विष्णू राव हा १६ वर्षांचा तरूण. सोलापूरमधल्या रेल्वे लाइनच्या क्वार्टरमध्ये राहात होता. वडील रेल्वेत यांत्रिक विभागात कार्यरत होते. पाच वर्षांपासून तिथे राहात असल्यामुळे विष्णूचे मित्रमंडळ जमले होते, पक्के झाले होते. त्यांच्याबरोबर त्याचे चांगले जमायचे. त्यातले काहीजण आजूबाजूच्याच इमारतींमध्ये राहणारे होते. नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती, त्यामुळे विष्णू घरीच निवांत बसला होता. मुलगा बाहेर फिरण्याऐवजी अधिक वेळ घरात असतो, याचे त्याच्या आईला अप्रूप होते, काहीसे कौतुक होते. पण, विष्णू दिवसरात्र कॉम्प्युटरवर, मोबाइलवर बसलेला असायचा, त्याने ती वैतागायचीही. दोन्ही डिव्हाइसेसवर सिनेमा पाहणे, ऑनलाइन गेम खेळणे, वेबसीरिज पाहणे यामध्ये तो गढून गेलेला असायचा.
विष्णूच्या आईवडिलांना वाटायचे त्याने बाहेर मैदानात खेळायला जावे, जिम करावी, गिर्यारोहणासारख्या उपक्रमात सहभाग घ्यावा, संगणकाचा एखादा कोर्स करावा. त्याबद्दल आई विष्णूला बोलायचीही, पण त्या विषयावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण व्हायचे. कधी कधी तर ते इतके टोकाला जायचे की मी आता घरातून निघून जातो, तुझ्या या भुणभुणीचा मला फार त्रास होतो, असे म्हणत विष्णू घरातून निघून जायचा आणि थेट रात्रीच परत यायचा. रागाच्या भरात मुलाने काही बरेवाईट करून घेऊ नये म्हणून आईवडिलांनी या विषयावर विष्णूशी बोलणेच बंद करून टाकले. दोन महिन्यांचाच प्रश्न आहे, एकदा तो अकरावीत गेला की पुन्हा अभ्यास, कॉलेज यामध्ये व्यग्र होईल, सुटीत त्याला हवे ते करू द्यावे, अशी भूमिका आईवडिलांनी घेतली होती. पण दोनच दिवसांत विष्णूचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने मी जिमला जातो, असे आईवडिलांना सांगितले.
अचानक त्याच्यात हा बदल कसा झाला, याचे दोघांनाही आश्चर्य वाटले. पण आता या विषयावर फार चर्चा नको, तो जायला तयार झाला आहे ना, तर जाऊ दे अशी भूमिका त्याच्या आईवडिलांनी घेतली. जिमला सुरुवात झाल्यानंतर विष्णूला त्याची इतकी गोडी लागली की तो फक्त सकाळीच नाही, तर संध्याकाळीही जिमला जाऊ लागला. त्याच्यातल्या या बदलाचेही आईवडिलांना खूपच कौतुक वाटत होते.
विष्णूचे वडील मिलिंद यांचे काम बर्याचदा शिफ्टमध्ये असायचे. मंगळवारचा दिवस होता, वडील सकाळच्या शिफ्टमध्ये काम करत होते. दुपारी एकच्या सुमारास जेवणाच्या सुटीत त्यांचा मित्र आनंद त्यांना भेटला. तो म्हणाला, मिलिंदराव, किती दिवस तुमची भेट नाही, कुठे आहात? बरे झाले आपली गाठ पडली, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. दोनच दिवसांपूर्वी तुमचा मुलगा विष्णू एका मशिदीमधून बाहेर पडताना दिसला. हे ऐकल्यावर मिलिंद यांना धक्का बसला, ते इतके अस्वस्थ झाले की जेवणासाठी उघडलेला डबा त्यांनी बंद केला. विष्णूचा कुणी मुस्लीम मित्र आहे का, त्याला भेटण्यासाठी तो तिथे गेला होता का, असे नाना प्रश्न त्याच्या डोक्यात घोळू लागले. कामातही त्यांचे मन रमेना, कधी घरी जातोय आणि विष्णूला हा प्रकार नेमका काय आहे, हे विचारतो, असे त्यांना झाले होते.
शिफ्ट संपवून ते घरी आले, तेव्हा विष्णू घरी नव्हता. संध्याकाळी आठच्या सुमारास तो घरी आला तेव्हा वडिलांनी त्याची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली, तू मशिदीतून बाहेर पडताना माझ्या मित्राने तुला पाहिले. नेमका हा प्रकार काय आहे? तू तिथे कशाला गेला होतास? वडिलांनी विचारलेल्या त्या प्रश्नावर विष्णू म्हणाला, ‘नमाज पढायला…’
‘काय?’ त्यांनी हा प्रकार त्याच्या आईला सांगितला. तिलादेखील त्याचा धक्का बसला होता. वडिलांनी विष्णूच्या रूमची तपासणी केली तेव्हा तिथे त्यांना एक ताईतही सापडला. हा सगळा प्रकार पाहून ते दोघेही पूर्णपणे चक्रावून गेले होते. हा प्रकार नेमका काय आहे हे त्यांना समजत नव्हते. विष्णूला त्यांनी याबाबत विचारले तेव्हा, त्याने दोघांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. रागाच्या भरात तो म्हणाला, हो मला मशिदीत जाऊन, नमाज पढायला आवडते, तुम्हाला काय अडचण आहे?
