्डबिलांच्या लक्षावधी बातेर्या धडाडल्या. अखेर कपूर वैश्याचा हत्ती जाधव क्षत्रियाच्या घोड्याच्या जोडीने कौन्सिलाभिमुख झाला. कौन्सिल इलेक्शनचा सत्यशोधकी जलसा आटोपताच माझ्या छापखान्याचा व्यवसाय आस्ते आस्ते चालू लागला. विशेष तपशील न देता, एवढे म्हटले म्हणजे पुरे की या पुढील सात आठ महिन्यांच्या अवधींत मी भांडवलशाहीच्या सपशेल पचनी पडावे, यासाठी अनेक प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आले.
प्रबोधनकार अर्थातच भांडवलशाहीच्या पचनी पडले नाहीत. पण या सात आठ महिन्यांत बरंच काही घडलं. त्याने प्रबोधनकारांच्या आयुष्यात उलथापालथ घडवली.