अथांग पसरलेल्या त्या समुद्राकडे तांडेल मोठ्या कौतुकाने बघत होता. अशा या अथांग समुद्राच्या छातीवर डौलाने होडी मिरवणार्या आपल्या सहकार्याचा आणि स्वतःचा देखील त्याला अभिमान वाटत होता. त्याच आवेशात त्याने हातातील दोरखंडाला जोरात पीळ घातला आणि समोर दोरखंडाचे दुसरे टोक हातात धरलेला भूपेन चांगलाच कळवळला.
`तांडेल अरे आता काय माझा हात पण पिरगाळतो का?’ हातातले दोरखंड बाजूला फेकत त्याने रागाने विचारले. आधी काय घडले आहे तेच तांडेलच्या लक्षात आले नाही. जेव्हा आले तेव्हा त्याच्या हास्याच्या गडगडाटाने संपूर्ण होडी थरारली. तांडेलचे हास्य होतेच तसे, त्याच्या दणकट देहाला शोभून दिसणारे गडगडाटी. ही होडी खरेतर शिनूच्या मालकीची. शिनू आणि त्याचा भाऊ राम दोघे ही बोट चालवायचे. जोडीला सांगकाम्या म्हणून बबन नावाचा एक पोरगेलासा तरूण होता. वेळेवर समुद्रात शिरावे, जे काही हाताला लागेल ते जाळ्यात गोळा करून वेळेवर काठावर परत यावे असा त्यांच्या शिरस्ता. काही वेळेला भरपूर मासे हाताला लागत, तर कधी निराशा पदरी पडत असे. एकदा बरेच दिवस असे निराशेच्या कालखंडातून जात असताना ते तांडेलच्या संपर्कात आले आणि त्यांचे नशीब पालटून गेले.
तांडेल जसा शरीराने अवाढव्य, तसा बुद्धीने देखील चतुर. शक्ती आणि युक्तीचा असा संगम फार निराळा. तांडेल देखील कोळी वस्तीमधील. आधी तो जगनच्या बोटीवर कामाला होता. पण त्याने एकदा जगनच्या नकळत त्याची होडी रात्रीच्या वेळी स्मगलिंगच्या कामासाठी वापरली आणि तो फसला. जगनला हे समजताच त्याने तांडेलला मिळालेला हिस्सा तर काढून घेतलाच, वर पोलिसांना कळवायची धमकी देखील दिली. सिंगल हड्डीच्या जगनसमोर तांडेलला हात चोळत गप्प बसावे लागले. पुढे चार महिन्यांत या जगनचे प्रेत एके रात्री जुळ्या खडकांच्या मध्ये सापडले हा भाग निराळा. काय झाले असेल याचा अंदाज काही लोकांना आला होता; पण जगनचे प्रेत आठवले की, त्यांच्या जिभा लुळ्या पडत होत्या. त्या दिवसापासून वस्तीत तांडेलचा एक अनाम दबदबा सुरू झाला होता आणि अशा आवली तांडेलच्या संपर्कात हे दोघे भाऊ आले.
हंसाबाईच्या खोपटासमोर दारू पीत बसलेल्या शिनू आणि रामची नजर सतत डाव्या हाताला बसलेल्या तांडेलकडे जात होती. इथे एक पावशेर मागवायची त्यांची ऐपत नव्हती आणि कोणतेही काम न करणारा, साधे स्वत:च्या मालकीचे जाळे देखील नसलेला तांडेल मस्त बाटली घेऊन बसला होता. त्याच्यासमोरच्या चिकन रश्शाचा वास दोघांच्या आतडीला पीळ पाडत होता. त्यांची ती नजर बहुदा तांडेलच्या देखील लक्षात आली होती. त्याने खुणेने दोघांना जवळ बोलावले, तसे दोघेही हबकले. घाबरत घाबरत दोघेही तांडेलसमोर जाऊन उभे राहिले.
`बसा..’ तांडेल गुर्मीत म्हणाला आणि त्याने समोरची रश्शाची प्लेट दोघांकडे सरकवली. तोंडदेखले `नको..नको.. कशाला?’ असे शब्द उच्चारत दोघांनी समोरच्या दोन भाकर्यांसकट प्लेटचा फन्ना उडवला.
`अजून घेणार?’ तांडेलचा जड आवाज पुन्हा घुमला.
`नको.. उरलेला ग्लास एका दमात रिचवत शिनू म्हणाला. त्याच्या चेहर्याकवर कृतकृत्य झाल्याचे भाव होते. आपल्याला तांडेलसोबत बसलेले कोणी कोणी पाहिले, हे बघण्यासाठी त्याने उगाचच गर्वाने चारीकडे मान फिरवली.