हा सगळा प्रकार डोके चक्रावून टाकणारा होता. यावर मार्ग कसा काढायचा म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे समुपदेशनासाठी नेण्याचा निर्णय घेतला होता. दुसर्या दिवशी सकाळीच ते मानसोपचारतज्ज्ञाकडे गेले. तिथे डॉक्टरांनी विष्णूशी संवाद साधायला सुरुवात केली, तेव्हा बोलता बोलता आपल्याला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागले असल्याचे त्याने सांगितले. या खेळात ‘फरींग हॉर्स’ हा खेळ मला खूपच आवडता असल्याचेही त्याने सांगितले. याची आवड कशी लागली, याची कहाणी विष्णू डॉक्टरांना सांगू लागला होता, एक महिन्यापूर्वी अगदी गंमत म्हणून मी त्याची सुरुवात केली. जिमला येणार्या शमी नावाच्या मित्राने मला हा गेम मस्त असल्याचे सांगितले. गेम खेळण्यासाठी अगदी सोपा होता, त्यामुळे मी तो चटकन शिकून घेतला. या खेळाचे तीन प्रकार होते. उदा. किल्ला जिंकणे, शत्रूचा पराभव करून त्याला नष्ट करणे. दुसर्या प्रकारामध्ये दोन टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळत असत, त्यामध्ये दोन्ही बाजूला युझर हे पीपल होते. तिसरा प्रकार म्हणजे एक खेळाडू आणि त्याच्या आवडीप्रमाणे परिस्थिती, शस्त्र यांची निवड करून खेळ खेळणे. खेळाच्या पहिल्या प्रकाराला नाव होते ‘पृथ्वीला वाचवा’. या खेळात चार खेळाडू एकत्र येऊन एक टीम करत होते. त्यामध्ये विष्णूला शमीने आपल्या टीममध्ये घेतले होते. खेळायला सुरुवात करण्याआधी सर्व खेळाडू एकत्र येऊन प्रार्थना करत. त्यानंतर खेळण्यास सुरुवात करत असत. जेव्हा या खेळात त्यांचा पराभव होत असे तेव्हा आपण का हरलो आहोत, जिंकण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, याच्या टिप्सदेखील या खेळात दिसत असत.
त्यात असे म्हटले होते, टीम मेंबर हे वेगवेगळ्या गावातील आहेत. खेळाडूंनी एकाच वेळी नमाज किंवा प्रार्थना केली तर हा खेळ नक्की जिंकता येतो. सुरुवातीला विष्णूला हे खरे वाटले नव्हते, त्यामुळे तो तसाच गेम खेळत होता आणि त्यात तो हरत होता. पण एकदा शमीसोबत त्याने नमाज पढला आणि नंतर खेळताना त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही प्रार्थना, नमाज पढला आहे काय, त्यावर चौघांनी ‘यस’ असा पर्याय निवडला. त्यानंतर त्यांची टीम या खेळात अगदी सहजपणे विजयी झाली. या खेळात टप्प्याटप्प्याने पुढे जाताना त्यामध्ये जिंकण्यासाठी, नवीन शस्त्रे घेण्यासाठी, आपली ताकद वाढवण्यासाठी काही आयात तर कधी कुरानाचे भाग वाचायला लागायचे. विशेष म्हणजे यासाठी अरबी, उर्दू, शब्दांचे अर्थ, उच्चार सांगणार्या वेबसाइटची लिंक देखील या गेममधून मिळत असे.
अशा पद्धतीने विष्णू या खेळात आणि त्यातून धर्माची गोडी लावण्याच्या प्रकारात अडकत चालला होता. त्याने दिवसातून पाचवेळा नमाजपठण सुरू केले होते. हा सगळाच प्रकार त्याच्या घरच्या मंडळींना नवा होता. अखेरीस त्याच्या काकांनी याची दखल घेऊन सायबर पोलिसांकडे याविषयीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली. हा गेम कोणी तयार केला, ती चालवणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेऊन दिल्ली आणि फिरोजाबादमध्ये छापे टाकून दोन तरुणांना अटक केली. हे दोघेजण सॉफ्टवेअर इंजिनियर होते. मुस्लिम मुलांनी खेळावा म्हणून आपण तो तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इंटरनेटवर गेमिंग करणारा कोणीही संस्कारशील मुलगा तो गेम खेळू शकतो आणि त्याच्याही नकळत यात अडकू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले नसावे किंवा तोच त्यांचा हेतू असावा. पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
हे लक्षात ठेवा…
ऑनलाइन गेममध्ये एकमेकांशी संवाद करण्याची सोय असते. त्याआधारे लहान मुलांची वैयक्तिक माहिती घेता येते. त्यांना प्रभावित करून आपल्या जाळ्यात ओढता येऊ शकते. त्यांचे शोषण करण्याचा प्रकार देखील यामधून होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेटवर गेम खेळताना अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद करणे टाळावे. कुणी व्यक्ती आपल्याशी बोलू लागली तर सजग राहणे, सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर भलत्याच चक्रव्यूहात फसण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.