माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या गेल्या काही दिवसांपासून का अस्वस्थ आहे याचं कोडं मला आज उलगडलं. सकाळी तो घरी आला तेव्हा मीच त्याला म्हणालो, पोक्या माणसानं काही गोष्टी मनात तुंबवून ठेवल्या असल्यासारखं घुसमटत राहू नये. जे असेल ते मोकळेपणानं बोलावं. मी तुझा एवढा जीवाचा मित्र असताना तू माझ्यापासून तुझ्या मनातलं का बरं लपवतोस? बाकी आपण सर्व विषयांवर बोलतो, भानगडी करतो, मग असा कोणता विषय आहे की तू तो विषय मलाही सांगत नाहीस. यामुळे तुला त्रास होईल. तुझा चेहराच मला तुझं मन सैरभैर झाल्याचं सांगतो. तू खरंच मला स्पष्ट काय ते सांग. मी तुला मार्ग सुचवीन. तसं पोक्याने तोंड उघडलं.
म्हणाला, माझी होणारी लाडकी वधू तुला माहीतच आहे. सध्या आम्ही लिव्ह रिलेशनमध्ये एकत्रच अकरा-अकरा महिन्यांच्या अलिखित करारावर राहातो. पंधरा दिवसांपूर्वी ती म्हणाली होती की तिला बॉडीच्या फिटनेससाठी योगसाधनेचे क्लासेस जॉईन करायचेत. मी म्हणालो, अवश्य कर. वाटल्यास टीव्हीवरील रामदेव बाबांची योगासने बघत जा. त्यापासून शिक. मुंबईत तर सर्व वयोगटातील महिलांसाठी अनेक विभागांमध्ये असे अनेक क्लासेस आहेत. तू अवश्य जा आणि जॉईन हो. त्यामुळे आरोग्यही सुधारेल आणि शरीरही डौलदार आणि अॅक्टिव्ह होईल. गेल्या काही महिन्यांत तू सुटत चाललीयेस हे मलाही जाणवतं. ती हो म्हणाली. पण काय सांगू. दहा-बारा दिवसांपूर्वी ठाण्यात महिलांच्या एका योगाभ्यास संमेलनात ज्येष्ठ योगगुरू रामदेवबाबा यांनी योगासने करणार्या महिलांच्या कपड्यांबाबत आणि सौंदर्याबाबत जे उद्गार आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे म्हणून वाढले त्याचा पेपरातील वृत्तान्त वाचल्यावर माझं डोकंच सणकलं. हिला योगाभ्यासाच्या क्लासला पाठवू का नको, असा संभ्रम मनात निर्माण झाला. काय भयंकर बोलले ते. सर्वच पेपरांनी त्याचं सविस्तर भाषण छापलं नाही. त्यातील ठळक मुद्दे छापले. पण मी त्या भाषणाची व्हिडीओ टेप मिळवून ते संपूर्ण भाषण पाहिलं तेव्हा रामदेवबाबा तिथे ‘कपडे, नग्नता आणि स्त्री सौंदर्य’ या विषयावर स्वत:चे अनुभव सांगून बोलायला तर आले नव्हते ना, असं वाटून गेलं.
ठाण्यात ढोकळी येथे हायलँड मैदानात पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने बाबा रामदेव यांचे योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिलांसाठी विशेष कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कार्यक्रमात योगासनं करणार्या महिलांसाठी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबीर पार पडलं. त्यानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आलं. परिणामी महिलांना साड्या नेसायला वेळ मिळाला नाही. त्या तशाच ड्रेस, सलवार, कुर्ता, सूट पेहरावात संमेलनात सामील झाल्या.
व्यासपीठावर रामदेव बाबांच्या समवेत अमृता फडणवीस, दीपाली सय्यद, आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवी राणा उपस्थित होते. उपस्थित महिलावर्गाशी संवाद साधताना योगगुरू बाबा रामदेव म्हणाले, ‘तुम्ही साड्या घेऊन आला होता, पण वेळेअभावी तुम्हाला त्या नेसता आल्या नाहीत. तरी काही हरकत नाही. आता घरी गेल्यावर साड्या नेसा. तुम्ही साडी नेसल्यावरही सलवार, सूट परिधान केल्यावरही अमृता फडणवीस यांच्याप्रमाणे चांगल्या आणि सुंदर दिसता आणि काही परिधान केले नाही तरी सुंदरच दिसता… उपस्थितांच्या अंकावर एकच शहारा आला. पण थांबतील ते रामदेव बाबा कसले! ते पुढे म्हणाले, पूर्वी लहान मुलांना कोण कपडे घालत होते? मी आठ-दहा वर्षांचा होईपर्यंत कपडे न घालताच फिरत होतो.’ त्यानंतर अमृता फडणवीस यांचा हसरा चेहरा आपल्याकडे करण्याची विनंती करत त्यांनी अमृता यांच्या सदैव हसत राहण्याच्या आनंदी वृत्तीची स्तुती केली. त्यांच्या चेहर्यावर शंभराव्या वर्षीही म्हातारपणाच्या खुणा दिसणार नाहीत, अशी मल्लीनाथी करताना ते म्हणाले, ‘अमृता फडणवीस या मोजकेच अन्न ग्रहण करतात. खुश राहतात. जेव्हा बघावं तेव्हा लहान मुलासारख्या हसत असतात. तसेच स्मितहास्य मला सगळ्यांच्या चेहर्यावर बघायचंय. मुख्यमंत्री दाढीवाल्यांना ऊर्जावान व्यक्ती म्हणाले, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांना विराट व्यक्तिमत्व म्हणाले. दोघे मिळून इतिहास घडवतील, अशी स्तुतीसुमने त्यांनी उधळली. त्यानंतर योगावर काही बोलायला हवं म्हणून भारताकडे महान योगशक्ती आहे. ती महान आहे वगैरे वगैरे सांगून त्यांनी निरोप घेतला. त्यांचं ते भाषण ऐकून मला तर धडकीच भरलीय. हिला योगाच्या वर्गाला पाठवू की नको, असं मला झालंय. मी तर सरकारला विनंती करणार आहे की प्रत्येक योगाभ्यासाच्या वर्गाला आणि त्याच्या संचालकांना सक्त आदेश द्या की त्या वर्गात येणार्या प्रत्येक महिलेने साडी नेसूनच योगाची आसनं करावी. फार तर पंजाबी ड्रेस चालेल. मला तर योगासने शिकवणार्या शिक्षकांची तर भीतीच वाटू लागली आहे. त्या रामदेव बाबांसारखी त्यापैकी काहींची नजर असली तर…!
