सुरूवातीपासून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र होते. परंतु लोकांची कामे व्हायला हवी, तर लोकप्रतिनिधी हवेत म्हणून शिवसेना १९६७ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि यशस्वी झाली. तेव्हापासून शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे समीकरण पक्के झाले.
लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका यांमध्ये नागरिकांची जास्तीत जास्त कामे नगरपालिकेकडेच असतात. त्यांच्या दैनंदिन समस्या नगरसेवक व नगरपालिकेचे अधिकारीच सोडवतात. शिवसेनेचे निवडणुकीमधील पहिले पाऊल ठाणे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पडले. १३ ऑगस्ट १९६७ रोजी ही निवडणूक होती. लोकांची नागरी कामे झटपट व्हावीत म्हणून शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक लढविण्याचे ठरविले. प्रचारासाठी शिवसेनाप्रमुखांबरोबर सर्वश्री मनोहर जोशी, दत्ताजी साळवी व सुधीर जोशी उतरले आणि त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. जवळजवळ ७० टक्के मतदारांनी मतदान केले.
लोकसभा निवडणुकीत आधी स. गो. बर्वे आणि त्यांच्या निधनानंतर ताराबाई सप्रे यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना ठाणेकरांच्या मनात रुजली होती. शिवसेनेच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याकरिता अनेकजण तयार होते. पण दुसर्या पक्षाला पाठिंबा देऊन त्यांच्या पदरात यशाचे माप टाकणे आता बस्स झाले, असे ठाण्यातील शिवसैनिकांना वाटू लागले. ठाणेकरांनी स. गो. बर्वे यांना आघाडी मिळवून दिल्यामुळे शिवसैनिकांचा आता विश्वास वाढला होता. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांनी ठाणे नगरपालिकेत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी डॉ. विजय ढवळे (शाखाप्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शाखेचे कार्य चांगले चालले होते. तिथे नोकरी सहाय्य केंद्र स्थापन झाल्यामुळे या केंद्राच्या पदाधिकार्यांनी ठाणे शहराच्या परिसरातल्या औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखान्यांना भेटी देऊन अल्पावधीत जवळजवळ एक हजार मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. हॉटेलमालकांशी चर्चा करून हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात शिवसेनेला यश आले होते. सामाजिक कार्य करीत असताना कलाक्षेत्रातही शिवसेना शाखा कार्यरत होती. त्यामुळे ठाणेकरांचा शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत होता.
शिवसेना उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. शिवसैनिकही लढाईस तयार झाले. शिवसेनेच्या काही उमेदवारांकडे पन्नास रुपये अनामत रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते, त्या सर्वांचे पैसे शाखेने भरले. शिवसैनिकांचा साधेपणा ठाणेकरांना भावला आणि शिवसेनेला भरभरून मतदान केले. १४ ऑगस्ट रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. एकूण ४० जागांपैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले आणि त्यामुळे शिवसेनेचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला. नगरपालिकेत पुढीलप्रमाणे बलाबल राहिले. शिवसेना २१, जनसंघ ८, प्रजा समाजवादी पक्ष ३ व अपक्ष ८ नगरसेवक होते.
दक्षिणेकडील तामिळनाडूमध्ये द्रमुकचा डंका वाजतच होता. पंजाबमध्येही अकाली दलाने हातपाय पसरायला सुरूवात केली होती. देशातील काही राज्यांत आज प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहेत. प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी, फुलवण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज प्रदेशांना वाटू लागली. त्यासाठी निवडणुकीत प्रवेश आणि विजय महत्त्वाचा ठरू लागला. अशा योग्य वेळी ठाणे नगरपालिकेतील विजय शिवसेनेच्या पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरला. शिवसैनिकांचं मनोबल उंचावलं. मुंबई-ठाण्यातील मराठी माणसाला पर्याय सापडला. ठाण्यातील शिवसेनेच्या या निर्विवाद विजयामुळे शिवसेना, मराठी भाषिक जनतेच्या भावनांच प्रतिबिंब व्यक्त करणारा राजकीय पक्ष आहे, असं मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केलं. ठाणे नगरपालिकेतील विजयामुळे शिवसेना नगरसेवकांना नागरी समस्या सोडवण्याची संधी मिळाली. लोकप्रतिनिधींच्या कार्याची, महानगरपालिका प्रशासनाची माहिती मिळाली आणि जबाबदारी वाढली. शिवसेना नगरसेवकांना एक प्रकारे हे आव्हानच होते. ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे वसंतराव मराठे निवडून आले. त्यांच्या सत्कार समारंभासाठी शिवसेनाप्रमुख आवर्जून उपस्थित राहिले. ते भाषणात म्हणाले, ‘‘जनतेच्या हितासाठी लढणारी शिवसेना ही संघटना ठाण्यात निवडणुकीत उतरण्याचा पहिलाच प्रसंग होता. बरेच जण म्हणत होते की, निवडणुका लढणे हे शिवसेनेला झेपणार नाही. आम्ही जनतेची सेवा करणारे असल्यामुळे जनतेचेच आहोत. नगरपालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालू. लोक आम्हाला देशप्रेमाचे धडे देतात. आम्ही प्रथम राष्ट्र, नंतर महाराष्ट्र मानतो. पण महाराष्ट्र जगला तर देश जगेल हे ध्यानात ठेवा. ठाणे शहरात आम्ही सुधारणा करू शकलो नाही, तर खुशाल आम्हाला बाहेर काढा.’’
त्यावेळी शिवसेनेचे ठाण्यातील बिनीचे शिलेदार डॉ. विजय ढवळे, वसंतराव मराठे, नाना गुप्ते, अरुण दोंदे, माधव वाघ, राज देसाई, भाई सामंत, काका बाळकृष्ण, एकनाथ नाफडे आदी होते. या सगळ्यांनी एकजुटीने काम केल्यामुळे शिवसेनेचा भगवा ठाण्यात प्रथम फडकला हे नमूद करावेच लागेल.
ठाण्यातील या विजयाने मुंबई-महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये चैतन्य पसरले. आपण निवडणुका जिंकू शकतो असा आत्मविश्वास शिवसैनिकांना आला. ठाण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या जिंकलेल्या निवडणुकीचा फायदा झाला. गेल्या ५५ वर्षांत ठाण्यामध्ये झालेल्या नगर परिषद, महानगरपालिका निवडणुकीत मधला १०-१२ वर्षांचा काळ सोडला तर सातत्याने शिवसेनेने विजय संपादन केला आहे. एकनाथ शिंदेसोबत ठाण्याचे नगरसेवक गेले असले तरी ठाण्यातील मराठी माणूस सूज्ञ मतदार हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. शिंदेबरोबर गेलेले नगरसेवक परत येत आहेत, तर काही परतीच्या वाटेवर आहेत. जेव्हा ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होईल तेव्हा ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’या खर्या शिवसेनेचाच विजय होईल. कारण शिवसेना म्हणजे ठाणे हे समीकरण कायम आहे. ‘शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना’ हेच सत्य आहे.