अशी आहे ग्रहस्थिती
राहू- हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ (वक्री)- वृषभेत, केतू- तुळेत, रवि- वृश्चिकेमध्ये, बुध, शुक्र धनु राशीत, शनि- प्लूटो मकर राशीत, गुरु मीन राशीत, नेपच्युन कुंभेत, चंद्र कर्केत, त्यानंतर सिंह आणि अखेरीस कन्येत.
दिनविशेष – ११ डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी…
मेष – आठवड्याची सुरुवात अस्थिर वातावरणात होणार आहे. थोड्या फार प्रमाणात अशांती जाणवेल. त्यामुळे चिडचिड होईल. कामात उशीर होईल, त्यामुळे मन निराश राहील. सुरुवातीचे दोन ते तीन दिवस ही स्थिती राहणार आहे, पण त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. आपल्या कामाच्या बाबतीत मनासारखे घडलेले दिसेल. आर्थिक बाजू भक्कम रहाणार आहे. काही मंडळींना आंतरराष्ट्रीय पातळीवरून मानसन्मान, धनलाभ मिळेल. धार्मिक गोष्टींमध्ये सहभागी होताल. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल. संततीसाठी उत्तम काळ रहाणार आहे. कलागुणांना प्रसिद्धी मिळेल. दाम्पत्य जीवनात आनंदी वातावरण राहणार आहे. सरकारी कामे झटपट पुरी होताना दिसतील. कामाच्या ठिकाणी बदली होण्याची दाट शक्यता आहे.
वृषभ – अधिकारप्राप्ती मिळवून देणारा काळ रहाणार आहे. आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर हितशत्रूंवर मात कराल. नोकरी, व्यवसायात चांगल्या संधी चालून येतील. प्रवासात महत्वाच्या वस्तू सांभाळा. कोर्ट कचेरीच्या कामात उशीर होईल आणि अपयश येईल. निरर्थक वेळ घालवू नका. शनिचे भाग्यातील भ्रमण त्यामुळे धार्मिक आणि अध्यात्मिक प्रगती होईल. लाभातील गुरु अनेक दृष्टीने लाभकारक राहणार आहे. फाजील हौस टाळा. मंगळाची सप्तम भावातील दृष्टी त्यामुळे जोडीदारासोबत अनावश्यक वाद वाढतील. त्यामुळे प्रसंगावधान राखा आणि वेळ मारून न्या…
मिथुन – शुक्राचे भ्रमण उत्तम राहाणार आहे. मित्र परिवाराच्या गाठीभेटी होतील. व्यय स्थानातील वक्री मंगळ त्यामुळे नोकरी-उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने फारशी शुभ फळे मिळणार नाहीत. व्यवसायात नुकसान होईल. त्यामुळे काळजीपूर्वक कामे करा. गुरु-चंद्र नवपंचम योग त्यामुळे ११ आणि १२ रोजी अनपेक्षित लाभ मिळणार आहे. दशम भावावर शनीची दृष्टी आता कमी होत आहे, त्यामुळे आपल्या व्यवसायात वाढ होताना दिसेल. पाळीव प्राणी असतील तर त्यांची काळजी घ्या. आपल्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. कोर्ट केसमध्ये पैसे खर्च होतील.
कर्क – आठवड्याची सुरुवात मनासारख्या घटनांनी होणार आहे. आपल्याला कामात सकारात्मक स्थिती पाहायला मिळेल. विविध क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगले यश मिळताना दिसेल. विक्री मंगळाची दृष्टी षष्ठम भावावर त्यामुळे धावपळ कमी करा. अन्यथा काही काळ हा पीडादायक राहू शकते. सुखस्थानातला राहू कौटुंबिक वातावरण बिघडवण्यास कारणीभूत रहाणार आहे. रवि, चंद्र, गुरु आणि शनी मंगळ यांचा नवपंचम योग या काळात सर्वच आघाड्यांवर उत्तम फळ देणारा राहणार आहे.
सिंह – आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात विपरीत राजयोग. रवि, चंद्र, गुरु, शनि व मंगळाच्या नवपंचमयोगामुळे संरक्षण क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी हा काळ खूपच उत्तम राहाणार आहे. सरकारी पातळीवर अनेक मंडळींना मानसन्मान मिळणार आहे. काही मंडळींना वडिलांच्या ओळखीचा चांगला फायदा होताना दिसेल. धडाडीच्या वृत्तीमुळे घेतलेला निर्णय हा तुमच्यासाठी अत्यंत फायदा देणारा राहणार आहे. नव्या घराचा प्रश्न मार्गी लागू शकतो. मित्र परिवाराच्या गाठीभेटी होतील, त्यांच्यासाठी पैसे खर्च होतील. संततीच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल, त्यामुळे आनंदी राहाल.