`काय रे शिनू, आज दोन भावात फक्त पावशेर?’ तांडेलने खिल्ली उडवत विचारले.
`तुला तर माहीत आहे तांडेलदादा, सध्या मासे मिळणे पण अवघड झाले आहे. रोजच्या खाण्याची मारामार सुरू आहे,’ खिन्नपणे शिनू म्हणाला.
`मी यासाठी तुम्हा लोकांना सांगत असतो की, जोडधंदा हवा.’
`म्हणजे?’
`आपल्या वस्तीतला साजन बघ. मासे पण पकडतो अन माशाचं कालवण बनवून छोट्या हॉटेलमध्ये पण पुरवतो. त्याला म्हणतात जोडधंदा.’
`खरे आहे तुझे. पण त्याच्या घरी तीन तीन बायका राबायला आहेत. सासरा मस्त पैसेवाला आहे. सगळ्यांचे नशीब थोडेच असे असते? आम्ही दोघे तर अजून बिनलग्नाचे फिरतो आहोत,’ आता राम खंतावला होता.
`तुमची स्वतःची मोठी होडी आहे ना?’ विचारताना तांडेलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती.
`आहे की पण काय उपयोग तिचा? पोटापुरते पण कमावून देत नाही.’
`मला भाड्याने द्या, ते पण फक्त रात्रीच्या वेळेत. प्रत्येक रात्रीचे ५०० रूपये,’ धूर्तपणे तांडेल म्हणाला.
`काय?’ शिनूचा फक्त चक्कर यायची राहिली होती.
`आणि बोट चालवायला कोण येत असेल तर त्याचे ५०० वेगळे,’ तांडेलने पुढचा बॉम्ब टाकला.
`आणि आम्ही दोघे बोटीबरोबर आलो तर?’ रामने घाईघाईने विचारले.
`मला काय कामाला दोन माणसे जास्ती मिळाली, ती पण बोटीसकट तर आनंदच आहे. बरोबर येणार असाल आणि थोडी हमाली करणार असाल, तर रात्रीचे तुमचे बोटीच्या भाड्यासकट २००० रूपये पक्के. शेवटी माझ्या वस्तीतली माणसे आहात तुम्ही,’ कावेबाजपणे सावळ्या म्हणाला आणि दोन्ही भावांच्या डोळ्यासमोर नोटांचा पाऊस सुरू झाला.
`पण नक्की काम काय आहे?’ भानावर आल्यावर शिनूने विचारले.
`हे बघ शिनू, आपण काय लपवाछपवीवाला माणूस नाही. कादरशेठचा दोन नंबरचा माल, म्हणजे कधी घड्याळे, कधी सोने असे किनार्या जवळ येते. ते बोटीत घालून आपण किनार्यामपर्यंत आणायचे. रस्त्यापर्यंत वाहतूक करून, तो माल कादरशेठच्या माणसांच्या हावाली केला की आपले काम संपले. फार फार तर रात्री अर्ध्या तासाचे काम.’
शिनू आणि रामा दोघेही विचारात पडले. आजवरचे संस्कार त्यांना धोक्याचा इशारा देत होते, मात्र शेवटी हव्यासाने सारासार बुद्धीवर मात केली आणि दोघेही तांडेलच्या कळपात सामील झाले.
– – –
आजचा दिवस खास होता. लहान सहान कामे करून आत्मविश्वास वाढलेल्या तांडेलने थेट अलिबाग किनार्यावरून वर्सोव्यापर्यंत माल आणण्याची जबाबदारी घेतली होती. पैसा देखील मजबूत मिळणार असल्याने सगळेच आनंदात होते. सावळ्याचा पूर्वीचा सहकारी भूपेन देखील त्यांच्यात जोडला गेला होता. गेल्या काही दिवसांपासूनची तांडेलची कामगिरी बघता नकळत सर्वांनी त्याला आपला नेता मान्य करून टाकले होते. बबन तर तांडेलचा अगदी भक्त बनला होता. त्याच भक्ताला तांडेलने आज शिडावर चढवून टेहळणीला बसवले होते. सगळे काही सुखरूप पार पडले, तर रात्री दोनपर्यंत ते माल भरून वर्सोव्यात हजर असणार होते.