पोक्या, वेडा आहेस का तू? ते भाजपप्रणीत रामदेवबाबा आहेत. त्यांच्या पाठीशी सरकार आहे. म्हणून ते वाट्टेल ती वायफळ बडबड स्त्रियांबद्दल करू शकतात. तरीही भाजपवाले सोडले तर समाजाच्या सर्व थरातून रामदेव बाबांच्या त्या बोलण्याचा तीव्र निषेध झाला आहे. शेवटी तरीही स्त्री आणि पुरुष हा भेदभाव असतोच. काही ठिकाणी स्त्रियांचे योगाभ्यासाचे, व्यायामाचे वेगळे वर्ग असतात, तर काही ठिकाणी स्त्री-पुरुष एकाच वर्गात हे धडे घेतात. तिथे योगाभ्यास, व्यायाम आणि त्याच्या अभ्यासाला महत्त्व असतं. सच्चा गुरूच्या मनात स्त्रियांना शिकवताना स्त्रीविषयी विकृत भावना कधीही येत नाहीत किंवा त्यांच्या शरीराविषयी अवाजवी आकर्षणही निर्माण होत नाही. तिथे स्त्रीचा आदर केला जातो. म्हणूनच त्यांचे पालक, पती त्यांना विश्वासाने तिथे पाठवतात. मल्लखांबासारख्या व्यायाम प्रकारात तरुण मुला-मुलींना पुरुष शिक्षकच मल्लखांबाचे प्रकार शिकवतात. आणि आजकालच्या मुली किंवा स्त्रिया एवढ्या अडाणी निश्चित नाहीत की त्या एखाद्या विकृत गुरूचा शाब्दिक वा शारीरिक आगाऊपणा सहन करतील. त्या तिथल्या तिथे धडा शिकवतील. तू म्हणशील, मग रामदेव बाबांच्या त्या वाह्यात बोलण्याचा अमृता फडणवीस किंवा उपस्थित दीपाली सय्यद, आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निषेध का केला नाही? कारण त्यांच्यात एवढ्या नावाजलेल्या आणि योगगुरू म्हटल्या जाणार्या, राजकीय वरदहस्त लाभलेल्या व्यक्तिमत्वाविरुद्ध सौम्य भाषेत बोलण्याची किंवा त्यांना सुनावण्याची हिंमत नव्हती. आणि अमृताबाईंविषयी रामदेव बाबांनी स्तुतीसुमने आधीच उधळल्यामुळे त्या हुरळून गेल्या असाव्यात. दीपाली सय्यद आणि आयोजक डॉ. श्रीकांत शिंदेही मूग गिळून गप्प बसले.
हजारो स्त्रिया उपस्थित असलेल्या या योग संमेलनात रामदेव बाबांनी आपलं हसं करून घेतलं याबद्दल महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला त्यांना कधीच क्षमा करणार नाहीत वा यापुढे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला, शिबिराला उपस्थित राहणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून त्या शितावरून तू भाताची परीक्षा करू नकोस. बहुधा भावी पत्नीला अवश्य योगाभ्यासाच्या वर्गाला नियमित पाठव. डोक्यात जी काही जळमटं रामदेव बाबांनी निर्माण केली आहेत ती साफ कर आणि आजपासून सर्व महिलांकडे आणि आपल्या भावी पत्नीकडे आदराने बघ. रामदेव बाबांची दृष्टी तशीच त्यांना सृष्टी दिसणार. काही गोष्टी मनात आल्या तरी जीभेवर येऊ देता कामा नयेत. पण एवढ्या मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मॉडेल व गायिका अमृता फडणवीस यांच्याकडे पाहून त्यांची जीभ घसरली आणि ते नको ते बोलून गेले. सध्या राज्यपालांपासून रामदेव बाबांपर्यंत अनेक नेत्यांमध्ये नको ते बोलण्याची स्पर्धा लागलेली दिसते. तू फार मनावर घेऊ नकोस. स्वत:वर, भावी पत्नीवर आणि आपल्या आदर्शांवर विश्वास ठेव. देव तुझं भलं करील.