कन्या – येत्या आठवड्यात तुम्हाला कुटुंब सौख्याचा आनंद मिळणार आहे. स्थावर मालमत्ता, नवे वाहन खरेदी याबाबत अत्यंत शुभ काळ रहाणार आहे. शुभ फळे मिळतील. मंगळ वक्री राहणारा असल्यामुळे मानसिक स्थिती थोडीशी अस्थिर राहू शकते, त्यामुळे काळजी घ्या. स्वभावातील चंचलता कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाढू शकते, त्याचा अपरिणाम आपल्या निर्णयावर होऊ शकतो. कागदपत्र तपासा आणि नंतरच कोणत्याही कागदावर सही करा. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. भाऊ, नातेवाईक मंडळी ऐनवेळी महत्वाच्या कामातून माघार घेतील. कुटुंबातील जेष्ठ मंडळींची काळजी घ्या. कानाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. ११ ते १३ डिसेंबरपर्यंत गुरु-चंद्र नवपंचमयोग आपली सर्व कामे मार्गी लागतील, अशी स्थिती राहणार आहे. अनपेक्षित लाभ मिळू शकतो, मित्रमंडळींबरोबर मौज मस्ती कराल.
तूळ – तुमचे प्रवासाचे बेत दृष्टीपथात येतील. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. विदेशी जाण्याची संधी चालून येईल. शनिची दशम भावावर दृष्टी त्यामुळे जर आपल्या व्यवसायाची घडी बिनसलेली असेल तर ती रुळावर येईल. घरात एखाद्या महत्वाच्या कार्याची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. मित्रांबरोबर काही आर्थिक देवाणघेवाण करणार असाल तर सावधपणाने करा. उगाच अडचण वाढू शकते. तिखट, चमचमीत खाण्यावर नियंत्रण ठेवा. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. मामाकडून सहकार्य मिळेल.
वृश्चिक – सरकारी अधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी यांना समाजात मान मिळेल. संततीला उत्तम यश मिळवून देणारा काळ राहणार आहे. क्रीडा स्पर्धा, खेळ, यामध्ये चांगले यश मिळेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुटुंबासाठी पैसे खर्च होतील. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणारे एजेंट, शेती अवजारांची विक्री करणारे विक्रेते, बांधकाम कच्चा पुरवठा करणारी मंडळी यांना उत्तम काळ राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी धावपळ होण्याची शक्यता आहे. घरापासून लांब जावे लागेल, व्यवसायाचे ठिकाण बदलू शकते.
धनु – काव्य, नाट्य, पेंटिंग यामध्ये रुची असणार्या कलाकार मंडळींसाठी यश मिळवून देणारा काळ राहणार आहे. नावलौकिकात भर पडेल. लग्नी बुध-शुक्र यामुळे नव्या हौसेला जन्म मिळेल. हंस योजगात गुरु त्यामुळे कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल. उंची वस्त्र, अलंकाराची खरेदी कराल. आर्थिक स्थिती उत्तम राहणारा आहे. लाभदायक कामासाठी केलेले प्रयत्न दृष्टीपथात येताना दिसतील. आर्किटेक्ट मंडळींना चांगला काळ राहणार आहे. कामे मार्गी लागताना दिसतील.
मकर – तुम्ही जात व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये चांगली सुधारणा होताना दिसेल. शुक्राचे व्ययस्थानातील राशांतर त्यामुळे धार्मिक कार्यासाठी वेळ देताल. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. शिक्षणाची एखादी संधी चालून येईल. काही प्रमाणात सकारात्मक बदल घडताना दिसून येतील. राहू-केतूचे राशांतर कौटुंबिक आणि व्यवहारी जगात काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकते. पण त्याकडे फार लक्ष देऊ नका. देवाचे नामस्मरण करा.
कुंभ – आगामी काळात तुमच्यासाठी समाधानकारक स्थिती राहणार आहे. शनीचे व्ययातील भ्रमण हे थोडे खर्च वाढवणारे राहणार आहे. कुटुंब, आई-वडील यांच्याकडून चांगली मदत मिळू शकते. संततीला अनेक नव्या संधी चालून येतील. कलाकार मंडळींसाठी उत्तम काळ राहणार आहे. एखादे पारितोषिक मिळू शकते. नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. रवि-गुरु नवपंचम योग व्यवसायात चांगली वृद्धी करेल.
मीन – कर्तृत्वाची चांगली साथ मिळेल. पराक्रमातल्या मंगळामुळे उत्साह वाढणारा आहे. लाभ भावात मकरेचा शनी त्यामुळे चांगले यश मिळताना दिसेल. नोकरीच्या ठिकाणी बढती आणि बदलीचे योग आहेत. १७ तारखेपर्यंत रवि भाग्यात असणार आहे. आगामी काळात महत्वाच्या बदलाचा काळ सुरु होणार आहे, त्याचा चांगला फायदा भविष्यात मिळताना दिसेल. आपल्या धावपळीचा प्रकृतीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ राहणार आहे.