रात्रीचा भन्नाट वारा आणि समुद्राच्या लाटांचा घनगंभीर आवाज वातावरणात घुमत होता. आजवर किनारा सोडून फारसे कधी पुढे न गेलेले सगळेच थोडे गंभीर झालेले होते. एक तर इतक्या मोठ्या कामाचे मनावर दडपण होते आणि त्यात कधी नाही ते आज समुद्राचे वातावरण काहीसे वेगळे वाटत होते. हवामान खात्याचा कोणताही इशारा नव्हता, पण वर्षानुवर्षे समुद्राशी नाते जुळवून असलेले मन, का कोणास ठाऊक, पण उगाच धोक्याचा इशारा देत होते.
नक्की कुठे घोळ झाला कळले नाही, पण ऐनवेळी माल देणारी माणसे आली नाहीत. त्यांच्याशी संपर्क देखील होत नव्हता, शेवटी कंटाळून रात्री एक वाजता तांडेलने परतायचा निर्णय घेतला आणि उदास मनाने सर्वांनी परतीचा रस्ता धरला. पण निघाले असले तरी सतत सर्वांच्या माना किनार्याकडे वळत होत्या. खुणेचा प्रकाशझोत कोणत्याही क्षणी इशारा देईल असे उगाचच मनाला वाटत होते. शेवटी किनारा देखील दृष्टीआड झाला आणि सर्वांना घराची ओढ लागली. किनारा सोडून ते बरेच पुढे आले आणि अचानक वातावरणात बदल जाणवायला लागला. समुद्र जणू आतून ढवळून निघाल्यासारख्या लाटा वेड्यावाकड्या नाचू लागल्या. निरभ्र आकाश अचानक काळवंडून आले आणि विजांच्या थैमानासह अचानक पावसाने त्यांच्यावर झडप घातली. हे सगळे इतक्या कमी वेळात घडले की, त्यांना सावरायला देखील वेळ मिळाला नाही. एका मोठ्या लाटेने सर्वांना होडीच्या विविध बाजूला भिरकावले आणि सगळे भानावर आले. हाताला लागेल ते घट्ट धरून प्रत्येक जण जीव वाचवू पाहत होता. मोठ्या मुश्किलीने भाड्याने मिळवलेली फेरी बोट अगतिकपणे वारा नेईल त्या दिशेला भरकटू लागली होती. फेरी बोटचे जुजबी ज्ञान असलेल्या भूपेनचे हात पाय गळाले आणि सगळ्यांचा धीर सुटायला लागला.
आपण काही केले नाही, तर आता सर्वजण धीर सोडणार हे लक्षात येताच रेलिंगला आवेशाने पकडत तांडेलने केबिनच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली. यापूर्वी त्याने मौज म्हणून एक दोन वेळा फेरी बोट चालवली होती, पण आजची गोष्ट वेगळी होती. तांडेल जिवाचे रान करत होता, मात्र प्रचंड वारे, अंधार आणि खवळलेला समुद्र या सगळ्यांमध्ये बोट नक्की कोणत्या दिशेला चालली आहे हे त्याला उमगत नव्हते. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले आणि एक लखलखती वीज अगदी त्यांच्या बोटीसमोर कोसळली आणि सर्वांचे डोळे दिपले.
– – –
सर्वात आधी शुद्ध आली ती तांडेलला. त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. भप्पकन सूर्यप्रकाश त्याच्या डोळ्यात शिरला. आधी त्याला आपण कुठे आहोत हे समजेना. मात्र काही वेळात तो भानावर आला आणि त्याने चारी बाजूला नजर फिरवली. बोटीची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. बोट पूर्णपणे एका बाजूला कलंडायला लागली होती, अर्थात खालून बोटीत पाणी शिरायला लागले होते हे नक्की. तांडेलने भराभर इतर चौघांना शोधायला सुरूवात केली. बबन सोडला, तर इतर सर्वजण सुखरूप होते. किरकोळ मार लागला होता, पण ते ठीक होते. बबन मात्र गायब होता. बबनच्या आठवणीने तांडेलसारखा खवीस देखील क्षणभर हळहळला.
– – –
चारी बाजूला अथांग पसरलेला समुद्र आता अगदी निरागस बाळासारखा शांत, सुंदर भासत होता. रात्रीच्या प्रलयाचे चिन्ह देखील कुठे जाणवत नव्हते. पण आपण नक्की कुठे आहोत, हेच कोणाला लक्षात येत नव्हते. समुद्राचा हा हिस्सा त्यांनी आजवर आयुष्यात कधी बघितल्याचे आठवत देखील नव्हते. होकायंत्र देखील काम करत नव्हते. बोटीत शिरणारे पाणी त्यांनी बंद करण्यात तात्पुरते यश मिळवले असले, तरी बोट किती वेळ निभाव धरेल हे सांगणे मुश्कील होते. राम तर रडकुंडीला आला होता. पहाडासारखा तांडेल देखील हतबल झाला होता. मृत्यूची दाट छाया मनावर पसरत असतानाच अचानक समोरून येणारी एक दुसरी बोट त्यांना दिसली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जिवाच्या आकांताने ओरडून ते तिला साद घालायला लागले. खरे तर त्याची गरज नव्हती, अथांग अशा सागरात ती बोट शांतपणे त्यांच्याच दिशेने येत होती.
बोट जवळ येताच सर्वांनी आपापले अत्यावश्यक सामान उचलले आणि सरळ त्या बोटीत उड्या घेतल्या. आता आत पोलीस असतील तरी पर्वा नव्हती; जीव वाचला हे महत्त्वाचे. ते बोटीत उतरले आणि त्यांना पहिला धक्का बसला. अशी बोट त्यांच्यापैकी कोणी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. जणू एकसंध लाकडात कोरल्यासारखी होती. न तिला शीड होते, ना वल्ही. बोटीच्या मशीनचा आवाज देखील येत नव्हता. संपूर्ण बोटीवर स्मशान शांतता पसरली होती. त्यांनी सर्वत्र शोध घ्यायला सुरूवात केली.
सगळ्यात आधी किंचाळला तो शिनू. बोटीच्या एका टोकाला बबनचे प्रेत पडले होते आणि… आणि त्या प्रेताजवळ बसलेला बबन, स्वत:च्या प्रेताकडे निरखून पाहत होता.
बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की, कोणाच्या तोंडातून शब्द देखील बाहेर पडायला तयार नव्हता. भूपेनची तर दातखिळी बसली होती. शिनूने रामनामाचा जप सुरू केला आणि मागे वळून बघत बबनने हातानेच बोटीच्या मागच्या बाजूकडे इशारा केला. काहीसे घाबरत सगळे थोडे पुढे सरकले आणि त्यांनी वाकून मागच्या बाजूला पहिले आणि सगळ्यांच्या पायातले त्राण जणू निघून गेले. बोटीच्या मागच्या बाजूला तांडेल, शिनू, राम आणि भूपेन यांची प्रेते पडलेली होती.
`स्वागत आहे..’ अचानक एक धीरगंभीर आवाज आला आणि सगळेच दचकले. बोटीच्या खालच्या बाजूने एक जिना होता आणि त्यावर फेल्ट हॅट घातलेला, इंग्रजी सैनिक घालतात तसे कपडे घातलेला इसम उभा होता.
`हे सगळे काय आहे?’ थरथरत्या आवाजात तांडेलने विचारले.
`वेल माय फ्रेंड… मला देखील नक्की उमगलेले नाही. मात्र आपल्या विश्वाला लागून असलेले हे बहुदा दुसरे समांतर विश्व आहे आणि इथे शरीराला प्रवेश नाही. वावर फक्त आत्म्यांचा.’
`तुम्ही काय म्हणताय ते मला काही कळत नाहीये. इथून सुटका कशी होणार ते सांगा…’
`मित्रा.. मला देखील ते आजवर समजले नव्हते. किती काळ उलटला माहिती नाही, पण अनेक वर्षापूर्वी आमची आरमारी बोट देखील एक वादळात सापडली आणि आम्ही सहा जण बोटीसकट इथे फेकले गेलो. आम्ही अनेक प्रयत्न केले, हा सारा समुद्र पिंजून काढला. पण ना इथे दुसरा कोणी सजीव आहे, ना कोणता किनारा. पण काल रात्री अचानक समुद्रात वीज चमकली आणि आमची बोट आपोआप त्या दिशेला वळली.’
`तू तर एकटाच दिसतो आहेस!’ तांडेलने आवेशाने विचारले.
`तुम्ही सहाजण असतात, तर मी देखील दिसलो नसतो,’ निराशेने तो अधिकारी म्हणाला आणि त्याने एक जोरदार बुक्का समोरच्या कठड्यावर मारला.
`म्हणजे?’
`म्हणजे इथले नियम वेगळे आहेत. तुम्ही पाच जण आलात आणि माझे पाच साथीदार मुक्त झाले. कुठे गेले, कसे गेले कल्पना नाही. सुटले, का दुसर्या कुठल्या जगात अडकले माहिती नाही. पण इथून त्यांची सुटका झाली.’
`आता पुढे काय?’ नुसत्या कल्पनेने सगळ्यांचा जिवाचा थरकाप उडाला होता.
`आता फक्त वाट बघायची.. नव्याने वीज कोसळण्याची..’ शांतपणे मागे वळत जिना उतरता उतरता तो अधिकारी म्हणाला आणि खालच्या काळोखात नाहीसा झाला.